विक्रोळी रेल्वे स्थानकातील एक विजेचा ट्रान्सफाॅर्मर बंद पडल्याने बुधवारी २५ मेच्या रात्री साडेआठच्या दरम्यान मुंबईतील मध्य रेल्वेवरची उपनगरी सेवा कोलमडली. हा ट्रान्सफाॅर्मर किमान २५ वर्षे कार्यरत असणे अपेक्षित असताना तो दोनच वर्षांत बंद पडला (मध्य रेल्वेने कंपनीला काळ्या यादीत टाकलेय) व हजारो प्रवाशांना असह्य उकाड्यात व अंधारात किमान तीन ते कमाल सहासात तास हालअपेष्टेत काढावे लागले. कोणत्याही स्थानकावर वा लोकलमध्येही प्रवाशांना कळतील अशा याविषयीच्या पूर्वसूचना दिल्या जात नसल्याने प्रवासी लोकलसाठी थांबून होते वा लोकलच्या उकडहंडीमध्ये बसून होते. काय झालंय, कधी दुरुस्त होईल, लोकल कधी सुरू होईल ही किमान आवश्यक माहितीही रेल्वेतर्फे पुरवली गेली नाही. तसंच, संध्याकाळी कामावरून घरी परतण्याच्या गर्दीच्या वेळी हा गोंधळ झाला तरीही प्रवाशांसाठी अतिरिक्त बसही सोडण्यात आल्या नाहीत. रिक्षा, टॅक्सीचालकांनी या संधीचा गैरफायदा घेत नेहमीप्रमाणे अव्वाच्या सव्वा पैसे आकारून त्यांचे मीटर सुरू ठेवले. मुंबई व तिच्या उपनगरांतील मध्य रेल्वेचे जाळे १२० किमीपेक्षा मोठे आहे. संपूर्ण मध्य रेल्वेची व्यवस्था बंद पडण्याचा असा प्रकार यापूर्वी कदाचित २६ जुलैच्या महाप्रलयाच्या दरम्यानच झाला असेल, एरवी एकदोन ट्रॅकवरून रुटुखुटु का होईना, सेवा सुरू असते. यावरून ते बंद पडलेले उपकरण किती महत्त्वाचे होते, याची कल्पना येईल. परंतु, रेल्वे प्रशासन बहुधा हे उपकरण २५ वर्षे निर्धोक चालूच राहील, अशा गाफील विश्वासावर होती की काय असा प्रश्न पडतो. कारण, ते बंद पडल्यावर काय करायचे, रेल्वे सुरू कशी ठेवायची, याचे उत्तर रेल्वेकडे नव्हतेच, परंतु गाड्या बंद पडल्या तर पर्यायी व्यवस्था काय व कशी करायची, याचाही विचार ना रेल्वेने केला ना राज्य/स्थानिक प्रशासनाने. मुंबई अस्ताव्यस्त, अनियंत्रित वाढतेय, रेल्वे व्यवस्था या गर्दीला आवाक्यात घेऊ शकत नाही, रस्त्यांची वाहनं वागवायची क्षमता संपली आहे; मुंबईकर हे सहन करत दिवस कंठत आहेत. सागरी मार्ग, भुयारी मार्ग, मेट्रो, माेनो रेल, हे प्रकल्प सुरू व्हायलाच दहादहा वर्षं लागतायत, त्यामुळे ते सुरू झाले तरी अपुरेच पडतात. असे मार्ग सुरू करण्यात पर्यावरणवादी खोडा घालतात, वाहतूक तज्ज्ञ विरोध करतात, पण काय करायला हवं, हे कोणीच सांगत नाही; प्रत्यक्ष करून दाखवण्याची गोष्ट फार दूरची. मुंबईची श्रीमंत महानगरपालिका, एमएमआरडीए, राज्य सरकार, राजकारणी नेते यांना मुंबईतून मिळणारा फायदा हवा आहे, मुंबईसाठी व मुंबईकरांसाठी दूरदृष्टी ठेवून काहीही करायची कोणाचीच तयारी नाही, क्षमता व आर्थिक पाठबळ पुरवण्याचा प्रश्नच अलाहिदा. यांना जाब विचारण्याऐवजी मुंबईकर गुमान मान खाली घालून अविचारातून व अनास्थेतून होणारे अत्याचार सहन करतात, जमेल तशी एकमेकांना मदत करतात व दुसऱ्या दिवशी पोटाची खळगी भरण्यासाठीच्या प्रवासाच्या मरणयातना भोगायला तयार होतात. यालाच आजकाल मुंबईचं स्पिरिट असं गोंडस नाव मिळालं आहे, याचा अर्थ आहे कितीही त्रास झाला, तरी हसतखेळत पुढे जात राहण्याची मुंबईकरांची वृत्ती. या स्पिरिटमुळेच मंत्रालयापर्यंत त्यांच्या कण्हण्याचा आवाज पोचतच नाही, कारण मंत्रालयातील मोठे अधिकारी व मंत्रिगण, तसंच रेल्वेचे अधिकारी मोटारीने प्रवास करतात, वाहतूक खोळंबली तर पायी जाण्याच्या अंतरावर त्यांची प्रशस्त घरं आहेत. कसाऱ्याहून सुटणारी सकाळी ७.३९ची जलद लोकल पकडण्यासाठी धावणाऱ्या मुंबईकराची घड्याळाच्या काट्यावर चालणारा अशी चेष्टा सगळेच करतात. परंतु जेव्हा हीच लोकल असहकार पुकारते तेव्हा होणारे त्याचे हाल या चेष्टेकऱ्यांच्या कल्पनेपलिकडचे असतात. पावसाळा तोंडावर आहे, यंदा भरपूर पाऊस पडण्याचं भाकीत आहे. पाऊस हवाच आहे, परंतु त्यामुळे रेल्वेचे रूळ पाण्याखाली जातील आणि कामाचा किती दिवस खाडा होईल, याची चिंता मुंबईकरांना परवाच्या प्रकाराने अधिक जाणवू लागली आहे. ट्विटरवर थेट रेल्वेमंत्र्यांना टॅग केलं की रेलविषयक समस्यांचं तात्काळ निराकरण होतं, असा प्रचार आजकाल जोरदार सुरू असताे; तोच ट्विटरोपाय योजण्याचा मार्ग पावसाळ्यात मुंबईकरांसमोर उरण्याची चिन्हं दिसत आहेत.
Comments
Post a Comment