सणांचे दिवस सुरू आहेत. मंगळागौरी झाल्या, आता महालक्ष्म्या येऊ
घातल्यात. मग नवरात्र आहेच. आणि नेमकी तेव्हाच घरातल्या एकीची तरी मासिक
पाळीही येणारच. मग कसं चालायचं? पाळीच्या अशुद्ध, अपवित्र वगैरे वगैरे
दिवसांत देवाचं कसं करायचं? सोप्पंय. गोळी घ्यायची नि पाळी पुढे ढकलायची,
आहे काय न नाही काय!
खरंच इतकं सोप्पं आहे पाळी पुढे ढकलणं? पाळीच्या वेळापत्रकात ढवळाढवळ म्हणजे प्रत्यक्ष बाईच्या शरीराशी, तिच्या ऋतुचक्राशी खेळणं. एका वेळची पाळी पुढे ढकलली तरी त्याचे परिणाम पुढे कित्येक दिवस जाणवत राहतात. अनेक जणींचं आरोग्य या गोळ्यांनी धोक्यात आलेलं आहे. तेही कशामुळे? तर मासिक पाळी ही काहीतरी भयंकर घाणेरडी गोष्ट आहे आणि देवाला ती अजिबात चालत नाही, या चुकीच्या समजामुळे. देवधर्म आणि मासिक पाळी यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही, पाळी हे स्त्रीत्वाचं लक्षण आहे, स्त्रीच्या उत्तम प्रकृतीचा पुरावा आहे. पाळी सुरू असलेल्या बाईने देवाची पूजा केली तर रुसून बसणारा वा तिच्यावर कोपणारा कसा असेल तो सर्वशक्तिमान देव? तो सर्वज्ञानी, त्याला हे शास्त्रीय सत्य माहीतच असेल ना?
मग आपण कोण त्यात लुडबुड करणाऱ्या गोळ्या घेऊन? त्याही अनेकदा डाॅक्टरांचा सल्ला न घेता, थेट केमिस्टकडे जाऊन प्रिस्क्रिप्शनशिवाय मनाला येईल तेव्हा व तेवढ्या घेणाऱ्या?
आता पाळीच्या काळात वापरता येण्याजोगे सॅनिटरी नॅपकिन्स, टँपोन्स, कप्स इतके सुलभ आहेत की, इतरांना सोडाच, खुद्द त्या स्त्रीलाही पाळी आहे हे लक्षात नसतं. मग ते वापरावं, जमेल तसा आराम करावा आणि खुशाल घरातली सगळी कामं, अगदी देवाचीसुद्धा, रोजच्याप्रमाणेच करण्यात काय चूक आहे बरं?
तुम्ही स्वत: किंवा तुमची पत्नी/मुलगी/सून असं काही नाही ना करत, याची काळजी या सणासुदीच्या काळात (आणि अर्थात नंतरही) घेणार ना? तिला अस्पर्श ठेवून किंवा गोळ्या घ्यायला लावून सणाचा आनंद खरोखरीच घेता येणार आहे का, याचा विचार तुम्हीच तर करायचाय. सण साजरे त्यासाठीच तर करायचे असतात.
Comments
Post a Comment