बनारसिया १

आम्ही कुटुंबीय दहाएक वर्षांपूर्वी काही कार्यक्रमासाठी बनारसला गेलो होतो. दोनतीन दिवस होतो. तेवढ्यात भटकंती आणि खरेदी झाली होती. मी दोन साड्या घेतल्या होत्या माझ्यासाठी. माझ्या मैत्रिणींना त्या प्रचंड आवडल्या. त्या म्हणाल्या, आमच्यासाठी का नाही आणल्यास, घेतल्या असत्या की आम्ही. तेव्हा मी हसून विषय सोडून दिला होता. नंतर साधारण वर्षभराने एका भाच्याचं लग्न ठरलं, सून होती बनारसची, त्यामुळे लग्न तिथेच होतं. साड्यांविषयीच्या संभाषणाने डोकं वर काढलं आणि मी लग्नाच्या निमित्ताने, साड्या आणायला बनारसला पोचले. आमचे तिथले नातेवाईक होते त्यांचा जुना साडीवाला होता, वर्षानुवर्षं त्याच्याकडनंच साडी खरेदी करतात ते. राजेंद्र यादव त्याचं नाव. मी एका मामींसोबत राजेंद्रभय्याच्या दुकानावर पोचले. दुकान कसलं, छोटीशी शेड होती. रिकामीच. फक्त बसायला गाद्या होत्या. मी जरा गोंधळलेच. मामींनी सांगितलं, तो होता आडत्या. आम्ही गेल्यावर त्याने विणकरांना बोलावलं आणि त्यांनी त्यांच्या गाठोड्यांतनं एकेक अप्रतिम साड्या बाहेर काढायला सुरुवात केली. प्रत्येक साडी मी विकत घ्यायला तयार होते, इतकी सुंदर होती. हातमागावरच्या साड्या, उत्तम रंगसंगती, नक्षी, पोत, सगळं पाहून मी हरखून गेले. खूप चाळणी लावत लावत पंचवीसेक वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या मी निवडल्या. त्या साड्यांना पाॅलिश, रोल प्रेस करून दुसऱ्या दिवशी साड्या माझ्या हातात आल्या.

तोपर्यंत साड्या या विषयात मला फारशी गती नव्हती. म्हणजे साडी नेसायला आवडायची. पण साड्यांचे प्रकार, पोत, किंमती यांविषयी माहिती नव्हती. त्यामुळे मी मुंबईत येऊन ठाण्यातल्या काही मोठ्या दुकानांमध्ये जाऊन पाहणी केली, किंमतींचा अंदाज घेतला. आणि पुढच्या वीकेंडला मैत्रिणींना आमंत्रण दिलं साड्या पाहायला यायचं.

माझी निवड चांगली आहे, याचा मला अंदाज होताच. जवळपास सगळ्या साड्या हातोहात उचलल्या गेल्याने तो खरा ठरला. मग वर्षभरात मी बनारसची आणखी एक चक्कर लावली. मला राजेंद्रभय्याला फोनवरनं आॅर्डर देऊन साड्या घ्यायच्या नव्हत्या. त्या मी निवडणं महत्त्वाचं होतं. म्हणून एकटीने बनारसचा २६ ते २७ तासांचा ट्रेनचा प्रवास मी केला, ट्रेनचा प्रवास माझ्या अत्यंत आवडीचा आहे हे माहीतच आहे तुम्हाला. याही साड्या खपल्या. नंतर मात्र मी बनारसला जाऊ शकले नाही.

ही पार्श्वभूमी माहीत असणाऱ्या तिघीचौघी मैत्रिणी अनेक दिवसांपासून मागे लागल्या होत्या, एकदा आम्हाला बनारसला घेऊन चल. त्यांना माझी काहीच गरज नव्हती तिथे जायला, पण त्या म्हणत होत्या खरं. मग जुलैमध्ये प्लॅन ठरला, नोव्हेंबरमध्ये जायचं. आधी तारखा ठरवल्या, त्यात बदल होणार नाही, हे स्पष्ट केलं. आम्ही सात जणींची तिकिटं काढली. आता मुंबईहून थेट बनारसला विमान जातं, त्यामुळे ट्रेनच्या फंदात आम्ही पडलो नाही. अदिती मोघे ही माझी मैत्रीण दोनेक वर्षांपूर्वी बनारसला गेली होती, फॅब्रिक आणायला. तेव्हा ती राजेंद्रभय्याकडे जाऊन आली होतीच. ती राहिली होती ते ग्रॅनीज इन हे हाॅटेल मस्त असल्याचं ती म्हणाल्याचं लक्षात होतं. ते आधी बुक करून ठेवलं. पाच दिवसांत काय काय पाहायचं, कसं भटकायचं ते ठरवलं. काही कारणांनी तिघींचं रद्द झालं आणि आम्ही चौघीच निघालो. वर्षाताई, मेघना, शुभांगी आणि मी. आमच्या या ट्रिपच्या केंद्रस्थानी साड्या असतील असा तुमचा ग्रह होऊ शकतो. तो खरा ठरतो की कसं ते कळेलच.

