एक छोटसं सुखी कुटुंब- जॉर्ज लिट्ल आणि त्याचे आईबाबा यांचं. जॉर्जला सोबत म्हणून छोटा भाऊ दत्तक घ्यायला त्याचे आईबाबा शहरातल्या अनाथलयात जातात आणि घरी घेऊन येतात एक चिमुकला, बोलका उंदीर- स्टुअर्ट लिट्ल. यातूनच फुलत जाते एक परीकथा, कुटुंबाचं महत्त्व सांगणारी.
उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमीच खास लहान मुलांसाठीच्या चित्रपटांचं पीक येतं, तसंच यंदाही आलंय. आणि कोलंबिया ट्रायस्टारचा स्टुअर्ट लिट्ल ही यातली हॉलिवुडची खास भेट. तीन वर्षांपुढच्या मुलांना बघायला आवडेल. आणि सहासात वर्षांच्या मुलांना थोडीफार गोष्टही कळेल असा.
तर होतं काय, की छोटा `मानवी' भाऊ घरी येणार या आशेनं शाळेतून घरात पाऊल टाकल्याटाकल्या जॉर्जला समोर दिसतो मुलासारखेच कपडे घातलेला तीन इंच उंचीचा पुटकला उंदीर, तो हिरमुसतो, संतापतो. स्टुअर्ट जॉर्जच्या नफरतीबरोबरच सामना करावा लागतो तो घरातल्या मांजराशी- स्नोबेलशी, स्टुअर्ट हा लिट्ल कुटुंबाचाच एक सदस्य आहे, त्याला कोणत्याही परिस्थितीत खायचं नाही, अशी तंबी मिळाल्याने स्नोबेलची परिस्थिती विलक्षण होते- a mouse with a pet cat – समोर उंदीर दिसतोय, पण त्याला खाता मात्र येत नाही अशी; कोणत्याही जातिवंत मांजरासाठी अपमानास्पद. यातून मार्ग काढण्यासाठी तो माँटी या मित्राच्या सल्ल्यानं गल्लीतला `भाई' असलेल्या स्मोकी या बोक्याची मदत घेतो.
इकडे स्टुअर्टनं हळूहळू जॉर्जचं मन जिंकण्यात यश मिळवलेलं असतं. तो त्याला दूरनियंत्रित होडय़ांची शर्यत प्रयत्नांची पराकाष्ठा करून जिंकून देतो. आणि घरात लावलेल्या `फॅमिली पोर्ट्रेट'मध्ये मानाच्या जागी जाऊन बसतो. अनाथलयातल्या पोरक्या वातावरणातून आईब, वडील आणि भाऊ यांच्या प्रेमळ सहवासात स्टुअर्ट
रमतो. काही काळाने सर्व दत्तक मुलांप्रमाणेच त्यालाही त्याच्या मुळ, जन्मदात्या आईवडिलांचा शोध घ्यावासा वाटतो. आणि एक दिवस अचानक त्याचे आईवडिल समोर उभे ठाकतात. त्यांच्यासोबत अत्यंत दु:खी मनस्थितीत स्टुअर्ट स्वत:च्या नव्या घरी पोचतो.
इथून पुढे स्टुअर्टच्या साहसांना सुरुवात होते. सोयीस्करपणे दोस्तीचा हात पुढे केलेल्या स्नोबेलच्या मदतीने तो आपल्या `शत्रुंवर' मात करतो आणि अखेर `आपल्या' घरी परततो.
हा चित्रपट ई.बी.व्हाइट यांनी 50 वर्षांपूर्वी लिहिलेल्या कथेवर आधारित आहे. कौटुंबिक पार्श्वभूमीची, फारशी गुंतागुंत नसलेली ही परीकथा, कोणत्याही विशिष्ट कालखंडाशी बांधील नसलेली. अत्याधुनिक संगणकशास्त्राच्या अफलातून वापराने दिग्दर्शक रॉब मिन्कॉफ आणि त्याच्या सर्व टीमने ती अत्यंत आकर्षक आणि आनंददायी केली आहे. चालताबोलता, माणसांनाही ज्याचं बोलणं समजू शकतं असा, झ्याक मारू कपडे
घालणारा, उबदार मऊमऊ गादीवर झोपणारा उंदीर लिट्ल कुटुंबाचा, म्हणजेच माणसांच्या जगाचा अविभाज्य
भाग आहे, हे प्रेक्षकाला मनापासून स्वीकारायला लावण्याची परीक्षा मिन्कॉफ पहिल्याच फटक्यात, पहिल्याच शॉटमध्ये पास झालाय. कारण, बोलका उंदीर पाहून चित्रपटात कुणालाच आश्चर्य वाटत नाही. हे जगच वेगळं, इथं सगळे प्राणिमात्र एकसमान.
