भिंती बांधायच्या की, पाडायच्या?

स्थलांतर जगभरात आणि अनेक कारणांनी होत असतं. नोकरी वा शिक्षणासाठी स्थलांतर करणारी माणसं ते स्वेच्छेने करत असतात, त्यांचं वास्तव्य असतं त्या ठिकाणी सोयीसुविधा किंवा संधीही अपुऱ्या असतात म्हणून. परंतु, युद्धजन्य परिस्थितीत स्थलांतर करणाऱ्यांकडे दुसरा पर्यायच नसतो. किंवा पर्याय असलाच तर फक्त मरणाचा. गेल्या काही वर्षांत असं जबरदस्तीचं स्थलांतर करावं लागणाऱ्यांची, म्हणजे निर्वासितांची, संख्या काही कोटींवर गेली आहे. अफगाणिस्तान, इराण, इराक, व सीरिया या देशांमधनं प्रामुख्याने निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे मिळेल त्या मार्गाने सुरक्षित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यांमधले तब्बल १३ लाख निर्वासित जाॅर्डन या इवलुशा देशाने सामावून घेतले आहेत. जाॅर्डनची लोकसंख्या आहे ८० लाखांच्या आसपास. हा देश जगातल्या सर्वात कमी पाणी उपलब्ध असलेल्या पाच देशांपैकी एक आहे. अरब राष्ट्र असलं तरी तथाकथित अरबी श्रीमंती या देशात नाही. तरीही जाॅर्डनच्या राजाने आपल्या सीमा लगतच्याच सीरियातल्या युद्धापासनं पळ काढणाऱ्या निर्वासितांसाठी खुल्या केल्या आहेत. ‘माझ्या नवऱ्याने सीमा बंद केल्या तर आम्हाला झोप कशी लागेल,’ असं जाॅर्डनच्या राणीने गेल्याच आठवड्यात एका मुलाखतीत म्हटलंय. ही नुसती डायलाॅगबाजी नाहीये, कारण ही राणी निर्वासितांच्या शिबिरांना भेटी देत असते, त्यांना सर्वतोपरी मदत करत असते.

सांगायचा मुद्दा हाच की, भूकंप, पूर, दुष्काळ या परिस्थितीतनं आपल्याच देशातले, राज्यातले वा जिल्ह्यातले लोक निव्वळ नाइलाजाने स्थलांतर करून आपल्या शहरात येतात, तेव्हा आपण काय करतो? भिंती बांधून ते येऊ नयेत अशी सोय करतो की, असलेल्या भिंती पाडून त्यांचं स्वागत करतो? त्यांचा धर्म वेगळा, भाषा वेगळी, राहणी वेगळी, खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या, अशी कारणं पुढे करून त्यांनी न अालेलंच बरं, असं आपण म्हणत राहतो का? तसं म्हटलं तर वाचणाऱ्या प्रत्येकाने आपले आईवडील वा आजीआजोबा यांचा जन्म कुठे झाला होता, आणि आता आपण त्याच ठिकाणी आहोत की, दुसरीकडे आलोय, याचा विचार केला तरी स्थलांतरित वा निर्वासितांकडे पाहण्याची आपली दृष्टी बरोबर की चुकीची, हे स्वत:लाच स्पष्ट होईल. मग ठरवता येईल, भिंती बांधायच्या की, पाडायच्या ते.

Comments