झुलनचं झगझगीत यश

क्रिकेटमधले अनेक विक्रम तुमच्यापैकी अनेकांना तोंडपाठ असतील. कोणी कधी कोणत्या स्टेडियममध्ये कोणत्या संघाविरुद्ध शतक झळकावलं, किती बळी घेतले, किती झेल घेतले वगैरे वगैरे अनेकांना मुखोद्गत असतं. शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकातल्या सनावळ्या काय लक्षात राहतील, इतक्या तपशीलवार क्रिकेटमधल्या तारखा पाठ असतात. पण हे सगळं पुरुषांच्या क्रिकेटबद्दल. महिला क्रिकेटसंबंधी अनेकांना माहितीच नसते. अर्थात लोकांना माहीत नाही म्हणून महिला क्रिकेटमध्ये विक्रम होण्याचे थांबत नाहीत. उदा. काहीच दिवसांपूर्वी भारतीय संघातर्फेच दोन विक्रम घडले, दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या चाैरंगी मािलकेत. एक म्हणजे जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेतले. आणि दुसरा, दीप्ती शर्मा व पूनम राऊत या सलामीच्या फलंदाजांनी उभी केलेली ३२० धावांची प्रचंड खेळी. (पुरुषांच्या क्रिकेटचा विचार केला तर ही संख्या तिसऱ्या क्रमांकावर आहे!) हे दोन्ही महिला क्रिकेटमधले जागतिक विक्रम आहेत. झुलनच्या नावावर इतरही विक्रम आहेत. तिने आतापर्यंत १५३ एकदिवसीय सामन्यांमधनं तब्बल १२३८ षटकं टाकली आहेत. याखालोखालचा आकडा आहे १०९ सामन्यांमधनं १००२! पाच फूट ११ इंच उंच असलेली झुलन भारतीय महिला संघाची कर्णधारही होती. तेव्हाही ती कमीत कमी धावा देऊन अधिकाधिक बळी घेणारी दुसरी कर्णधार होती. सर्वाधिक ५२ झेल घेणाऱ्या तिघींमध्ये ती एक आहे. ती अजूनही खेळतेच आहे, त्यामुळे हा आकडा ती लवकरच पार करेल, यात शंका नाही. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात जन्मलेली झुलन ३५ वर्षांची आहे, ती १५ वर्षांपासून भारतीय संघाचा अविभाज्य घटक आहे. तिला अर्जुन व पद्मश्री हे पुरस्कारही मिळालेले आहेत.

इतकं करूनही झुलन आपल्या भावविश्वाचा भाग झालेली नाही, तिचे फॅनक्लब नाहीत, तिच्यावर चित्रपट निघत नाहीत, तिला लाखोकरोडो रुपये देऊन कोणी माॅडेलिंग करायला सांगत नाही. हे सगळं निव्वळ ती महिला आहे म्हणूनच, यात कोणतीच शंका नसावी आपल्या मनात.

Comments