बनारसिया २

गंगायमुनेचा संगम
आजचा इथला तिसरा दिवस. आलो तेव्हापासूनच बनारसमध्ये छठ पूजेचा माहौल आहे. बाजारात ऊस, शिंगाडे, कमरक, वगैरेंचे ढीग लागलेत. आणि सगळ्या प्रकारची फळं. आज संध्याकाळी हजारो भाविक गंगाकिनारी जमणार आहेत. अलाहाबादलाही तेच असणार, त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आम्ही सकाळी लवकर जायचं ठरवलं. सकाळी सातला निघालो. १२५ किमी आहे अलाहाबाद, इथल्या भाषेत इलाहाबाद. म्हणजेच प्रयाग, त्रिवेणी संगमाची जागा. आजचा चालक होता पोरगेलासाच, फैज नावाचा. वाटेत एके ठिकाणी गरम कांदाभजी आणि चहा घेतला. गावात शिरता शिरताच रस्त्यावर अनेक लोक गाडीला हात दाखवत थांबवायचा प्रयत्न करू लागले. फैज म्हणाला, ते नावाडी होते, संगमावर जाण्यासाठी नावा चालवणारे. त्यातल्या एकाला गाडीत घेतलं आणि नदीकाठी जायला निघालो. किनाऱ्याला लागून मोठा किल्ला आहे, पण तो लष्कराच्या अखत्यारीत असल्याने फार थोडा भाग पर्यटकांना पाहण्यासाठी खुला आहे. गाडीतून उतरलो, तर नावाडी मागे लागले. चार, पाच, सहा हजार काहीही सांगत होते. आम्ही उडालोच.

विचारलं, किती वेळ लागेल?

दो ढाई घंटे!

एवढा वेळ, कशाला बुवा?

हां, नहाएंगे, पूजा करेंगे, तो वक्त लगेगाही ना.

आम्हाला काही आंघोळ वगैरे करायची नव्हती. मग आम्ही फैजला विचारलं. शेवटी चार हजारवाल्याशी डील केलं. फैजलाही सोबत चल म्हटलं. आणि डुगडुगत्या नावेत जाऊन बसलो.

नाव थोडी पुढे गेली असेल तर सीगल्स घिरट्या मारू लागले. आणि शेजारी एक छोटी नाव आली, शेवेच्या पुड्या विकत होता तो नावाडी. शेव कशाला ते कळेना. फैज म्हणाला, या पक्ष्यांना शेव फार आवडते, त्यांना घालण्यासाठी. आम्ही दोन पुड्या घेतल्या, ६० रुपयांना. शेव पाण्यात फेकली की पक्षी त्यावर झडप घालून ते फस्त करत होते. फार मज्जा वाटली ते पाहून. कुठून आॅस्ट्रेलियाहून आलेले हे पक्षी, शेवेचे अॅडिक्ट झाले होते! दोन पुड्या कधीच संपल्या, मग आणखी दोन घेतल्या. अर्ध्या एक तासाने प्रत्यक्ष संगमापाशी पोचलो. गंगा आणि यमुनेचे प्रवाह एकमेकांत मिसळलेे होते, वेगळे रंग स्पष्ट दिसत होते. तमाम हिंदूंच्या दृष्टीने हे अत्यंत पवित्र स्थळ. मला मात्र या भौगोलिक चमत्काराची जास्त उत्कंठा वाटत होती. कन्याकुमारीला समुद्र वेगळे दिसतात, तसंच हे. अनोखं दृश्य. संगमाजवळ अनेक नावा एकत्र उभ्या होत्या, त्यातला एकीतनं एका पुजाऱ्याने आमच्या नावेत टुणकन उडी मारली. आणि पूजा कशी करायची वगैरे बोलू लागला. मला काही पूजा करायची नव्हती, पण बाकीच्या तिघींना इच्छा होती. मग त्याने काहीतरी मंत्र बडबडले. बडबडलेच, एकाही शब्दाचा अर्थ लागत नव्हता. नारळ दिलेन तेही ओलेच होते, म्हणजे ते सरळसरळ रिसायकल होत होते. त्याने या तिघींना डोक्यावरनं ओढण्याही घ्यायला लावल्या. आणि प्रसादही त्यानेच आणलेले पेढे. त्या संगमाचं पावित्र्य, सौंदर्य, शांतता एंजाॅय करण्यासाठी मला फारच प्रयत्न करावा लागला या सगळ्यानंतर. शेवटी तो निघाला, त्याने आम्हाला हायजॅक केल्यासारखंच वाटलं मला.

