उडदामाजि काळेगोरे

(Published on the edit page on 06.08.2016, Dainik Divya Marathi.) 

अमेरिकेत अध्यक्ष निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सध्याचे अध्यक्ष बराक ओबामा आठ वर्षांपूर्वी निवडून आले तो अमेरिकेच्या इतिहासातला महत्त्वाचा टप्पा होता, श्वेतवर्णीय नसलेली व्यक्ती प्रथमच अध्यक्षपदावर विराजमान झाली होती. तिकडच्या कृष्णवर्णीय नागरिकांच्या दृष्टीने, व जगातील इतरही पददलितांच्या दृष्टीने, हा मोठा क्षण होता. आता होऊ घातलेली निवडणूकही ऐतिहासिक गणली जाऊ शकते, जाऊ लागलीही आहे. अध्यक्षपदासाठी उमेदवारी स्वीकारणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन या पहिल्या महिला ठरल्या आहेत, त्या निवडून आल्या तर त्या या महाकाय लोकशाही राष्ट्राच्या पहिला महिला अध्यक्ष होतील. त्यांचे प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे डाेनाल्ड ट्रम्प जी बेछूट विधाने दिवसागणिक करत आहेत, त्यामुळे ते सतत प्रसिद्धीच्या झोतात आहेत. पहिल्यावहिल्या महिला अध्यक्ष निवडून येण्याचा इतिहास घडेल अथवा नाही, हे ठाऊक नाही; परंतु या घडीला या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घटनांनी इतिहास रचला जातोय. सोशल मीडियावर आणि व्हर्च्युअल जगात हिलरी विरुद्ध ट्रम्प हे युद्ध अत्यंत अटीतटीने लढले जात आहे.
या निमित्ताने दिवसागणिक विनोद, अर्कचित्रं, मीम यांची प्रचंड निर्मिती होऊन ती अमेरिकेबाहेरच्या व या निवडणुकीशी सुतराम संबंध नसणाऱ्यांचंही मनोरंजन करते आहे. इतरत्र असते तशीच इकडून तिकडे जाणाऱ्यांची संख्याही कमी नाही. आणि इतरत्र होते तसेच सामान्य नागरिकाचे, मतदाराचे लक्ष या दोन व्यक्तिमत्त्वांकडे लागलेले आहे. त्यांच्यातील नेतृत्वक्षमता, त्यांची राजकीय धारणा, आर्थिक धोरणे, राष्ट्राला पुढे नेण्याची क्षमता यांची फारशी चर्चाच नाही. ट्रम्प उद्योगपती आहेत, बांधकाम व्यवसायातील अग्रणी, त्यांच्या ट्रम्प रिअॅल्टीतर्फे भारतातही इमारती उभ्या राहत आहेत. राजकारणाचा वा प्रशासनाचा त्यांना अजिबातच अनुभव नाही. परंतु बेधडक, बेलगाम, अविचारी व धादांत खोटी विधाने करण्यात त्यांचा हात धरणारं क्वचितच कुणी असेल. एक व्यावसायिक म्हणूनही ते कसे चुकीच्या व बेकायदा गोष्टी करत असतात, हेही उघड झाले आहे. मुस्लिम, निर्वासित, महिला, या सगळ्यांविषयी ते तिरस्काराने बोलत असतात. तरीही त्यांचे समर्थक प्रचंड संख्येने आहेत.
तर हिलरी यांना खुद्द अध्यक्ष ओबामा यांनी संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. हिलरी ओबामा यांच्या मंत्रिमंडळातल्या ज्येष्ठ सहकारी, अनेक वर्षांपासून त्या स्वत: राजकारणात तर आहेतच; परंतु पती बिल यांच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी तोही अनुभव जवळून घेतलेला आहे. परंतु त्याही धुतल्या तांदळासारख्या स्वच्छ नाहीत.
क्लिंटन फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला त्या परराष्ट्रमंत्री असल्याचा (गैर)फायदा झाल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. तसेच परराष्ट्रमंत्री असताना राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या काही ईमेल्स त्यांनी त्यांच्या वैयक्तिक ईमेल आयडीवरून केल्याने त्या राष्ट्रद्रोही असल्याचेही आरोप त्यांच्यावर आहेतच. या आरोपांचे त्यांनी खंडन केले असले तरी त्यातून त्या निर्दोष म्हणून सुटत नाहीत. ट्रम्प खोटं बोलतात पण त्या क्षणाला त्यांच्या दृष्टीने ते सत्यच बोलत असतात, दिवसभरातून ती चार असत्य वचनं बोलत असतील, तर ती चारही ते अत्यंत विश्वासाने, सत्य असल्याच्याच खात्रीने बोलत असतात. हिलरी जाहीर खोटं बोलत नाहीत, परंतु खरं काय तेही उघड करत नाहीत, त्यामुळे त्याही ट्रम्प यांच्याइतक्याच खोटारड्या आहेत, असा या निवडणुकीतील निरीक्षकांचा दावा आहे.

अमेरिकेच्या राजकारणात हे दोन पक्षच महत्त्वाचे आहेत, त्यामुळे मतदार वा नागरिकांमध्येही सरळ दोन तट दिसतात. अमेरिकेचे नागरिक असलेल्या भारतीयांची संख्या मोठी आहे, तेही विभागलेलेच आहेत. हे भारतीय म्हणजे निर्वासित नव्हेत, परंतु ते अमेरिकीही नव्हेत, ते बाहेरचेच. अशा बाहेरच्यांचं काय करायचं, याविषयीचं ज्या अध्यक्षाचं धोरण फायद्याचं त्याला यांचा व त्यांच्यासारख्या इतर देशांतून आलेल्यांचा पाठिंबा. हिलरी यांना अनेक महिला मतदारांची सहानुभूती आहे, परंतु साक्षात बराक ओबामा यांच्या विराेधातही मतदान केलेले कृष्णवर्णीय आहेतच. एखाद्या व्यक्तीला निवडून देतोय म्हणजे आपण नक्की काय करतोय, हे कोणत्याही देशातल्या फार कमी मतदारांना ठाऊक असतं. उडदामाजि काळेगोरे निवडण्यापेक्षा ते वेगळं आहे, हे मतदारांना कधी कळणार, हा प्रश्न आहे.

Comments