भारतीय रेल्वे - माझी लाइफलाइन

(सायली राजाध्यक्ष यांनी संपादित केलेल्या डिजिटल कट्टा वर्षा विशेषांक २०१५मध्ये प्रसिद्ध झालेला लेख.)
वयाच्या पंधराव्या वर्षापासून, म्हणजे अकरावीत गेल्यापासून, मी लोकलचा, नेहमीच्या भाषेत ट्रेनचा, नियमित प्रवास करतेय. त्याआधी मुंबईतल्या मुंबईत प्रवास होई, पण अगदी कमी. कधी बस, कधी ट्रेन. आणि दूरचा प्रवास वर्ष दोन वर्षांतनं एकदाच, मनमाडला मोठ्या काकांकडे जायला. पंचवटीतल्या त्या प्रवासाच्या आठवणी अगदी ताज्या आहेत. स्टेशनवर मिळणारे वडे, भजी, फळं, सगळं घ्यायला बाबा तयार असायचे, तयार असण्यापेक्षा त्यांना ते अगदी हट्टाने घ्यायचं असायचं. एरवी मुंबईत अगदी चौकटीतलं जगावं लागणारे बाबा त्या प्रवासात खूप मोकळे असायचे. मनमाड स्टेशन खूप मोठं, त्या शाळकरी वयात तर ते महाप्रचंड वाटायचं. कितीतरी प्लॅटफॉर्म, किती ट्रेन उभ्या, उद्घोषणा... जंक्शनचा अर्थ नीटच कळतो मनमाडला.
बाबा पोस्टात होते, जीपीओत जायचे. त्यांची रोजची सकाळची आणि संध्याकाळची ट्रेन ठरलेली असायची. सकाळी गरमगरम वरणभात, भाजीपोळी खाऊन, शर्टकॉलरमध्ये रुमाल घालून ते आठच्या सुमाराला निघायचे नि साडेसहा सातपर्यंत परत यायचे. रोज घरी आल्यावर दोन्ही वेळा कोणती ट्रेन मिळाली, गर्दी होती का, किती नंबरला आली ही चर्चा व्हायचीच. त्यांना ट्रेनचं फॅसिनेशन होतं, ते माझ्यात तेव्हाच उतरलं असावं. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत पश्चिम रेल्वेवर ४०२/३०२ किंवा अशाच क्रमांकाच्या दोन लोकल होत्या, ज्यांचे डबे जुने होते. बाकांवर तीनजण जेमतेम बसू शकत, उभं राहायला बक्कळ जागा. लेडीजचा डबाही वेगळ्या ठिकाणी यायचा. ती गाडी आली की प्रवाशांची धावपळ व्हायची, मग बाबांजवळ सांगायला खूप काही असायचं. मलाही अनेकदा त्या ट्रेनचा अनुभव आहे. मी कॉलेजला गेले त्याच्या आगेमागे आईचीही बोरिवलीहून बदली झाली, थेट चर्चगेटला. त्यामुळे मग तिची धावपळ, आणि तिच्या गप्पा. ती परवाच सांगत होती, सुरुवातीला एकच लेडीजचा डबा होता, मग जेव्हा मिड्ल लेडीज सुरू झाला तेव्हा किती आनंद झाला होता.
मी १९८५मध्ये रुपारेल कॉलेजला अकरावीत अॅडमिशन घेतली आणि रोजचा ट्रेनचा प्रवास सुरू झाला. हळूहळू प्रवासाची सवय झाली. फर्स्ट क्लासने जाण्याइतकी परिस्थिती नव्हती, पण गरजही नाही वाटली. संध्याकाळी घरी जाताना गर्दी असायची, मग मी आणि माझी मैत्रीण ज्योती शेवटच्या संस्कृतच्या तासातून पाच मिनिटं आधी निघायचो परवानगी काढून, महालक्ष्मीहून सुटणारी, कमी गर्दीची ट्रेन मिळावी म्हणून. तेव्हा रुपारेलजवळ रेल्वेचा पूल नव्हता, आम्ही रूळ ओलांडूनच जायचो. आणि रस्त्याला लागून मोठी वस्ती होती, बहुतेक तृतीयपंथीयांची. सीनिअर कॉलेजला गेल्यावर सकाळची ६.२०ची ट्रेन ठरलेली, बरोब्बर चाळिसाव्या मिनिटाला सात वाजता माटुंग्याला पोचायची. ७.०५च्या लेक्चरला अगदी क्वचितच उशीर व्हायचा आम्हाला. आणि शिवाजी पार्क वा जवळपास राहणारे विद्यार्थी हमखास उशिरा यायचे.
