बनारसिया ४


समारोप

बनारस.

वाराणसी.

काशी.

अनेक नावांनी आपण या शहराबद्दल लहानपणापासून ऐकलेलं असतं. काशीस जावे नित्य वदावे, असंही म्हणतातच. पूर्वीच्या काळी काशीयात्रेला जाणं म्हणजे संन्यासाश्रम घेतल्यासारखं होतं. तिथून परत येणार नाही, असाच संदेश जाताना दिलेला असायचा. आता अर्थात असं नाही. मुंबईहून चारपाच ट्रेन, विमानं काशीला थेट जातात. प्रवासाचा वेळही २८ तासांवरून २५ तासांवर आला आहे ट्रेनचा. विमान तर दोन तासांत पोचतं. तिथे जाताना आपल्याला हे माहीत असतंच की, हे शहर जगभरातल्या पुरातन शहरांपैकी एक. या शहराचं सगळ्यात आधीचं नाव होतं आनंदवन. मग काशी. मग बनारस. वरुणा आणि अस्सी या दोन नद्यांच्या संगमावरून पडलं वाराणसी. शंकराचं स्थान. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. आध्यात्मिक महत्त्वाचं. ऐतिहासिक महत्त्वही तेवढंच. मराठी लाेकांच्या दृष्टीने वैशिष्ट्य हे की, होळकरांच्या काळात त्यांच्या सोबत अनेक मराठी कुटुंबं इथे आली आणि तिथेच वसती करून राहिली. ती प्रामुख्याने ब्राह्मण. झाशीच्या राणीचा जन्म इथलाच. गंगा नदीचंही माहात्म्य सर्व भारतीय हिंदूंसाठी आहेच. डोम अथवा डाेंब राजा इथला. अनेक हिंदी चित्रपटांमधनं दिसणारं हे शहर. हल्ली मराठी मालिका काहे दिया परदेसमुळे नव्याने नजरेत आलेलं. आणि अर्थातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ ही या शहराची गेल्या अडीच पावणेतीन वर्षांत निर्माण झाली ताजी व अत्यंत महत्त्वाची ओळख. जी शहरात फिरताना मनात असतेच, परंतु तिच्या खुणा मात्र दिसत नाहीत.

मी पाहिलेलं हे सर्वात गलिच्छ, अस्वच्छ, प्रशासनाचं जराही अस्तित्व न दिसून येणारं शहर. तीनेक वर्षांपूर्वी मी अकोल्याला पहिल्यांदा गेले होते, सकाळी सातच्या सुमारास ट्रेनमधनं उतरले, बाहेर आले तर कशाही गाड्या पार्क केलेल्या, गायीगुरं बसलेली. धुळीने माखलेलं अस्ताव्यस्त शहर समोर आलं. रस्ते छोटे, खड्डे असलेले. अतिक्रमणांनी गांजलेलं. नंतर एकदा गेले, तेव्हा या शहराने बऱ्यापैकी कात टाकल्यासारखी वाटली होती. आयुक्त चांगला होता, असं अंधुक आठवतंय.

आणि बनारस? विमानतळातनं बाहेर पडताक्षणीच लक्षात येतं की, खालची जमीन खडबडीत आहे. चाकं असलेली बॅग ओढून नेणं मुश्किल. तरी हा विमानतळ आंतरराष्ट्रीय आहे बरं. मूळ गावापासून लांब अाहे ते ठीकच. वाराणसी रेल्वे स्थानकाचीही तीच गत. डोळ्यांत मुख्य भरतो तो कचरा. पाच दिवसांत क्वचितच कचरापेटी नजरेस पडली असेल. तिथे मातीच्या कुल्लडची प्रथा आहे, किंवा पानांच्या द्रोणांचा वापर होतो. प्लॅस्टिकचे कपही असतात, पण जरा कमी प्रमाणात. चाट, रबडी, चहा, समोसे यांसाठी वापरले जाणारे कुल्लड नि द्रोण तिथेच दुकानाबाहेर टाकून दिलेले दिसतात, ते टाकण्यासाठीही तिथे काही सोय केलेली दिसत नाही.

