मुशाफिरी मारवाड आणि मेवाडची - २

सिटी पॅलेसच्या बाहेरचा हत्ती

सिटी पॅलेसमधली एक खिडकी
करनी माता मंदिराजवळनं दिसणारं उदयपूर

चित्तोडगड

चित्तोडमधलं एक मंदिर

फतेहसागरवरचा सूर्यास्त

सहेलियों की बाडी येथील एक कारंजं

चित्तोडगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ

फतेहसागर

फतेहसागरच्या काठावरची स्वर्गीय काॅफी

उदयपूर हे मेवाड प्रांतातलं शहर. जोधपूर होतं मारवाडचा एक भाग. महाराष्ट्रातले विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण यासारखेच हे प्रांत, पण प्रशासकीय नव्हेत. मेवाड, मारवाड ही राजघराणी किंवा संस्थानं, त्यांवरनं पडलेली ही नावं
 
उदयपूरमधला पहिला दिवस. दहाच्या सुमारास आम्ही सिटी पॅलेस पाहायला गेलो. सिटी पॅलेस हे उदयपूरमधलं नंबर एकचं पर्यटक आकर्षण. राजस्थानात राजवाड्यांची कमी नाही, परंतु तरी एकासारखा दुसरा नाही. सगळेच प्रशस्त. जोधपूरचं उम्मेद भवन पाहून परतताना फतेहसिंग सांगत होते, त्या परिसरातले फ्लॅट िवकले गेले नाहीत फारसे कारण इथल्या लोकांना त्याची सवय नाही आणि जागाही भरपूर आहे. त्यामुळे आपलं स्वत:चं घरच त्यांना पसंत पडतो. त्या प्रकल्पातले बंगले सगळे विकले गेले होते, त्यावरनं हे लक्षात येतंच. दोन्ही शहरांमध्ये इमारती, अपार्टमेंट्स फारच कमी आढळतात. कारण जागा भरपूर आणि तुलनेने लोकसंख्या कमी
 
तर सिटी पॅलेस. इथे दोघींची प्रवेश फी आणि कॅमेरा फी मिळून ६०० रुपये झाले तब्बल. गाइडचे २५० वेगळेच. परंतु, पॅलेसची देखभाल करणारा ट्रस्ट आहे, आणि त्याचं अस्तित्व जाणवत राहातं. मोबाइल कॅमेरा असेल तरी पैसे भरावे लागतात व त्याचा टॅग त्याला लावावा लागतो. ठिकठिकाणी रक्षक उभे असतात, ते कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवून असतात. आम्ही फक्त डीएसएलआर कॅमेऱ्याचे पैसे भरले मग
 
पॅलेसच्या दारातच मोठी कमान आहे, उजव्या बाजूला लाइफसाइज हत्तीचं शिल्प आहे. तेव्हा अाफ्रिकन हत्ती असत सैन्यात, त्यामुळे ते शिल्पही महाकाय आहे. याही पॅलेसमध्ये राजा अजूनही राहातो, बराचसा भाग हाॅटेलने व्यापला आहे. परंतु जो खुला आहे, तो पाहाणं हाही नयनरम्य अनुभव होता. शीशमहाल, जनाना, मोर चौक, बैठक, शयनकक्ष, अशा वेगवेगळ्या पद्धतींनी सजावट केलेल्या खोल्या, दालनं, खिडक्या, छोटे छोटे दरवाजे, निमुळती बोळं, झरोके, कुणीही आत प्रवेश करावा तर मान खाली घालूनच, अशा पद्धतीची प्रवेशद्वारं, खिडक्यांमधनं दिसणारा पिचोला तलाव. त्यापलिकडची पर्वतरांग, वृ़क्षराजी, पाण्यात बांधलेला समर पॅलेस. मुंबईकरांच्या नजरेतून पाहिलं तर सुखच सुख. यात बेल्जियममधून आणलेल्या काचांचं काम, इटलीतून आणलेला वाफेवर चालणारा पंखा, काही वर्षांपूर्वीचा राजा अधू होता त्याच्यासाठी इंग्लंडहून मागवलेली िलफ्ट, अशा अनोख्या वस्तूही आल्याच. पॅलेस पूर्ण फिरायला दोनअडीच तास सहज लागतात, खरंतर आणखी कितीतरी वेळ फिरू शकतो, उत्साह आणि कलाकुसर पारखून पाहायची नजर असेल तर.

