ऊर्जादायी स्पर्धा

ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या आॅलिम्पिक क्रीडास्पर्धांनी जगभरात चैतन्य निर्माण केलंय. ज्या कोणत्या छोट्यामोठ्या देशांचे खेळाडू त्यात सहभागी झाले आहेत, तिथे सगळीकडे त्यांच्या कामगिरीवर नागरिकांचं लक्ष आहे. अगदी क्षुल्लक वाटाव्या अशा परंतु दूरगामी अन‌् अनेकांवर परिणाम करणाऱ्या बऱ्याच घटना आतापर्यंत आपल्यासमोर आल्या आहेत. माणुसकी, अपार मेहनत, एकाग्रता, चिकाटी, धाडस, धैर्य, सहनशक्ती, सामर्थ्य, निष्ठा, प्रेम अशा अनेक मूल्यांवर या घटनांनी शिक्कामोर्तब केलंय.
धावण्याच्या शर्यतीत अडखळून पडणाऱ्या आपल्या सहधावकाला आधार देणारी एखादी धावपटू पाहिली की, माणुसकीचं दर्शन हाेतं. पण तिने तिची शर्यत सोडल्याचं लक्षातही येत नाही आपल्या. सुवर्णपदकांचा विक्रम करणारा मायकल फेल्प्स पोहताना पाहिलं की वाटतं, त्याने समुद्रातच पोहायला हवं, त्याच्या जातीच्या माशांशी शर्यत लावायला हवी. मासिक पाळी सुरू असल्यामुळे मी माझ्या क्षमतेएवढी जलद पोहू शकले नाही, म्हणून आम्ही हरलो, अशी जाहीर कबुली देणाऱ्या चिनी जलतरणपटूचं आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होतं. पाळी आणि क्रीडापटू हा भारतातच काय, सर्व तथाकथित प्रगत देशांमध्येही अळीमिळीगुपचिळी असलेला विषय. तो तिने किती सहजतेने मांडला. संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घालूनही खेळातल्या कौशल्यात कुठेही कमी न पडणाऱ्या मुस्लिम राष्ट्रांमधील क्रीडापटूंना पाहिलं की इच्छा असेल तिथे मार्ग नक्कीच सापडतो, यावर विश्वास बसतो. शेवटच्या दहा सेकंदांत सामन्याचं चित्र पालटणाऱ्या साक्षी मलिकला पाहून मेहनतीचं चीज झाल्याचं समाधान आपल्याला, लांबून सामने पाहणाऱ्यांनाही मिळतं. तिचे प्रशिक्षक जेव्हा म्हणतात की, या क्षणासाठी मी साक्षीचा कायमचा ऋणी राहीन, तेव्हा त्यांनी तिच्यावर किती कष्ट घेतले असतील, किती आणि कोणाशी पंगा घेतला असेल, याची कल्पना येते. विनेश फोगतला खेळताना गुडघ्याला दुखापत झाल्याने स्ट्रेचरवरनं रुग्णालयात नेताना पाहून आपण सारेच खंतावतो. कृष्णवर्णीय जिम्नास्ट सिमाेन बाइल्स सुवर्णपदक जिंकते, तेव्हा तिचा आणि अमेरिकेतला वंशभेदाचा संघर्ष आपणही जगतो. उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन शत्रुराष्ट्रांच्या क्रीडापटू एकमेकींसोबत सेल्फी घेतात तो क्षण हृदयस्पर्शी असतो. टेनिसमधला सुवर्णपदकांचा विक्रम माझा नाही, माझ्या आधी सेरेना आणि व्हीनस विल्यम्स या दोघींनी जास्त पदकं जिंकलीत, त्यांना तुम्ही कसं विसरताय, असं वृत्तनिवेदकाला जाहीर सुनावणारा अँडी मरी जगभरातील महिलांसाठी कौतुकाचा विषय ठरतो.

हे असे मूल्यवान क्षण आपल्याला देणाऱ्या सर्व क्रीडापटूंचे आभारच मानायला हवेत ना?

Comments