लोकप्रियतेची उतरती भाजणी?

अंतर्नाद एप्रिल २०१७.
डोंबिवलीतल्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा नुकताच समारोप झालाय. सात फेब्रुवारीच्या अंकात बहुतेक वर्तमानपत्रांनी संमेलनाला झोडपणारे अग्रलेख लिहिले आहेत. या संमेलनाचं ठळक वैशिष्ट्य हेच म्हणता येईल की, त्यात एकही वैशिष्ट्यपूर्ण, जिच्याबद्दल ठळकपणे बोलावं/लिहावं अशी घटना घडली नाही. ना कोणी वादग्रस्त विधानं केली, ना कोणती मुलाखत गाजली, ना कोणती चर्चा रंगली. खुद्द डोंबिवलीत नसल्या तरी राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री वगळता इतर राजकारण्यांनीही संमेलनाकडे पाठ फिरवली, त्याने बातमी मिळायची शक्यता अाणखीच खाली गेली. डाॅ. अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षीय भाषणातही बातमीमूल्य तर सोडाच आवर्जून वाचावा, वाचायची शिफारस करावा, असा एकही मुद्दा नव्हता. त्यांच्या समारोपाच्या भाषणाची बातमी करतानाही एक परिच्छेद कसाबसा जमवावा लागला, यातच सारं आलं.

संमेलनाकडे लोकांनी पाठ फिरवली होती असंही म्हणता येत नाही, कारण गर्दी तर होती. रोज संध्याकाळी सेल्फी, फोटो काढणारे शेकडो लोक मुख्य मंडपाबाहेर दिसत होते. मुख्य मंडप होताच इतका अवाढव्य की, तो भरणं मराठी साहित्य संमेलनात अशक्य. त्यामुळे बऱ्यापैकी लोक असूनही तो रिकामाच वाटत होता बापडा. बाजूच्या दोन मंडपांमध्ये अहोरात्र कविकट्टा सुरू होता, त्यातही अनेक लोक होते. जेवायच्या मांडवात तर कायम गर्दी होती. मग ही माणसं नक्की कशासाठी संमेलनस्थळी आली होती? कारण ग्रंथदालनातही तुरळकच माणसं होती, शनिवार व रविवार संध्याकाळ वगळता तो परिसर ओसाड आणि केविलवाणा दिसत होता.

सासवडला तीन वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनाला मी उत्सुकता म्हणून गेले होते. तिथे ग्रंथप्रदर्शनात अतोनात गर्दी होती, परंतु स्टाॅल्स छोटे होते, दोन रांगांमधली जागा अतिशय निमुळती होती, रचना चुकीची होती. आणि तिथे धुळीचं साम्राज्य होतं. परिस्थिती मला इतकी धोकादायक वाटली होती की, सुरुवातीचे पाचसहा स्टाॅल्स पाहून पळ काढला होता. पिंपरी, सासवड आणि त्यापुढच्या वर्षी चिपळूण या संमेलनांमध्ये पुस्तकांची विक्रमी विक्री झाली होती. पण डाेंबिवलीत बहुतांश प्रकाशकांच्या अपेक्षेपेक्षा कमीच विक्री झाल्याचं कळतं.

काँटिनेंटल प्रकाशनच्या देवयानी अभ्यंकर यांनी हे कोडं उलगडून ठेवायचा प्रयत्न केला. जाहिरात जशी उत्पादनांसाठी महत्त्वाची असते, तशीच ती संमेलनासाठी असते, हे आयोजकांना कळलं नसावं, असं त्या म्हणाल्या. आम्ही पुण्याहून येताना डोंबिवलीत शिरल्यानंतर दोनतीन मराठी माणसांना संमेलनाच्या इथे कसं जायचं, असं विचारलं तर त्यांनीच आम्हाला विचारलं, कसलं संमेलन. डोंबिवलीतल्याच लाेकांना संमेलन आहे हे माहीत नाही, तर इतरांना कुठून कळणार. शहरात कुठेही पोस्टर्स, जाहिराती, फ्लेक्स नव्हते संमेलनाबद्दल माहिती देणारे. मग लोक येणार तरी कसे?

मी रेल्वेने डोंबिवलीला गेले. शुक्रवारी स्थानकात उतरले तेव्हा एखादा स्वागताचा फलक दिसतो का, ते पाहात होते. परंतु या परिसरात संमेलनासारखा काही कार्यक्रम होतोय याचं एकही चिन्ह स्थानकात नव्हतं. पूर्वेकडे बाहेर पडल्यावर रिक्षा पकडली. म्हटलं, संमेलनाच्या इकडे जायचंय.

रिक्षावाला उत्तर भारतीय होता, तो एकदम उद्गारला, हँ?

म्हटलं, सावित्रीबाई फुले आॅडिटोरियम के यहाँ.

क्या हो रहा है वहाँ?

मराठी किताबों का मेला है.

