अपशब्दांचा अभ्यास

प्रदीप म्हापसेकरांचं चित्र
अापली मातृभाषा वगळता इतर भाषा शिकणं, हे कौशल्य मानलं जातं. भाषा शिकणं आणि त्यावर प्रभुत्व मिळवणं, या मात्र दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या भाषेत अस्खलित शिव्या देता येतात, तेव्हा तुमचं त्या भाषेवरचं प्रभुत्व मान्य केलं जातं. याचा अर्थ असा नव्हे की, शिव्या दिल्याच पाहिजेत. परंतु, त्या देता आल्या पाहिजेत, हे आपल्यापैकी अनेकांना अनुभवाअंती समजलेलं असतं. एक मैत्रीण मध्यंतरी लोकलमध्ये चढताना ढकलाढकली झाल्याने प्रचंड चिडली होती, रागारागात डब्यात शिरल्यानंतर चारपाच जबरी शिव्या हासडल्यानंतरच ती शांत झाली. शांत झाल्यानंतर आम्हाला साॅरी म्हणाली. 'मी आधी अशी नव्हते. पण बांधकामाच्या साइटवर जावं लागतं अनेकदा, तेव्हापासून असे शब्द तोंडी येऊ लागलेत. तिथे कामगारांना भय्या, भाई, दादा, असे शब्द जणू कानावरच पडत नाहीत. काम करून घ्यायचं तर भ.. निघावाच लागतो तोंडातून,' असं ती म्हणाली तेव्हा ते आम्हाला काहीसं पटलं. आता यात दोष कोणाचा, ते तुम्ही शोधा.

लहान मुलं बोलायला शिकतात तेव्हा जे शब्द ऐकतात तेच बोलतात. त्यांना त्या शब्दांचे अर्थ, संदर्भ, परिणाम, वगैरे काहीच माहीत नसतं. आणि आपण तेव्हापासूनच असं नाही बोलायचं, बॅड वर्डस नाही म्हणायचे, पाप लागतं, वगैरे वगैरे शिकवत असतो. पण त्यांच्यासमोर असे शब्द आपल्या तोंडून निघायचे थांबत नसतात.

प्रत्येक भाषेत शिव्या वा अपशब्दांचं प्रचंड भांडार आहे. आज ऐशी वा नव्वदीत असलेल्या पिढीत हे शब्द अगदी नित्यनेमाने वापरले जात, आता मात्र तेच आपल्याला अप्रशस्त वाटतात. यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिव्या देणाऱ्या बायकांकडे पाहण्याची वेगळी नजर. सिगरेट ओढणं, मद्यपान, वा शिव्या देणं हे पुरुषांमध्ये समाजमान्य आहे, बायकांनी मात्र ते केलं की आठ्या पडतात. शिव्या देण्याचं समर्थन नाहीच, परंतु त्या कशा निर्माण झाल्या, का दिल्या जातात, त्याचे काय बरेवाईट परिणाम होतात, या व इतर मुद्द्यांचा भाषाशास्त्र, समाजशास्त्र, राजकारण, या अंगांनी अभ्यास व्हायला हवा, हे नक्की. हा विषय दुर्लक्ष करण्याजोगा नव्हेच, हे तुम्हालाही मान्य व्हावं.


Comments

  1. प्रत्येक भाषेत शिव्या आणि ओव्या दोन्ही आहेत.आपापल्या ठिकाणी दोन्हींचे महत्व आहे. शिव्यांची अभिव्यक्ती हा एक स्वतंत्र विषय आहे. जून्या स्रीया सहज शिव्या देत. ग्रामीण भागातील वा झोपडपट्टीतील भांडणात स्त्रीयाही शिव्या देतात. मनातली मळमळ वा राग बाहेर काढण्याचे ते एक प्रकारचे रेचकच आहे, असे मला वाटते. 'माहित हाये तुमचा ताव किती हाये ते. जिथ काढायचा तिथे काढत नाही आन इथ चालले म्होर भांडायले' असे ग्रामीण भागातली स्री सहज म्हणते. हजारो शब्दांपेक्षा एक छायाचित्र खूप काही सांगून जाते, तसे एका शिवीचे असते.

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं.

      Delete

Post a Comment