माणसं आणि प्राणी यांना असं एका पातळीवर, एका जगात, एकत्र वावरताना दाखवणं, हे चित्रपटाच्या तंत्रज्ञांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान होतं. कारण, इथे स्टुअर्ट कार्टुन फिल्ममधल्या चित्रांसारखा सपाट, द्विमित नाही, तर खऱयाखुऱया उंदरासारखा त्रिमित आहे. चित्रपटात तो अगदी खराखुरा उंदीर वाटतो, पण, तो संपूर्णपणे संगणकावर तयार झालाय. आणि त्याच्यासारखीच बोलकी मांजरं मात्र खरीखुरी आहेत. पडद्यावर
आपल्याला सगळे सारखेच भासतात, हीच तर खरी कमाल आहे.
म्हणूनच स्टुअर्टला जन्माला घालण्यामागे कित्येक लोकांनी किती कळा भोगल्या आहेत हे जाणून घेणं- प्रत्यक्ष चित्रपट पाहण्याइतकंच, किंबहुना त्याहून अधिक- उत्कंठावर्धक ठरतं. 1997 मध्ये त्याच्या जन्माची प्रक्रिया सुरू झाली. सर्वात प्रथम सर्वांना हवंहवंसं वाटेल असं आणि `मी हे करू शकतो' या आत्मविश्वासामुळे कौतुकही वाटावं, असं स्टुअर्टचं बाह्यरूप चित्रपटात दिसावं म्हणून उंदीर कसे दिसतात याचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाला फोटो रिअलिझममधील अत्याधुनिक तंत्राची जोड देऊन स्टुअर्टचं रूप साकारण्यात आलं. ते एकदा निश्चित झाल्यावर.
संगणकतज्ञांनी बिल आयर्विन या मूकाभिनेत्याकडून उंदराच्या हालचाली शिकून घेतल्या. त्याच्या असंख्य भावना- हालचालींचा संगणकात साठा करण्यात आला.
दुसरं मोठं काम होतं ते त्याचे कपडे आणि अंगावरची लव तयार करण्याचं. त्याचे कपडे शरीराच्या हालचालींनुसार दुमडले जावेत, सुरकुतावेत यासाठी संगणाकावर त्याचे कपडे `शिवणाऱयांनी' चक्क शिवणवर्गात प्रवेश घेतला. त्याचे हात एखाद्या लहान मुलासारखे गोंडस बनविण्यात आले.
संगणकावर स्टुअर्टचं अंतिम रूप तयार झाल्यानंतर खरी परीक्षा सुरू होणार होती, त्याला सहकलाकारांबरोबर- अभिनेते आणि खऱयाखुऱया प्रशिक्षित मांजराबरोबर-पडद्यावर एकत्र आणण्याची. या मांजरांनी दिग्दर्शकाची परीक्षाच घेतली. ती त्यांच्या प्रशिक्षकांच्या उपस्थितीतच `काम' करायची. त्यामुळे प्रत्येक शॉटच्या वेळी प्रशिक्षक त्यांना तर दिसले पाहिजेत, पण शॉटच्या आड न येता, अशी सोय करावी लागे.
स्नोबेल, माँटी, स्मोकी आणि इतर मांजरं त्यांच्यात्यांच्या स्वभावानुसार, भूमिकांनुसार निवडण्यातच अनेक महिने गेले. ही मेहनत किती सार्थकी लागली आहे, ते चित्रपट बघताना कळतंच. या मांजरांच्या दिसण्यातून त्यांची व्यक्तिरेखा क्षणार्धात अचूक उभी राहते.
आता पाळी होती प्रत्यक्ष लिट्ल कुटुंबाची. हे कुटुंब थोडंफार विक्षिप्तच, पण तिरसट नव्हे, तर लाघवी तऱहेवाईकपणा असलेलं. उंदीर दत्तक घेणारी माणसं जरा `सटक'च असणार ना!