नानीच्या घरात

शुक्रवारी सकाळी सव्वासातच्या स्पाइसजेटने आम्ही जाणार होतो. बाकीच्या तिघी पुण्याहून आदल्या रात्रीच विलेपार्ल्यात येऊन थांबल्या होत्या. मला मुलुंडहून विमानतळावर जायला पहाटे पाच वाजतासाठी काही वाहन मिळेना. आदल्या रात्री साडेदहापर्यंत मी ओळखीच्या टॅक्सीवाल्यांना फोन करत होते, उबर, ओला ट्राय करत होते. नन्नाचा पाढा. अखेर एका मैत्रिणीच्या सुनेने मेरूचं नाव सुचवलं. मग मेरू बुक केली आणि निश्चिंत झोपले. गाडी पहाटे वेळेवर आली आणि आम्ही चौघी विमानतळावर भेटलो. वर्षाताईला मी एकदाच भेटले होते याआधी, तेही अगदीच औपचारिक, पण आमचा संवाद सुरू होता. मेघनाला प्रथमच भेटले. शुभांगी मात्र जवळची मैत्रीण म्हणावी अशी. त्या तिघी एकमेकींना ओळखत होत्या. असा जरा चमत्कारिक ग्रूप तयार झाला होता आमचा. शुभांगीने प्रत्येकीसाठी दोन लाडू, चिवडा, चमचा, असं पॅकेट करून आणलं होतं विमानात खायला. गप्पांच्या नादात दोन तास कसे गेले कळलंही नाही आणि साडेनऊ पावणेदहाला आम्ही बनारसला उतरलो. छोटासा विमानतळ, विमानातून उतरून चालत बाहेर आलो. बस, एअरोब्रिज असला प्रकार नाही करावा लागला. सामान घेतलं आणि हाॅटेलने पाठवलेल्या गाडीत बसलो.

बाबतपूर विमानतळ बनारस शहरापासून २२ किमी वर आहे हे माहीत होतं. म्हटलं पाऊणएक तासात पोचू. पण रस्त्याची अवस्था पाहिल्यावर हा अंदाज सपशेल चुकीचा आहे हे लक्षात आलं. रस्त्याचं काम सुरू आहे सध्या, जिकडेतिकडे धुळीचं साम्राज्य, आणि मुळातला रस्ताही खड्डेयुक्त. दीडेक तासांनी आम्ही हाॅटेलवर पोचलो. हाॅटेल कसलं, हा तर छोटासा बंगला. बाहेरच्या मोठ्या गेटवरनं आतला अंदाज नव्हता आला. पण आत आल्याअाल्या कपडे वाळत घालायचा स्टँड आणि त्यावर वाळत असलेले कपडे पाहिल्यावर वेगळेपण लक्षात आलं. (कोणत्याही हाॅटेलात कपडे वाळत घालायला जागा नसते, एवढंच काय धुवायला बादली/मगही नसतो, ही माझी नेहमीची तक्रार.) आत गेलो. एक काळासावळा तरतरीत तरुण मुलगा समोर आला नि म्हणाला, वेलकम मॅम. मैं मयूर. हाॅटेल बुक करताना मयूर नावाच्या व्यक्तीशी माझं बोलणं/मेल होत होते, तोच हा. आम्हाला एक खोली तळमजल्यावर नि एक पहिल्या मजल्यावर मिळाली होती. वर्षाताईचे गुडघे छळू होते, त्यामुळे ती नि मेघना खालच्या खोलीत आणि मी नि शुभांगी वरच्या खोलीत अशी वाटणी केली.

