आमची 'फ्लोरेन्स नाइटिंगेल'

डावीकडून : नंदूमावशी, वासंतीताई, पुष्पामावशी व आक्कामावशी

मागच्या शनिवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास मुलुंडला मी बदलापूर लोकलमध्ये चढले. दुसरा शनिवार, लाँग वीकेंड असूनही गाडी खचाखच भरलेली. जेमतेम आत शिरता आलं, कशीबशी उभी राहिले. हातातल्या पिशव्या रॅकवर ठेवायला दिल्या. पुढचा एक तास धक्के खाण्यातच गेले, तेही उभं राहून. अर्थात बसलेल्यांचीही स्थिती फारशी सुखावह नव्हती, कारण गर्दीच इतकी होती. त्या एक तासाच्या प्रवासात मनात फक्त हाच विचार येत होता, रोजच्या रोज असा प्रवास करणाऱ्या व्यक्ती आॅफिस आणि घरात कशा नाॅर्मल राहू शकत असतील? इतके धक्के सहन करून आॅफिसात पोचल्यावर काम करायची एनर्जी कुठून पैदा करत असतील नि घरी पोचल्यावर घरच्यांशी साधं हसून नाॅर्मल बोलता तरी कसं येत असेल यांना? तेही एकदोन दिवस नाही, अनेक वर्षं? मी ज्यासाठी बदलापूरला चालले होते, त्या पार्श्वभूमीवर तर हे प्रश्न मला अधिकच अस्वस्थ करून गेले.

माझी मावसबहीण वासंतीताई लोकमान्य टिळक ऊर्फ सायन हाॅस्पिटलमधून परिचारिका म्हणून गेल्याच आठवड्यात निवृत्त झाली, तिची कर्तव्यपूर्ती साजरी करायला आम्ही सगळे तिच्या घरी जमणार होतो. ताईने जवळपास ४० वर्षं नोकरी केली. त्यातला बराच काळ पहिली पाळी, सातची. त्यासाठी ती पहाटे पाचची लोकल पकडायची. म्हणजे ती किमान चारला उठून पावणेपाचला घराबाहेर पडायची. सुरुवातीला नवरा, प्रकाश आणि मोठा झाल्यावर मुलगा, अमेय तिला स्टेशनवर सोडायला जायचे. तिची आई, माझी आक्कामावशी घर सांभाळायला होती, फक्त हा प्लस पाॅइंट. चार साडेचारपर्यंत घरी. सायनसारख्या महाप्रचंड रुग्णसंख्या हाताळणाऱ्या रुग्णालयात ड्यूटी करण्याचे तणाव वेगळेच.

अशा विचारातच मी तिच्या घरी पोचले तर आमचा पटवर्धन गोतावळा जमतच होता. सात बहिणी व दोन भाऊ, त्यांची २२ मुलं, त्यांचे जोडीदार व त्यांची २६ मुलं, या मुलांपैकी काहींचे जोडीदार, आणि आता पाच महिन्यांचा असलेला चौथ्या पिढीचा प्रतिनिधी ऋग्वेद असं आमचं हे कुटुंब. आॅलमोस्ट प्रत्येक घरातला किमान एक प्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर होता. आणि जे नव्हते, ते मनाने इथेच होते, आम्ही त्यांना व्हाॅट्हअॅपवरनं अपडेट्स देतच होतो. साडेआठपर्यंत पन्नासेक जणांचा कोरम पूर्ण झाला. आक्कामावशीने, ऐंशीवं वर्ष जवळ आलं असतानाही, आमच्यासाठी स्वत: केलेल्या गुळाच्या पोळ्या, टोमॅटोचं सार, पुलाव, पापड, ताक असं जेवलो. आणि मग गच्चीत गेलो. गच्चीत दोनतीन दिवसांपासून ताईला प्रवेश नव्हता, तिच्यासाठी सरप्राइज ठेवायचा होता कार्यक्रम. आम्हालाही कुणाला फारसा अंदाज नव्हता.

गच्चीत गेलो तर खुर्च्या, समोर प्रोजेक्टर, एक संगणक, स्पीकर्स, वगैरे जामानिमा मांडलेला. वासंतीताईच्या लहानपणापासून ते निवृत्ती सोहळ्यापर्यंतचे निवडक फोटो एकत्र करून त्याची छोटी एव्ही केली होती. त्यात प्रभामावशी, ताईचे दीर जाऊ आणि पुतण्या यांचे आॅडिओ/व्हिडिओही होते. अठराव्या वर्षी लग्न झाल्यानंतर सासऱ्यांची इच्छा म्हणून नर्सिंगच्या कोर्सला प्रवेश घेणारी ताई. होस्टेलचे अनुभव, अमृताचा जन्म, मग सायन हाॅस्पिलची नोकरी, वेळोवेळी केलेली प्रशिक्षणं, बर्न्स वाॅर्डमधल्या कामाची पाच वर्षं, आणि निवृत्ती सोहळ्यातली हृद्य क्षणचित्रं यांनी सजलेल्या एव्हीतून आम्हा भावंडांनाही ताईची नवी ओळख झाली.