आम्ही परतीला लागलो. पुन्हा पक्ष्यांना शेव घालत घालत काठावर परतलो. जवळच निद्रिस्त हनुमानाचं मंदिर आहे, पण तिथे खूप मोठी रांग होती, मग आम्ही काही आत गेलो नाही. इथे छोटासा बाजार भरलेला होता. सुप्रसिद्ध इलाहाबादी पेरू होते, वरून लाल, आत पांढरे. चना चाट होती. या भागांत लोकप्रिय, खरं तर 'परदेशी पर्यटकप्रिय' असलेला लेमन टी होता. चविष्ट चाट, गोड पेरू आणि चाट मसाला घातलेला लेमन टी. अहाहा, काय नाश्ता झालाय त्या दिवशी. फैजला कोणी ओळखीचं भेटलं, त्याने सांगितलं की, गावात छठच्या निमित्ताने गर्दी लोटलीय आणि वाहनं अडकलीत. मग आम्ही आनंद भवन वगैरे इतर प्रेक्षणीय स्थळं न पाहता बनारसला परत जाण्याचं ठरवलं. दोनपर्यंत घरी पोचलोही. फार भूक नव्हती, मग दिनेशने खिचडी, पापड, सोबत ताजा मुळा असं जेवायला घातलं. त्यावर नानीने आठवणीने तूप वाढलं. जेवून आम्ही थोडा वेळ झोपलो. आणि संध्याकाळी बनारसच्या गंगेत नौकानयन करायला निघालो. हाॅटेलपासून काही अंतरापर्यंत रिक्षा जात होती, पण पुढे दशाश्वमेध घाटापर्यंत चालतच जावं लागणार होतं. साधारण एक किमी अंतर असेल. एरवी हे अंतर चालायला दहा मिनिटं लागली असती, पण त्या दिवशी अर्धा तास तरी लागला. कारण वाटेत होते छठपूजेसाठी गंगाकिनारी निघालेल्या बिहारी आयाबहिणींचे जथ्थेच्या जथ्थे. त्यात रस्त्यावरची दुकानं. आणि जन्मसावित्री गायीगुरं. सोबत मयूर होता म्हणून घाटापाशी पोचू शकलो, नाहीतर नावेपर्यंत जाताच आलं नसतं. मुंबईपुण्यातली गणपती विसर्जन मिरवणुकीतली गर्दी साधारण अशी असते. पण त्या गर्दीलाही एक शिस्त असते. इकडे शिस्त नावालाही नव्हती. नाही म्हणायला पोलिस मात्र सर्वत्र होते लक्ष ठेवून. गर्दीतलं कोणी हरवल्याच्या/सापडल्याच्या घोषणाही ध्वनिक्षेपकावरनं चालू होत्या.

मयूरने त्याच्या मित्राच्या नावेपर्यंत आम्हाला सोडलं. घाटाच्या पायऱ्यांवर माणसं दाटीवाटीने बसलेली, अगदी पाण्यात गेलेल्या पायऱ्यांवर पूजा सुरू. अनेक लोक पाण्यात उभे. या गर्दीतनं जाणं ही खरोखर परीक्षा होती. त्यात मला नि वर्षाताईला सारखी चेंगराचेंगरी झाली तर काय, ही भीती.

