रेल्वेचा ताण

काल संध्याकाळी मी पावणेसातच्या सुमारास दादरला पोचले. ७.००ची, पाच नंबरवरून सुटणारी दादर कल्याण सेमीफास्ट पकडून मुलुंडला जाण्यासाठी. ब्रिजवर असतानाच उद्घोषणा ऐकू येऊ लागल्या, चार नंबरच्या ट्रॅकवरून सध्या गाड्या जात नाहीत. पाचवर लोकल अालेली होती, वेळ ००.०० लावलेली, पण कुर्ला, भांडुप, मुलुंड आणि पुढे स्लो, अशी सेमी फास्ट असेल असं दिसत होतं. त्या गाडीच्या नेहमीच्या मैत्रिणी आत दिसल्या, मी बाहेरच उभी राहिले कारण बऱ्यापैकी गर्दी होती. गाडी सुटली. कुर्ल्याला ज्या बाया चढल्या, त्या म्हणाल्या की, गाडी फास्ट आहे, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली नि कल्याण. तिथेच डबा पॅक झाला होता. आम्ही मुलुंडच्या तिघी, कळव्याची एक आणि ठाण्याची एक अशा पाच जणी दाराजवळ होतो. विचार करू लागलो, आता काय करायचं. घाटकोपरला उतरता आलं असतं कदाचित, पण मग मागून येणाऱ्या कोणत्याही गाडीत किमान तासभर तरी चढता आलं नसतं. आमची गाडी जवळपास ३० मिनिटांनी त्या दिशेने निघालेली पहिली फास्ट होती, त्यामुळे सर्वच स्थानकांवर अलोट गर्दी होती. घाटकोपरला चढण्याच्या रेटारेटीत तीनचार जणी फलाटावर पडल्या. काही जणी चढू शकल्या. आता यापुढचं स्टेशन ठाणे. ते येतं दुसऱ्या बाजूला. काही फुटांचं अंतर, पण ते पार करणं निव्वळ अशक्य होतं. आम्ही तसा विचारही करू शकत नव्हतो. ठाण्याची मुलगी होती, तिचं बहुधा लहान मूल घरी होतं, ती त्या विचारात होती, पण आम्ही तिला रोखलं. ठाण्याला गाडी पोचली तेव्हा किंचाळ्या, आरडाओरडा या पार्श्वभूमीवरच बाया चढल्या/उतरल्या. आम्ही ठाण्याला न उतरण्याचा निर्णय योग्यच होता, याची खात्री पटली. दहाएक मिनिटांत डोंबिवली आलं, आम्ही सहज उतरू शकलो. समोरच्याच फलाटावर सीएसटी लोकल आली आणि आम्ही त्या स्लो लोकलने ८च्या सुमारास मुलुंडला उतरलो.
जवळजवळ एक तास यात वाया गेलाच, शिवाय टेन्शन प्रचंड होतं. ताणलेल्या अवस्थेत, दारात अर्धा तास उभं राहून पाय खूप दुखू लागले. आम्ही पाच जणी फर्स्ट क्लासच्या एका डब्यातल्या. अशीच अवस्था १२ डब्यांमधल्या अनेकांची झाली असणार.
कारण काय?
तर चुकीचा इंडिकेटर.
जबाबदार कोण?
ज्यांची लहान मुलं पाळणाघरात आहेत, क्लासमधनं पिकअप करण्यासाठी वाट पाहताहेत, म्हातारे आईवडील/सासूसासरे जेवणासाठी वाट पाहताहेत - स्त्रिया किंवा पुरुष - कोणीही असेल; त्यांच्यावर किती ताण येत असेल अशा प्रसंगात, तो आपण मोजू शकतो का?
आयुष्यभराच्या अशा, निव्वळ रेल्वेच्या गलथान कारभारामुळे येणाऱ्या ताणाचा, मुंबईकरांच्या जीवनमानावर काय विपरित परिणाम होत असेल, तो आपण मोजू शकतो का?

Comments