नियम आणि माणूस

एक ९० टक्के अपंगत्व असलेली आई. एकल पालक. स्त्रीरोगतज्ज्ञ. ११ वर्षांची मुलगी व आईवडिलांसोबत पुण्यात राहणारी. सरकारी रुग्णालयात नोकरी. पण कुठे, तर पुण्यापासून ११० किमी अंतरावर. घराजवळ बदली व्हावी, म्हणून अनेकदा प्रयत्न करूनही सरकारी कार्यालयांमधनं नन्नाचा पाढाच. एकल पालकत्व कठीणच, त्यात व्हीलचेअरला बांधलेलं आयुष्य. अशा वेळी बदलीसाठी संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांच्या मिनतवाऱ्या करण्याची वेळ एका डाॅक्टरवर यावी, हे काही बरं लक्षण नव्हे. नोकरशाही, लाल फिती, नियम वगैरे वास्तव आहे, हे अशा घटनांमधनं समोर येतं. पण नोकरशाहीचा भागही आपणच आहोत, कोणी परग्रहावरनं आलेलं नाहीये राज्य करायला. डाॅक्टर ही अशी व्यक्ती असते जी पृथ्वीतलावर कुठेही काम करू शकते, सगळीकडेच तिची गरज भासत असते. मग ती बारामतीत असो किंवा पुण्यात. अशी बदली करण्यात तांत्रिक अडचणी असतीलही, परंतु एका हाडामासाच्या व्यक्तीला त्या नियमांचा जाच होत असेल, तर त्यातनं मार्ग काढायलाच हवा ना. संबंधित कर्मचाऱ्याच्या ओळखीतली एखादी व्यक्ती बदली मागत असते, तेव्हा ती पटकन होऊ शकते, हेही वास्तव डोळ्यांआड करता येत नाही.

या डाॅक्टरांनी बदलीचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर सोशल मीडियावर आपलं गाऱ्हाणं मांडलं. change.org या संकेतस्थळावर एखादी तक्रार वा एखादा विषय मांडला, की जगभरातल्या अनेक व्यक्तींपर्यंत पोचता येतं व आपलं म्हणणं संबंधितांपर्यंत, अनेकांच्या पाठिंब्यासह पोचतं. अपेक्षेनुसार, मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेतली आणि बदलीचे आदेश दिले. पण, मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, इतका महत्त्वाचा हा प्रश्न आहे का? ज्यांच्याजवळ सोशल मीडियावर जाण्याची क्षमता नाही, त्यांचे प्रश्नही इतकेच वा याहून गंभीर असूनही ते दुर्लक्षितच का राहतात? नोकरी करताना, अधिकाराच्या पदावर वावरताना, आपण माणूस म्हणून विचार करणं बंद करतोय का? नियम महत्त्वाचेच, पण समोरचा माणूस अधिक महत्त्वाचा, हे कोणी सांगावं का लागतंय आपल्याला आजकाल? ही तर लहानपणापासून मिळणारी शिकवण, सर्व धर्मांनी सांगितलेली. मग धर्म, पंथ, जात, गुरू हे सगळं निरर्थकच म्हणावं लागेल ना.

Comments