हाँ तभी. सुबह यहाँ बहुत से बच्चे थे, पूरा जाम लगा हुआ था. कल भी होगा क्या?

संमेलनस्थळाच्या अर्धा किमी आधी घर्डा चौक आहे, त्याच्या जरा आधी एक कमान दिसली संमेलनाला येणाऱ्यांचं स्वागत करणारी. घर्डा चौकात रांगोळी होती काढलेली संस्कारभारतीची. बाकी या अडीचेक किमी रस्त्यावर, संमेलन आहे, याची एकही खूण नव्हती.

पी. सावळाराम क्रीडा संकुलातलं मैदान आणि शेजारीच असलेल्या सावित्रीबाई फुले रंगमंदिरात संमेलन भरलं होतं. या स्थळाचं नामकरण पु.भा. भावे साहित्य नगरी असं करण्यात आलं होतं. मैदानात मुख्य शं.ना. नवरे सभामंडप प्रचंड मोठा होता. मधोमध भव्य व्यासपीठ, समोर मोकळी जागा, मग टीव्ही कॅमेऱ्यांसाठी मंच, आणि बसायची व्यवस्था. व्यासपीठाच्या डाव्या हाताला पत्रकारांची बसायची सोय आणि त्यामागेच त्यांच्यासाठी कक्ष होता. या कक्षाला डोंबिवलीकर दिवंगत ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत टोळ यांचं नाव देण्याचं औचित्य दाखवलेलं होतं. महाराष्ट्र टाइम्समध्ये नोकरी करत असताना टोळ यांच्या बातम्या अनेकदा एडिट केल्या होत्या, ते आठवलं. आयोजकांतर्फे पत्रकारांसाठी वायफायची सोय होती, परंतु मला तरी ते अनेकदा प्रयत्न करून एकदाही कनेक्ट झालं नाही.

दुपारी चार वाजता उद्घाटन होतं. मुख्यमंत्री येणार असल्याने ते उशिरा सुरू होईल याची कल्पना सर्वांनाच होती. शरद पवारांचंही नाव पत्रिकेत छापलेलं होतं, परंतु ते आलेच नाहीत. अखेर पाच वाजता कार्यक्र सुरू झाला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी संमेलन भरवण्यामागची भूमिका मांडली. 'महात्मा जोतिबा फुले यांनी गेल्या शतकात म्हटलं होतं, पददलितांना कंठ फुटला पाहिजे, त्यांच्या आवाजाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, संमेलन हे मूठभर सांस्कृतिक वर्चस्ववाद्यांच्या हातात न राहावे. हे संमेलन आगरी यूथ फोरमने आयोजिल्याने जोतिबांचं स्वप्न फलद्रुप झालंय,' असा दावा त्यांनी केला. जोशींनी एक इंटरेस्टिंग मुद्दा मांडला. 'दाक्षिणात्य लोक भाषेच्या बाबतीत जसे जागृत असतात, भाषिक अस्मितेसाठी ते लढायला तयार असतात, तसा मराठी भाषकाचा राज्यकर्त्यांवर दबाव नाही, सामान्य माणसाला मराठी भाषेची चिंता वाटत नाही,' असं ते म्हणाले. 'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी दिल्लीत जंतरमंतरवर धरणं धरायला आम्ही तयार आहोत, तुम्ही फक्त पुढे व्हा,' असं ते मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले. 'महागाईमुळे संमेलनं आयोजित करणं कठीण झालं आहे. राज्य सरकारने एक कोटी रुपये आयोजकांना दिले, तर आयोजक वरचे पन्नास लाख वा एक कोटी रुपये उभे करू शकतात,' असंही ते म्हणाले. त्यांच्या या म्हणण्याचा प्रत्यय संमेलन संपताना आलाच, पुढच्या संमेलनासाठी कोणतीही संस्था पुढे आलेली नाही.

मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सीमाप्रश्न व सीमाप्रांतातील मराठी जनांवरचा अन्याय, अभिजात भाषेचा दर्जा, महाराष्ट्राचं विभाजन, दाभोळकरपानसरेकलबुर्गी हत्या, असे सगळे मुद्दे घेऊन आवेशपूर्ण भाषण केलं. सांस्कृतिक दहशतवादाचा मी निषेध करतो, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. अर्थात मुख्यमंत्र्यांनी त्याकडे तितकंच ठणकावून दुर्लक्ष केलं.