पात्रयोजना करणाऱया डेब्रा झेनच्या डोक्यात आली ती अनेक पुरस्कार मिळवलेली, साधीशीच पण गोड दिसणारी जीना डेव्हिस आणि ब्रिटिश अभिनेता ह्यू लॉरी. जॉर्जच्या भूमिकेसाठी निवडलेला जोनाथन लिपिनिकी हा स्मार्ट छोकरा याआधी जेरी मॅग्वायर या चित्रपटात झळकला होता. स्टुअर्टचा द्वेष करीत असतानाही प्रेक्षकांची सहानुभूती मिळवायची जबाबदारी त्यानं चोख पार पाडली आहे.
हे कुटुंब तयार झालं आणि 1998 मध्ये चित्रपटाच्या प्रत्यक्ष निर्मितीचं काम सुरू झालं. लिट्ल कुटुंबाचं घर तयार करण्यात आलं. पाहताक्षणी आपलं, आरामदायी वाटणारं हे घर मन जिंकून घेतं. त्यातली दत्तक येणाऱया मुलासाठीची खोली तर खासच. अडीच-तीन फूट उंचीच्या मुलासाठी तयार केलेल्या खोलीत तीन इंच उंचीचा स्टुअर्ट येतो. उबदार अंथरूणात झोपतो, सकाळी उठून आरशासमोर उभा राहून दात घासतो. हे सगळं
पाहताना अगदी स्वाभाविक, नैसर्गिक वाटतं, यातच ते उभं करणाऱयांचं कौतुक आहे.
चित्रपटातल्या छोटय़ा होडय़ांच्या शर्यतीसाठी साडेसात लाख गॅलन पाण्याचा तलाव तयार करण्यात आला आणि पडद्यावर नेहमीच्या आकाराच्या दिसतील अशा होडय़ाही. या होडय़ा हव्या तशा वळविण्यासाठी तलावाच्या खाली रूळ टाकण्यात आले. या तलावात कोणी मुलं पडण्याचा प्रश्न नव्हता पण होडय़ांचे महत्त्वाचे भाग खाली पडले तर ते उचलायला जीवनरक्षक आणि पाणबुडे तैनात होते. या शर्यतीच्या चित्रिकरणासाठी 55 फुटी क्रेनचाही वापर करण्यात आला.
स्टुअर्टच्या छोटय़ाशा लालचुटुक पॉश कारसाठी तिच्या आकाराला साजेसा एक डांबरी रस्ता तयार करण्यात आला. आणि ज्या सेंट्रल पार्कमध्ये स्टुअर्ट स्नोबेलच्या मदतीने आपल्या शत्रूंचा मुकाबला करतो. तेही स्टुडिओतच उभारण्यात आलं.
हे सर्व सुरू असताना मिन्कॉफचं एका बाबतीतलं भान कधीच सुटलं नव्हतं. स्पेशल इफेक्ट्स कितीही आकर्षक, भव्यदिव्य झाले तरी मूळ कथा आणि त्यातली पात्रं प्रेक्षकाला भावली नाहीत, तर सगळं मुसळ केरात जाणार. त्यामुळेच चांगली कथा आणि प्रेक्षकाला तादात्म्यभावाचा अनुभव देणारी पात्रं मिळूनच खरा चित्रपट बनतो, लोकांना आवडतो. त्यामुळे प्रेक्षकाला भावेल, हसवेल, क्षणभर डोळे पाणावेल आणि खूप दिवस
लक्षात राहील, असा चित्रपट बनवायचा, हा या चित्रपटासाठी काम करणाऱया शेकडो लोकांचा दृष्टीकोन होता.
खास लहान मुलांसाठी चित्रपट काढण्याची प्रथा अजून भारतात फारशी रुजलेली नाही. वास्तवाचं फँटसीसदृश चित्रपटीय दर्शनच चालणाऱया या देशात अस्सल फँटसीचं. परीकथांचं मात्र प्रेक्षकांना वावडंच आहे. त्यामुळे अशा जेमतेम दीड तासाचा जीव असलेल्या चित्रपटासाठी इतक्या लोकांनी जीव ओतून एवढे कष्ट घेतलेले आपण बघतो. तेव्हा थक्क व्हायला होतं. एका साध्या पिटुकल्या उंदरासाठी कामाच डोंगर उभारण्याची ही
वृत्ती सलाम ठोकायला लावते.
(महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला लेख.)
Comments
Post a Comment