पॅलेसच्या समोरच्या रस्त्यावर दुकानं आहेत. राजस्थानात जाऊन काहीही खरेदी न करता येणारी मंडळी विरळाच असतील. व्हाइट मेटल, चांदी, लाखेचे दागिने, बांधणी/ब्लाॅक प्रिंटचे स्कर्ट, टाॅप्स, पलाझो, चामड्याच्या पर्स, छोट्या डायऱ्या यांनी दुकानं भरली होती. तासभर आम्ही ती पालथी घातली, छोटंमोठं काही घेतलं आणि निघालो करनी माता मंदिर पाहायला. हे मंदिर एका टेकडीवर आहे, तिथे रोपवेने जाता येतं. रोपवेने वर गेल्यावर रेस्तराँ आहे, तिथे ताक प्यालं आणि थोडं वर चढून मंदिरात गेलो. मूळ मंदिर छोटंसंच, पण आता तीन कोटी रुपये खर्चून त्याचा जीर्णोद्धार सुरू आहे. गाढवांवरनं सामान वर आणलं जातंय, मजूर कारागिरी करतायत. वरनं उदयपूर शहराचं दृश्य मनोहारी दिसतं. उदयपूर हे तलावांचं शहर, ते अगदी स्पष्टच होतं.

दुसऱ्या दिवशी चित्तोड गड पाहायचा की, कुंभलगड ते ठरत नव्हतं. दोन्ही साधारण सारख्याच अंतरावर होते, पण वेगवेगळ्या रस्त्याला. शेवटी चित्तोडचं ठरवलं. सकाळी दहाला ब्रेकफास्ट करून निघालो. ११५ किमी अंतर, चांगला रस्ता. त्यामुळे दोनेक तासांत पोचलो. पायथ्याशी चहा प्याला एका टपरीवर. बहुधा आमच्याकडे पाहून चहावाल्याने धावत जाऊन समोरच्या दुकानातनं ताजं दूध आणलं, ती पिशवी फोडून त्याचा आलं घालून चहा केला मस्त. चित्तोडगडावर मोटार जाऊ शकते, ज्यांना चालणं शक्य नाही, त्या व्यक्तीही गाडीत बसून गडाचा बराच भाग पाहू शकतात. ज्यांना फिरायचं आहे, त्यांना भरपूर वाव आहे, अख्खा दिवस फिरलो तरी कमी पडेल वेळ एवढा विस्तार आहे गडाचा, गडावर पाच हजार वस्ती आहे. मेवाडच्या शिसोदिया घराण्याची ही पूर्वीची राजधानी. अजून बरीचशी बांधकामं शाबूत आहेत, काहींची डागडुजी सुरू आहे. गडाच्या मागच्या बाजूने वर जायचा रस्ता आहे. खालपासून वर पोचेस्तो सात प्रवेशद्वारं लागतात. एका द्वारापाशी गणपती बसवलेला होता, म्हणजे गणेशोत्सवासाठी. तिथे विशाल हा आमचा गाइड आम्हाला जाॅइन झाला. तो फतेहसिंगांच्या ओळखीचा होता. विशाल गडावरच राहातो, पाचवीत असल्यापास्नं गाइडचं काम करतो, सध्या SYBAला आहे. त्याचे वडीलही गाइड आहेत, आई गडावरच्या शाळेत शिक्षिका आहे. सगळ्या गाइडची एक शैली असते बोलायची, तशीच त्याची. विशिष्ट ठिकाणी पाॅज, एकदोन ठिकाणीआमचे फोटो काढण्याची आॅफर, वगैरे.

