Seize the day.

Sharmishtha with the trophy, designed by Santosh Kale.
प्रियांका डहाळे मित्र परिवारातर्फे ११ मे रोजी, काल संध्याकाळी कुसुमाग्रज स्मारकात प्रियांकाचा पहिला स्मृतिदिन सोहळा रंगला. हो, विचारपूर्वकच रंगला म्हणतेय. 
सात वक्ते तिच्याबद्दल बोलले, तिच्या कादंबरीचं आणि तिच्या कवितांच्या अभिवाचनाच्या आॅडिओ सीडीचं प्रकाशन झालं आणि शर्मिष्ठा भोसले या विलक्षण ताकदीच्या पत्रकार/कवयित्रीला प्रियांकाच्या नावाचा पहिला पुरस्कार दिला गेला. प्रियांकाबद्दल चित्रपट समीक्षक गणेश मतकरी, तिचे वडील सुनील डहाळे, तिच्या गुरु/मैत्रीण वृंदा भार्गवे, प्रकाशक प्रदीप खेतमल, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे मकरंद हिंगणे, नाटककार/लेखक संजय पवार, व प्रमोद चुंचुवार यांनी इतकं काही सांगितलं की, तिच्या कुटुंबीयांना तिची ती नव्याने ओळख होतीच. पण तिच्यासोबत काही वर्षं काम केलेल्या मलासुद्धा तिच्याबद्दल खूप काही नवीन कळालं. सगळ्या वक्त्यांच्या भाषणात तिचे वेगवेगळे पैलू समोर आलेच, पण त्यातही एक सूत्र होतं, कुठेही विरोधाभास नव्हता. हे सातही जण तिच्याशी वेगवेगळ्या नात्यांनी जोडलेले होते, तरीही. सूत्रसंचालक आणि तिचा दिव्य मराठीतील सहकारी पियूष नाशिककर यानेही हे सगळं तिच्या कवितांनी चपखल जोडत नेलं.

वृंदा आणि प्रियांकाचे वडील वगळता इतरांची प्रियांकाशी ओळख काही महिने ते तीनेक वर्षं एवढीच. वृंदा तिला दहाबारा वर्षं तरी ओळखत होती, दोघी कायम संपर्कात होत्या, एकमेकींकडून खूप काही शिकत होत्या. पत्रकारितेची विद्यार्थिनी, लेखिका, नवशिकी पत्रकार अशी प्रियांकाची रूपं वृंदाने पाहिली आहेत. आणि मुंबईला आल्यानंतरच्या एक वर्षात तिच्यात झालेला बदलही त्यांनी टिपला. 

संजय पवारांची व प्रियांकाची ओळख जानेवारी ते एप्रिल २०१५ एवढीच. पण तेवढ्या काळातही ते अनेकदा भेटले, बोलले होते. तिने त्यांना लिहितं केलं होतं दिव्य मराठीसाठी. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या विषयावर लिहाल का, असं तिने विचारल्यावर ते म्हणाले होते, मला लिहायचा कंटाळा आलाय आता, त्यामुळे त्याविषयी बोलायचं असेल तर फोन नका करू. त्यावर तिने दिलेला रिप्लाय होता, ठीकेय, मग मी चित्रं काढायला लागते आता! तो वाचून त्यांनीच तिला उलटा फोन केला आणि त्यांच्यातला संवाद सुरू झाला. लग्न ठरल्याची बातमी तिने त्यांना दिली होती, पण हेही म्हणाली होती, लग्न ठरलंय, मी जातेय साखरपुड्यासाठी. बघू पुढे काय होईल ते. ११ मेच्या संध्याकाळी तिचा मिस्ड काॅल त्यांच्या फोनवर, काही वेळाने त्यांनी केलेला फोन तिने न उचलणं, दुसऱ्या दिवशी सकाळी अनपेक्षित अशा काही मैत्रिणींचे फोनही न उचलणं, आणि यानंतर पाहिलेला नम्रता भिंगार्डेचा एसएमएस Priyanka is no more. वडिलांच्या मृत्यूपेक्षा प्रियांकाच्या मृत्यूचा सल जाणवतो, तिची कादंबरी वाचायची राहूनच गेली, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

गणेशही तिला साधारण वर्ष दीड वर्षं ओळखत असेल. तोही तिला अनेकदा भेटलेला या काळात. तिच्यातली दृश्य माध्यमाची समज, स्वत:चं काहीसं वेगळं मत मांडण्याची पद्धत यावर तो बोलला. 