विश्वेश्वराच्या दर्शनाला आपण रांगेत उभे असतो. एका बाजूला अगदी आपल्याला चिकटून दुकानं असतात, दुसऱ्या बाजूची हात लांब केला तर स्पर्श होईल अशा अंतरावर असतात. पायाखाली आेल असते, पाणी आणि दूध सांडून निर्माण झालेली. याच्यावरनं पाय घसरून एक व्यक्ती पडली तर तिला चिकटून उभी असलेली माणसं भांडी घरंगळावी तशी पडण्याची शक्यता. शिवाय देवाला वाहिलेलं दूधही असंच वाहात असतं बाहेर. कधी एकदा या किचाटातनं बाहेर पडतो असं होऊन जातं. बाहेर गेल्यावर फरक इतकाच की, काही झालं तर घुसमटायची व चेंगराचेंगरीची शक्यता कमी. बाकी कचरा नि गर्दी सगळीकडे आहेच.

अर्थात, कचरा नि गर्दी हे बनारसचं व्यवच्छेदक लक्षण आहे. ये शहर गंदा ही रहने दो, इसे चकाचक साफसुथरा मत बनाओ असं अनेकांचं मत आहे, कारण मग ते बनारस राहणार नाही. इथली गर्दी इतक्या ठिकाणांहून आलेली असते की, तिच्यावर नियंत्रण एका मर्यादेपर्यंतच ठेवलं जाऊ शकतं. दक्षिणेकडनं येणाऱ्या बहुतांश भाविकांना हिंदी कळत नाही, त्यांच्यासाठी इथले दुकानदार तामिळ नि तेलुगु शिकले आहेत. बहुतेक भाविक बऱ्याचदा मोठ्या गटाने येतात, यात्रा कंपनीतर्फे. त्यांना फक्त विश्वेश्वराचं दर्शन नि गंगास्नान करायचं असतं. त्यापलिकडे त्यांना या शहराशी घेणंदेणं नसतं. परदेशी पर्यटक येतात, त्यांना फोटो काढायचे असतात सतत, कारण इथलं सगळंच त्यांच्यासाठी वेगळं, नवीन, चमत्कारिक, फोटोजेनिक. साधू, गंगेचा घाट, नावा, पाणी, गर्दी, स्ट्रीट फूड, सायकल रिक्षा, गरिबी, मृत्यू, चिता, अस्वच्छता, भाविक, चहावाले, पानटपऱ्या, हे सर्वच त्यांना टिपायचं असतं. ते स्वत: इथल्या अस्वच्छतेत भर घालणार नाहीत हे निश्चित. पण त्यांनाही या आकर्षणांपलिकडे या शहरात रस नाही.

मुंबईकर मध्यमवर्गीय आणि पत्रकार अशी मी तिथे जाते तेव्हा मला तिथे हे सर्व पाहायचं असतंच, पण मला तिथल्या स्थानिक माणसामध्येही रस असताे, तो येऊ घातलेल्या राज्य निवडणुकीत काेणाला मत देणार आहे, तो कितपत शिकलाय, त्याला त्याचं भविष्य काय दिसतंय हेही मला जाणून घ्यायचं असतं. त्यात मी यशस्वी होतेच असं नाही. पण माझा प्रयत्न जरूर तसा असतो. सर्व जातिधर्माचे, भाषा बोलणारे, देशविदेशातील नागरिक इथे एकत्र येतात नि या शहराचं एक स्वतंत्र रसायन तयार होतं. ते एका भेटीत कळणं अशक्यच. पण या रसायनाचा गंध नि चव माझ्यापर्यंत नक्की पोचलेली असते. इथली अक्षय्य ऊर्जा मला जाणवत असते. मृत्यू हा या शहराचा आत्मा आहे, पण ते मरणाभोवती घुटमळत नसतं. ते मृत्यूची अपरिहार्यता स्वीकारून पुढे चाललेलं असतं.

