स्वप्नांच्या धूसर सावल्या

माझा सहकारी राहुल शिंदे याने केलेले चित्र
 सरोगसीसंबंधीच्या कायद्यात चारपाच दिवसांपूर्वी अनेक लहानमोठ्या सुधारणा सुचवणारा मसुदा केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूर केला, त्यावर आता संसदेत चर्चा होऊन तो अमलात येईल. या निमित्ताने सरोगसीचा थेट परिणाम ज्यांच्यावर होतो त्या माणसांविषयी ही ३० आॅगस्ट २०१६च्या मधुरिमाची कव्हर स्टोरी.
अमीनाबी. नवी मुंबईतल्या एका चाळवजा इमारतीच्या एका लहानशा खोलीत राहणारी पस्तिशीतली बाई. दोन मुलं आणि नवरा असं कुटुंब. नवरा रिक्षा भाड्याने घेऊन चालवणारा. तिच्या कानावर आलं की, मूल पैदा केल्यावर पैसे मिळतात बक्कळ. गरिबीने गांजलेल्या अमीनाबीला आशेचा किरण दिसतो.

अॅना आणि डेव्हिड. अमेरिकन जोडपं. मूल होत नाही म्हणून अमेरिकेत वेगवेगळे उपाय करून झाल्यावर मुंबईत येऊन ठाकलेले. चांगले डाॅक्टर शोधून उपचार सुरू करणारे. आयव्हीएफनेही काही होत नाही म्हणून सरोगसीकडे वळलेले.
सरिता. गरीब, गरजू परंतु निरोगी मध्यमवयीन बायांवर लक्ष ठेवून असणारी मध्यस्थ.
डाॅ. एक्स वाय झेड. मुंबईत मोठं पाॅश स्वच्छ क्लिनिक. आयव्हीएफ तंत्रज्ञान आणि सरोगसीतलं नावाजलेलं नाव.
अॅना क्लिनिकमध्ये पोहोचते इंटरनेटवर सर्च करून.
अमीनाबी क्लिनिकमध्ये पोहोचते सरिताच्या सांगण्यावरून. सरिताने तिला कधीतरी मुंबईतल्या बसच्या प्रवासात हेरलेलं असतं.

वरकरणी अॅना आणि अमीनाबी एकमेकींच्या गरजा पुरवू शकणाऱ्या दिसतायत.
अनेक तपासण्या केल्यानंतर डाॅक्टर यावर शिक्कामोर्तब करतात. अॅना आणि डेव्हिडला स्वत:चं मूल होण्याचा मार्ग सुकर होतो. त्यांचा गर्भ अमीनाबीच्या पोटात वाढू शकताे. अमीनाबीचं दारिद्र्य काही अंशी कमी होणार असतं. निदान या सगळ्याची शक्यता तरी दिसते.
अमीनाबी आणि अॅना, दोघींना काही इंजेक्शनं, गोळ्यांचे उपचार सुरू होतात. दोघींच्या मासिक पाळीचं चक्र सिंक्रोनाइज होण्यासाठी. अमीनाबीच्या गर्भाशयाला या परक्या गर्भासाठी तयार करण्यासाठी.
डेव्हिडला पण काम असतंच. त्याचंही मूल असणार असतं ते.
दोन-तीन महिन्यांत सगळी गणितं जुळून येतात. अॅना आणि डेव्हिडच्या अपत्याचं लघुत्तम रूप - भ्रूण - अमीनाबीच्या गर्भाशयात पोहोचतो.
आता फक्त वाट पाहायची.
ही वाट बघणं कर्मकठीण. कारण इतक्या शक्यता त्यात दडून बसलेल्या असतात. अॅना-डेव्हिडला स्वप्नं पडत असतात इवलासा पाहुणा घरी नेण्याची. अमीनाबीला तिची मुलं चांगल्या शाळेत जाताना दिसू लागलेली असतात. सरिताला घराला रंग काढायचा असतो. डाॅक्टरांना त्यांच्या क्लिनिकच्या वेबसाइटवर आणखी एका यशस्वी जन्माला हातभार लावल्याचं जगजाहीर करायचं असतं.

अमीनाबीला नक्की काय चाललंय, काय होणार आहे, मूल जन्माला घातल्यानंतर तिला कसं वाटू शकतं, काय वाटायला हवं... कशाचीच कल्पना नाही. तिला फक्त इतकंच ठाऊक आहे की,
आपल्या पोटात नऊ महिने मूल वाढवायचं.

ते नऊ महिने होस्टेलवर राहायचं, आराम करायचा, चांगलंचुंगलं खायचं, काही काम करायचं नाही.
दिवस भरले की हाॅस्पिटलात जायचं.
बाळ अॅना-डेव्हिडच्या हाती सोपवायचं नि घरी यायचं.
अमीनाबीच्या नवऱ्याचीही यात प्रमुख भूमिका आहे.