प्रख्यात हिंदी साहित्यिक विष्णू खरे यांचं भाषण चांगलं रंगलं. 'हिंदी साहित्यात नागपूर महत्त्वाचं आहे, कारण गजानन माधव मुक्तिबोध तिथे होते. त्यांना आम्ही हिंदीचा शीर्षपुरुष मानतो. त्यांची यंदा जन्मशताब्दी आहे, त्या निमित्ताने त्यांचा पुतळा उभारा किंवा एखादं चर्चासत्र आयोजित करा,' अशी आग्रही सूचना त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. याही सूचनेवर कोणतेही भाष्य करण्याचे फडणविसांनी टाळले. (आचारसंहिता?) खरे यांनी सांगितलं की, '१८९०मधल्या चार हिंदी नाटकांचा शोध त्यांना काही वर्षांपूर्वी लागला, त्यातले ८० टक्के संवाद मराठीत आहेत.' 'मध्य प्रदेशात आम्ही वैतागलो आहोत, विदर्भ स्वतंत्र होईल, तेव्हा आम्हाला (खरे छिंदवाडा प्रांतात राहतात) त्यात जोडून घ्या,' अशी विनंतीही त्यांनी केली.

भालचंद्र नेमाडे आणि श्याम मनोहर हे मोठे कादंबरीकार आहेत, नोबेलच्या लायकीचे आहेत, पण जागतिक पातळीवर त्यांना कोणी ओळखत नाही, कारण त्यांचे अनुवाद परकीय भाषांमध्ये झालेले नाहीत. यासाठी अनुवाद अकादमी स्थापन करायला हवी, अशी महत्त्वाची मागणी त्यांनी केली. खरे यांनीही लेखक सुरक्षित आहे का, त्याला त्याच्या विचारांमुळे मारपीट तर होत नाही, त्याचं तोंड तर कोणी काळं फासत नाहीये, हे प्रश्न उपस्थित केले आणि सरकारप्रमाणेच वाचकांवरही ही जबाबदारी असल्याचं विधान केलं. नुसतं पुस्तक वाचून एंजाॅय करून उपयोग नाही, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेची ढाल पुढे करून फार काही बोलणं टाळलं. 'मला यायला मिळालं, याचाच आनंद होतोय,' एवढंच ते म्हणाले. 'पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर डोंबिवली ही उपराजधानी आहे,' असं ते म्हणाले. (पण मग पार्ल्याचं काय, असा प्रश्न मला पडला!)

दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्रीबाई फुले रंगमंदिरात पहिला परिसंवाद अध्यक्षीय भाषणावरील चर्चेचा होता. सकाळी नऊला सुरू होणाऱ्या या कार्यक्रमासाठी दहा वाजेपर्यंत फक्त पंचवीसेक रसिक उपस्थित होते. यथावकाश आयोजक, स्वयंसेवक आले व व्यासपीठावर फक्त खुर्च्या मांडून चर्चेला सुरुवात झाली. (हीच गत मुख्य मंडपातही होती, उद्योजक जयंत म्हैसकर यांची मुलाखत दीड तास उशिरा सुरू झाली.) या चर्चेत पत्रकार विजय चोरमारे, मराठीचे प्राध्यापक अनिल नितनवरे, नागपूरचे प्रदीप दाते, रामचंद्र काळुंखे व अंतर्नादचे संपादक भानु काळे सहभागी झाले होते. बदलापूरचे ग्रंथप्रेमी श्याम जोशी यांनी प्रत्येक वक्त्याच्या बोलण्याचा धागा पकडून चर्चा उत्तमपणे पुढे नेली. (साहित्य आणि समाज एकमेकांपासून दूर गेलेत असा सूर या परिसंवादात लागलाच, परंतु त्यानंतर झालेल्या बदलती अर्थव्यवस्था, समाजाचे विघटन आणि मराठी लेखन या परिसंवादातही असंच निरीक्षण वक्त्यांनी मांडलं.) 'काळे यांचं भाषण मेंदूला आवाहन करणारं आहे, त्यात वाङ्मयीन प्रश्नांची चिकित्सा आहे, ते प्रांजळ, वस्तुनिष्ठ आहे,' असं मत भंडारा येथील मराठीचे प्राध्यापक अनिल नितनवरे यांनी मांडलं. 'इंग्रजीचे पाय न तोडता मराठीची उंची का वाढवता येणार नाही,' या काळे यांच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा व्यक्त केला. पत्रकार विजय चोरमारे यांनी मात्र या भाषणात आजच्या लेखक वा कलाकृतींचा काही संदर्भ नाही, त्यात कोणतीही जोखीम घेतलेली नाही, अशी टीका केली. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीबद्दल काहीच भाष्य नाही, आजच्या जगण्यासंदर्भात काही चर्चा नाही, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांकडून अधिक समाजस्पर्शी भाषणाची अपेक्षा असते,' असंही ते म्हणाले.