राण्याचे राजवाडे, दालनं, त्यांच्या दासींची सोय, सज्जा, देवळं, विजयस्तंभ, कीर्तीस्तंभ, भीमताल, असं बरंच कायकाय पाह्यलं. विजयस्तंभ हा नऊ मजली स्तंभ, कोरीव कामाने भरलेला. आत्ता, एक जुलै रोजी त्याच्या आत प्रवेश बंद केल्याचं विशाल म्हणाला, तेव्हा फारच वाईट वाटलं. मस्त वाटलं असतं वर जायला आणि वरनं गड पाहायला. तिथून पुढे एका मंदिरात ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची मूर्ती आहे, ती दुर्मीळ आहे, असं विशालने सांगितलंं. याच मंदिरावर बाहेरच्या बाजूला गणेश पंचायतन आहे कोरलेलं. आम्हाला मधे टाॅयलेटला जायचं होतं. विशाल म्हणाला की, राजस्थान पर्यटन विकास महामंडळाची सोय आहे, पण त्यासाठी तिथे काहीतरी साॅफ्टड्रिंक वगैरे विकत घ्यावं लागतं. ते टाॅयलेट स्वच्छ आहेत. इतर आहेत, ते मोफत आहेत पण स्वच्छ नाहीत. मग महामंडळाच्या स्टाॅलवर गेलो, चहाचं साहित्य दिसत होतं, म्हणून म्हटलं चहा घेऊ. तर सांगण्यात आलं, अंदर पुताई हो रही है, चाय नहीं मिलेगी. मग लिम्का घेतलं, टाॅयलेटला जाऊन आलो. गाडी तिथेच पार्क केली आणि समोर एके ठिकाणी गेलो. तिथे चणे घेतले. आमच्या समोरच चालणाऱ्या एका माणसाकडच्या चण्याच्या दोन्ही पुड्या वांदराने शिताफीने ढापल्या आणि बाजूच्या कट्ट्यावर बसून ते चणे खाऊ लागलं. तो माणूस त्याला विनंती करत होता, एक तो दे दे वापस. पण ऐकेल तर ते वांदर कसलं. त्यामुळे मी आमची पुडी बॅगेत टाकली. पुढे पद्मिनीचं प्रतिबिंब अल्लाउद्दीन खिल्जीला जिथे दाखवल्याची कथा आहे, तो राजवाडा पाहिला. तिथे आरशात आपण पाण्यातला तो समर पॅलेस पाहू शकतो. पुढे गेल्यावर एक जैन मंदिर आणि कीर्तीस्तंभ आहे, हा विजयस्तंभापेक्षा थोडा लहान, पण तितकाच सुंदर आहे. सगळ्यात शेवटी किल्ल्याचं भव्य असं मुख्य प्रवेशद्वार आहे. तिथून खाली चित्तोडगड परिसर, झिंकचा कारखाना, खाणी खणल्यामुळे तयार झालेली तळी आणि हिरवेगार पर्वतराजी दिसते. किल्ल्यावर प्रचंड संख्येने सीताफळाची झाडं आहेत.

हे सर्व पाहून आपण अचंबित झालेलो असतो. आणि तरीही डोक्यात राहते पद्मिनी आणि १६ हजार स्त्रियांनी जोहार केलेली जागा. ती सगळी कहाणीच धक्कादायक, अस्वस्थ करणारी आहे. अशी वेळ कुणावरही का यावी, हा प्रश्न डोक्यातनं काही केल्या जात नाही बघा
 
भारलेल्या अवस्थेत खाली आलो, कडकडून भूक लागलेली होती. एका छोट्या रेस्तराँजवळ गाडी थांबवली. एका मुलाने येऊन सांगितलं, बाजूच्या जिन्याने वर या असं. वर गेलो तर दोन कुटुंबं जेवत होती. तिथेही आम्ही दालचावल मागवलं. इतर दोघांशी बोलणं झालं तर कळलं की तेही महाराष्ट्रातलेच होते. एक गुजराती कुटुंब होतं मुंबईचं, तर मराठी जोडपं होतं पुण्याचं. एकूणच राजस्थानात मराठी पर्यटक मोठ्या संख्येने जातात, आम्हाला ते प्रत्येक ठिकाणी भेटलेच. जेवून परत निघालो, चित्तोडगड गाव मोठं आहे तसं. गावात एक गिरणीवर मजेशीर पाटी हाेती. अमावस्या अवकाश! अमावस्येलाच का गिरणी बंद असेल बरं?

चित्तोडहून उदयपूरला परतेपर्यंत सहा वाजले. सूर्यास्ताला तासभर तरी होता. अजूनही आम्ही उदयपुरातले प्रसिद्ध पिचोला आणि फतेहसागर तलाव पाहिले नव्हते, त्यामुळे गाडी फतेहसागरकडे वळवली. ज्या क्षणी तो विस्तीर्ण जलाशय दिसला, त्या क्षणी आम्ही दोघी त्याच्या प्रेमात पडलो. तलावाला डावीकडे ठेवत अगदी लागून जाणारा रस्ता, उजवीकडे भिंतीवर रंगवलेली मेवाड प्रांतातल्या प्रेक्षणीय स्थळांची सुंदर चित्रं. थोडं पुढे गेल्यावर नौकानयनाचा धक्का. स्पीडबोटही होत्या, पण आम्हाला दाेघींनाही पाण्याची भीती वाटते, त्यामुळे ते कितीही एक्सायटिंग वगैरे असलं तरी हिंमत नव्हती. इतक्यात आमचा, दैनिक भास्करचा फोटोग्राफर रिषभ जैन आम्हाला भेटला. रिषभसोबत आम्ही बोटीत बसलो. ३५ ते ४० प्रवासी बसतील एवढी मोठी बोट होती, प्रत्येकासाठी लाइफजॅकेट होतं. सर्वांनी ते घातल्यावरच बोट सुरू झाली. तलावाच्या मध्यभागी छोटं उद्यान आहे. त्या उद्यानापाशी उतरलो. उद्यान फोटो काढायला एकदम भारी होतं. चहूबाजूंनी पाणी, पाण्याच्या पलिकडे एका बाजूला शहर, एका बाजूला डोंगररांगा. तिकडनं परत येऊ वाटत नव्हतं. पण शेवटची बोट आली न्यायला, परतावंच लागलं.