बायकोचं गर्भाशय नऊ महिने वापरायला दिल्यावर कधी न पाहिला इतका पैसा हातात येणार आहे. त्यासाठी तिला प्रत्यक्ष दुसऱ्या पुरुषाशीही संग करावा लागणार नाही, हा त्याच्यासाठी समाधानाचा भाग. फक्त पुढचे नऊ महिने तिची काळजी घ्यायची, ती पाचव्या महिन्यात होस्टेलवर राहायला गेली की घर सांभाळायचं, अगदी भोचक शेजारी/नातलगांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची. ती परत आली की, भरपूर पैसा आहेच.

पण... अमीनाबीच्या पोटात हा गर्भ टिकत नाही. दोनदा प्रयत्न केल्यावर डाॅक्टर काही दिवस ब्रेक घ्यायचं सुचवतात.

अॅना-डेव्हिड निराश होऊन परतीच्या विमानात बसतात. अमीनाबी पुन्हा तिच्या खुराड्याएवढ्या घरात पोटाला चिमटे काढत जगायला परत जाते.

सरिता दुसरी एखादी होतकरू स्त्री शोधते.
क्लिनिकमध्ये अमीनाबी आणि अॅनासारख्या इतर बायांच्या फेऱ्या सुरूच राहतात. काही जणी एकमेकींचं स्वप्न पुरं करू शकतात, काहींना त्यात अपयश येतं.

या गोष्टीला पाच वर्षं झाल्यानंतरही अॅनाच्या मनातलं स्वप्न काही विरलेलं नाही. पण ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता तिचं वय वाढल्यामुळे धूसर होत चाललीय, हे तिला ठाऊक आहे.

अमीनाबी औषधं, उपचार, त्यातून होणारा शारीरिक त्रास याला कंटाळून दुसरी कामं करतेय, अर्थात त्यांतनं तिला जेमतेमच कमाई होतेय.

सरोगसी म्हणजे या सगळ्यांचं भावविश्व. सरोगसी म्हणजे मुलं जन्माला घालण्याचा कारखाना आहेच, पण त्या कारखान्यात असतात हाडामांसाची जिवंत माणसं. सरोगसी म्हणजे त्यांच्या भावभावनांचा अशक्य असा गुंता. या गुंत्यात गाठी असतात पैशाच्या. मोहाच्या. निरगाठी असतात नात्यांच्या. अपेक्षांच्या नि अपेक्षाभंगाच्याही. कोणत्याही एका कायद्याने हा गुंता सोडवला जाणार नसतोच.

माणसापेक्षा संस्कृती मोठी, नियम महत्त्वाचे, असं मानलं की गडबड होते. जोडपं अॅना आणि डेव्हिड असं असेल किंवा सतीश आणि महेश असं, किंवा सुचित्रा आणि रश्मी असं. त्यांनाही हवं असतं ते त्यांचं स्वत:चं मूलच. अमीनाबीच्या जागी सुजाता आली तरी तिला तिचं दािरद्र्य दूर करून मुलांना चांगलं शिकवायचंच असतं. त्यासाठी ती या तांत्रिक बाबी अजिबात न समजून घेता धोका पत्करायला तयार होत असते. पैशांमुळे गैरव्यवहारांची शक्यता निर्माण होते हे खरं; पण भारतीय कुटुंबांमध्ये स्त्रीवर आधीच इतकी बंधनं, तणाव आहेत की, नात्यातल्या कोणासाठी सरोगेट म्हणून नऊ महिने मूल वाढवायसाठी भावनिक/आर्थिक दबाव येण्याचीही शक्यता निर्माण होते, हेही खरंय. मूल होण्यासाठी विवाहित असल्याची अट घालून नक्की काय साध्य होणारेय?

लिंग कोणतंही असो, लैंगिक कल कसाही असो, मूल हवं असणं ही माणसाची आदिम गरज असावी. आज विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे आवाक्यात आलेला हा अपत्याचा आनंद संस्कृती आणि कायद्यांच्या प्रभावातून काही विशिष्ट व्यक्तींना मिळू न देणं निखळ अविचारी वाटतं. माणूस म्हणून त्या व्यक्तीचा जगण्याचा हक्कच काढून घेण्यासारखं.
mrinmayee.r@dbcorp.in

Comments

  1. A bitter truth : If you follow Supply-Chain Management path, Terms & Conditions are mandatory.

    ReplyDelete
  2. Well, I have a different story to narrate a men gay couple in USA wanted their own baby. They came to India in Gujarat and have two beautiful daughters born in the womb of an Indian mother. I see them on Facebook all the time. My daughter knows them and the family well. Now India is planning to ban such arrangements, regulation I understand since the mothers get paid very little, why prohibit?

    ReplyDelete

Post a Comment