देता किती देशील दो कराने


नवरात्र आणि ‘जाॅय आॅफ गिव्हिंग’ सप्ताह एकत्रच आलेत यंदा. कुणाला काही देण्यासाठी कारण नकोच खरं तर, पण वर्षभर आपल्या कामांच्या धांदलीत असं अावर्जून काही दिलं नाही जात अनेकांकडून, म्हणून हा दानसप्ताह साजरा करण्याची वेळ आली. हे काही फॅड नव्हे, वेगवेगळे डेज साजरं करण्यासारखं. ज्यांना शक्य आहे त्यांनी नियमितपणे गरजूंपर्यंत काही मदत पोचवावी, पैसे/कपडे/धान्य इ. कोणत्याही रूपात, याची आठवण करून देण्यासाठी हा सप्ताह. आहे रे आणि नाही रे वर्गांतली दरी कमी होण्याऐवजी प्रचंड वाढलेली आहे. ती कमी करण्यासाठी अनेक पातळ्यांवर लढावं लागणार आहे. सरकारची धोरणं त्या दिशेने काम करत असतातच. परंतु आपण या समाजाचा भाग आहोत, जेवढं शक्य तेवढं गरजूंसाठी केलं पाहिजेच.
आॅफिसला, शेतावर, शाळाकाॅलेजात येताजाता दररोज अशा अनेक व्यक्ती आपल्याला दिसतच असतात. त्यातल्या बहुतांश व्यक्ती पोटाची खळगी भरण्यासाठी मेहनतही करत असतात, त्या काही भीक मागत नसतात. अशांसाठी आपण काही करू शकतो का, काय करू शकतो, याचा विचार करायला लावणारा हा दानसप्ताह. लाखो रुपये कमावत नसूही आपण, पण समोरचा हजारोही कमावत नाहीये, याची जाणीव असायलाच हवी. कोणत्याही प्रकारची मदत देताना त्या व्यक्तीशीही आपण जोडले जातो, आपल्याला एका नव्या जगाची ओळख होते, हाही एक फायदाच या देण्याचा.
अनेक संस्था, संघटना आपली मदत मागत असतात, अनेक वंचित, दुर्लक्षित, दुर्बल घटकांसाठी त्या काम करत असतात. प्रत्येक गावात, शहरात अशा अनेक संस्था असतात. त्यांना या निमित्ताने भेट देता येते, त्यांचं काम पाहता येतं, कामातून त्या व्यक्तींना मिळणारं समाधान आणि ज्यांच्यासाठी काम करतायत त्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू अशा दोन्हींचा आपल्याही मनावर सकारात्मक परिणाम होतोच की. इन्फोसिस फाउंडेशनच्या सुधा मूर्ती म्हणतात, इतकं दिलंच पाहिजे, अशी काहीच अट नाही. जितकं जमेल तितकं द्यावं, समोरच्यासाठी तेही फार मोठं असू शकतं, याची जाणीव ठेवावी एवढंच. नवरात्र साजरं करता करताच, हा दानसप्ताहही लक्षात ठेवताय ना?

Comments