भानु काळे यांनी या भाषणाच्या निमित्ताने एकूणच मराठी साहित्य व्यवहाराबद्दल भाष्य केले. मराठी आपण कशी वापरतो, राज्यकर्त्यांनी किती महत्त्वाची वाटते, परिवर्तन घडवून आणण्याची यंत्रणा, आदि मुद्दे त्यांनी उपस्थित केले. Vanity publishing स्वयंप्रकाशित साहित्य मोठ्या प्रमाणावर बाहेर येतंय, ते घाईघाईत प्रकाशित केलेलं असतं, त्यामागे कोणतीही मेहनत नसते, त्यामुळे चांगल्या पुस्तकांचं प्रमाण कमी आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं. मुद्रितशोधनाकडे होत असलेलं दुर्लक्ष हा त्यांनी मांडलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. सध्या जे काही मुद्रितशोधन होतं, त्याचा दर्जा केविलवाणा असतो. या कामाला मूल्य नाही, त्यामुळे बुद्धिमान तरुण या मार्गाला येतच नाहीत. हा अर्थकारणाचा साहित्यावरचा परिणाम बोलला जात नाही. काळे यांनी या वेळी मॅकाॅले या इंग्रज विचारवंताच्या एका निबंधातलं वाक्य उद्धृत केलं. Poetry necessarily declines as civilisation advances. Sense of wonder, sense of awe reduces. जसजशी वैज्ञानिक प्रगती होत जाते, कुतूहल शमत जातं तसा रोमान्स कमी होत जातो, असं हे विधान आहे. आपल्याला राेजच्या जीवनात हे नेहमीच जाणवत राहातं, असं मला प्रकर्षाने वाटलं. कथा, ललित, प्रवासवर्णन हे वाङ्मयप्रकार कमी होत चाललेत, ते हळुहळू कालबाह्य होत जातील, अशी भीती त्यांनी या वेळी व्यक्त केली. चिरंतन प्रश्नांची उत्तरं साहित्यातून मिळायला हवीत, असं ते म्हणाले.

अर्थकारणाचा साहित्याशी संबंध उरलेला नाही, असा एका परिसंवादाचा साधारण सूर होता. पैशांविषयी न बोलणं अप्रामाणिक ठरेल, असं एक वक्ते यमाजी मालकर यांनी सुरुवातीलाच म्हणून टाकलं. 'दारिद्र्याचं वर्णन करणारं तेच चांगलं लेखन असा समज आपल्याकडे आजही आहे, परंतु बहुतांश वाचकांना भौतिक सुखाची आस लागलेली असताना असं लिखाण योग्य वाटत नाही,' असं ते म्हणाले. धडधाकट गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती हे शिकवणाऱ्या शालेय धड्यांनी भारताचं मोठं नुकसान केलं, अशा अर्थाचं पुलंचं वाक्य मला आठवलं ते ऐकल्यावर. चंद्रशेखर टिळक, सारंग दर्शने, श्रीकांत बारहाते या परिसंवादातील वक्ते होते, परंतु मुख्य आकर्षण होते अर्थक्रांतीचे अनिल बोकील. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य माणसाला चांगलेच ठाऊक झालेले बोकील बोलायला उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. बारहाते यांचा अर्थकारणासोबतच इंग्रजी साहित्याचा अभ्यास आहे. कोणत्याही साहित्याचं मोजमाप आशयघनता, चिरंतनता आणि निरंतरता या पट्ट्यांनी करायला हवं, असा मुद्दा त्यांनी मांडला. परंतु, दुर्दैवानं त्यांचं बरंचसं बोलणं माझ्या डोक्यावरून गेलं. दर्शने यांनी मराठी साहित्याचा अर्थकारणाशी संबंध नव्हताच, असं मत मांडलं. अर्थकारणाचे पडसाद मराठी साहित्यात फार विरळा, वीसपंचवीस वर्षांपूर्वी अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं, पण याचं प्रतिबिंब फारच कमी लेखनात दिसून येतं, असं ते म्हणाले. बोिकलांनी जीविका आणि उपजीविका यांमधला फरक, उपजीविकेसाठी सध्याची होणारी फरपट, श्रममूल्यापेक्षा बौद्धिक मूल्याला आलेलं महत्त्व, असे काही मुद्दे मांडले. प्रत्येक चोचीसाठी दाणा आहे, हा assurance निसर्गाने दिलेला असताना आपण insurance च्या मागे लागलोय, अशी टिप्पणी त्यांनी केली. कागदी नोट मानवी आयुष्य गुंडाळून टाकू लागली आहे, असं ते म्हणाले. त्यांच्या बोलण्यात भावनिक आवाहन होतं, परंतु मला ते काहीसं naive, युटोपियन, प्राथमिक स्वरूपाचं वाटलं.

ग्रामीण स्त्री, वास्तावातील आणि साहित्यातील असा एक परिसंवादही मी ऐकला. साताऱ्यातील कथालेखक राजेंद्र माने, जे डाॅक्टरही आहेत, ते म्हणाले की, 'डाॅक्टर म्हणून काम करताना स्त्रीचे वेगवेगळे अनुभव येतात आणि ते लिखाणात उतरतात. मुलींना शेतकरी नवरा नको, हे सध्याचं वास्तव आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं वय साधारणपणे २५ ते ३५ असल्याचं निरीक्षण मांडत ते म्हणाले, या शेतकऱ्यांच्या तरुण पत्नींची काय अवस्था होत असेल, त्या कसं जगण्याला तोंड देत असतील, हे साहित्यात यायला हवं.' पुरुष पुढे जातोय, पण स्त्रिया अजून तिथेच आहेत, प्रत्येक स्त्रीचं शोषण हाेतंच, असं मत प्रा. ईश्वर नंदपुरे यांनी व्यक्त केलं. साहित्याने पुस्तकांच्या बाहेर यावं, असं ते म्हणाले.