पाच वर्षांनंतर पदवी हातात घेऊन मी विद्यानगरीत गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेच्या डिप्लोमाला प्रवेश घेतला. लेक्चर्स संध्याकाळची असायची. जय हा बोरिवलीला राहणारा मित्र भेटला तिथे. त्याच्यासोबत अनेकदा जनरल डब्यातनं प्रवासाची संधी मिळाली. वेगवेगळे गेलो तरी बोरिवलीला भेटून एकत्र घरी जायचो. एकदा आठवतंय, रात्रीचे साडेनऊ दहा वाजले असतील. मी बोरिवलीला स्टेशनवर उतरले आणि जयचा पत्ताच नाही. मी खूप वेळ वाट पाहिली आणि विचारातच घरी आले. तेव्हा मोबाइल नव्हते. प्रचंड काळजीत होते कारण तो माझ्या ट्रेनमध्ये चढलेला मी पाहिला होता. घरी आले, उशीर झाला म्हणून आईचा ओरडा खात असतानाच तो बेल वाजली. पाहते तो जय दारात उभा. ट्रेनमध्ये कोणीतरी त्याचं पाकीट मारलेलं त्याला कळलं, नि तो त्याच्यामागे कांदिवलीलाच उतरला. त्याला पकडून पोलिस वगैरे सोपस्कार पार पाडून तो तडक माझ्या घरी आला, कारण मी काळजीत असणार त्याला माहीत होतं.
पदवी घेतली आणि मी द डेली या इंग्रजी टॅब्लॉइडमध्ये वार्ताहर म्हणून नोकरीला लागले. १९९२ किंवा ९३च्या १४ ऑक्टोबरला रात्री ऑफिसमधनं परतले, बोरिवलीला येईतो दहासाडेदहा झाले असतील. स्टेशनवर थोडी गर्दी होती, पण कशाची ते पाहायची तसदी मी घेतली नाही, म्हणजे मी अगदीच ढ रिपोर्टर होते असं आता वाटतं. घरी आले. थोड्या वेळाने समोरच्या बिल्डिंगमध्ये राहणारी वैशाली आली, म्हणाली, ‘अगं, दीपकची बहीण भारती दिसली का कुठे तुला स्टेशनवर?' का, तर कळलं की तिच्या ट्रेनला आग लागली किंवा आग लागल्याची अफवा उठली म्हणून काही बायकांनी चालत्या गाडीतनं उडी मारली आणि शेजारच्या रुळावरनं धडधडत जाणाऱ्या ट्रेनखाली त्या आल्या. बापरे, मी अशी काही कल्पनाच नव्हती केली. ती गेलीच त्या अपघातात. दर वर्षी १४ ऑक्टोबरला भारतीची आणि त्या अपघाताची आठवण येतेच मला. माझ्या लक्षात राहावा, असा तो पहिला रेल्वे अपघात. आणि दुर्दैवाने असे अनेक नंतर होत गेले, अपघात आणि बॉम्बस्फोट.
एक बॉम्बस्फोट नंतर काही वर्षांनी, माझ्या लग्नानंतर झालेला. माझी मावसबहीण मंजिरी ज्या ट्रेनने दररोज डोंबिवलीला जायची व्हीटीहून, त्या ट्रेनमध्ये त्याच डब्यात बॉम्बस्फोट झाला मुलुंडच्या आसपास. काही कारणाने ती त्या दिवशी मागच्या ट्रेनला होती. रात्री तिच्याशी फोनवरून बोलताना तिने हे सांगितलं तर मटकन खालीच बसले होते मी. नंतर एका बॉम्बस्फोटात जय हा वर उल्लेखलेला मित्र जखमी झाला होता. प्रेशर कुकरमधले बॉम्बस्फोट होते ते. नंतर जे झाले, स्फोटांची साखळीच होती ती, गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी घडवून आणलेली. ७ जुलै. मी दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा म्हणून रुपारेलमध्ये मानसशास्त्राच्या विभागप्रमुख डॉ. नंदिनी दिवाण आणि डॉ. नीता ताटके यांना भेटायला गेले होते दुपारी, काही तासांतच माटुंगा स्टेशनजवळच या साखळीतला एक स्फोट झाला होता.
