पूर्ण झोपेचं सुख

सकाळी आपोआप झोप उघडून जाग यावी, शरीर आणि मन झोप पूर्ण झाल्याने ताजंतवानं झालेलं असावं नि मग दिवसभराच्या धावपळीला तोंड देण्याच्या पुरेपूर तयारीनेच अंथरुणातून बाहेर पडावं. अगदी नैसर्गिक आणि सहजसुलभ वाटावी अशी ही गोष्ट. पण ती किती दुरापास्त आहे, खासकरून बायांना, ते तुम्हाला माहीत आहे चांगलंच. घड्याळाचा ठणाठणा गजर न होता, अशी सहज जाग येऊन किती वर्षं लोटलीत, हा प्रश्न स्वत:लाच विचारला तर उत्तर देणं कठीण होईल. मोठ्यांचीच नाही तर मुलांचीही हीच व्यथा. सकाळच्या शाळा, बस/व्हॅनमुळे लागणारा वेळ लक्षात घेता मुलांनाही पहाटे उठावं लागतं, घरातल्या बाईला (काही ठिकाणी पुरुषांनाही) डबा तयार करायचा म्हणून त्याच्याही आधी उठावं लागतं. रात्री झोपायला अनेक कारणांमुळे उशीर होतो आणि कोणाचीच आवश्यक ती सातआठ तास झोप होत नाही. यामागचं एक कारण हेही आहे की, पुरुषांना झोपायला अधिक जागा लागते आणि बायकांची तिथेही कुचंबणाच होते.

अपुऱ्या झोपेचे अनेक दुष्परिणाम आपल्या एकूणच आयुष्यावर होतात. कामात लक्ष न लागणं, चुका होणं, अभ्यास नीट न होणं, इ. परंतु, बायांना ते जास्त भोगावे लागतात, असा निष्कर्ष एका संशोधकाने नुकताच जाहीर केलाय. बायांना पुरुषांपेक्षा साधारण अर्धा तास अधिक झोप आवश्यक असते, कारण दिवसभर त्यांचा मेंदू प्रचंड व्यग्र असतो, अनेक प्रकारचे तणाव, कामाचे व्याप हाताळत असतो. या मेंदूला विश्रांती झोपेतच मिळते, तो दुसऱ्या दिवसाची आव्हानं पेलायला तयार होतो. नेमकी हीच विश्रांती त्याला मिळत नाही आणि अनेक बाया कंटाळलेल्या, चिडचिडलेल्या, दमल्याभागल्या, आळसावलेल्या अवस्थेत दिवस कंठत राहतात.

अनेक समस्यांवर जे उत्तर आहे, ते यालाही लागू होतं. घरातल्या सर्वांनी कामं वाटून घेणं, आपापली कामं जबाबदारीने पार पाडणं, फक्त आई/बायको/बहीण/मुलगी यांच्यावर सर्व कामाचा भार पडणार नाही याची काळजी घेणं हाच तो उपाय. किती घरांमध्ये होतो बरं हा लागू?

Comments