साहित्य व्यवहार आणि माध्यमांचे उत्तरदायित्व या विषयावरचा परिसंवाद बऱ्यापैकी रंगला. समन्वयक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी साहित्यिकांच्या वतीने प्रसिद्धीमाध्यमं, विशेषकरून वृत्तवाहिन्यांवर, आरोप केला की, माध्यमं मराठी साहित्याकडे दुर्लक्ष करतात, वृत्तपत्रांनी संमेलनाच्या अध्यक्षांच्या भाषणाची हेडलाइन न करता मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची केली, वगैरे. साम टीव्हीचे संजय आवटे यांनी माध्यमांच्या वतीने त्यांना उत्तर दिलं. 'आमचे मुख्यमंत्री १२ कोटी जनतेचे प्रतिनिधी असतात, तुमचे अध्यक्ष किती जणांचं प्रतिनिधित्व करतात,' असा सवाल त्यांनी केला. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो त्यांनी रवींद्र यांच्या आरोपांनंतरही केला होता. मला या उपस्थितांची गंमत वाटली. 'साहित्याच्या नावाखाली काहीही छापलं जातं, कवितासंग्रह छापायला कोणीही तयार होत नाही, तो छापला तर विक्रीसाठी कोणी तयार नसतं, हे अधिक धोकादायक आहे,' असंही आवटे म्हणाले. ज्येष्ठ लेखक रा.रं. बोराडे यांनी या वेळी आरक्षण वा जातिव्यवस्था साहित्य उद्ध्वस्त करतेय की काय, अशी भीती व्यक्त केली. लेखक आपापल्या जातींचे होऊन बसलेत, ते लेखकांनाही ते भूषण वाटतं. जातिव्यवस्थेचा हा परिणाम भीषण आहे, असं ते म्हणाले.

रविवारी सकाळी मुख्य मंडपात झालेलं प्रतिभायन हे सत्र संमेलनातील एक रंगलेलं सत्र म्हणावं लागेल. पाॅप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, लेखक अच्युत गोडबोले आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांच्याशी वंदना बोकील कुलकर्णी यांनी गप्पा मारल्या. भटकळ लेखक, प्रकाशक आहेतच, परंतु ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतज्ज्ञही आहेत, मैफलीत गातात व शिकवतातही, हे अनेकांना या कार्यक्रमाद्वारे पहिल्यांदाच कळलं. गोडबोले आयआयटी, अमेरिका, आयटीतली नोकरी सोडून आता पूर्णवेळ लिखाण करतात. आणि मेधाताईंच्या आत एक संवेदनशील कवयित्री दडलेली आहे. असे हे तीन प्रतिभावंत. भटकळांनी सुरुवातीला कुलकर्णी यांना विनंती केली की, मेधाताईंना त्यांनी जास्त बोलतं करावं, त्या अशा प्रकारच्या मंचावर फार कमी वेळा असतात. मेधाताईंनी यानंतर त्यांच्या काही कविता सादर केल्या. ते ऐकणं हा वेगळाच अनुभव होता. आंदोलनं, निदर्शनांमध्ये घोषणा देऊन, भाषणं करून काहीसा खरखरीत झालेला आवाज, इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर आलेला थकवा, थोडी निराशा, आणि तरीही असलेला दुर्दम्य उत्साह असं मिश्रण मेधाताईंमध्ये आहे. 'इतकं काम आहे समोर की, रोजचा व्यायाम झाला तरी ठीक असं वाटतं. कविता आणि आयुष्यच हरवून गेलंय. कवितासंग्रह वगैरे काढणं ही तशी लक्झुरीच वाटते त्यामुळे. रोज तीसचाळीस पानं तर लिहिली जातात अजूनही, मग ते एफआयअार असतील, वा अॅफिडेव्हिट, वा संपादकीय. हातपाय थकले की, कवितांकडे लक्ष देईन,' असं त्या म्हणाल्या. कविता म्हणताना आलेला आवंढा दाबत त्या पुढे जात, पण त्यांना असं पाहणं माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव होता.