एकदा आम्ही भोपाळहून मुंबईला येत होतो. आदल्या दिवशी, त्याच पंजाब मेलच्या त्याच एसी कंपार्टमेंटमध्ये आग लागून अपघात झाला होता. आणि आमच्या डब्यातला एक माणूस मस्त विडी ओढत होता. डब्याच्या आत. कधी मुंबई गाठतोय असं झालं होतं मला तेव्हा.
लग्नानंतर लांबचे ट्रेनचे प्रवास खूप केले. प्रत्येक प्रवासानंतर माझं रेल्वेप्रेम दृढ होत गेलं. या प्रेमावर मायेचं, आपुलकीचं कोंदण चढवलं कोकण रेल्वेने. मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये वार्ताहर होते, वाहतूक बीट करत होते. त्यामुळे कोकण रेल्वेचा वीर-खेड विभाग खुला झाला, तेव्हा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तिथे जायला मिळालं. खेड स्थानक इतकं चित्रातल्यासारखं होतं तेव्हा, एका बाजूला डोंगर आणि समोर इवलंसं स्टेशन. तिथून मोटारीने इकॉनॉमिक टाइम्समधल्या संतोष मेनन या सहकाऱ्यासोबत, उस्ताद रशीद खान यांचा मारवा ऐकत केलेला प्रवास, हाही अविस्मरणीयच होता.
मी गरोदर असताना मुंबई रत्नागिरी मार्ग खुला झाला. मग काय, आजोळी जाण्याची संधी मी न घेते तरच नवल. माझ्या त्या प्रवासात इतके मजेशीर अनुभव आले, की परतल्यावर टाईम्समध्ये त्याची बातमी झाली मस्त. तिकीट घरी जपून ठेवून त्याची झेरॉक्स टीसीला दाखवणारे प्रवासी, वरच्या बर्थवर चढायला चक्क नाही म्हणणारी म्हातारी, ट्रेन जाताना आजूबाजूला उभे असलेले अचंबित गावकरी आणि कोकणातून परतताना फणस, सुपं, खराटे असं खास कोकणी सामान आणणारे प्रवासी. मी लिहिलेली बातमी सापडली चक्क आंतरजालावर. ती ब्लॉगवर टाकलीय. (http://ardheakash.blogspot.in/2015/05/first-time-train-travellers-provide.html)
त्यानंतर कधीच कोकणात एसटीने जाणं झालं नाही. रत्नागिरी, करमळी, कुमठा, अर्नाकुलम आणि तिरुवनंतपुरम या स्थानकांपर्यंत प्रवास केलेत या मार्गावरून. डोळ्यांचं पारणं फिटवणारा हा मार्ग. त्यात ISO प्रमाणपत्र असलेल्या मांडवी एक्स्प्रेसचा एसी डब्यातनं केलेला प्रवास भारीच. स्वच्छ डबे, गरमागरम नाश्ता, आणि बाहेरची हिरवाई. वा! प्रवास असावा तर असा.
