निकालानंतर बिल्किस बानो, आंतरजालावरून साभार |
बिल्किस बानो प्रकरणाचं वृत्तांकन करणाऱ्या काही पत्रकारांनी पत्रकारितेच्या नियमांनुसार व आपल्या देशातील कायद्याला धरून तिचं नाव त्यांच्या वृत्तांमध्ये उघड केलं नव्हतं. परंतु, काही काळाने ते नाव उघड झालं व हा खटला बिल्किस बानोच्या नावानेच ओळखला जाऊ लागला. निर्भया प्रकरणी तिचं नाव तिच्या आईवडिलांनीच काही काळाने जाहीर केलं, परंतु हा खटला निर्भयाच्याच नावाने ओळखला जातो. बलात्काराच्या आरोपाची शिक्षा अधिक कडक करणारा कायदाही तिच्या नावानेच ओळखला जातो.
बिल्किस बानो प्रकरणाला गोध्रा हत्याकांडाची पार्श्वभूमी आहे. या गरोदर महिलेवर अनेकांनी सामूहिक बलात्कार केला होता. तर निर्भयावरचा बलात्कार कुठल्या दुसऱ्याच ग्रहावर घडला असावा, इतका अमानवी असल्याचं खुद्द सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात म्हटलं आहे. बलात्कार आणि तिच्यावर केली गेलेली हिंसा ही या प्रकरणातील सहा आरोपींच्या मानसिक विकृतीचं निदर्शक होत. वाचकांना आठवत असेल की, आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी कोणतीही चूक केल्याचे, पश्चात्तापाचे भाव नव्हते. यातला एक तर फक्त १६ वर्षांचा होता, तो तीन वर्षं शिक्षा भोगून सुटलाही.
बिल्किस बानोचा खटला बऱ्यापैकी लांबला. निर्भया प्रकरणाचा निकाल त्या तुलनेत लवकर लागला. या दोघींच्या कुटुंबियांची निकालानंतरची प्रतिक्रिया हीच होती की, उशीर झाला असला तरी न्याय मिळाल्याचा आनंद आहे. अर्थात आरोपींना शिक्षा झाली म्हणजे बिल्किस बानो आणि निर्भया, या दोघींनी जे भोगलं ते विसरलं जाणं अशक्य. संगणकावर अनडू आज्ञा देता येते, तसं प्रत्यक्षात होत नसतं.
Comments
Post a Comment