प्रजासत्‍ताक चिरायू होवो

लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही; आणि प्रजा व प्रजेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या हातात सर्वोच्च सत्ता असते ते प्रजासत्ताक. अशा भारतीय लोकशाही प्रजासत्ताकाचा परवा गुरुवारी ५७वा वर्धापन दिन. या निमित्ताने आपण प्रजासत्ताकाचा अर्थ समजून घ्यायला हवा. नाहीतर देशप्रेम आणि संस्कृतीच्या आवरणाच्या आत लपलेली अनागोंदी, अनास्था बाहेर न पडण्याच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचेल. हीच आपली संस्कृती, असं म्हणत आपण स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर घातलेल्या निर्बंधाचं समर्थन किती दिवस करणार अाहोत? सीमांचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या नावाचा वापर करून, इतर नागरिकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारांबद्दल बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी करणारं, त्यांना राष्ट्रद्रोही ठरवणारं प्रजासत्ताक अभिमान वाटावं असं आहे का‌? एकीकडे हे विश्वचि माझे घर, ग्लोबल व्हिलेज, ग्लोकल अशा शब्दांचं समर्थन करून त्यानुसार वागायचं; तर दुसरीकडे राष्ट्रवादाचं समर्थन करायचं, हे विचित्रच नव्हे का?

राष्ट्रवाद ही संकल्पना आता मागे पडत चालली आहे. जगभरात सध्या साडेसहा कोटींहून अधिक व्यक्ती निर्वासित आहेत, विविध कारणांमुळे त्यांना त्यांचा देश सोडून जाणं भाग पडलं आहे. स्वत:च्या इच्छेने शिक्षण वा नोकरीसाठी आपला देश सोडून इतरत्र कायमस्वरूपी निवासासाठी गेलेल्यांची संख्या याहूनही मोठी असणार. आपल्या प्रत्येकाच्या ओळखीत अशा अनेक व्यक्ती असतातच. मग अशा व्यक्तींनी कोणता राष्ट्रवाद बाळगायचा, मूळ देशाकरता, की आता निवारा दिलेल्या. त्या उलट, आपण प्रजासत्ताक ही संकल्पना अधिक गांभीर्याने घेतली तर आपलं सगळ्यांचंच जीवन सुखकर होण्याची शक्यता अधिक. सार्वजनिक जीवनातला आपला वावर, शिस्त, वैयक्तिक आयुष्यातले नियम, स्वच्छता, प्रामाणिकपणा, वेळ पाळणं ही मूलभूत मूल्यं पाळली तर प्रजासत्ताकाचं स्वप्न खरं होण्याची शक्यता अधिक. अन्यथा, मुलींनी जीन्स घालाव्या की नाही, नोकरी करावी की नाही, कोणी काय खावं नि खाऊ नये, कोणी कोणावर प्रेम करावं, अशा प्रश्नांवर मतं देण्यातच आपली उमेदीची वर्षं, वेळ, व बुद्धी वाया जाईल.
प्रजासत्ताक चिरायू होवो, अशा शुभेच्छा.

Comments