सामान टाकलं आणि हातपाय धुऊन खाली डायनिंग टेबलपाशी आलो. प्रचंड भूक लागली होती. दिनेश या कुकशी तेव्हा ओळख झाली. हा मूळचा गढवाली, रुद्रप्रयाग या अप्रतिक सौंदर्याने नटलेल्या गावचा. ग्रॅनीज इनच्या गुडगाव रिसाॅर्टवर काम करणारा, इकडे १५ दिवस बदलीवर आला होता. दिनेशने पोहे, ब्रेडबटर आणि चहा दिला. खाताखाता आम्ही भिंतीवर रंगवलेली चित्रं पाहात होतो. नानी आणि दादी, या दोघी ग्रॅनीज. त्यांनी चालवलेली ही ग्रॅनीज इन. अदितीने या दोघींचं प्रचंड कौतुक ऐकवलेलं होतं. चित्रांमधनं नानी व दादीची थीम स्पष्ट होत होती. इतक्यात तिथे साधा सुती सलवार कुडता घातलेली, केस पांढरे झालेली स्त्री आली, पासष्टीची असावी. म्हणाली, मैं नानी. दादी मेरी बहन है, जो इस वक्त यहाँ नहीं है. तिने आजीच्या मायेने आमची चौकशी केली, आणि आम्ही तिच्याशी गप्पा मारण्यात रंगून गेलो.

खाऊन झाल्यावर आम्ही तासभर आराम केला नि मी राजेंद्रभय्याला फोन लावला. काम आधी ;)

साड्यांचा सिलसिला

नानीला सांगून बाहेर पडलो. बनारसमध्ये फिरण्यासाठी आता अत्यंत सोयीची अशी ईरिक्शा आहे. बॅटरीवर चालणारी, चार व्यक्ती नीट आणि सहा व्यक्ती दाटीवाटीने बसू शकेल अशी. आम्ही चौघी असल्याने आम्ही पुढचे पास दिवस या ईरिक्शाने बराच प्रवास केला. अशा रीतीने आम्ही गोलघर भागात पोचलो जिथे राजेंद्रभय्याचा भाऊ छोटेलाल आम्हाला न्यायला येणार होता. (राजेंद्रभय्या कानपूरला गेला होता नेमका आणि त्याने नवीन दुकान घेतलं होतं, जे मला माहीत नव्हतं. बनारसच्या गल्ल्यांमधनं स्वत:चं घर सापडायलाही महिने उलटावे लागतात असं म्हणतात, तर आमची काय गत.) आम्ही रिक्षातनं उतरल्यावर एक माणूस हात जोडत समोर आला, म्हणाला आईये. आम्ही गेलो त्याच्या मागे. विणकर आले, साड्या पाहात असताना भय्याचा फोन आला, कहाँ है, पहुँचे नहीं अभी? म्हटलं, दुकानात तर आहोत. तर म्हणाला, छोटेलाल को फोन दीजिए. मी म्हटलं, छोटेलालजी, लीजिए भय्या से बात करिए. तर तो म्हणतो, मैं तो सुधीर हूँ, छोटेलाल कौन है? मी आठेक वर्षांनंतर जात होते, त्यामुळे मला काही छोटेलालचा चेहरा लक्षात नव्हता. या माणसाने आम्ही साड्या खरेदी करायला आलोय म्हटल्यावर आम्हाला बोलावलं होतं आणि आम्ही गेलो होतो. पण त्याने दाखवलेल्या दोन साड्या वर्षाताईला आवडल्या होत्या, त्याचे थोडे पैसे देऊन आमच्या साडीखरेदीचा शुभारंभ करून आम्ही छोटेलालला शोधायला निघालो.

छोटेलाल बाहेरच होता, त्याच्यासोबत एका निमुळत्या गल्लीतनं डावंउजवं वळत एका चारमजली इमारतीसमोर आलो. या इमारतीच्या बेसमेंटमध्ये दुकान होतं. तिथे फोनचं नेटवर्क येत नाही. पण जुन्या दुकानापेक्षा हे बरंच मोठं होतं. गाद्या घातलेल्या, टेकायला लोड होते. आम्ही बसलो, गडबड झाली त्याच्याबद्दल बोलत हसलो. मग सिलसिला सुरू झाला विणकर आणि साड्यांचा.