भटकळांनी ते शिकले त्या तीन विद्यापीठांचा उल्लेख केला, तो मजेशीर आहे. एक म्हणजे लेखक विद्यापीठ. ज्या लेखकांची पुस्तकं पाॅप्युलरने काढली त्या लेखकांकडून भटकळ खूप काही शिकले, म्हणून हे विद्यापीठ. दुसरं, कँटीन विद्यापीठ. काॅलेजच्या वर्गात मी कमीच शिकलो, पण कँटीनमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या विद्यार्थ्यांशी मारलेल्या गप्पांमधून खूप काही शिकता आलं. आणि तिसरं, काॅरिडाॅर विद्यापीठ. कविवर्य शंकर वैद्य मराठी शिकवत, पण भटकळांचा तो विषय नव्हता. वैद्यांना हे माहीत होतं की, भटकळांना कविता आवडते. मग ते काॅरिडाॅरमध्ये भेटले तरी कविता ऐकवत, कवितेविषयी बोलत. असं हे काॅरिडाॅर विद्यापीठ.

सुमारे तासभर उशिरा सुरू झालेल्या या परिसंवादाच्या शेवटी मेधाताई म्हणाल्या, 'आजचं साहित्य आणि वेगवेगळी आंदोलनं यांचा संबंध तुटत चाललाय.' नर्मदा बचाव आंदोलनाबद्दल अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी पूर्वी लिहिलं, याची त्यांनी आठवण करून दिली.

रविवारी सकाळी ज्येष्ठ वैज्ञानिक व लेखक डाॅ. जयंत नारळीकर व चित्रकार बाळ ठाकूर यांचा मुख्य मंडपात सत्कार करण्यात आला. बाळ ठाकूरांचा सत्कार वैशिष्ट्यपूर्ण म्हणायला हवा कारण, अशा चित्रकारांची दखल साहित्य संमेलनाने घेणं महत्त्वाचं व दुर्मीळ. परंतु त्या वेळी मला उपस्थित राहता आलं नाही, मी तेव्हा ग्रंथदालनात ज्योत्स्ना प्रकाशनच्या स्टाॅलवर लेखक माधुरी पुरंदरे यांच्याशी गप्पा मारत होते.

माधुरी पुरंदरे यांची अनेक पुस्तकं ज्योत्स्नाने प्रकाशित केली आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सोपी समकालीन भाषा, तुमच्याआमच्या घरांमध्ये सापडतील अशी पात्रं आणि सोबतची आकर्षक चित्रं, तीही पुरंदरे यांनीच चितारलेली. राधाचं घर हा पुरंदरे यांच्या सहा छोट्या पुस्तकांचा संच पंधराएक वर्षांपूर्वी प्रथम प्रसिद्ध झाला. राधा, आईबाबा, अाजीआजोबा, काका आणि भाऊ तन्मय अशी यातली पात्रं. राधा वगळता इतर पात्रांचं प्रत्येकी एक पुस्तक. वीतभर लांबीरुंदीचं. सुरुवातीला ही पुस्तकं कृष्णधवल होती, आता ती रंगीत आहेत. दाेनअडीच वर्षांच्या मुलांना ही पुस्तकं वाचून दाखवली तर त्यांना ती अितशय भिडतात, हा स्वानुभव. प्रत्यक्ष अक्षरओळख नसली तरी चित्रावरनं कोणतं पुस्तक ते ओळखता येतं या लेकरांना. आणि आतले शब्दही स्मरणशक्तीच्या जोरावर वाचता येतात. पुरंदरे यांना भेटायला असे अनेक पालक आले होते, ज्यांची मुलं ही पुस्तकं वाचत मोठी झालीत किंवा आता वाचत आहेत. एक आई होती, तिचा मुलगा एमफार्म करत होता. 'पुरंदरेंची स्वाक्षरी घेऊन येच,' असं त्याने आईला सांगितलं होतं. एक पाचवीतली चिमुकली होती, सुक्षा क्षीरसागर. तिचा उत्साही बाबा मकरंद तिला मुलुंडहून घेऊन आला होता, कारण तिच्याकडे पुरंदरेंची सगळी पुस्तकं होती आणि त्या भेटणार म्हटल्यावर ती अतिशय आनंदात होती. आणखी एक छोटुकली होती रेवा. तीही राधाची फॅन. पुस्तकविक्रीचा व्यवसाय करणारे मयूरेश गद्रे सांगत होते, 'त्यांच्या मुलाने मामाला मुलगा झाला तेव्हा तन्मय नाव ठेवायचा हट्ट केला होता.' हे ऐकल्यावर पुरंदरेंनी सांगितलं की, 'लेखक नंदा खरे यांच्या नातीनं लहान बहीण झाल्यावर तिचं नाव राधा ठेवायला लावलं होतं.' एक छोट्या होता ज्याला काकाचं पुस्तक अजिबात म्हणजे अजिबात आवडत नव्हतं, ते घरीसुद्धा नको होतं त्याला. पुरंदरे पाचसहा तास स्टाॅलवर होत्या, आणि सतत कोणी ना कोणी त्यांच्याकडे स्वाक्षरी घ्यायला येतच होतं. पुस्तकं वाचणाऱ्या या लहानग्यांना पाहून मजा वाटली. आणि थोडं छानही वाटलं. पुस्तकं आणि लेखक यांच्याबद्दलचं कुतूहल, आवड, प्रेम हे सगळं दिसलं या स्टाॅलवर.