परतलो तोवर अंधारलं होतं. फतेहसागरचा कट्टा माणसांनी फुलून गेला होता. समोरच्या फास्ट फूडच्या दुकानांमध्ये खाण्यासाठी गर्दी होती. आम्हाला भूक नव्हती, रिषभने काॅफी मागवली. चंद्र उगवला होता, हलका वारा होता, त्या वाऱ्याने तलावात लाटा फुटत होत्या. तो आवाज ऐकत आम्ही गप्पा मारत होतो. आणि काॅफी समोर आली. कुल्हडमध्ये. वर फेस, आणि त्यावर ड्रिंकिंग चाॅकलेट. अहाहा. या काॅफीचा स्वाद आगळाच होता. काॅफी असावी तर अशी. काॅफीसोबत गप्पा रंगल्या. आठ वाजून गेले तशी आम्ही उठलो. थोडं पुढे चालून आल्यावर तलावातल्या पाण्याचा ओघ एका कालव्यात सोडलेला आहे, तिथे आलो. तिथे रंगबिरंगी प्रकाशयोजना केली होती, पाण्याचे तुषार उडत होते अंगावर. मस्त माहौल होता एकदम.

दुसऱ्या दिवशी उठून सामान पॅक केलं. चेक आउट केलं. आणि निघालो सहेलियों की बाडी या उद्यानाकडे. राणी आणि तिच्या मैत्रिणी/दासींसाठी बनवलेलं उद्यान. जिकडेतिकडे कारंजी, रंगबिरंगी फुलं. मध्यभागी छोटं तळं. तिथेच एक छोटं विज्ञान केंद्र होतं. लेक तिथे एका वडाखाली बसून मित्रमैत्रिणींना पत्रं लिहीत होती. मी त्या केंद्रात चक्कर मारली. एक मानवी सांगाडा, मुळं आणि फांद्यांचे प्रकार, गर्भावस्था, प्राणी व पक्ष्यांचे फोटो, संगणकाचे भाग वगैरे कायकाय होतं. तिथे तीन अॅक्टिव्हिटी होत्या. लाकडी T, फूटभर उंचीचा. त्या टीचे चार तुकडे केले होते, आणि ते जोडून टीचा आकार करायचा होता. पाचेक मिनिटं प्रयत्न केला, जमेना. दुसरा होता एक लाकडी घनाकार. तेही असेच चारपाच तुकडे जोडायचे होते. तेही जमेना. त्या केंद्रात इतर कोणीच नव्हतं, म्हणून लाज राखली गेली!

बाहेर आले आणि त्या उद्यानाच्या मागच्या भागात गेले. तीनचार रंगांचा तेरडा होता तिथे. शिवाय बरीच फुलं. सुंदर होतं, आणि कारंज्यांमुळे थंडगारही. परतले, तर बाईंची पत्रं लिहून झाली होती. मग निघालो. उद्यानाच्या बाहेरच पेरू घेतला एक, तो खात खात पुन्हा एकदा फतेहसागरच्या दिशेने निघालो. आता टळटळीत दुपार होती. पण तलावाशेजारी गारवा होता. मॅगी आणि सँडविच असं आॅर्डर केलं आणि तलावातल्या पाण्याच्या लाटांकडे पाहात बसलो. नुसतं काही न करता बसणंही किती सुखदायी असतं!

खाऊन कालच्याच काॅफीशाॅपकडे गेलो. काॅफीचा स्वाद मनात ठेवतच गाडीत बसलो आणि विमानतळाकडे निघालो.

उदयपूर आमच्यात भिनलं होतं. आणखी एखादा तरी दिवस हवा होता, असं वाटत होतं.

Comments

Post a Comment