एकेक साडी तो विणकर उलगडून दाखवत होता. मला ते सवयीचं होतं, पण या तिघींना नवीनच. मेघनाला साड्यांची फार हौस नाही, पण तिलाही साड्या पाहायला आवडत होत्या, निदान सुरुवातीला तरी. वर्षाताई आणि शुभांगी मात्र त्या विश्वात हरवून गेल्या. ये दिखाना, वो दिखाना, सुरू झालं. एखादी साडी आवडली की, ये कितने की भय्या, असं विचारल्यावर छोटेलाल आणि तो विणकर यांच्यातला ठरावीक संवाद सुरू होई.

दाम बोलो.

तीन हजार.

देने का बोलो.

देने का तो बोला.

बेचनी के नहीं बेचनी?

बेचनी है ना.

अठरासौ.

अरे, आप ने तो एकदमही कम किया, नहीं होगा.

देते हो की नहीं?

नहीं भय्या, नहीं होगा.

एकीकडून विणकराने साडी धरलेली, एकीकडून छोटेलालने.

चलो, पहले सडिया छोडो.

अरे कैसे छोडे भय्या, इतने कम दाम में नहीं बेचनी.

छोटेलाल आम्हाला, अठरासौ में लेनी या नहीं लेनी?

मुंबईपुण्यात त्याच साडीची किंमत तीन हजार माहीत असल्याने 'नहीं लेनी' हा पर्यायच नव्हता.

हा खेळ साधारण पाच तास सुरू होता. एकदोनदा चहा झाला, मठरी खाऊन झाली. शेवटी आम्ही थकून गेलो. साड्या पुन्हा एकदा पाहून फायनल केल्या आणि बाहेर पडलो.

मलैयो, रबडी, समोसा, वगैरे

बाहेर पडलो तर अंधार पडला होता, साडेसहाच वाजले होते पण आठ वाजल्यासारखे वाटत होते. प्रचंड भूक लागली होती पण रस्त्यावरचं काही खावं वाटेना. दिनेशला रात्री जेवायला येतोय सांगितलंच होतं. मग रस्त्यावरच्या हातगाडीवरनं केळी घेतली. एकेक केळं खाल्लं आणि ईरिक्शा पकडून हाॅटेलवर आलो. हाॅटेल सापडायला एकदम सोपं होतं. समोरच एक मोठा माॅल होता, ती खूण चांगली होती.

रिक्शातनं उतरलो तर शेजारीच एका छोट्याशा दुकानासमोर कुल्हडमध्ये पिवळ्या रंगाचा छोटा डोंगर आणि त्यात खोवलेला लाकडी चमचा असं दृश्य दिसलं. क्या है ये? मलैयो.

वाॅव. हिवाळा सुरू झालाय, त्यामुळे मलैयोचा मौसमही आहे, हे माझ्या लक्षातच नव्हतं आलं. मलैयो हा खास उत्तर प्रदेशातला, त्यातलाही पूर्वांचलमधला पदार्थ, फक्त हिवाळ्यात मिळणारा. रात्री दुधाचं पातेलं उघड्यावर ठेवायचं, वरती कापड बांधून अर्थात. दंवाची आणि दुधाची प्रक्रिया होऊन वर येणाऱ्या मलईच्या फेसाचा डोंगर होता कुल्हडमध्ये. तो खाऊन झाल्यावर त्याच कुल्हडमध्ये त्याने मसाला दूध ओतलं. ते पिऊन तृप्त होतोय, तर शुभांगीने रबडी पुढे केली. लच्छेदार रबडी. साखरेची हिंट तेवढी, घातलीय न घातलीय एवढीच. आम्ही रबडी खातोय तोवर वर्षाताईने पुढच्याच दुकानातले समोसे घेतलेन. शुद्ध घीमधले. (या ट्रिपमध्ये काहे दिया परदेस, त्यातली अम्माजी आणि जौनपूरवाली सारख्या आठवत होत्या.) वा, मजा आ गया. मेघना जरा काळजीपूर्वक खाणारी, आमच्यासारखी बिनधास्त 'हाण गणप्या' म्हणणारी नव्हे. त्यामुळे तिने या पदार्थांची फक्त चव घेतलीन.

घरी पोचलो. हाॅटेल म्हणजे घरच होतं एक प्रकारचं. एरवी चकाचक हाॅटेलमध्ये असतो तसा अलिप्तपणा नव्हता इथे. अर्थात तो आम्हालाही नको होता. ज्यांना अलिप्त राहायचंय ते राहू शकतातच. हातपाय धुतले आणि जेवायला बसलाे. कोबीची भाजी, दाल, चावल आणि गरमागरम फुलके. नानीच्या हातचं लोणचं. ताजी काकडी लिंबू पिळलेली. जेवत होतो तोवर आमच्या शेजारच्या खोलीत राहणाऱ्या दोघी मुली आल्या. याही मुंबईच्या. एकीचं ठाण्यात बुटीक आहे, ती त्यासाठी खरेदी करायला आली होती. मग त्यांच्याशी गप्पा झाल्या. छान पाय पसरून बसलो होतो जमिनीवर.