आतापर्यंत तीन वेळा वाराणसीला गेलेय, त्यातल्या दोनदा तर एकटीच. जवळजवळ २८ तासांच्या या प्रवासात इतके मस्त सहप्रवासी भेटले, अजून त्यांच्या नावांसकट लक्षात आहेत. त्याच प्रवासात इटारसीच्या नीलम रेस्टॉरंटची ओळख झाली. गाडी इटारसीला पोचायला तासभर असताना नीलमला फोन करून जेवणाची ऑर्डर द्यायची, सीट नंबर सांगायचा, की गाडीवर गरमागरम जेवण हजर. आता अशी सोय अनेक स्थानकांवर झाली आहे. एका परतीच्या प्रवासात भेटला एक रेल्वेतला एक तरुण अधिकारी. त्यामुळे त्याच्याशी खूप गप्पा झाल्या. तेव्हा वाटून गेलं, आपण का नाही रेल्वेत नोकरी करायची संधी शोधली, का नाही प्रयत्न केला तसा. मी शिकत होते तेव्हा इंडियन रेल्वे सर्विस असा काही प्रकार असतो, हेही ठाऊक नव्हतं. असतं तर नक्कीच तिथे गेले असते. पत्रकारिता मी एंजॉय केलीये, करतेयही. पण रेल्वेतली नोकरी अधिक आवडली असती असं वाटायला लावणारे काही अधिकारीही नंतर काम करताना भेटले. टाइम्समध्ये वाहतूक बीट असल्याने पश्चिम आणि मध्य रेल्वेचे पीआरओ अगदी सुरुवातीपासून ओळखीचे झालेले. पश्चिम रेल्वेवर १९९०च्या दशकात मोहिनी श्रॉफ या पीआरओ होत्या. BP तायल, मुकुल मारवा हेही त्याच काळात परिचित झालेले. तायल आता कोकण रेल्वेच्या बहुधा सर्वोच्च पदावर आहेत, तर मारवा पुन्हा एकदा मुंबईत आलेत नुकतेच. मोहिनी निवृत्त झाल्यात, पण अजून कधीमधी फोन होतो आमचा. मोहिनीचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तम इंग्रजी, नम्र वागणं आणि त्यांचं वैमानिक असणं. भारतातल्या पहिल्या महिला वैमानिकांपैकी त्या एक. त्या वेळी मोबाइल नव्हते, लँडलाइनवर किंवा प्रत्यक्ष भेटूनच कामं व्हायची, म्हणून रॅपो खूप छान होता. आजच्यासारखं व्हॉट्सअॅपवरून काम होत असतं, तर या सगळ्यांच्या इतक्या आठवणी नसत्या तयार झाल्या असं वाटतं. तेव्हापासूनचा पीआरओ शेखर अजून आहे व्हीटीला, अजून त्याच्याशी संपर्क आहे. आता तिकिटं नाही फारशी कन्फर्म करून घ्यावी लागत त्याच्याकडनं, पण काम नसलं तरी संपर्क आहे. (हो, रेल्वे हा बीट असल्याचा हा सर्वात मोठा फायदा होता, वेटलिस्टेड तिकिटं पीआरओकडून पत्र घेऊन कन्फर्म करवून घेण्याचा.) मध्ये एकदा भेटले तर म्हणाला, ‘मारवा साब बोल रहे थे, पुरानी गँग को मिलना है!' पाहू कधी भेटतोय. कोकण रेल्वेवरही वैशाली पतंगे आहे अनेक वर्षांपासून. नुकताच तिला फोन केला होता, एसी डबलडेकर ट्रेन भांडुपजवळ ट्रॅकवर उभी होती अनेक दिवसांपासून, ती कोकण रेल्वेवर धावणार अशा बातम्यांचं पुढे काय झालं विचारायला. तर काय, पुढे काहीच झालेलं नाहीये त्या ट्रेनचं.
मुंबईकरांना लक्षात असेल, १९९३पासून साधारण ९७/९८पर्यंत लोकलचा प्रवास हा प्रचंड कष्टाचा झाला होता, ओव्हरहेड वायर तुटणं, गाडी रुळांवरनं घसरणं, सिग्नल बंद होणं हे प्रकार अत्यंत नियमितपणे होत, विशेषत: मध्य रेल्वेवर. अशा काळात तिथे अरुण दुबे नावाचे विभागीय व्यवस्थापक आले. त्यांच्यासोबत एक रेल्वेचा प्रवास असा केला की ज्या ट्रेनमध्ये फक्त रेल्वे अधिकारी आणि काही पत्रकार होते. अत्यंत धीम्या गतीने जाणाऱ्या या लोकलमधनं अधिकारी रेल्वेमार्ग परिसराची पाहणी करत होते, आणि आम्हा पत्रकारांशी गप्पा मारत होते. यानंतर काही दिवसांनीच सध्या अत्यंत चर्चेचा विषय ठरलेला, परंतु प्रसिद्धीमाध्यमांनी कायमच अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळलेला मेगा ब्लॉक सुरू झाला. कोणतीही व्यवस्था, आपल्या रेल्वेइतकी अवाढव्य असेल तर निश्चितच, नियमित देखभाल व दुरुस्ती नसेल तर कोलमडणारच. तसंच मुंबईच्या लोकलचं झालं होतं. मेगाब्लॉकमुळे परिस्थिती आता बरीच सुधारली आहे. काही वर्षांपूर्वी मस्जिद ते व्हीटी मार्ग दोनतीन दिवस बंद ठेवून व्हीटी परिसरात खूप मोठं काम रेल्वेने पूर्ण केलं होतं, ते अनेकांना आठवत असेल. मध्य रेल्वेला दीडशे वर्षं झाली तेव्हा जी विशेष लोकल व्हीटीहून ठाण्याला रवाना झाली, तीदेखील अविस्मरणीय. सीएसटी तोंडात येतच नाही अजिबात, इतकं टाइम्समधल्या दहा वर्षांच्या नोकरीमुळे व्हीटीशी नातं जुळलेलं होतं. टाइम्सइतकं सुलभ कार्यालयाचं भाग्य ज्यांना लाभलं त्यांनाच त्याची मजा कळेल. व्हीटी येईपर्यंत गाडीत झोप व्हायची, संध्याकाळी परतताना बसायला मिळायचं, पाऊस असला तरी छत्री नसल्याने बिघडायचं नाही काहीच. पटकन ऑफिसात पोचता यायचं.