ताई सायनला असल्याने आमच्या कुटुंबात कोणी गंभीर आजारी पडलं किंवा शस्त्रक्रिया करायची असली तर तिथेच होई. हाॅस्पिटलपासून चुनाभट्टीचं आप्पामामाचं घर आणि माहीमचं माईमावशीचं घर जवळ. त्यामुळे श्रीरंग नि भालचंद्र यांचं तिथे नेहमी जाणं होई. पेशंटच्या निमित्ताने किंवा ताईला भेटायला. त्यामुळे या दोघांकडे 'पराडकर सिस्टर'च्या अनेक आठवणी आहेत. तिचा तिथे दरारा होता, वचक होता. ती असेल तो वाॅर्ड शिस्तीत असे. अर्थात तिचं काम, अनुभव, परिस्थिती सांभाळायची हातोटी, पटकन निर्णय घेण्याची क्षमता हे त्यामागचं मुख्य कारण. मधेच आक्कामावशीने माईमावशीने तिला सांगितलेली गंमत ऐकवलीन. माईमावशी ताईला भेटायला गेली तेव्हा ताई बर्न्स वाॅर्डमध्ये होती. ताई तिथे एका पेशंटला भेटायला आलेल्या नातलगांना ओरडत होती. त्यांनी आत जाऊ नये, म्हणून त्यांना अडवत होती. मावशीला ते काही रुचलं नव्हतं. पेशंटच्या आप्तांना त्याला भेटायला द्यायचं नाही म्हणजे काय, असं तिला वाटत होतं. ते लोक बाहेर गेल्यावर ताईने मावशीला आत नेलं नि ती एका छोट्या रुग्ण मुलाला बिस्किट भरवू लागली. एक परिचारिका म्हणून एकाच वेळी कठोर नि मृदू दोन्ही असणं किती आवश्यक असतं ते मावशीला दिसून आलं. आणि तिने ते कौतुकाने आक्कामावशीला सांगितलं. हे एकमेकींना सांगणं ही या बहिणींची गरज होती, त्यांचं नेटवर्क जबरदस्त होतं.

यानंतर ताईची मुलगी अमृता बोलली. अमृता लहान असताना ताई आधी शिकत होती, मग नवीन नोकरी. त्यामुळे ती आधी काकाकाकू नि मग आजी, म्हणजे आक्कामावशीजवळ, वाढलेली. आईशी जवळीक फारशी नाहीच, अनेक वर्षांपर्यंत. आठनऊ वर्षांपूर्वी अमृता गंभीर आजारी पडली. सायन हाॅस्पिटलमध्ये नाकातोंडात नळ्या घातलेल्या अवस्थेत तिला डोळे उघडायची तेव्हा फक्त आई दिसायची. सोनी, मी आहे, असं सांगणारी खंबीर आई. आणि त्यानंतर त्या दोघींचं नातं बदलूनच गेलं. अमृताच्याच शब्दांत सांगायचं तर, आता बोललं नाही तरी चालतं, ये हृदयीचं ते हृदयी अशा पातळीवर त्यांचं नातं आलं आहे. अमृताच्या याच आजारपणात अमृताचा नवरा सुबोधही सासूच्या जवळ आला. आज त्या दोघांचं नातंही अद्भुत म्हणावंसं आहे, मैत्रीचं, जिव्हाळ्याचं. त्याला तिचा आधार वाटतो खूप. आणि प्रेमही. शेवटी सुबोधने म्हटलंच, आय लव्ह यू आई. हे असं मनापासून आपल्या सासूला जाहीरपणे, किंवा अगदी खाजगीतही, म्हणणारे किती मराठी मध्यमवर्गीय जावई असतील, असं वाटतं ना? सुबोधने आमचे त्याला स्वीकारल्याबद्दल आभार मानलेन, पण तो आमचाच झालाय, आमचं नशीब तो आमच्या कुटुंबात आलाय, यावर दुमत नसावं.

