Back to the roots

आषाढीच्या निमित्ताने गावात निघालेली छोटी दिंडी
आजोळी जायला मिळणं ही इतर बहुतेकांसारखीच आम्हा पटवर्धन भावंडांसाठीही आनंदाची बाब. आम्ही काही कोणत्या सणाला तिथे नियमाने जातो असं नव्हे, पण वर्ष दोन वर्षांतनं एकदा फेरी होतेच.

मागच्या आठवड्यात एका घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने मामेभावाचं बोलावणं आलं, सगळ्यांनी जमू या. धार्मिक विधी काहीही नाहीत, निव्वळ गप्पांसाठी. गुरुवारी आॅफिसातलं काम आटोक्यात आहे, असं लक्षात आल्या आल्या दुसऱ्या दिवशी निघायचं ठरवलं, एका छोट्या गाडीत माझ्यापुरती जागा होती ती मुक्रर केली. आणि शुक्रवारी पहाटे आम्ही चौघं गणेश गुळ्याच्या वाटेला लागलोही.

मुंबईच्या बाहेर पडताच हिरव्यागार शेतांनी आणि डाेंगरांनी डोळे निवून गेले. This is a cliche, I know. पण तेच खरं आहे. हिरव्या रंगाच्या अनेक छटा डोळ्यांना शांतावत होत्या. भरपूर पाऊस झाल्याने रस्त्याच्या आजूबाजूला शेतांमध्ये पाणी साठलेलं होतं, अनेक ठिकाणी लावण्या सुरू होत्या, क्वचित पूर्ण झालेल्या होत्या. नद्या दुथडी वाहात होत्या. कुठे संथ, कुठे फेसाळलेल्या, कुठे उग्र, कुठे लाटांनी हिंदकळणाऱ्या. काळ, अांबा, वशिष्ठी, सावित्री या नद्यांपैकी एखादी सोबतीने वाहात होती, तर एखादीला आम्ही ओलांडत होतो. (एक सडवली नावाची छोटी नदीही होती वाटेत.) छोटेमोठे धबधबे, ओढे, ओहोळ तर असंख्य. ऊन नव्हतं, पाऊसही नव्हता, ताजी स्वच्छ गार हवा फक्त होती, त्यामुळे मोटारीचा प्रवासही सुखाचा ठरला. रस्ताही बरा होता जाताना, येताना मात्र तीन दिवसांत त्याचे तीनतेरा वाजलेले होते.

महाडच्या आसपास जीपीएसने जवळचा रस्ता म्हणून एका जरा आडरस्त्याला पोचवलंन. जवळजवळ तासभरात एखाददुसरीच गाडी दिसली असेल. एका बाजूला डोंगर, उजवीकडे हिरवीगार दरी, दरीत उतरलेले कापसासारखे ढग, छोट्याशा गावातली कौलारू घरं, लालपिवळंकेशरी मंदिर, लहानशी नदी. आपण एकटेच आहोत रस्त्याला, अशी जाणीवही होऊ दिली नाही या दृश्याने.

जाताना कोलाडच्या जरा पुढे डावीकडे पांढऱ्या फुलांची दोन शेतं दिसली. गाडी पुढे गेली होती लक्षात येईस्तो, मागे नाही घेतली. आणि असंही वाटलं की, एक शेत आहे म्हणजे आणखीही असतीलच. पण पुढे काही दिसलं नाही तसं. त्यामुळे येताना अगदी लक्ष ठेवून होतो या शेतांकडे. नशिबाने पाऊस नव्हता. गाडी थांबवली, दारं उघडली आणि एका मंद गोड सुवासाने आम्हाला घेरून टाकलं. चिखलातनं धडपडत आम्ही त्या लिलीच्या शेतात पोचलो आणि वेडावून गेलो. फोटो काढावे की, गंध श्वासात भरून घ्यावा की, त्या पांढऱ्या-हिरव्या गालिच्याकडे पाहात राहावं, हेच कळेना. तिन्ही केलंच अाम्ही अर्थात. Not to be missed असाच हा स्पाॅट.

चिपळूणला जेवून निघालो तेव्हा जीपीएसने सांगितलं की, सव्वापाचला आपण गुळ्यात पोचू. आणि खरोखरीच सव्वापाचला आम्ही घरासमोर होतो. मला फारच अप्रूप वाटलं याचं.