साडेनऊच्या सुमारास गप्पा आवरून खोलीत गेलो. प्रचंड दमलो होतो. पहाटे साडेचारपासून उठलेलो. गरम शाॅवर घेतला. खोलीत सामान लावलं थोडं फार. सुरुवातीला उल्लेख केलेल्या मामींच्या मुलाला, सुमीतला फोन केला. दुसऱ्या दिवशी सारनाथ आणि रामनगरला जायला गाडी सांगितली. आणि ताणून दिली.

एकंदर ट्रिपची सुरुवात मस्त झाली होती.

सारनाथ, रामनगर, बाटीचोखा

काल खूप दमलो होतो त्यामुळे आज पहाटे लवकर उठून कुठे जाण्याची आमची तयारी नव्हती. जरा आरामात उठलो, आवरून ब्रेकफास्ट केला नि दहाच्या सुमारास निघालो. प्रचंड ट्रॅफिक, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून चालणाऱ्या गाड्या, सायकली, सायकल रिक्षा, मोटरसायकली, ईरिक्शा आणि अरुंद रस्त्यांवर ठिय्या आंदाेलनाला बसलेल्या असंख्या गायी. या सगळ्यातनं वाट काढत आधी संकटमोचन हनुमान मंदिरात गेलो. मंदिरात मोबाइल वगैरे नेता येत नाहीत, आम्ही बॅग्सही गाडीत ठेवायला विसरलो होतो. मग दोघी आत आणि दोघी बाहेर बॅगा सांभाळतोय, असं करावं लागलं. शनिवार असल्याने प्रचंड गर्दी. हनुमान मंदिर म्हटल्यावर माकडांचा वावर साहजिकच. एकुणातच बनारसमध्ये माकडं फार आहेत, घरात शिरून फ्रिजचं दार उघडून फळं वगैरे चोरणारी ही हुशार माकडं. नॅशनल जिओग्राफिकवर या माकडांविषयीचा Monkey thieves हा अप्रतिम माहितीपट पाहिला होता, त्याची आठवण झाली. या मंदिराच्या आवारात असलेले बेसन लाडू भारी असतात, भुरा साखरेचे.

तिथून निघालो. पंधरा किमीहून अधिक नसेल अंतर, पण रामनगरला पोचायला तास गेला. त्यात ड्रायव्हर म्हणायला लागला, किल्ला १२ वाजता बंद होतो. आम्ही काळजीत पडलो, एवढा ट्रॅफिक जॅम पार करून येतोय तर किल्ला पाहायला मिळतोय की नाही. त्यात तो एकदा रस्ता चुकला. अखेरीस पोचलो, विचारलं तर कळलं की किल्ला संध्याकाळी पाचपर्यंत खुला असतो. मग जरा निवांत झालो. लिंबू सोडा प्यायलाे बाहेर, खूप ऊन लागलं होतं. फोटोग्राफरकडनं किल्ल्याबाहेरच्या तोफेसमोर फोटो काढून घेतला, परतलो तेव्हा त्याने काॅपीज आमच्या हातात ठेवल्या.

रामनगरचा किल्ला अडीचशे वर्षांहून जुना आहे. काशीनरेशांचं हे निवासस्थान. सध्याचा राजाही इथेच राहतो. किल्ला आहे गंगेच्या काठावरच, समोर उजव्या हाताला बनारस शहर दिसतं. नावेतूनही इकडे येता येतं, ट्रॅफिक पाहता तेच सोयीचं झालं असतं असं वाटत होतं. पण किल्ल्याची देखभाल शून्य. राजाच्या शंभर वर्षं जुन्या देखण्या गाड्यांवर धुळीची पुटं चढलीत. जे वस्तुसंग्रहालय आहे, त्यातले पुतळे खाली पडलेत, कापडं फाटलीत. चीड येणारं वातावरण. फक्त शस्त्रास्त्रं नीट स्वच्छ ठेवलीत.

किल्ला साधारण तासाभरात फिरून झाला. अगदी थोड्या भागात फोटो काढायला परवानगी आहे.

