आधुनिक संजय

मधुरिमा, ६ जानेवारी २०१२.
‘युद्धस्य कथा रम्या’ असे आपण युद्धसदृश परिस्थिती कधीही पाहिलेली वा अनुभवलेली नसताना म्हणतो, कारण आपल्यासाठी ती युद्धाची ‘गोष्ट’ असते. महाभारतासारखी, संजयाने धृतराष्ट्राला सांगितलेल्या गोष्टीसारखी. आजच्या काळातही, पहिल्या महायुद्धापासून आतापर्यंत जगभरात अनेक ठिकाणी, उठाव, बंडखोरी, लढाया, गोळीबार, चकमकी, बॉम्बस्फोट अशा विविध प्रकारच्या हिंसक घटना घडत आल्या आहेत आणि आपण त्या आधुनिक संजयांच्या मुखातून/लेखणीतून पाहत/वाचत/ऐकत आलो आहोत. जगभरातल्या या आधुनिक संजयांमध्ये अनेक महिलाही आहेत, ज्या जिवाची बाजी लावून आपापले वृत्तपत्र वा दूरचित्रवाणी वाहिनीसाठी वार्तांकन करत असतात. ‘पण अशीही वेळ अनेकदा येते की अचानक लक्षात येते की कोणतीच बातमी आपले आयुष्य पणाला लावण्याच्या लायकीची नाही,’ जम्मू-काश्मीरमधून वार्तांकन करणारी शहाना बट्ट म्हणते.
बीबीसीसाठी सुमारे दोन दशके असे वार्तांकन करणा-या केट एडी यांचे ‘काइंडनेस ऑफ स्ट्रेंजर्स’ हे आत्मचरित्र नुकतेच वाचनात आले. जागतिक पातळीवरील या प्रकारचा अनुभव काय असतो, याची हे पुस्तक थोडीशी कल्पना देते. 1980मध्ये लंडनमधल्या इराणी दूतावासावर काही दहशतवाद्यांनी केलेला कब्जा आणि नंतर आत ओलीस ठेवलेल्या लोकांची केलेली सुटका ही केट यांनी वार्तांकन केलेली पहिली मोठी बातमी. त्यानंतर त्यांनी तिआनमेन चौक, आखाती युद्ध, सिएरा लिओन, रवांडा येथील परिस्थिती अशा अनेक ठिकाणचे/घटनांचे वार्तांकन बीबीसी टीव्हीसाठी केले. वेळोवेळी संपूर्णपणे परक्या असलेल्या स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माणुसकीच्या वागणुकीमुळे आपण तगलो, म्हणून त्यांनी या आत्मचरित्राचे नावच काइंडनेस ऑफ स्ट्रेंजर्स असे ठेवले.
भारतात ईशान्येमधील सात राज्ये आणि जम्मू-काश्मीर हे अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे अशांत असलेले प्रांत. तिथे वार्ताहर म्हणून काम करत असलेल्या शहाना बट्ट आणि तेरेसा रहमान यांच्याशी हल्लीच भेट झाली होती. केट एडी यांचे पुस्तक वाचताना या दोघी, मिझोराममध्ये अनेक वर्षे वार्ताहर/संपादक म्हणून काम करणारी छोट्या चणीची पण आक्रमक लिंडा छकछुआक आणि एनडीटीव्हीमुळे आपल्या सर्वांच्या घरात पोचलेल्या बरखा दत्तची आठवण झाली.
आसाममध्ये जन्मलेल्या तेरेसाला लहानपणापासून पत्रकार व्हायचे होते. तिने लिखाणाला सुरुवात केली वृत्तपत्रांमधल्या लहान मुलांच्या पानावरून. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने तहेलका आणि अनेक स्थानिक वृत्तपत्रे/वाहिन्यांसाठी काम केले आहे. ईशान्येतील अनेक अतिरेकी संघटनांचे प्रमुख आणि त्यांचे सहकारी यांच्या मुलाखती तिने घेतल्या आहेत. मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये अडीच वर्षांपूर्वी झालेल्या चकमकीची बातमी तिने कव्हर केलेल्या प्रमुख बातम्यांपैकी एक. या संपूर्ण चकमकीची छायाचित्रे एका व्यक्तीने काढलेली होती आणि तरीही अशी कोणतीही चकमक झालेलीच नाही, असा दावा सैन्यातर्फे करण्यात आला. (ईशान्येतील राज्यांमध्ये सशस्त्र दलांना कोणाही संशयास्पद व्यक्तीला गोळी घालण्याचा अधिकार आहे, हा अधिकार देणा-या कायद्याविरुद्ध तेथे मोठा असंतोष आहे.) तेरेसाने त्या छायाचित्रकाराचे नाव जाहीर न करता तहेलका मासिकात यासंबंधी वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर तिला सीबीआय, न्यायालयीन चौकशी समिती आणि मणिपूर पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या चौकशीला सामोरे जावे लागले. ‘हा माझ्यासाठी कधीही न विसरता येण्याजोगा अनुभव होता,’ असे ती जरी म्हणत असली तरी मणिपूरमध्येच लहान मुले अशा अतिरेकी संघटनांमध्ये कशी ओढली जातात याविषयीची बातमी करताना आलेला अनुभव एक पत्रकार म्हणून आणि आई म्हणून तितकाच अविस्मरणीय होता, हे ती मान्य करते. तेरेसाला दोन मुली आहेत.