आनंदी ही ताईची सून. भरून येणारे डोळे पुसत पुसत तिने एवढंच सांगितलं, आई, तुम्हाला इतकी वर्षं जे करायचं होतं पण करता नाही आलं, ते आता मनसोक्त करा. आनंदात राहा.

राजश्रीने एक छोटीशी कविता वाचून दाखवली, जे आम्हा सर्वांच्या अगदी मनातलं होतं.

माझ्यात आणि ताईत जवळपास १५ वर्षांचं अंतर. त्यामुळे माझ्याकडे तिच्या अशा आठवणी नव्हत्या. पण आमचं कुटुंब एकत्र असणं, जवळ असणं, आनंदाच्या नि दु:खाच्या प्रसंगात एकमेकांसाठी उपलब्ध असणं मला महत्त्वाचं वाटतं. माझ्या एका मैत्रिणीने १५ दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला. तिचंही कुटुंब बऱ्यापैकी मोठं, दोन मोठ्या भावांची ही बहीण. परंतु त्यांच्यात संवाद नाही पुरेसा. याचा उल्लेख करून मी म्हटलं की, आपण एकमेकांसोबत असण्याचा मोठा मानसिक आणि भावनिक आधार मला वाटतो. आर्थिक आधारही आम्ही वेळप्रसंगी देत असतोच, पण मानसिक आधार महत्त्वाचा. काहीही झालं तरी आपल्यासोबत अनेक व्यक्ती आहेत, हा विश्वास फार आवश्यक असतो. हे व्यक्त करण्याची संधी मी या निमित्ताने घेतली. अभिजीतने आमचं सर्वांचं मनोगत एका वाक्यात मांडलं. इतक्या वर्षांची ताईची ही तपस्याच आहे, हिमालयात न जाता केलेली.

ताईचे पती प्रकाश अगदी दोन वाक्यंच बोलले. ताईचं कौतुक कोकणातल्या मालूमावशीचे यजमान अण्णा भटांनी कसं केलं होतं, याची आठवण त्यांनी सांगितली. नर्सिंग क्षेत्रातल्या अगदी दुर्मीळ ब्राह्मण स्त्रियांपैकी ती एक होती, त्या निमित्ताने रत्नागिरीत तिचा सत्कार त्यांनी घडवून आणला होता.

मग ताई बोलू लागली. तिच्यासाठी हा कार्यक्रम आणि आम्हा सर्वांची उपस्थिती फारच भावनाविवश करून जाणारी. नर्सिंग करण्याची इच्छा नसतानाही सासऱ्यांच्या आग्रहामुळे ती नर्सिंगला गेलेली. पण एकदा करायचं ठरल्यावर ते तनमनधन ओतून करायचं, ही आईची शिकवण तिने आचरणात आणली. याच परिश्रमातून ती निवृत्त झाली तेव्हा सिस्टर इन चार्ज होती. अमृता आणि अमेय यांचं बालपण अनुभवता न आल्याबद्दल ती चक्क त्यांना साॅरी म्हणाली. घर हाॅस्पिटलात न्यायचं नाही आणि हाॅस्पिटल घरी न्यायचं नाही, अशी शिकवण नोकरीच्या अगदी सुरुवातीलाच तिला देणाऱ्या दीक्षित नावाच्या मेट्रनबद्दल ती आदराने बोलली.

तिने सांगितलेला एक किस्सा ऐकताना आमच्या अंगावर काटाच आला. ती तेव्हा बर्न्स वाॅर्डमध्ये होती. एका मुलीचं लग्न ठरलं होतं, आणि ती अचानक भाजली. अनेक दिवस हाॅस्पिटलमध्ये होती. पण तिचा होणारा पती तरीही तिच्यासोबत होता, आणि ती बरी झाल्यावर त्यांचं लग्न झालं. तिच्या उपचारात ताईचा मोठा सहभाग होता. यानंतर काही दिवसांनी आणखी एक मुलगी अॅडमिट झाली, पहिल्या मुलीच्या नात्यातली. परंतु ती वाचली नाही. यानंतर एकदा ताई एकटीच रात्री नऊच्या सुमारास जीटीबी नगर स्टेशनकडे चालत निघाली होती तर तिच्या समोर तीन बुरखाधारी व्यक्ती उभ्या राहिल्या. तिने पाहिलं तर पायात बूट स्पष्ट दिसत होते. आमच्या मुलीला तुम्ही वाचवलं नाही, आता तुम्हाला कोण वाचवतंय ते पाहू, असं त्यातला एक म्हणाला. ताई म्हणाली, एखादाच असता तर मी काहीतरी हातपाय हलवले असते, तेवढी रग माझ्यात होती. पण तिघांसमोर माझं काही चालणार नव्हतं. बुरख्यामुळे त्यांच्याकडे काय हत्यार आहे, तेही तिला कळत नव्हतं. तेवढ्यात एक म्हणाला, आपल्याला जिला मारायची सुपारी दिलीय ती ही नाही, हिने तर माझ्या मोठ्या बहिणीला वाचवलंय. एवढं बोलून ते निघून गेले. ताई पुढची दहाएक मिनिटं तिथेच जमिनीला खिळून उभी होती. तिची एक सहकारी तिथे आली, तिच्यासोबत ताई स्टेशनकडे निघाली.