फिरून बाहेर आलो, पुन्हा एक एक लिंबू सोडा घेऊन सारनाथकडे निघालो. सारनाथला गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली असं म्हणतात. तिथे स्तूप आहे. बुद्धांची अनेक देवळं आहेत, श्रीलंका, जपान आणि थायलंड सरकारांनी बांधलेली. पुरातत्त्व विभागाचं उत्तम संग्रहालय आहे. स्तूपातील जुनं बांधकाम, कोरीव काम फारच कमी पाहायला मिळतं. डागडुजी केल्याने फक्त विटाच दिसतात त्यावर. थायलंड सरकारतर्फे बांधलेली ८० फूट उंच बुद्धांची मूर्ती सुरेख आहे. या परिसरात आम्हाला खूप फुलपाखरं पाहायला मिळाली, मला फुलपाखरं अतिशय आवडतात. मग मी त्यांचे फाेटो काढण्यात बराच वेळ घालवला. इथे आम्ही थोडी जंक ज्युलरी खरेदी केली. वर्षाताईला एक मस्त स्लीपिंग बुद्ध मिळाला, जड आणि सुरेख कोरलेला. इथे एक गाडड होता सोबत, त्याने जी काय पोपटपंची लावली होती त्यातनं माहिती कमी मनोरंजन अधिक झालं.

आता पाय बोलू लागले होते आणि पोटात कावळेही कोकलत होते. बनारसच्या वाटेवरच बाटीचोखा नावाचं रेस्तराँ असल्याचं मयूरने सांगितलं होतं. चक्क ड्रायव्हरलाही ते माहीत होतं. पावणेपाचच्या सुमारास तिथे पोचलो. जरा धाकधूक होती, इतक्या उशिरा जेवायला मिळेल की नाही. पण आत गेलो तर अनेक कुटुंबं जेवत होती. थोड्या वेळाने आम्हाला एक टेबल मिळालं. एक स्पेशल आणि एक साधी थाळी मागवली. नक्की काय समोर येईल त्याचा काहीच अंदाज नव्हता. मी जयपूरला दालबाटी खाल्ली होती, पण हे चोखा प्रकरण माहीत नव्हतं.

मोठी थाळी, त्यात दोन बाट्या, एकीत पनीर तर एकीत सत्तू भरलेला होता. चोखा म्हणजे निखाऱ्यांवर भाजलेल्या बटाट्यांचं व वांग्याचं भरीत, पण कच्चं, म्हणजे ते परत फोडणीला नसतं टाकलेलं. टोमॅटो, मीठ आणि सरसोचं तेल. वर्षाताईला या तेलाचं वावडं, त्यामुळे तिने डाळीसोबत खाल्ली बाटी. सोबत मिरचीचा ठेचा होता आणि टोमॅटोची चटणी होती. ते या चोख्यामध्ये मिसळून खायचं. बाटी खाल्ली, मग डाळभात खाल्ला. स्पेशल थाळीत तांदळाची खीर होती. निव्वळ अप्रतिम. ती आणखी मागवली. तृप्त होऊन घरच्या वाटेवर निघालो.

रात्री हाॅटेलच्या जवळ दीना चाट नावाचं प्रसिद्ध दुकान आहे, तिथे कुल्फीफालुदा खाल्ला. मलईदार कुल्फी आणि त्यावर शेवया. द्रोणात मिळणारा हा फालुदा पटकन संपला.

उद्या लवकर उठून प्रयागला निघायचं होतं, त्यामुळे लवकर गुडुप केलं.

दुसऱ्या दिवशी काय केलं ते इथे वाचा.

Comments

  1. आवडलं. पण अजून वैशिष्ट्यपूर्ण बनारस जाणवलं नाहीय. पुढच्या पोस्ट्स मधून दिसेल कदाचित.

    ReplyDelete
  2. हो, लिहितेच आहे.

    ReplyDelete
  3. एका आलीशान, रुबाबदार राजवाड्यात प्रवेश करतेय असं वाटलं.. अभी और आने देओ..

    ReplyDelete
    Replies
    1. मिथिला, थँक्यू सो मच <3

      Delete
  4. मस्तच वाटतंय हे वाचायला.

    ReplyDelete
  5. वर्णन खिळवून ठेवणारे आहे. बनारस ला जावं वाटायला लागलंय आता.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की जा. एकदा जाऊन मन भरत नाही.

      Delete

Post a Comment