रिपोर्टर असतानाच्या काळात एक प्रवास हार्बर मार्गावर मोटरमनच्या केबिनमध्ये बसूनही केला होता. रेल्वेच्या रुळांपासून किती कमी अंतरावर वस्ती आहे, आणि त्या वस्तीत राहणाऱ्या माणसांच्या रेल्वेमार्गावरच्या वावरामुळे गाड्यांच्या वेगावर कसं बंधन येतं, हे लोकांपर्यंत पोचवावं म्हणून रेल्वेने काही पत्रकारांना ही संधी दिली होती. त्या प्रवासात असं वाटलं होतं की तो मोटरमन चुकून त्या माणसांच्या घरांमधनं, अंगणांमधनं गाडी नेतोय. गाडीतनं हात बाहेर काढला तर घरात जाईल इतक्या जवळ ही वस्ती होती. त्यानंतर बहुतांश ठिकाणांहून वस्ती दूर हलवली गेली. अजूनही माहीम, वडाळा या भागात ती आहेच म्हणा.
सासरचे बहुतेक नातलग मध्य प्रदेशात असल्याने जबलपूर, भोपाळ आणि इंदूर असे अनेक प्रवास गेल्या वीस वर्षांत केले. हावडा मेल, पंजाब मेल आणि अवंतिका एक्स्प्रेसचे हे प्रवास खूप आवडीचे. (एकदा अवंतिकाने इंदूरला चाललो होतो. मैत्रिणीचा फोन आला, मुलीचं बारसं झालं ते सांगायला. नाव काय, तर अवंतिका! इतकी मजा वाटली मला.) एकदा पुतण्याच्या मुंजीसाठी ऐन होळीच्या दिवसांत जबलपूरला एकटीने केलेला प्रवास आठवतोय. कुर्ला टर्मिनसहून मध्यरात्री मी ट्रेन पकडली. खचाखच भरलेली, उत्तर प्रदेशात जाणारी ती ट्रेन. दुसऱ्या दिवशी दुपारी जबलपूर येईपर्यंत मी माझ्या बर्थवरून खाली येऊ शकले नव्हते, टॉयलेटला जाणं भागच झालं तेव्हा एकदा जाऊन आले तेवढंच. तेव्हा अगदी निश्चय केला, ऐन सणासुदीत आणि स्लीपर कोचमधनं लांबचा प्रवास करायचा नाही म्हणजे नाही.
मुंबईतल्या लोकल प्रवासाच्या आठवणी वेगळ्याच. वाईटच आहेत असं नव्हे, अनेक तर माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या. ट्रेनमधल्या मैत्रिणी किंवा मित्र, ग्रूप, त्यांची सेलिब्रेशन्स, ट्रेनमध्ये बसून सोललेले मटार वा निवडलेली गवार याच्या कथा तर आपल्याला माहीतच असतात, किंवा आपल्यापैकी बहुतेकांसाठी त्या स्वत:च्याच असतात. त्यातल्या त्यात वेगळा प्रवास असे महाराष्ट्र टाइम्समध्ये नाइट केल्यानंतर घरी येतानाचा. रात्री साडेअकराच्या सुमाराची ट्रेन पकडायची व्हीटीला. तशी रिकामीच. सोबतीला टेलिफोन ऑपरेटर्स, नर्स, कॉलगर्ल्स आणि तृतीयपंथी. तेव्हा आयटी कंपन्या फार नव्हत्या आपल्याकडे, त्यामुळे गर्दी ही बहुतेक दिवशी अशीच असायची. यात अनेक मुस्लिम स्त्रिया असत, मुलाबाळांसकट. त्याचं मला फार आश्चर्य वाटे सुरुवातीला. इतक्या रात्री या व्हीटीला काय करतात, असं वाटे. मग कळलं, त्यातल्या बऱ्याच जणी मूळच्या मोहमद अली रोड व परिसरात राहणाऱ्या. घरं लहान पडू लागली म्हणून मुंब्रा किंवा कल्याणला राहायला गेलेल्या. पण रोज दुपारी माहेरी किंवा सासरच्या मूळ घरी यायचं नि रात्री जेवून परत जायचं, असा यांचा दिनक्रम असे. हल्ली एवढ्यात इतक्या उशिरा जाण्याची वेळ नाही आली ट्रेनने, त्यामुळे अजूनही हा प्रकार सुरू आहे किंवा नाही, कल्पना नाही.