घरी बरीच मंडळी जमली होती. संध्याकाळचा चहा सुरू होता. चहा घेऊन आम्ही समुद्रावर निघालो. मी अनवाणीच निघाले. मला त्या लाल मातीचा मऊशार स्पर्श आणि मधूनच बोचणाऱ्या खड्यांनी मिळणारा अॅक्युप्रेशरचा फील फार आवडतो. घरापासून समुद्रापर्यंत बहुतेक चाल मातीतून होती, शंभरदीडशे मीटर डांबरी रस्ता असेल फक्त. पुढचे दोन दिवस मी अनवाणीच फिरत होते, मुक्त अशी. समुद्रावर पोचलो तो किनाऱ्यावरच्या सुरुबनाला पकडायला येणाऱ्या लाटांनीच आमचं स्वागत केलं. किनाऱ्यावर फक्त आम्ही. थोडा वेळ पाण्यात खेळून आम्ही गावातल्या तळ्याकडे आलो. पोरांनी पाण्यात धबाधब उड्या टाकल्या, आम्ही काठावर बसून मजा पाहात होतो.

अंधार पडायच्या आत घरी परतलो. आंघोळी केल्या. मग गप्पांचं जे सत्र सुरू झालं ते पुढचे दोनअडीच दिवस सुरूच राहिलं. रात्री पाचसहा तास जे झोपलो तेवढ्यापुरतंच शांत होतो. नाहीतर हसणं आणि बडबड, अविरत.

रात्री आमच्या घरगुती कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम झाला. दोन भाचे तबल्यावर धमाल करत होते आणि मेव्हणा गात होता. दोन तास कसे गेले कळालंही नाही.

दुसऱ्या दिवशी दुपारी तिसऱ्या पंगतीत जेवून जरा आडवं व्हावं म्हणून ओटीवर आले तो लॅडीजचा डाव रंगत आलेला, माजघरातून भांड्यांचा, गप्पांचा आवाज येत होता. बाहेर हलका पाऊस होता, गारवा होता हवेत त्यामुळे जरासा. हातशेवया आणि रसाचं जेवण झालेलं होतं, डोळ्यांत झोप भरून आलेली. सुख म्हणतात ते हेच ना?

या सुखाचा एक वेगळा पैलू होता मोबाइलचं नेटवर्क, म्हणजे नेटवर्कची अनुपस्थिती. सडा आेलांडून खाली उतरतानाच नेटवर्कने मान टाकली. मग चुपचाप स्विच आॅफ करून मोबाइल बॅगेत टाकून दिला, तो निघतानाच बाहेर काढला. त्यामुळे दोनअडीच दिवस नो फेसबुक, नो व्हाॅट्सअॅप. त्यामुळे चश्माही बॅगेतनं निघाला नाही. आणि डोळ्यांना विश्रांती मिळाली ती वेगळीच, त्यात हिरव्या रंगाचं टाॅनिक होतं त्यांना.

तिसऱ्या दिवशी सकाळी सातला बाहेर पडायचं ठरवलं होतं. पण कोणाचाच पाय निघेना. साडेआठला निघालो शेवटी, जड मनाने.

Going back to the roots असं जे म्हणतात, त्याचा अर्थ दर वेळी आजोळी गेले की, मला नव्याने कळत जातो. माझी आई कुठून आली, कुठवर पोचली, आणि अजून ती तिथेच किती घट्ट रुजलेली आहे, ते वेगवेगळ्या पद्धतीने जाणवत राहातं. माझ्या लेकीलाही तसंच काही वाटत असेल का?  

Comments

  1. Loved it masi... Apt to the feelings we had :)

    ReplyDelete
  2. Mast mrin ....those who hv not attended feeling jealous ...

    ReplyDelete
    Replies
    1. हो गं, आम्हीही तुम्हाला खूप मिस केलं.

      Delete
  3. छानच गं.लकी आहेस.

    ReplyDelete
    Replies
    1. एकदा जाऊ आपण तिथे, आवडेल तुलाही.

      Delete
  4. Replies
    1. i don't know who you are Pravaasi, but thank you!

      Delete
  5. गुळयाचे खुळे - मधाचे पोळे असं आदित्यने लिहीलं होतं - ते किती समर्पक आहे !!

    ReplyDelete
  6. अगदी खरंय. आपण सारेच खुळे.

    ReplyDelete
  7. ए मावशी खूप सुंदर लिहिला आहेस . आम्ही ३G तुम्हा २G चे आभार मानतो फॉर द रूट्स . KEEP THE GOOD WORK YAR.

    ReplyDelete
  8. 2G अजिता, धन्यवाद. तुम्ही सगळे यात आहातच महत्त्वाचे.

    ReplyDelete

Post a Comment