आता थोडं पुस्तकं आणि विक्रीविषयी कारण ग्रंथप्रदर्शन हे साहित्य संमेलनाचा महत्त्वाचा घटक असतो.

मुख्य मंडपाच्या उजव्या बाजूला ग्रंथदालन होतं, त्याला रा. चिं. ढेरे ग्रंथग्राम असं नाव देण्यात आलं होतं. स्टाॅल्सची रचना दाटीवाटी होणार नाही, खूप जास्त माणसं एका वेळी आली तरी सहज फिरू शकतील अशी होती. जमिनीवर गालिचा होता, त्यामुळे धुळीचा प्रश्न नव्हता. पंखे होते. मांडव बंदिस्त असल्याने जरा उकडत होतं एवढंच. आणि तरीही माणसं मात्र नव्हती. गेल्या चारपाच संमेलनांच्या तुलनेत सर्वात कमी विक्री यंदा झाल्याचे ज्योत्स्ना प्रकाशनचे विकास परांजपे यांनी सांगितले. 'सासवड, चिपळूण येथे विक्रमी विक्री झाली होती. जेवायला जाण्याची उसंत तीन दिवस मिळाली नव्हती, मधल्या माणसांच्या गर्दीमुळे समोरचा स्टाॅल दिसत नव्हता. पण डोंबिवलीत शुक्रवार व शनिवार फारच कमी लोक स्टाॅल्सकडे फिरकले. जी काही विक्री झाली ती रविवारी,' असे ते म्हणाले. 'डोंबिवलीत संमेलन असल्याने अगदी मुंबईतील नाही तरी ठाण्यापासून बदलापूरपर्यंतच्या पट्ट्यातील मराठी वाचक पुस्तकं खरेदीला येतील, अशी अपेक्षा होती, परंतु आमची निराशा झाली,' असे परांजपे यांनी सांगितले.

परंतु, रोहन, ज्योत्स्ना, मौज, राजहंस व काँटिनेंटल या पाच प्रकाशनांनी एकत्र येऊन निर्माण केलेले मराठी रीडर हे अॅप तीन दिवसांत जवळपास हजार रसिकांनी डाउनलोड केल्याचे रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर यांनी सांगितले. त्यांच्या स्वतंत्र स्टाॅलवर या अॅपविषयीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली होती. या अॅपवर सध्या उपलब्ध असलेल्या पुस्तकांची संख्या शंभरहून कमी असली तरी हळुहळू वाढवण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.

ग्रंथदालनाला एकच प्रवेशद्वार असल्याने सुरुवातीच्या काही स्टाॅल्सवर जास्त गर्दी होती, बहुतांश रसिक आतल्या स्टाॅल्सपर्यंत पोचलेच नाहीत, असे मॅजेस्टिक प्रकाशनचे आशय कोठावळे यांनी सांगितले. मॅजेस्टिकचा स्टाॅल सुरुवातीलाच होता, तरीही आमच्या अपेक्षेपेक्षा विक्री बरीच कमी झाल्याचे कोठावळे म्हणाले. रोहन चंपानेरकर यांनीही विक्री कमी झाल्याला दुजोरा दिला. अपेक्षेपेक्षा तीस टक्के तरी विक्री कमी झाली, असे त्यांनी सांगितले. रोहन प्रकाशनचा स्टाॅलही प्रवेशद्वारापासून फार लांब नव्हता. पुस्तकविक्री कमी होण्याला कदाचित हेही कारण असेल की, डोंबिवलीतील बहुतांश माणसं नोकरीसाठी मुंबईत किंवा ठाण्यात येत असतात. मुंबई आणि ठाण्यात पुस्तकं मिळण्याची चांगली सोय आहे, त्यामुळे चंद्रपूर, चिपळूण किंवा सासवडसारखे इथले रसिक पुस्तकांचे भुकेले नव्हते.