आम्हाला इथे स्थूल माणसं फार कमी दिसली. गंगेवर जाणं हा शहरातील अनेकांचा रोजचा नेम. एक घाट उतरून पुन्हा चढून वर येणं म्हणजे इमारतीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावरची दमछाक करायला लावणारी कृती. तसंच वाहनं एका मर्यादेपर्यंत सुरू असल्याने दैनंदिन जीवनात त्यांना चालावंही बरंच लागतं. दुकानं मुंबईपुण्यापेक्षा अधिक काळ सुरू असतात, चहावाले, दूधवाले तर २४ तास काम करत असावेत. विश्वेश्वराच्या मंदिराजवळची दुकानंही २० तास तरी उघडी असतील. हे शहर झोपत असेल तर जेमतेम तीनचार तास, पहाटे चारला अनेकांचा दिनक्रम सुरू होतो. नावाडी, गाइड, पंडे यांचाही दिवस १० ते ५ या रूटीनपेक्षा नक्कीच मोठा. एकूण शारीरिक हालचाली अधिक कराव्या लागत असाव्यात, म्हणून माणसं शिडशिडीत असावीत, असं वाटलं खरं.

आम्हाला तिथे मदत मिळाली बऱ्याच तरुणांची. दोन्ही चालक जेमतेम वीस पंचवीस वर्षांचे होते. एक बाहेरून शिकत होता, बहीण काॅलेजात होती. एक नावाडी प्रदीप, दहावीपर्यंत शिकलेला, धाकटे बहीणभाऊही शिकणारे होते. एक नऊदहा वर्षांचा चुणचुणीत मुलगा रोहित भेटला, प्रदीपसोबत फिरताना. रोहितने थर्मोकोल वापरून छोटीशी नाव तयार केलीय स्वत:च, आणि त्याच नावेत बसून तो दिवे विकतो. द्रोणात चारपाच झेंडूची फुलं, त्यात मध्ये दिवा आणि काड्यापेटीही. दिवसा शाळेत जातो. नदीच्या उस पार गेलो तेव्हाही नावाड्यासोबत एक नऊदहा वर्षांचा मुलगा होता. तो नुसताच पाहात होता, नावाड्याचा भाऊही नव्हता. तोही या व्यवसायातले बारकावे उचलत असेल अशा फेरीत. तोही दिवसा शाळेत जाणारा. ग्रॅनीज इनमध्ये काम करणारा मयूरही अत्यंत चटपटीत. ईमेल्स, बुकिंग, पेमेंट सगळं सांभाळणारा. खेरीज हेरिटेज वाॅकचा वाटाड्या म्हणूनही काम करणारा. त्यांना ठाऊक आहे, आपण काम केलं तर भविष्य आहे. आणि बनारसला आॅफ सीजन नावाचा प्रकारच माहीत नाही. उन्हाळ्यात थोडेफार कमी होत असतील पर्यटक, परंतु शहर थंडावलेलं कधीच नसतं. मुंबईत उत्तर प्रदेशातनं अनेक लोक रोजगारासाठी येतात. त्यातले फार थोडे बनारसचे असावेत, कारण या शहरात प्रत्येक हाताला काम आहे.

बनारसच्या गल्ल्या ही या शहराची ओळख आहे, इतिहास आहे, ठेवा आहे. त्या तशाच राहायला हव्यात, पण त्या थोड्या स्वच्छ करता येतील, प्रकाशयोजना नीट करता येईल. आणि त्या गायींना उचलून दूर नेलं तर शहर बऱ्यापैकी सुकर होईल, असं वाटतं. सायकल रिक्षा आता कमी होत चालल्या आहेत, ईरिक्षांचा वापर वाढतो आहे. रस्ता रुंदीकरण हा आपल्याकडच्या सर्वच गावांमधला व शहरांमधला मोठा प्रश्न, कारण त्यामुळे विस्थापित होणाऱ्यांचं पुनर्वसन हे महाकठीण काम. बनारसला स्मार्ट सिटी नका करू, पण इथला केआॅस कमी झाला तर बरं होईल का?

पण हा केआॅसच हवाहवासा वाटतो, माझ्यासकट अनेकांना, त्याचं काय करायचं?

कारण बनारस या सगळ्याच्या घटकांच्या बेरजेपेक्षा अधिक उरणारं आहे. More than the sum of it all. ते पुन्हा पुन्हा बोलवत राहातं, एकदा जाऊन मन भरत नाही. मी चारदा जाऊन आलेय, पण पाचव्यांदा जायची तयारी आहे अर्थातच.

Comments