नावेत बसल्यावर मात्र हीच गर्दी लुभावनी वाटायला लागली. कारण आम्ही तिच्यापासून दूर होतो. रंगबिरंगी, अधिकतर लालच्या विविध छटा, साड्या नेसलेल्या स्त्रिया घाटावरनं पाहताना लक्षात येत होतं की, युरोपियन किंवा अमेरिकनांना बनारसचं वेड का असेल, इकडल्या रंगांची भूल त्यांना न पडती तरच नवल. रंगच कशाला, गंध नि आवाजही. चवीही आहेतच अगणित, पण ते इकडे येऊन स्ट्रीट फूड कितपत चाखत असतील असं वाटतं.

आमचा नावाडी होता प्रदीप. २३/२४ वर्षांचा असेल. अनेक वर्षांपासून नाव चालवायचा, त्याचे वडील, दादा, परदादा सगळे नावाडीच. आम्ही दशाश्वमेध घाटापासून मनकर्णिका घाटापर्यंत आलो, वाटेतल्या हरिश्चंद्र घाटावरही मनकर्णिका घाटासारख्याच चिता जळत होत्या, छठ असो वा इतर काही, मृत्यूला पाॅज नाही. त्या घाटावर शेकडो वर्षांपूर्वी पहिली चिता जळली तेव्हापासून तो अग्नी अव्याहत जळत आलेला आहे, असं म्हणतात. सुरत नु जमण अने काशी नु मरण अशी म्हण आहे. त्यानुसार हजारो लोक बनारसला येतात, इथे मृत्यू यावा व थेट मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून. रस्त्याने जात असताना दिवसभरात चारपाच अंत्ययात्रा दिसणं अगदीच नाॅर्मल.

मनकर्णिका घाटापासून आम्ही उलटे फिरलो. आता पुन्हा छठची गर्दी दिसू लागली. दशाश्वमेध हा काशीतला लोकप्रिय घाट, इथेच संध्याकाळची ती सुप्रसिद्ध गंगाआरती होते. आम्ही शेवटच्या अस्सी घाटापर्यंत जाणार होतो. आता चांगलंच अंधारलं होतं. नदीत सोडलेले दिवे सुंदर दिसत होते. बरेचसे लोकही पूजा आटोपून परतीच्या वाटेवर होते, तर काही त्यांनी बांधलेल्या पूजेजवळ थांबले होते. मावळतीच्या सूर्याला अर्घ्य देऊन झालं होतं, आता याच ठिकाणी उद्याच्या उगवतीच्या सूर्याला अभिवादन केल्यानंतर त्यांच्या पूजेचा समारोप होणार होता.

प्रदीप आम्हाला घाटांची नावं सांगत होता, कोणकोणत्या हिरोहिरोइन्सना त्याने पाह्यलं होतं, अगदी जवळून त्याच्या गोष्टी आनंदाने सांगत होता. त्याच्या बोलण्यात वारंवार येत होता कार्तिक पौर्णिमेचा उल्लेख. कार्तिक पौर्णिमा हा बनारसमधला अतिशय महत्त्वाचा दिवस. गंगेचे सर्व घाट लाखो दिव्यांनी उजळून जातात. आणि हे घाट पाहायला नावांचं बुकिंग महिनाभर आधीच झालेलं असतं. त्या दिवशी रामनगरच्या किल्ल्यापासून दशाश्वमेध घाटापर्यंत नावांची शर्यतही असते, प्रदीपच्या धाकट्या भावाने ती गेल्या वर्षी जिंकली होती म्हणे. यंदा मात्र प्रदीपला नेमकं त्याच दिवशी महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जायचं होतं, त्यामुळे तो हिरमुसला होता.

प्रदीप नाव वल्हवत होता, त्यासाठी त्याला कष्ट पडत होते, परंतु आम्ही त्याला काहीच मदत करू शकत नव्हतो. त्याच्या नावेला मोटर होती, पण मोटरच्या आवाजात गप्पा मारता येत नाहीत आणि डिझेलचा वासही त्रासदायक ठरतो. शिवाय या मंदगती नावेतून फिरण्याची मजा वेगळीच. त्याची काहीच तक्रार नव्हती, आम्हालाच वाईट वाटत होतं.

