ऐरणीवरचं आईपण

आईपण वा मातृत्व कायम चर्चेत असतं. (स्वेच्छेने वा कारणवश आई होऊ न शकलेल्या अनेक स्त्रियांना यामुळे आपण वेगळं पाडतोय, याची जाणीवही अशा चर्चेत सहभागी होणाऱ्यांना नसते.) हे आईपण गेल्या आठवड्यात दोन सेलिब्रिटी व्यक्तींमुळे पुन्हा चर्चेत आलं. एक आहेत, ब्रिटनच्या हुजूर पक्षाच्या खासदार अँड्रिया लीडसम आणि दुसऱ्या आहेत, लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टन. लीडसम यांचं नाव ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या दोन नावांपैकी एक. दोघी महिलाच. शर्यतीचा अपरिहार्य भाग असतो तुलना, आणि मी दुसऱ्या/रीपेक्षा कसा/शी श्रेष्ठ, हे सांगण्याची केविलवाणी धडपड. पंतप्रधान म्हणून ज्या अखेर विराजमान झाल्या, त्या थेरेसा मे यांना मूल नाही. याचंच भांडवल लीडसम यांनी केलं. मला मुलं आहेत, त्यामुळे माझ्या पुढच्या पिढीला हा देश राहायला कसा अधिक चांगला होईल, याची काळजी मला (मे यांच्यापेक्षा) जास्त आहे, असं विधान त्यांनी केलं. पंतप्रधानपदी बसून देश चालवायला अनेक गुण अंगी बाळगणं आवश्यक असतं, मूल असणं वा नसणं, किंवा वैवाहिक स्थितीचा नेतृत्वाशी काहीही संबंध नसतो, हे सर्वसामान्य जनतेलाही ठाऊक असतं. त्यामुळे, लीडसम यांच्या या वाक्यावर त्यांचे विरोधक तुटून पडलेच, परंतु पक्षातही त्यांना समर्थन देणाऱ्यांची संख्या कमी झाली. परिणती अर्थात मे यांच्या विजयात झाली.
दुसरी जेनिफर अॅनिस्टन, फ्रेंड्स या अत्यंत लोकप्रिय मालिकेतील ही एक अभिनेत्री. जेनिफर गरोदर आहे, अशा बातम्या ठरावीक अंतराने प्रसिद्ध होत असतात. आणि चवीचवीने वाचल्या/चघळल्या जातात. जेनिफरने अखेर या बातम्यांना कंटाळून या गाॅसिपखोरांना सणसणीत उत्तर दिलं. ‘मी गरोदर नाही, पण वैतागलेली जरूर आहे. नवरा आहे अथवा नाही, मूल आहे अथवा नाही, यावर स्त्रियांचं पूर्णत्व ठरत नाही लोकहो.’
आपण यावरनं काय शिकू शकतो?
कोणाही व्यक्तीची- स्त्री असो वा पुरुष- लायकी, तिच्या वैवाहिक स्थितीवरनं वा मूल असण्या/नसण्यावरनं ठरवायची नाही. त्याविषयी गाॅसिप करायचं नाही.
सोपं आहे, जमेल ना?

Comments