सौंदर्याचे ठोकताळे

स्त्रियांच्या सौंदर्याचे काही निकष अनादी काळापासून चालत आले आहेत. त्वचेचा रंग/वर्ण, केसांचा पोत व लांबी, कपाळ, डोळे, नाक वगैरे वगैरे... अनेक वर्षांपासूनचे हे नियम पुरुषांच्या नजरेतून किंवा इतरांच्या दृष्टीतून स्त्रीने कसं असावं, दिसावं हे सांगतात. तिची त्वचा गोरी, नितळ असावी, शरीरावर (डोकं वगळता) कुठेही केस नसावे, हा यातला अगदी महत्त्वाचा नियम. त्यामुळेच जिकडेतिकडे उगवलेल्या ब्यूटी पार्लर्समध्ये सर्वाधिक मागणी असते ती भुवया कोरणे आणि वॅक्सिंग या दोन कामांना. वॅक्सिंग ज्यांनी केलंय त्यांना हे चांगलंच ठाऊक असेल की, ते किती वेदनादायक असतं. आणि तरीही दर महिन्याला जाऊन अनेक स्त्रिया हा अत्याचार स्वत:च्या शरीरावर करून घेतात. त्या हे का करतात, या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं येईल कदाचित. मला आवडतं, असं म्हणतीलही काही जणी. पण ते का आवडतं, याचं उत्तर तो सौंदर्याचा एक निकष आहे, माझं वैयक्तिक मत नाही, हे त्या स्पष्ट नाही सांगणार. माझं शरीर आहे, डोईवरच्या केसांचा अंबाडा बांधायचा की, वेणी घालायची की, बाॅब करायचा, हे मी ठरवेन, त्याचं स्पष्टीकरण मला इतर कुणाला देण्याची गरज नाही. वॅक्स न केलेले हातपाय, काखा व इतर अवयव हा माझा निर्णय आहे, मला गरम मेण त्यासाठी शरीरावर ओतून घेणं नि ते खेचून काढणं नाही पटत, असं किती जणींना वाटतं? अमेरिका व युरोपात काही दिवसांपूर्वी काखेतले केस रंगवण्याची फॅशन आली होती. स्त्रीवादी भूमिका स्पष्ट करणारी ती कृती होती. तुम्हाला आवडतं म्हणून आम्ही आमच्या शरीरावर अत्याचार सहन करणार नाही, आम्ही आहोत तशा स्वीकारा, हे त्यामागचं सांगणं होतं. या ठिकाणी हे लक्षात घ्या की, स्त्रियांनी अस्वच्छ, गबाळं राहणं अपेक्षित नाही. तर त्यांना जसं हवं तसं राहण्याचं, कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य त्यांना असणं अध्याहृत आहे. त्यांच्या सौंदर्याचे निकष त्यांनी ठरवायचे आहेत, पुरुषप्रधान समाजाने नाही. एका फॅशन मॅगझीनवरच्या प्रियांका चोप्राच्या गुळगुळीत काखांवरून गेल्या आठवड्यात मोठा वाद झाला, त्यामुळे हे सांगावंसं वाटलं.

Comments