‘मी एका घरात बारा वर्षांच्या मुलाच्या आईशी बोलत होते. तो मुलगा खेळायला गेला तो परत आलाच नव्हता. (तो एका संघटनेत दाखल झाल्याचा, किंबहुना त्या संघटनेने त्याला पळवून नेऊन जबरदस्तीने सामील करून घेतल्याचा संशय होता.) ती मला त्याचे शाळेचे दप्तर, वह्या, त्याने काढलेली चित्रं दाखवत होती. मला तिचं दु:ख पाहून कढ येत होतेच; पण मी माझा व्यावसायिक चेहरा पुढे करून निर्विकारपणे आवश्यक ते प्रश्न विचारत होते,’ तेरेसा सांगते. ईशान्येकडच्या राज्यांमध्ये व्यक्तिगणिक बातमी आहे, ती संवेदनशीलपणे आणि जबाबदारीने करणारे पत्रकार हवेत, असे तिला वाटते. तेरेसा अनेकदा गोळीबारातून, चकमकीतून वाचलेली आहे. अशा पत्रकारांसाठी या प्रकारच्या धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशनाची अत्यंत आवश्यकता आहे आणि ते उपलब्ध नाही, याची तिला खंत वाटते.
शहाना बट्ट ही तिशीच्या आतली, सुंदर काश्मिरी तरुणी. 2007मध्ये तिने एका स्थानिक वृत्तपत्रातून कामाला सुरुवात केली; पण वर्षभरातच काश्मीरमधील परिस्थिती आत्यंतिक तणावाची झाली असताना ती इराणमधील प्रेस टीव्ही या वाहिनीकरता काम करू लागली. ‘निवडणुकांच्या वेळी मी आणि माझा कॅमेरामन निदर्शक आणि संरक्षण दल यांच्या कचाट्यात सापडलो होतो. गावकरी आम्हाला सांगत होते, जवानांनी अमुक एक करावे. जवान आम्हाला सांगत होते, गावकरी परत गावात जातील, असं काहीतरी करा. तेव्हा मला वाटलं की, कोणतीच बातमी आयुष्य पणाला लावण्याच्या लायकीची नाही,’ शहाना सांगते.
शहाना काश्मीरमध्ये टीव्हीसाठी काम करणारी एकमेव महिला पत्रकार. या कामामुळे सोशल लाइफ जवळपास नाहीच, याची थोडीशी खंत तिला जरूर वाटते. ‘आई-वडील, मित्र-मैत्रिणी तर मला अँटी सोशलच म्हणतात; पण शेवटी आपल्या आजूबाजूला जे काही होत असतं, त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतच असतो. ते बदलण्यासाठी, सुधारण्यासाठीच तर मी पत्रकारितेत आले. त्यामुळे मी तक्रार करू शकत नाही,’ असेही ती स्पष्ट करते. कुटुंब आणि मित्रमंडळींमुळे मिळणा-या भावनिक आधाराच्या भरवशावर तर मी या परिस्थितीतही उत्तमरीत्या तग धरून आहे, असे शहाना मान्य करते. मिझोराममध्येच वाढलेली आणि काम करणारी लिंडा एक बिनधास्त व्यक्तिमत्त्व. छोट्या चणीची, पण अतिशय आक्रमक बोलणारी, मनाला येईल ते बेधडक बोलून दाखवणारी. मिझोराममधल्या अनेक तरुणी मुंबईत ब्युटिशियन म्हणून काम करण्यासाठी येतात, पण त्या नकळत देहविक्रयाच्या व्यवसायात ओढल्या जातात. याविषयीची तिने केलेली बातमी अतिशय गाजली होती.
मुंबईत दोन-तीन वर्षांपासून राहणारी अ‍ॅना कनिंगहॅम ही ब्रिटिश पत्रकार. मुंबईत जुलैमध्ये दादर आणि ऑपेरा हाऊस भागात झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर सहा महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन तिने लॅपटॉपच्या साह्याने कॅनडातील सीएनबीसी या वाहिनीसाठी लाइव्ह रिपोर्टिंग केले, कारण घरी मुलीला सांभाळायला कोणी नव्हते. या ओळखीच्या, माहीत असलेल्या आणि अनोळखी अशा माझ्या सहका-यांना पत्रकार दिनानिमित्ताने सलाम.

Comments