सीमोल्लंघनासाठी शुभेच्छा

तू आत येण्याअगोदरच
चपलांसोबत स्वतःला पण
सोडून ये उंबऱ्याबाहेरच...

अभिरुची ज्ञाते या तरुण कवयित्रीच्या या ओळी वाचल्या आणि वाटलं, हे असं स्वत:ला साेडून येणं वगैरे कवीमंडळींनाच सुचत असावं. स्वतःला सोडून ये म्हणजे काय, येऊ की नको येऊ, स्पष्ट सांग. पण नाही, हे इतकं वरवरचं नाही. फक्त कवींनाच सुचेल किंवा त्यांनीच करावं असं नाही. योगसाधना हेच सांगत असते, स्वतःला बाजूला ठेवा. किंबहुना आपण सगळे काही विशिष्ट परिस्थितीत हे करतच असतो की. स्वयंपाक करताना, आॅफिसात काम करताना, गाडी चालवताना, पुस्तक वाचताना, भरतकाम करताना, स्वेटर विणताना इतकंच काय फोनवर कँडी क्रश खेळतानाही आपण स्वतःला विसरलेलेच असतो ना?
कवितेतलं स्वतःला बाहेर सोडून येणं थोडं वेगळं असेल कदाचित. पण असा उंबरा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असतोच एखाददुसरा. कधी प्रत्यक्ष घराचा, कधी परंपरांचा, कधी प्रेमाचा तर कधी धाकाचा, जो उंबरा सोडून आपण जाऊ शकत नाही, वा जाऊ धजत नाही. खूप काही मनात असतं, करायचं असतं, करून पाहायचं असतं, पण आपण त्या दिशेने प्रयत्नही करत नाही, कारण या उंबऱ्यांची दहशत आपल्या मनात असते. तो जणू पिंजराच बनलेला असतो.
आजचा दिवस असा उंबरा ओलांडून सीमोल्लंघन करण्याचा. निदान पाऊल त्या दिशेने टाकण्याचा.
नवीन काही शिकायचंय? मग कुठे शिकता येईल त्याची चौकशी आज करूया.
एखादा उद्याेग सुरू करायचं डोक्यात घोळतंय? मग त्याच्यासाठी काय तयारी लागेल ते आज शोधूया.
कुणाला साॅरी म्हणायचंय, पण कसं म्हणू असं वाटतंय? अाजच त्या व्यक्तीशी बोला.
अनेक दिवसांपासून अडलेली कामं आहेत, पण मुहूर्त मिळत नाहीये? आज सुरुवात करा.
आजचा दिवस, सर्वच दिवसांसारखा शुभ. अगदी शास्त्राचा आधार हवाच असेल तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक. कोणतंही चांगलं काम करायला आजचा दिवस नेहमीच चांगला असतो, काम सुरू करून पूर्णत्वाला न्याल तर तो अधिकच चांगलं ठरेल.
तर अशा सगळ्या सीमोल्लंघनासाठी सर्व मित्रमैत्रिणींना खूप शुभेच्छा.

Comments

  1. छान लिहिलंयस म्रुण्मयी. सीमोल्लंघनाचा एक छान अर्थ दिला आहेस. तुलाही दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.💐

    ReplyDelete
  2. धन्यवाद अरुणाताई. खूप शुभेच्छा.

    ReplyDelete

Post a Comment