अस्सी घाटाशी पोचल्यावर आम्ही उतरलो. हा घाट इतर घाटांच्या मानाने प्रशस्त आहे. इथे राेज पहाटे सुबह ए बनारस हा कार्यक्रम होतो. गंगा, दिशा आणि सूर्याची पूजा आणि शास्त्रीय संगीताची छोटी मैफल असं याचं स्वरूप असतं.

घाट चढून वर आलो, थोडा वेळ पायऱ्यांवर बसलो. शांत.

रिक्षाने घरी आलो, दिवसभर बऱ्यापैकी भटकंती झाली होती. आता चिअर अप करायला निघालो दीना चाटमध्ये. नऊ टेबलं आहेत फक्त, उभं राहूनही अनेक जण खातच होते. आम्हाला नशिबाने पटकन एक टेबल मिळालं. आणि मटर चिवडा, पाणीपुरी, दहीपुरी, समोसाचाट, वगैरे एकेक प्लेट मागवलं. मटर चिवडा म्हणजे मटारपोहे, अर्थात भरपूर मटार घातलेले. हिंगाचा स्वाद अगदी जाणवण्याजोगा. यात पातळ पोहे असतात, पाण्याचा अंशही नसतो. चाटही मस्तच होती. शेवटी गुलाबजाम खाल्ला एकेक, अहाहा. दिन सेट हो गया था!

घरी आलो. बुटीक चालवणारी सोना भेटली. दिवसभरात काय काय केलं नि कुठे खाल्लं याच्या गप्पा झाल्या. उद्या पहाटे आम्हाला पार पाडायचं होतं मिशन विश्वनाथ दर्शन! पाचला निघायचं ठरवलं नि झोपलो.

आंघोळी अाटोपून बाहेर पडलो. बनारसही मुंबईसारखंच, न झोपणारं शहर. रिक्षा होतीच, फक्त ती काही अंतरापुरतीच. पण वर्षाताईसाठी ती केली. आज आम्ही ठरवून साड्या नेसलो होतो. मी प्रवास करते तेव्हा सामान कमीत कमी कसं होईल हा माझ्यासाठी एकमेव महत्त्वाचा मुद्दा असतो. पण लेकीसोबत फिरताना लक्षात आलं की, ती ठरवून वेगळे कपडे, त्यासोबत जाणारे दागिने, बॅग्स घेत असते. फोटोमध्ये ते फार उठून दिसतं. वजनात काही फार फरक पडत नाही बॅगच्या पण आपल्यालाच मुंबईपेक्षा जरा वेगळं राहता येतं. म्हणून आम्ही या ट्रिपमध्ये स्कर्ट, जीन्स, सलवार कुडता आणि साडी असं नेलं होतं.

गिरिजाघरापाशी, म्हणजे चर्च, रिक्षाने आम्हाला सोडलं. आता पुढे गल्लीबोळातनं वाट काढत मंदिरात जायचं होतं. मंदिरात मोबाइल, चामड्याच्या वस्तू वगैरे नेऊ देत नाहीत हे ठाऊक होतं. त्यामुळे फक्त माझ्याकडे एक कापडी स्लिंग बॅग घेतली, त्यात चौघींचे पैसे आणि रुमाल. आम्ही रांगेत लागलो. सोमवार होता त्यामुळे नेहमीपेक्षा अधिक गर्दी. अर्थात इथली गर्दी कमी कधीच नसते म्हणा.

