किती फेकाल?

डिस्पोजेबल. फेकून देण्याजोगं. हा शब्द आता परवलीचा झाला आहे सगळीकडेच. प्लॅस्टिक चमचे, कागदाच्या डिश, कागदी रुमाल, शीतपेयांचे टेट्रापॅक, दह्याचे/श्रीखंडाचे डबे, प्लॅस्टिक पिशव्या, पेनं, दाढीची ब्लेड, सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर, इतकंच काय अंतर्वस्त्रंही आहेत फेकून देण्या जोगी. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी आपण यातलं काय इतक्या सातत्याने वापरत होतो, त्याचा विचार केला तर? फारच कमी, हे उत्तर असेल हे नक्की.

नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हे आठवलं. पर्यावरण म्हणजे फक्त शाळेच्या पुस्तकात शिकायचं नव्हे की, दुष्काळ, वाढता उन्हाळा, यावरची चर्चा. पर्यावरण म्हणजे आपण राहतो तो परिसर, आपलं भवताल, आपलं जबाबदार वागणं, स्वच्छता, कचऱ्याची िनर्मिती व विल्हेवाट, इत्यादि इत्यादि. फक्त कचऱ्याचा विचार आपण केला तरी अनेक गोष्टी ध्यानात येतात. सोय व्हावी म्हणून आपण या डिस्पोजेबल वस्तू वापरायला लागलो खरे, पण वापरता वापरता आपण इतके आळशी झालोत की, आता धुऊन पुन्हा वापरण्याचाच आपल्याला कंटाळा येऊ लागलाय. दही घरी कशाला लावायचं, विकत मिळतं की केव्हाही सहज! प्रवासात किंवा सहलीला कुठे ताटंचमचे धुवत बसायचे, नेऊ पेपर प्लेट! दाढीचं ब्लेड बदलायचं कशाला महिन्याभरानंतर, त्यापेक्षा रेझरच बदलू. पेनात रिफिल घालून घेण्यापेक्षा नवीन पेनच विकत घेऊ (जुनं फेकून देऊ)! पाळीच्या दिवसांत घरी असलं तरी कापड वापरून धुवायचे/वाळत घालायचे कष्ट कशाला, नॅपकिन बरे! रोज रुमाल कशाला न्यायचा सोबत, आॅफिसातल्या प्रसाधनगृहात टिश्यू पेपर असतोच! इतकंच काय, मोबाइलही हल्ली आपण लवकर बदलतो पूर्वीपेक्षा. 

एक ना दाेन.

विचार केला तर जाणवतं की, यातला बराचसा कचरा विघटन होऊ न शकणारा, पर्यावरणाला अतिशय घातक आहे. त्यामुळे चला, सकाळपासून रात्रीपर्यंत किती वस्तू आपण एकदोनदा वापरून फेकून देतो कचऱ्याच्या डब्यात, त्याची यादी करू या. त्यावरून आपल्याला कळेल आपण नक्की किती कचरा निर्माण करतोय ते. असं कळलं की, तो कमी कसा करता येईल, ते ठरवता येईल. हो ना?

Comments