प्रियांकाला मृत्यूचं आकर्षण होतं, असं वृंदा आणि संजय पवार दोघांच्याही बोलण्यात आलं. आपल्याकडे फार कमी दिवस आहेत, त्यात आपल्याला जमेल तेवढं जगून घ्यावं, वेगवेगळे अनुभव घ्यावे, फिरावं, लिहावं, अनेकांना भेटावं असं तिला कायम वाटत असे, असं त्यांचं निरीक्षण. क्वीन पाहून आल्यावर पॅरिस फिरायचं धोशा तिने लावला होता. किती खर्च येईल, याची माहितीही तिने काढली होती. आम्हाला आॅफिसातही तसं सांगून झालेलं होतं.

गणेशने हे सूत्र कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मांडून कार्यक्रमाचा टोन निश्चित केला होता. Seize the day हे प्रियांकाच्या जीवनाचं घोषवाक्यच होतं जणू, आपण ते आत्मसात करायला हवं, असं तो म्हणाला. पहिला स्मृतिदिन असल्याने तिच्या आठवणी सर्वांच्याच मनात तशा ताज्या होत्या, तरीही सगळ्यांनीच अत्यंत संयत मांडणी केली, कार्यक्रम रुक्ष होऊ न देता. 

पुरस्कार मिळाल्यानंतर शर्मिष्ठाने केलेलं भाषण तिच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही देणारं होतं. कोणतीही कविता हे एक राजकीय स्टेटमेंट असतं, असं ती म्हणालीच होती. तिने प्रियांकाशी तिच्या लिखाणातून झालेली ओळख चांगली मांडून दाखवली. या दोघीही पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनी, दोघींना त्याचा फार आनंद. रानडेतील विद्यार्थी आणि कन्हैयाकुमार या संदर्भात पुण्यात झालेले वाद ताजे असल्याने शर्मिष्ठाने तो उल्लेख आवर्जून केला. भारतातील पत्रकारिता राजकारणापासून वेगळी करताच येत नाही, असं तिने ठासून सांगितलं. पुरस्कारासाठी तिची निवड सार्थ वाटली तिची मतं ऐकून निवड समितीतील सर्वांनाच.

दरवर्षी या पुरस्काराची महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांतल्या पत्रकार तरुणींनी वाट पाहावी, असं त्याचं स्वरूप व्हावं, अशी अपेक्षा संजय पवारांनी व्यक्त केली, ती योग्यच वाटते.

दिव्य मराठीच्या मुंबई व नाशिक कार्यालयातील आम्हा सहकाऱ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजिला होता, तो चांगला सकारात्मक मुद्द्यांनिशी पार पडला, याचं आम्हा सर्वांना समाधान आहे.

Comments

  1. मृण्मयी, मलाही या कार्यक्रमाला येेण्याची खूप इच्छा होती, पण काही कारणांनी ते नाहीच जमलं.. असो...प्रियाबद्दल तू जे लिहिलं आहेस, कार्यक्रमाविषयी जे मांडलं आहेस, ते वाचून मी हा कार्यक्रम मिस केल्याची रुखरुख कायम मनात राहणार..परिचय किती दिवसांचा, यावर ‘ओळख’ अवलंबून नसतेच ना गे..प्रियाचं तसंच होतं, असं आता म्हणावं लागतंय..एकाच दैनिकात काम करणारी सहकारी म्हणून जी प्रिया भेटली त्यापेक्षाही गोड, छान, पॅशनेट असणारी मुक्त विचारांची स्वतंत्र आधुनिक तरुणी म्हणून मला ती अधिक भावली..आमचा बहुतेक संपर्क फोनवरच्या संभाषणातला...प्रत्यक्ष भेट फारच कमी वेळा झाली..आणि मग अचानक एक दिवस आपलं हे पाखरू उडून गेलं...कुठलीही चाहूल न देता...हा सलही कायमचाच...

    ReplyDelete
  2. हो गं. सल तर आहेतच.

    ReplyDelete

Post a Comment