शर्मिला - गांधीजींच्या वाटेवर चालणारी

(दै. दिव्य मराठीमध्ये २७ जुलै रोजी प्रसिद्ध झालेले स्फुट) 
इरोम चानू शर्मिला. वय वर्षं ४४. रा. इंफाळ, मणिपूर. मोकळे कुरळे केस, पांढरी साडी आणि नाकात घातलेली नळी अशा शर्मिलाचं छायाचित्र गेल्या १६ वर्षांपासून आपण अधूनमधून पाहत आलोय. मानवी हक्कांसाठी इतका प्रदीर्घ काळ उपोषण करणारी ती जगभरातली एकमेव कार्यकर्ती. मात्र या उपोषणाचा उपयोग होत नाहीसे पक्के ध्यानात आल्यानंतर शर्मिलाने ते मागे घेतले आहे. सरकारकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आपण नऊ ऑगस्ट रोजी उपोषण सोडणार आहोत व पुढच्या वर्षीची मणिपूर विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत, असे तिने म्हटले आहे. 
ईशान्येकडची सात राज्यं आणि जम्मू व काश्मीरमध्ये लागू असलेला सशस्त्र दल विशेष संरक्षण कायदा AFSPA (Armed Forces Special Powers Act) मागे घ्यावा, या मागणीसाठी गेल्या १६ वर्षांपासून शर्मिला उपोषण करते आहे. मणिपूरची राजधानी इंफाळमधल्या विमानतळानजीकच्या एका बसथांब्यावर उभ्या असलेल्या १० जणांना आसाम रायफल्सच्या जवानांनी गोळ्या घालून ठार केल्याचा निषेध म्हणून ४ नोव्हेंबर २०००पासून तिचे उपोषण सुरू आहे. या १० जणांमध्ये बाल शौर्य पुरस्कार मिळालेल्या एका मुलाचाही समावेश होता. सरकार तिला अटक करते, जबरदस्ती नळ्यांद्वारे अन्न भरवायचा प्रयत्न करते, सोडून देते, पुन्हा अटक करते... असे सत्र कायम आहे. दर वेळी आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप तिच्यावर लावण्यात येतो.
शर्मिला ज्या कायद्याच्या विरोधात उपोषण करतेय, तो कायदा संरक्षण दलांना मोठे अधिकार देणारा आहे. कोणाच्याही घराची झडती त्यांना घेता येते, कोणालाही वॉरंटविना अटक करता येते, तसेच कोणावरही दिसताक्षणीच गोळीबार करता येतो. ईशान्येकडच्या बऱ्याच राज्यांप्रमाणेच मणिपूरमध्येही घुसखोरी व त्यातून येणारा दहशतवाद हा जवळजवळ ६० वर्षांपासूनचा कळीचा प्रश्न आहे. चाळीसहून अधिक फुटीरतावादी संघटना राज्यात आहेत, त्यांच्या घातपाती कारवायांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हा कायदा १९५८मध्ये संसदेने मंजूर केला. परंतु, कोणत्याही कायद्याचा वा अधिकारांचा होतो तसा याचाही गैरवापर होऊ लागला. संरक्षण दलांचे जवान कोणाला जुमानेसे झाले. वर उल्लेख केलेल्या घटनेच्या चौकशीच्या वेळी आसाम रायफल्सचे जवान उपस्थितही राहिले नाहीत. शेकडो महिलांवर बलात्कार केल्याचे सशस्त्र दलाच्या जवानांवर आरोप आहेत. या बलात्कारांचा निषेध म्हणून २००४मध्ये १२ महिलांनी नग्नावस्थेत निदर्शने केली, त्याने अख्खे जग हादरले. परंतु परिस्थिती आजही तशीच आहे. कायदा मागे घेतला जाण्याची चिन्हे नाहीत. मणिपूरमध्ये काही वर्षं पत्रकारिता केलेल्या तेरेसा रहमान यांनी याविषयी सांगितलं की, "या राज्यांमध्ये एक low intensity war सुरू आहे, सैन्यदले, फुटीरतावादी आणि सामान्य नागरिकांमध्ये. त्यात अर्थातच सामान्य नागरिक भरडले जातात.' शर्मिलाने उपोषण मागे घेतल्याने काय होईल, यावर रहमान म्हणाल्या, "तिने तिच्या आयुष्याची १६ वर्षं या लढ्यासाठी दिली आहेत. तिने लढ्याचं स्वरूप बदलल्याने त्याची परिणामकारकताही बदलेल कदाचित.' कायदा कायम राहण्यामागे राजकारण आहेच, शिवाय या कायद्याच्या अाडून राज्यात मोठ्या प्रमाणावर काळा पैसा येतो, त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
शर्मिला आज ४४ वर्षांच्या आहेत, म्हणजे उपोषण सुरू केले तेव्हा त्या केवळ २८ वर्षांच्या होत्या. त्या वयातल्या तरुणी पाहतात ती स्वप्नं त्यांनीही पाहिली असतील कदाचित. किंवा लहानपणापासून जे वास्तव त्या पाहत आल्या, त्यातून त्यांची जडणघडण वेगळी झाली असेल. नोव्हेंबर २०००मधल्या त्या घटनेने म्हणूनच त्या अधिक व्यथित झाल्या असतील आणि त्यांना उपोषणाचा मार्ग अवलंबिला असेल. जगाला सत्याग्रहाची ओळख करून देणाऱ्या महात्मा गांधींच्या वाटेवर चालणाऱ्या शर्मिला यांचा उपोषणाच्या सामर्थ्यावर विश्वास होता. परंतु १६ वर्षं हा मोठा काळ गेल्याने त्याही विचारात पडल्या असाव्या. परिस्थितीत किंचितही सुधारणा झाली असती तरी त्यांनी ते याआधीच मागे घेतले असते. परंतु, रहमान म्हणतात त्याप्रमाणे low intensity war मध्ये परिस्थिती फारशी बदलत नसते. हे लक्षात आल्यानेच शर्मिला यांनी काही नियोजन करून मगच उपोषण मागे घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असावा.

Comments