गरोदर होते तेव्हाची गोष्ट. आठवा महिना असावा, रजेवर जाणारच होते दोनतीन दिवसांत. पावसाचे दिवस. घाटकोपरहून व्हीटीला यायला ट्रेनमध्ये बसले. नवरा सोबत आला होता. मशीदपर्यंत गाडी मस्त आली, मग तो म्हणाला, ‘आता मी समोरच्या प्लॅटफॅर्मवर गाडी पकडतो पटकन आणि जातो परत.' म्हटलं, ‘ठीकेय.' आणि नंतर गाडी उभी ती उभीच. तासभर झाला असेल. मी जेन्ट्स फर्स्ट क्लासमध्ये होते. अनेक जण उड्या मारून पायी व्हीटीकडे जाऊ लागले होते. तर डब्यातले पुरुष मला म्हणू लागले, ‘तुम्ही उडी नका मारू, गाडी कधी ना कधी पोचेलच व्हीटीला. आम्ही आहोत सोबत.'
अशा अनेक आठवणी गाड्यांच्या गोंधळाच्या, गळणाऱ्या डब्यांच्या, बंद न होणाऱ्या दरवाजे/खिडक्यांच्या, बंद असलेल्या पंख्यांच्या, चुकीच्या वा अजिबातच नसलेल्या उद्घोषणांच्या. अनेक आठवणी रेल्वेने कमी वेळात, न दमता, ऊन न लागता, सुरक्षित घरी पोचल्याच्या. अनेक आठवणी दादर स्थानकात इंडिकेटरच्या खाली वाट पाहण्याच्या. अगदी ताजी आठवण, पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नवीनच रुजू झालेल्या बम्बार्डिअर लोकलच्या पहिल्या प्रवासाची. या लोकलचा प्रहिला प्रवास ज्या दिवशी चर्चगेट ते बोरिवली होणार होता, त्या दिवशी मी दहा मिनिटं अगोदरच दादरला तिची वाट पाहात उभी होते. माहीमपर्यंत जेमतेम पाचसहा मिनिटांचा प्रवास, पण मला तो त्या दिवशी करायचाच होता. ती गाडी पकडायची म्हणून आईने सांगितलेलं एक कामही मी टाळलं होतं.
गेल्या वर्षी जूनमध्ये मेट्रो सुरू झाली तेव्हा मी तिथे पोचणं स्वाभाविकच म्हणायला हवं. इतकी एक्सायटेड होते मी. घाटकोपरहून वर्सोव्याला जाताना खालचा रस्ता पाहून मस्त तर वाटत होतंच, पण वाईटही वाटत होतं खूप. पाचसहा वर्षांपूर्वी कॅथरीन बूबरोबर काम करत असताना मुलुंडहून साकी नाक्याला जाताना नाकी नऊ येत. कितीतरी तास बसमध्ये उभ्याने प्रवास करत काढले होते त्याची आठवण येऊन भरूनच आलं मला. मेट्रो असती तेव्हा तर आणखी किती वेळ तिच्यासोबत राहता आलं असतं, असं राहून राहून वाटतंच अजूनही. त्या अनुभवावर लिहिलंही. (https://mrinmayeeranade.blogspot.in/2014/06/blog-post_28.html)
एक्स्प्रेसला होते, म्हणजे इंडियन एक्स्प्रेसला, तेव्हाची गोष्ट. तिथे कल्पना वर्मा या ज्येष्ठ पत्रकार भेटल्या. अनेक वर्षांपासून रेल्वे बीट कव्हर करणाऱ्या. खूप गप्पा मारायचो आम्ही. तिथे आठवड्यातून एकदा शेतीविषयक पान असायचं, त्यासाठी मुंबईतल्या रेल्वेमार्गानजीकच्या शेतीवर स्टोरी केली होती. तशीच एक स्टोरी करायची मनात आहे, रेल्वे स्थानकांलगतच्या उद्यानांची. काही ठिकाणी इतकी छान बाग फुलवलेली आहे रेल्वे कर्मचाऱ्यांनी, मन प्रसन्न होतं पाहून. लिहायला हवं ना त्यावर?
