एक ती जर्दजांभळा स्लीवलेस कुडता घातलेली
तिच्या केसांमधले स्प्लिट एंड्स शोधत तोडत बसलेली
अर्धा तास होऊन गेला तरी
एक ती न्हाऊन आलेली
ट्रेनमध्ये बसल्या बसल्या गोल्डन क्लिप काढून
केस मोकळे सोडून सावध डुलक्या घेणारी
शेजारचीच्या खांद्यावर पडत नाहीयोत ना
याची काळजी घेत
एक ती विशीतली लठ्ठशी मुलगी
केस टोकाशी पांढरे रंगवलेली
जाड फ्रेमच्या चष्म्यातून फोनकडे पाहात बसलेली
एक ती प्याजी रंगाची महेश्वरी साडी नेसून
स्टेशन येईपर्यंत सगळ्या व्हाॅट्सअॅप ग्रूप्सवरचे
सगळे मेसेज भक्तिभावाने वाचणारी
एक ती पन्नाशीतली, शार्प नाकाची
खांद्यावरनं ओघळणाऱ्या कुडत्याची काळजी न करता
पुण्याला जाताना किती गरम होतं ते
फोनवरनं बहिणीला सांगणारी
एक ती नवपरिणीता पंजाबन
हातभर लालसोनेरी चुडा घातलेली
पाठीवरची सॅक मांडीवर ठेवून
फोनवर आॅफिसचं मॅटर डिस्कस करणारी
एक ती ट्रेन पकडण्यासाठी धावता धावता
मोगऱ्याच्या गजऱ्यांच्या पाटीशी थबकून
"कसा दिला गं मोगरा?' विचारणारी
एक होता तो दादरच्या ब्रिजवर मित्राच्या गळ्यात हात टाकून
चालता चालता, लाल झालेले डोळे पुसणारा
"ठीक होईल रे सगळं,' सांगणाऱ्या मित्रावर
विश्वास ठेवावा की न ठेवावा या दुविधेत अडकलेला
ही, ती, तो, ते, त्या
मानेवर घामात मिसळलेल्या पावडरच्या पांढऱ्या वळकट्या मिरवणारे
गदमदलेल्या वातावरणाला कंटाळून
बॅगेतल्या पाण्याच्या बाटल्या संपवून
स्टेशनवरचं रंगीत सरबत पिणारे
मिनिटामिनिटाला रुमालाने घाम पुसत
श्श श्श म्हणत सुस्कारे सोडणारे
आणि एक होती ती
इतकं काही हॅपनिंग असूनही आजूबाजूला
कितीही खोल खणलं तरी पाणी न लागणाऱ्या बोअरसारखी
२०० फुटाहून खोल खणण्यावरची बंदी झुगारून
कोणीतरी आतल्या ओलाव्यापर्यंत पोचेल
याची वाट बघणारी...
Comments
Post a Comment