जेंडर आणि मी

काल एका मित्राच्या वाॅलवरचे 'बापासारखा बायकी नि आईसारखा पुरुषी' असे शब्द खटकले. मी शक्यतो असं काही खटकलं तरी एरवी काही कमेंट करत नाही. पण त्याने असं लिहावं हे जरा बोचलंच, म्हणून तिथे खटकल्याची नोंद केली. त्यावर अर्थात असं असेल तर काही लिहायलाच नको, विनोद कसा करायचा, हलकं घ्या वगैरे कमेंट्स आल्या.

पण जेंडर हा विषय आपण फारच दुर्लक्षित ठेवलेला आहे, हे या निमित्ताने लक्षात आलं. साधारण साठेक वर्षांपूर्वी जेंडर बायस, जेंडर सेन्सिटिव्हिटी, जेंडर बेसड व्हायलन्स, जेंडर रोल्स, अशा विषयांची दखल अमेरिकेत घेतली गेली. आपल्याकडे दहापंधरा वर्षांपूर्वीपासून, असा अंदाज. मीही कधी या दृष्टिकोनातून याआधी विचार केला नव्हता. तीनचार वर्षांपूर्वी पाॅप्युलेशन फर्स्ट या जेंडर सेन्सिटिव्हिटी इन मीडिया या विषयावर काम करणाऱ्या संस्थेने मला यासाठीच्या पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणून बोलावलं तेव्हा माझ्यातली ही उणीव मला प्रकर्षाने जाणवली. त्यानंतर मात्र मी अत्यंत जाणीवपूर्वक याचा विचार करू लागले. लिहिताना वा बोलताना काळजी घेऊ लागले. काेणाचाही रंग, उंची, लैंगिक निवड, कपडे, वगैरे यावरनं कमेंट करताना हा जेंडरचा किंवा जेंडर स्टिरिओटाइपचा विचार मनात येऊ लागला. "ती काळीसावळीच आहे, पण छान आहे,' असं एकदा म्हणाले होते तर लेकीने पटकन तोडलं. म्हणाली, "काळीसावळी आहे पण.. म्हणजे काय? तू पण पक्की रेसिस्ट आहेस.' शाळाकाॅलेजात असताना LGBTQ वगैरे काही माहीत नव्हतं, तेव्हा वेगळी लैंगिकता असणाऱ्यांना आम्ही समोर नाही, पण खाजगीत चिडवत नक्कीच होतो. सिनेमा पाहताना त्यात स्टिरिओटाइप किती ठासून सांगितले जातात, ते लक्षात आलं नव्हतं. कुछ कुछ होता है, हा आवडलेला चित्रपट खरं तर. पण जेंडर विषयावर काम करणाऱ्या व्यक्तींसाठी तो अभ्यासाला खाद्य पुरवतो इतके स्टिरिओटाइप्स त्यात आहेत, हे आता कळतंय.

पण आज माझ्या लेकीला तिच्या मित्रमैत्रिणींसोबत मी पाहाते, तेव्हा किती बदल झालाय ते लक्षात येतं. ही मुलं एकमेकांसोबत अतिशय कंफर्टेबल असतात. मासिक पाळी वगैरेसारख्या विषयावरही ती एकमेकांशी बोलू शकतात. त्यांना एकमेकांच्या शारीरिक जवळिकीचीही सवय आहे. (हे मुलगे पन्नाशी ओलांडल्यावर बसस्टाॅपवर उभं राहून काॅलेजकन्यकांकडे किंवा रेल्वेच्या डब्यातनं शेजारच्या डब्यातल्या बायकांकडे टक लावून पाहणार नाहीत, अशी आशा मला वाटते. कारण स्त्रियांशी शारीरिक जवळिकीचा अभाव deprivation त्यांना वाटणार नाही. अर्थात हा माझा अंदाज आहे फक्त.) ही मुलं एकमेकांची लैंगिकताही सहज स्वीकारतात, हे मला फार आश्वासक वाटतं. ती एकमेकांना किंवा कोणालाही त्यावरनं Judgeकरत नाहीत, हे महत्त्वाचं आहे. कोणालाही कशावरूनही जज न करणं ही फार कठीण गोष्ट आहे, मला तरी ती १० टक्केच जमली असावी. निदान लैंगिकतेवरनं तरी जज न करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे.

त्या पोस्टमधले बायकी व पुरुषी हे शब्द मला म्हणूनच खटकले. (सैफ अली खान मला अजिबातच तसा वाटत नाही, वा करीनाही, हा मुद्दा वेगळाच.) सैफ बायकी आहे म्हणजे काय? बाईने अमुक एकच असलं पाहिजे, आणि पुरुषाने तसं नसलं पाहिजे, ही भावना ठळकपणे यातनं व्यक्त होते. मुलीसारखा रडतोस काय, हे वाक्य लहानपणी ऐकावं न लागलेला पुरुष विरळाच असावा. त्यातही तेच आहे. मुली रडतात, मुलगे रडत नाहीत. सिंपल. या अशा स्टिरिओटाइप्सचा पुरुषांनाच किती त्रास होतो, हे अनेक मित्रांकडनं ऐकलंय. रडावंसं वाटत असताना, रडू येत असताना ते दाबून ठेवावं लागणं फारच वाईट. अनावश्यकही खरंतर. रडणं ही एक गोष्ट झाली, लैंगिकतेशी संबंधित तर अनेक. मुली वा महिलांना या स्टिरिओटाइप्समुळे काय काय भोगावं लागतं, काय काय करता येत नाही, हे सांगायची गरज नाही.

आज एका महाविद्यालयात फेस्टिवलच्या दरम्यान जेंडर रोल्स या विषयावरच्या पॅनल डिस्कशनची मी माॅडरेटर होते. सहा वक्त्यांना मी बोलतं केलं. समोर १६ ते २० वयोगटातला विद्यार्थीवर्ग होता. आॅडिटोरियम पूर्ण भरलेलं होतं, वक्त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना आम्हाला पुरेसा वेळ देता आला नाही. यावरून लक्षात येतंय की, मुलांशी या विषयावर सतत बोलायला हवंय आपण. कितीही मोकळेपणा असला तरी त्यांनाही प्रश्न पडतात. ते त्यांना विचारायचे असतात. आमच्या मित्रांना आम्ही कसं सांगू शकू की, तुम्ही आमच्याशी कोणत्याही विषयावर बोलू शकता, असं एका मुलीने विचारलं. मुलगी वयात येण्यापूर्वी आईने तिला माहिती दिलेली असते, मुलाचं काय? बाप बोलतो का मुलाशी? मग दोन कन्फ्युज्ड मुलं एकमेकांशी बोलतात आणि त्यातनं काहीतरी वेगळंच डोक्यात भरतात. आणि पुढच्या गोंधळाचा पाया तयार होतो.

एका प्रोफेसरांनी चर्चेचा समारोप करताना सांगितलं की, माझी धाकटी मुलगी बायसेक्शुअल आहे आणि माझी मोठी मुलगी मला हे समजावून सांगते, त्यावर पुस्तकं, लेख वाचायला देते. माझं शिक्षण सुरू आहे सध्या. पण मला हे सांगायला लाज वाटत नाही की, ती बायसेक्शुअल आहे.

हे ऐकून अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरारलं. कारण अशी सेन्सिटिव्ह व्यक्ती आपली शिक्षक आहे, याचा आनंद त्यांना झालेला दिसत होता.

Comments