ज्याचं नाव ऐकून रसिक धावत येतील, नक्की येतील, अशा खणखणीत वक्त्यांचा अभाव आणि अपुरी जाहिरात ही संमेलन फिकं पडण्याची कारणं असावीत, असा अंदाज बांधता येतो. विषयांमध्येही फारसं नावीन्य दिसलं नाही. जिथे विषय नवीन होते तिथे बोलणारी नावं तीच होती. तासभर चालणाऱ्या परिसंवादात समन्वयकासह सहा वक्ते असले की कोणालाच धड बोलायला वेळ पुरत नाही. किंवा एखादाच वक्ता इतकं बोलतो की, इतरांकडे बोलण्याजोगं काही उरत नाही. युवकांसाठी एक सत्र होतं विशेष, ज्याचा समन्वयक अभिनेता सुबोध भावे होता. सुबोध खरं तर आबालवृद्धांचा लाडका, त्याचा फुगे सिनेमाही येऊ घातलाय. तरीही या सत्राला फार गर्दी नव्हती. बाकी अनेक अभिनेत्यांना तर निमंत्रणच नव्हतं, अशा अर्थाच्या बातम्या आपण वाचल्याच आहेत. जयपूर फेस्टिवलमध्ये जशी बहुतेक सत्रं पुस्तकाभोवती फिरणारी असतात, तशी कल्पना मराठीतही रुजवायला हवी, असं प्रकर्षाने वाटतंय. म्हणजे त्या पुस्तकाची जाहिरातही होते, आणि लेखकाची व त्या विषयाची अधिक ओळख होते. गेल्या वर्षी नोव्हेेंबरमध्ये नाशकात दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिवल झाला, त्यात काही सत्रं अशी होती, ज्यात हिंदी, मराठी व इंग्रजी लेखकांचा समावेश होता. आमिष, अाश्विन सांघी, आनंद नीळकंठन, विकास सिंग, व इतर काही हिंदी लेखकांना ऐकणं, त्यांच्या पुस्तकांबद्दल जाणून घेणं हा अतिशय समृद्ध करणारा अनुभव होता. मराठी वाचकांना ही चांगली संधी होती आणि फेस्टिवलला चांगली गर्दीही होती.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या उतरत्या भाजणीला सुरुवात झालीय की काय, अशी शंका डोंबिवलीत आलेल्या अनेकांना वाटली असेल तर त्यात नवल वाटू नये. संमेलन यशस्वी झालं ते कसं ठरवतात, कोण ठरवतं? संमेलन आयोजित करण्यामागचे उद्देश, हेतू काय असतात नेमके, ते साध्य होतात का, किती अंशी साध्य झाले, काय चुकलं, काय जमलं, याचा ताळेबंद कोणी मांडतं का दरवर्षी? की, पुढे पाठ मागे सपाट अशा न्यायाने दर वर्षीची आयोजक संस्था मागच्या चुका टाळत तर नाहीच, नवनवीन करत राहते? दर वर्षी वेगळी संस्था आयोजन करत असते त्यामुळे तिला अनुभवाचा फायदा मिळत नाही, असं गृहीत धरायला हरकत नाही. (जयपूर लिटरेचर फेस्टिवलचं यंदाचं दहावं वर्ष होतं. त्याचे तिन्ही संचालक पहिल्या वर्षापासूनचे आहेत, चुकांमधून ते शिकत राहतात, याची प्रचिती दरवर्षी येते.) साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दोनतीनदा सांगितलं की, ते महिनाभर डाेंबिवलीत मुक्काम ठोकून होते व आगरी यूथ फोरमला मदत करत होते. मग माजी संमेलनाध्यक्षांना निमंत्रण पाठवायला लागतं, ज्या वक्त्यांची नावं छापली आहेत त्यांची परवानगी घ्यावी लागते, नुसती परवानगी घेऊन भागत नाही तर त्यांनाही रीतसर निमंत्रण पाठवायला लागतं, त्यांची येण्याजाण्याराहण्याचीजेवणाची सोय करावी लागते, हे त्यांच्याही लक्षात आलं नाही की काय? फूड फेस्टिवल आणि साहित्य संमेलन या दोन्हींच्या आयोजनामध्ये मूलभूत फरक आहे, त्यांच्या उद्देशातही फरक आहे, या बाबीकडे अंमळ दुर्लक्षच झाल्यासारखे वाटले. नुसता पैसा असून उपयोग नाही, तो कुठे व कसा खर्च करायला हवा, हेही कळावं लागतं.

संमेलनात साहित्यिक मूल्यांच्या चर्चा व्हायला हव्यात. मराठी भाषा आणि मराठी साहित्य पुढे कसं जाईल, याची चर्चा हवी. नवीन लेखकांना हुरूप येईल, मार्गदर्शन मिळेल, ते वाचकांसमोर येतील, वाचकांना चांगल्यावाईट पुस्तकांची ओळख होईल, वेगळे विषय मांडू पाहणाऱ्या लेखकांचं कौतुक होईल, अशा दिशेने सत्रं/परिसंवादांची आखणी हवी, ही अपेक्षा चुकीची आहे का? थोडी पाॅप्युलिस्ट भूमिका घ्यावी लागेल कदाचित, गर्दी व्हावी म्हणून, पण हे अशक्य तर नाहीच.



हे लिहेपर्यंत तरी कोणत्याही संस्थेने ९१व्या संमेलनासाठी आमंत्रण दिलेलं नाही. ते येईल अशी आशा करायला हरकत नाही. आणखी १० वर्षांनी, २०२७मध्ये होणारं संमेलन शंभरावं असेल. ते अविस्मरणीय, यशस्वी, वगैरे व्हायचं असेल तर आताच नियोजनाला सुरुवात करायला हवी. नाहीतर शंभराव्या संमेलनाचे सूप वाजले, अशा नीरस चावून चोथा झालेला मथळाच वाचावा लागेल तेव्हा आपल्याला.

Comments