यानंतर गच्चीतला कार्यक्रम संपवून आम्ही पहिल्या मजल्यावरच्या हाॅलमध्ये जमा झालो. तिथे गाद्या घालून ठेवलेल्या होत्या आणि तबलापेटी आमची वाट पाहात होते. गाणं सुरू होण्याआधी अर्थात चहाचा एक राउंड झाला.

देवगडहून आलेला आमचा मेव्हणा संदीप फडके पेटीवर आणि तबल्यावर आमचा भाचा अथर्व कार्लेकर, गाणार स्वत: संदीप. आम्ही सगळी समोर, कोरस म्हणून. संदीपने काही अभंग सांगितले. राजेंद्र, सतीश, राजश्री यांची टाळ आणि झांजांची अप्रतिम साथ होती त्याला. आम्ही बेसुरे कोरस गात होतो. सतीश, ऋता, मुद्रा, नचिकेत, अथर्व, अमोल यांनीही एक एक अभंग वा गोंधळ सांगितला. मग आदित्याने खास त्याच्या स्टाइलमध्ये ढलता सूरजचा सूर लावला आणि झोपायला गेलेली मंडळीही परत आली. मागच्या भागात नाचायला सुरुवात झाली. नाचून दमल्यावर थोडी शांत गाणी ऐकावी वाटायला लागली. अभिजीत नि श्रीरंगाने तलतचे सूर लावले, ती गाणीही आम्ही कोरसनेच गायलो. मधेच पुन्हा एक चहाचा राउंड झाला. सोबत बिस्किटं आणि वेफर्सही होते. मग जुन्या हिंदी गाण्यांच्या फैरी झडल्या. शेवट संदीपच्या पेटीवादनाने झाला. काही नाट्यगीतं आणि भैरवी. अथर्वने त्याला तोडीची साथ दिली आणि आम्ही तृप्त झालो. पहाटे साडेचारपर्यंत आम्ही गात, नाचत, टाळ्या वाजवत होतो. पाचच्या गाडीला राजश्री नि मुद्राला सोडून आम्ही झोपायला गेलो. तीनचार तास झोपतोय, तर अमृताने इडली चटणी आणून ठेवली होती. त्यावर ताव मारून हळूहळू आपापल्या वाटेला लागलो.

एका बहिणीच्या निवृत्तीनंतरच्या गेट टुगेदरसाठी आम्ही जमलो होतो. अशी फार कुटुंबं नसतील, जिथे कशाचाही सोहळा होऊ शकतो आणि ज्यात सर्वांचा अॅक्टिव्ह सहभाग असतो. निघताना सगळ्यांचेच पाय जडावले होते, कुणालाच जावंसं वाटत नव्हतं. आम्ही ताईला पार्टी देणं, किंवा आमच्यापैकी कुणाकडे बोलावणं खरं तर साहजिक म्हणायला हवं. पण इथे ताईनेच, तिच्या लेकीसुनामुलाजावयाच्या मदतीने हा घाट घातला. याचं अप्रूप आम्हाला सगळ्यांनाच खूप.

कार्यक्रम इतका मस्त झाला की, पुष्पामावशी म्हणाली पण, 'मला एखादा जावई असता तर त्याने माझ्यासाठीही केला असता असा कार्यक्रम.'

Comments

  1. Superb... all moments are well captured... can we add few images ?

    ReplyDelete
  2. Mastach....it was really memorable event of 2016...Bhalchandra Gokhale.

    ReplyDelete
  3. खूप सुंदर 👌👌😊

    ReplyDelete
  4. मुंबईत रहाणारा माणूस एवढा हळवा व नातं जपणारा असू शकतो हे बघून आमच्या सारखे लहान शहरात राहणार-यांना लाज वाटते हे मी कबूल करतो.
    असे पारिवारिक कार्यक्रम बळ देतं.💐💐

    ReplyDelete

Post a Comment