साधारण पाचसहा फूट रुंद, की अरुंद, बोळ. दुतर्फा पेढे, पूजासामान विकणारी दुकानं. रांगेतल्या अनेक भाविकांच्या हातात दुधाचे लोटे, हार प्रसादाचे ट्रे, वगैरे. अनेक भाविक वयस्कर, काठ्या वगैरे घेतलेलेसुद्धा. मंदिराच्या थोडी जवळ रांग पोचली तर एका दुकानदाराने सांगितलं की जोडे घालून इथून पुढे जाता येणार नाही. मग मी त्याच्या दुकानासमोर जोडे काढले आणि पुढे जाऊ लागले तर म्हणाला, प्रसाद का बाॅक्स ले लो. म्हटलं, हमें नहीं चाहिये. जूते रख रहे हैं, उस के पैसे दे देंगे. तर तो उखडलाच. म्हणाला, वैसे पैसे नहीं लेते हम, प्रसाद ले लो, नहीं तो जोडे हटा लो. आली का पंचाईत? म्हटलं दे दो. तर हातात एक मोठी टोपली ठेवली नि म्हणाला, साडेतीनसौ रुपये.

साडेतीनसौ? बापरे, इतने पैसे हैं ही नहीं

मग त्याने त्यातलं काहीतरी काढलं, नि म्हणाला, डेढ सौ.

इतने भी नहीं है

मग त्याने फक्त रुईच्या फुलांचा हार नि पेढ्यांचा बाॅक्स ठेवला वैतागून, सौ रुपये. म्हटलं, हां, इतना ठीक है, आणि ते घेऊन पुढे चालू लागलो.

पूर्ण झडती घेतल्याशिवाय आत जाता येत नाही. मंदिरात प्रवेश केला तर शेकडो माणसं आत होती. विश्वनाथबाबांच्या पिंडीसमोर उभं राहिलो, तिच्या भोवती काटकोनात स्टीलचे बॅरिकेड आहेत, त्यामुळे हात लावता येत नाही. मी कधी हातातला बाॅक्स पुजाऱ्याच्या हातात दिला, त्याने तो परत कधी केला मला अजिबात कळालं नाही. तेवढ्यात आगे चलिएचा धोशा सुरू झाला आणि आम्ही पुढे निघालो.

जवळच काही भटजी रुद्र म्हणत होते. काही दाक्षिणात्य भाविक एकत्र अभिषेक करत होते. मंदिराच्या भिंतींवर कहाण्या लिहिल्या आहेत, चित्रं आहेत संगमरवरावर कोरलेली. ते पाहिलं, दोन मिनिटं टेकलो आणि पुन्हा त्याच वाटेने बाहेर पडलो. प्रसादवाल्याचे पैसे दिले अाणि अन्नपूर्णेच्या मंदिरात आलो. अन्नपूर्णेची मूर्ती फार सुरेख आहे. मंदिरात इतरही अनेक देव आहेत. इथेही फार गर्दी होती, विशेषकरून दाक्षिणात्य बायांची.

एव्हाना मला गर्दीने कसंतरी व्हायला लागलं होतं. भगदड मचेल, अशी भीती सारखी वाटत होती. मग बाहेर पडलो. विश्वनाथबाबांच्या दर्शनानंतर कालभैरवाचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. भैरव ही काशीची संरक्षक देवता. मग तिथे जायला ईरिक्षा केली. त्याला थांबवून ठेवलं, दर्शनानंतर घरी परत सोडायला. हे देऊळ छोटंसं आहे, पण सुंदर आहे.

(मुंबईत परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्षाताई मला विचारते, अगं, आपण नक्की विश्वेश्वराचंच दर्शन घेतलं ना, मला काहीच आठवत नाहीये. डोकं भणभणलंय माझं, की आपलं चुकलं की काय काही. गर्दीचा परिणाम, दुसरं काय!)

अशा रीतीने बनारसला आल्यानंतर चौथ्या दिवशी का होईना, विश्वेश्वराचं दर्शन घेऊन घरी परतलो.

पुढच्या दिवशी काय केलं ते इथे वाचा.

Comments

  1. हा भाग खूपच मस्त झालाय. बनारस दर्शन.

    ReplyDelete
  2. मस्तच झालंय बनारसदर्शन!

    ReplyDelete
  3. धन्यवाद शर्मिलाक्का आणि अरुणाताई.

    ReplyDelete

Post a Comment