एक खिसा घ्या मग शिवुनि

खिसा हा आपल्या कपड्यांचा महत्त्वाचा भाग. महत्त्वाचा आणि उपयुक्त. पैसे, रुमाल, मोबाइल, पाकीट वगैरे ठेवण्यासाठी या खिशाचा उपयोग होतो. या वस्तू तर स्त्रियाही वापरतात ना, तरीही खिसे फक्त पुरुषांच्याच कपड्यांना का बरं असतात?
स्त्रिया अनेक वर्षांपासून कामासाठी बाहेर पडत आहेत, आॅफिसात नसतील जात पण शेतावर कामाला तर जातच होत्या. पुरुषांच्या पँटला, अर्ध्या चड्डीला, टीशर्टला, पायजम्याला, कुडत्याला, शर्टला सगळ्याला खिसे असतात, एकपासून पाचपर्यंत कितीही. बायांना मात्र उपयोगी वस्तू ठेवण्यासाठी पर्स/पिशवी/चंची बाळगावी लागते. ती पटकन कोणी ओढून घेऊ शकतं, ती सुरक्षित नाही खिशाइतकी, कारण ती कपड्यांचा भाग नसते. असं तर नसेल की पुरुषांसाठी उपयुक्त कपडे बनवले गेले कायमच आणि स्त्रियांसाठी सुंदर/छान/चांगले दिसतील असे? कारण पुरुषांनी काम करायचं आणि स्त्रियांनी फक्त समोरच्याला, पक्षी पुरुषांना, आकर्षित करून घेण्यासाठी सुंदर दिसायचं? कारण खिसे सामावून घेतील असे स्त्रियांचे कपडे फारच कमी बनवले गेलेत. तुम्ही प्रत्येकीने आणि प्रत्येकाने आपापले कपडे तपासलेत तर लक्षात येईल की, पुरुषांच्या ९५ टक्के कपड्यांना खिसे असतात आणि स्त्रियांच्या ९५ टक्के कपड्यांना ते नसतात! मुली जीन्स घालतात, त्यावर नको इतक्या कमेंट्स करतात लोक. पण जीन्सचा, पर्यायाने खिशांचा फायदा मुलींनाही हवा असतो, हे कोणी लक्षात घेत नाही. जीन्स केवळ फॅशन म्हणून वापरत नाहीत मुली, हेसुद्धा ओरडून सांगावं लागतं हे किती दुर्दैव. काही स्त्रिया असतात ज्यांना खिशांचं वेड असतं. मग त्या सलवार वा कुडत्याला खिसे शिवून घेतात. या खिशात पैसे, मोबाइल आणि पिशवी टाकली की हात मोकळे ठेवून बाजारहाट करायला वा इतर कामं करायला त्या सुटसुटीतपणे वावरू शकतात. ज्या स्त्रिया फक्त साड्याच नेसता, तशा काहीजणी त्यांच्या एखाद्या तरी परकराला खिसा शिवून घेतात, प्रवासाला जाताना या खिशात पैसे, दागिने सुरक्षित ठेवता येतात म्हणून. काही जणी खिसेवाली जाकिटं घालतात.
खिसेपुराण संपवू आणि खिसे असलेला छानसा ड्रेस कसा शिवता येईल त्याचा शोध घेऊ! आपल्याला सुटसुटीतपणा आणि सोय महत्त्वाची, होय ना?

Comments