आॅफिसातले काळजीवाहू सरकार

उन्हातनं हाशहुश करत आॅफिसात पोचलं की बॅग टाकता टाकताच सिद्धेशला हाक मारायची. पटकन हो एेकू येणार आणि दोन मिनिटांत टेबलावर चहा हजर. माझ्या ठरलेल्या मगमध्ये. पाण्याची बाटली चुकून राहिली असेल भरायची तर ती घेऊन जाणार. दुपारचे १.५५ झाले की शेजारी उभा राहणार. डबा घ्यायला. दोन ही आमची रोजची जेवायची वेळ. प्लेटमध्ये पोळीभाजी काढून गरम करून समोर आणणार. चारचा चहा पावणेचारला आणल्यावर मी घड्याळाकडे पाह्यलं की हसत डोळे मिचकावून म्हणणार, वाजलेतच की चार आता. संध्याकाळी हातात सफरचंद, मोसंबं, संत्रं एवढंच काय डाळिंब ठेवलं की पाच मिनिटांत ते सोलून देणार. असा आमचा सिद्धेश ऊर्फ सिद्धू, पँट्री बाॅय. चित्रपटांचं प्रचंड वेड. सैराट तर असंख्य वेळा पाहिला असेल त्याने. चिपळूणचा आहे, जमेल तेव्हा जाऊन येणारा, तिकडच्या जगाशी नातं जोडून ठेवणारा.
स्वच्छतागृह लख्ख ठेवणारी शैला. बारीक, मोठ्या डोळ्यांची. पण हसरी. माहेर पंढरपूर, आता राहते कुलाब्याला एका वस्तीत. वयाच्या चौदाव्या वर्षी लग्न झालेलं. सोळाव्या वर्षी मुलगी झाली. नवरा ड्रायव्हर. इकडे घरी दोघेच. मग मुलीला दिवसभर कुठे ठेवायची असा प्रश्न निर्माण झाला. ती पहिलीत गेल्यावर तिला कांजूरला एका मिशनरी शाळेत ठेवलंय तिने. रविवारी दाेघं कांजूरला जातात, तिला घेऊन बाहेर जातात, दिवस मजेत घालवतात तिच्यासोबत. 
तुकाराममामा, हाउसकीपिंगमधले एक कर्मचारी. टिपिकल कोकणी बोलणं. प्रेमाने अगत्याने काम करणं. 
यांच्यासारखेच इतर सहकारी, आमचं कार्यालय स्वच्छ ठेवणारे, एखादा डास दिसला आसपास तर रॅकेट घेऊन धावणारे, आमचा दिवस आनंदात जाईल यासाठी प्रयत्न करणारे, आम्हाला कशाचा त्रास होत नाही ना हे पाहणारे. 
तसं म्हटलं तर एका विशिष्ट एजन्सीकडून पुरवलेली ही माणसं. पगारावर काम करणारी. पण त्यांचं वागणं इतकं स्वच्छ, त्यांची मेहनत इतकी नि:स्वार्थी, की त्यांच्याबद्दल अपार कृतज्ञता वाटतेच. एक दिवस यांनी कोणी रजा घेतली तर त्यांच्या ऐवजी एजन्सीकडनं दुसरा माणूस येतो. तो दिवस कसातरीच जातो. चहा हवा तसा मिळत नाही, पाण्याची बाटली याची त्याला जाते, जेवण समोर येतं ते चुकीच्या पद्धतीने, वगैरे. दुसऱ्या दिवशी सिद्धेश आला की कसं घरी आल्यासारखं वाटतं. 
आता दिवाळीच्या आदल्या दिवशी हे सगळे मिळून आॅफिस सजवतील, जिकडेतिकडे कंदील, फुलं, फुगे लावून वातावरण उत्सवी करतील. रांगोळ्या घालतील. बेस्ट ड्रेस्ड पर्सनचं बक्षीसही पटकावतील. 
दिवाळीच्या निमित्ताने आज आमच्या एचआर विभागाने या गँगला जेवायला नि सिनेमा पाहायला नेलं होतं. आज त्यांना काम करायचं नव्हतं. दैनिक भास्करच्या एचआरचं हेच वेगळेपण. अतिशय आवडणारं.

Comments