काल अधिकृत वर्षा ऋतू सुरू झालाय, त्यामुळे आता तरी पाऊस पडेल अशी आशा आहे. आपण
भारतीय सगळी कामं मुहूर्त, शुभ वेळ, राहूकाल वगैरे पाहून करतो नं, तसाच तो
भारतीय पाऊस. कॅलेंडरमध्ये तिथी काय लिहिलीय, सौर वर्षा ऋतू प्रारंभ असं
स्पष्ट केलंय ना, ते पाहूनच येणार ना तो पठ्ठ्या. तो काय हवामान खात्याचा
अंदाज वगैरे पाहून थोडाच येणारेय. पावशे पक्षी दिसू लागले, घरातल्या
ट्यूबलाइटभोवती किडे नाचू लागले की येतो तो. यंदाइतकी त्याची वाट मात्र
गेल्या काही वर्षांत नव्हती पाहायला लागली.
तो आता केव्हाही येऊन कोसळणार, अशी चिन्हं असलेले उन्हाळ्यातले शेवटचे पंधराएक दिवस मात्र असह्य होऊन जातात. उकाड्यामुळे अंग घामाने भिजत असतं, सगळी माणसं चिडचिडलेली असतात, झाडंही त्रासलेली वाटत असतात. सर्वांनाच हवा असतो ओलावा, आर्द्रता. सगळेच आसुसलेले असतात त्या कोसळणाऱ्या धारांसाठी. प्रत्येकालाच चिंब व्हायचं असतं सृष्टीच्या या आनंदोत्सवात.
अरे, सगळं ठीकेय, पण त्याला काय हवंय, त्याला काय करायचंय, काय करावंसं वाटतंय हे आपण नको का विचारात घ्यायला? किती स्वार्थीपणा करायचा तो! वाटत असेल त्याला कधी सुटी घ्यावी, ढगांच्या विमानात बसून भटकत राहावं निरुद्देश. इतक्या उंचावरून खाली पडल्यावर लागलंबिगलं तर, अशी भीती नसेल का त्याला वाटत?
गंमत सोडा, पण यंदा खरोखरीच छान पाऊस होऊ देत, तलाव, धरणं भरून वाहू देत, धरणीमाय तृप्त होऊ देत. वर्षा ऋतूतल्या वर्षावाचा आनंद भारतीयांना मन:पूत लुटता येऊ देत.
चार महिने गेले की आहेच रखरखाट, पाणीटंचाई, रबी/खरीपावर संकट, चाराछावण्या, वगैरे. कारण आपण कितीही त्रासातून गेलो तरी शिकणारे नाहीच ना? जबाबदारीने वागायचं, दूरदृष्टी, भविष्यवेधी निर्णय वगैरे दिवास्वप्नं असावीत आपल्यासाठी असंच वागत आलोय आपण आजवर, यंदा तरी वेगळे वागू अशी अपेक्षा का बरं ठेवावी कुणाकडूनही, सरकार वा आपण सर्वसामान्य जनतेकडूनही?
तरीही, आता मात्र वर्षाव होऊ दे, हे खरंच.
Comments
Post a Comment