राजस्थानात मेवाड प्रांतात चित्तोडगडावर राणी पद्मिनीने १६ हजार
स्त्रियांसह जिथे चितेत उडी मारली, जोहार केला, ती जागा दाखवतात. आता तिथे
मैदान आहे, काही झाडं आहेत नि कोपऱ्यात हवनकुंड आहे. होळीनंतरच्या एकादशीला
तिथे येऊन राजपूत लोक पूजा करतात. अप्रतिम लावण्य लाभलेल्या पद्मिनीच्या
सौंदर्याने वेडापिसा होऊन अल्लाउद्दीन खिल्जीने चित्तोडवर आक्रमण केले अन
त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी हा जोहार केला गेला, अशी कथा सांगण्यात
येते. काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार पद्मिनी अशी कोणी राणी नव्हतीच,
ती कविकल्पना आहे. काहीशे वर्षांपूर्वीच्या घटनांच्या फार नोंदी आपल्याकडे
नाहीत, काव्यांमधून जे समोर येते त्यात सत्य आणि कल्पना यांची बेमालूम
सरमिसळ असते. असे असले तरीही, पद्मिनी आणि तिच्या सौंदर्याची, खिल्जीने
तिचं प्रतिबिंब आरशात कसं पाहिलं त्याची, नंतरच्या त्याच्या आक्रमणाची, व
शेवटच्या जोहारची कथा आपण सगळ्यांनीच ऐकलेली/वाचलेली असते. तिथे असंही
सांगतात की, या जोहारनंतरच राजस्थानात घूँघट घेण्याची प्रथा सुरू झाली, जी
आजही काही प्रमाणात सुरूच आहे. मारवाड वा मेवाड प्रांतात फिरताना अगदी
चेहरा झाकणारा पदर घेणाऱ्या स्त्रिया फार दिसत नसल्या तरी डोक्यावरनं पदर
मात्र अनेकींच्या असतो. बुरखा, घँूघट, पदर सगळेच प्रकार स्त्रीला झाकून
ठेवणारे. नकोच तो तिचा चेहरा दिसण्याचा, त्यामुळे कुणा पुरुषाला काही
करावंसं वाटण्याचा, त्याने ते खरोखरीच प्रत्यक्षात आणण्याचा धोका...
चित्तोडगडावर आजही पाचेक हजार वस्ती आहे. गड लांबच्या लांब पसरलेला आहे, अनेक राजवाडे, मंदिरं, स्तंभ चांगल्या अवस्थेत आहेत. काही बांधकामं मोडकळीला आलीत, तर काहींची डागडुजी नित्यनेमाने होत असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या तुलनेत हा गड चांगलाच भारावून टाकणारा आहे. शिवाय, महाराणा प्रताप कसे चित्तोडगडावर राहू शकले नाहीत, २७ वर्षं जंगलांमधनं भटकत राहिले, हेही आठवतच राहातं. पण, या भारावलेपणावरही मात करते ती सत्यासत्यतेच्या सीमेवर रेंगाळणाऱ्या पद्मिनीच्या जोहाराची खंतावणारी, अस्वस्थ करणारी कथा.
thank you!
ReplyDelete