आषाढ लागलाय

आषाढाचा पहिला दिवस आज. आषाढाचे किती वेगवेगळे संदर्भ आहेत आपल्या मनात. कालीदासांचं शाकुंतल, आषाढीची पंढरपूरची वारी, कांदेनवमी, आखाड तळणे, इत्यादि इत्यादि.

महाकवि कालीदासांच्या ‘मेघदूत’ची आठवण तर सगळ्यात आधी येते. त्याची सुरुवातच ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ अशी. आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघरूपी यक्षाला त्याच्या प्रिय पत्नीची आठवण येते अन पुढची गोष्ट समोर येते. म्हणूनच आज कालिदास दिनही साजरा केला जातो.

पंढरपूरच्या वारीला नुकतीच सुरुवात झालीय, वारकरी अर्ध्या वाटेवर पोचलेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आता आधुनिक होत चाललीय, वारकरी मोबाइल वापरू लागलाय आणि मोबाइलशिवाय जगू न शकणारी तरुण मंडळी वारीत उत्साहाने, उत्सुकतेने सहभागी होऊ लागलीय. काय असते वारी नेमकी, काय मिळतं त्यातून, खरंच काही मिळतं का, या प्रश्नांची उत्तरं नवीन पिढीला शोधावीशी वाटतायत, हेही आनंदाचंच.
घोटी, इगतपुरी

आजपर्यंत थोडा पाऊस झालाय, पेरण्या झाल्यात, बऱ्याच ठिकाणी धरणीमाता हिरव्या रंगात लपेटलीय. आता हा महिनाही बरसावा, हीच सगळ्यांची इच्छा. (आज सूर्य पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करतोय, त्याचं वाहन आहे कोल्हा. म्हणजे पाऊस लबाडासारखा वागणार की काय, अशी भीती वाटतेय ना?)
याच महिन्यात रानभाज्याही येतात खूप, त्या एरवी वर्षभर मिळत नसतात. त्यामुळे त्या आवर्जून खायला हव्यात, हे काही डाॅक्टरांनी नको सांगायला. त्या भाज्यांसाठी पावसाळ्याची वाट पाहणारे अनेक जण असणारेत नक्की.

अनेक घरांमध्ये आखाड तळतात या महिन्यात. बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना तळलेले चमचमीत गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा सर्वांनाच होत असते, म्हणूनच ही प्रथा पडली असेल कदाचित. कांदेनवमीला कांदाभजी, थालिपीठ असा मेनू हमखास होतो, भले तुम्ही चातुर्मास न पाळता कांदालसूण खात असाल.

गेला महिनाभर रोजे पाळणाऱ्यांना विसरलो नाहीये. त्यांना मनापासून रमजान मुबारक.

Comments