खराखुरा आखाडा


कोणत्याही बाईला आखाडा नवीन नसतोच. फक्त तिच्या ओळखीचा आखाडा मातीचा नसतो. तिच्या रोजच्या जीवनात ती अनेकदा विरोधकांकडून चीत होत असते, कधी अडचणींवर मात करत असते, कधी ती कामाच्या ठिकाणच्या प्रतिस्पर्ध्याला आसमान दाखवते, तर कधी घरच्यांना धोबीपछाड घालते.
ही कुस्ती जन्मापासून मृत्यूपर्यंत सुरूच असते प्रत्येकीची. या कुस्तीला तर नियमही नसतात अनेकदा, ना असतात कोणी पंच. ना ती हरल्यावर कोणी तिला पाणी देणार असतं, ना जिंकल्यावर हात उंचावून अभिनंदन करणारं. पण ती न लढण्याचा पर्यायही नसतोच तिच्यापुढे, ती कायमच शड्डू ठोकून पवित्रा घेऊन उभी असते. ही कुस्ती लढणाऱ्या काही जणींना मात्र अस्सल तांबड्या मातीत उतरून खरीखुरी कुस्ती खेळावीशी वाटते, त्यांचं कौतुक करण्यासाठी आजची मधुरिमा.
कुस्ती खेळणाऱ्या मुली हे साधारण पंधराएक वर्षांपर्यंत अगदीच दुर्मीळ चित्र होतं भारतात. लाल मातीत अंग मळवून घेण्याची, मार सहन करण्याची, तासन‌्तास सराव करण्याची, त्यासाठी योग्य आहार घेण्याची आस त्यांना या अलीकडच्या काळात लागली.
साक्षी मलिक, गीता फोगट, विनेश कुमारी यांच्यासारख्या कुस्तीगीर गेल्या काही वर्षांपासून देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून पदकं आणू लागल्या. त्यासाठी घरच्यांचा, दारच्यांचा, समाजाचा विरोध सहन करायचीही त्यांनी तयारी ठेवली. पुरुषांची कुस्ती शंभरहून अधिक वर्षांपासून आपली लोकप्रियता आणि राजाश्रय दोन्ही टिकवून आहे, पण महिला कुस्तीकडे सध्या तरी राज्य सरकारचं फारसं लक्ष नाहीसं या महाराष्ट्रातल्या मुलींच्या गोष्टी वाचून ध्यानात येतंय. त्यांच्यासाठी पूर्ण वेळ आखाडेही नाहीत,
मग प्रशिक्षक, आहारासाठी निधी वगैरे बाकीच्या गोष्टी सोडाच. सोनाली तोडकरने सिंगापूरमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक कमावलं, पण तिथे जायचा लाखभर रुपयांचा खर्च उचलण्यासाठी तिच्या वडलांना अनेकांसमोर हात पसरावे लागले, हे आपल्या राज्याला शोभा देणारं नक्कीच नाही. पण या मुलींच्या स्फूर्तीदायक कहाण्या वाचून ही परिस्थिती बदलेल अशी आशा नक्कीच वाटते. ‘दंगल’ चित्रपट कोट्यवधीचा धंदा करेल न करेल, खऱ्या कुस्तीगीर मुलींना कितीही निधीसाठी मिनतवाऱ्या कराव्या लागू नयेत, अशा शुभेच्छा.

Comments