ट्रेनमधली खरेदी हा एक मोठाच आवडीचा भाग. किती कानातले, बांगड्या, टिकल्या, पिना, हेअरबँड्स घेतले असतील आतापर्यंत, त्याची गणतीच नाही. क्वचित भाजीसुद्धा. एका विशिष्ट समाजातल्या या बायका, खांद्याला बांधलेल्या झोळीत एखादं मूल, डोक्यावर तीनचार पेट्या मालाच्या. किंवा लहान मुलांची पुस्तकं विकणारी तितकीच लहान मुलं. हल्ली कायम येणारे चायनीज माल विकणारे मुलगे. खाखरा, समोसे, पुरणपोळी, चिक्की, चिप्स, आमपापड, गोळ्या विकणाऱ्या मराठी/गुजराती बाया. रुमाल, गाउन, ओढण्या, लेगींग्ज, चड्ड्या, स्लिप्स विकणाऱ्या बाया. अनेक वर्षांपासून मातीची खेळणी विकणारी गुजराती बाई. गजरे/सोनचाफा विकणारी मंडळी. वेगवेगळ्या प्रकारांनी पैसे जमा करणारे तृतीयपंथी - कोणी गाणारे, कोणी गप्पा मारणारे, कोणी शांतपणे हात समोर करणारे. आणि बायकांच्या डब्यात घुसणारे पुरुष. या सगळ्यांना वगळून ट्रेनच्या प्रवासाचा विचारही करू शकत नाही आपण.
मी नियमित प्रवास सुरू केला तेव्हापासून आतापर्यंत, जवळजवळ ३० वर्षांत मुंबईतली रेल्वे कितीतरी बदलली. जुन्या गाड्या, म्हणजे डबे (rakes) अजून आहेतच काही, पण बऱ्याचशा नवीन आहेत. नऊ डब्यांची लोकल बारा डब्यांची होऊनही वर्षं लोटली, आता तर १५ डब्यांचीही झाली ती. कुर्ल्यापासून ठाण्यापर्यंत पाचवा व सहावा मार्ग झाला, बोरिवली ते विरार तिसरा व चौथा मार्गही झाला. ठाणे ते वाशी ट्रान्सहार्बर रेल्वे सुरू झाली, ती पनवेलपर्यंत पोचली. आता तर डेक्कन क्वीन पनवेलमार्गे पुण्याला जाते. आता गोरेगावला मोठं स्थानक होतंय, हार्बर तिथपर्यंत जाणार आहे. बोरिवलीला आठ फलाट झालेत. अंधेरीचा मेट्रोमुळे कायापालट झालाय. वांद्र्याला हेरिटेज स्थानकाची झळाळी पुन्हा मिळालीय. व्हीटी स्टेशनच्या आयकॉनिक इमारतीला रोज संध्याकाळी वेगवेगळ्या प्रकाशात न्हाऊन निघताना बघून डोळ्यांचं पारणं फिटतं. अनेक स्थानकांमध्ये एस्कलेटर लागलेत. जुनं पुठ्ठ्याचं तिकीट आठवूनही हसू येतं आता, संगणकातून छापून येणारं तिकीट मिळायला लागूनही कैक वर्षं झाली. कूपन्स आली, स्थिरावली आणि एक मे, २०१५ पासून बंदही झाली. आता जमाना एटीव्हीएमचा, किंवा मोबाइल तिकिटाचा. बाहेरगावच्या आरक्षणासाठी आदल्या रात्रीपासून आरक्षण केंद्रावर रांगा लावणं इतिहासजमा झालं, आता घरीच सकाळी आठ वाजता संगणकावर लॉगइन करून रेल्वेच्या वेबसाइटवरून तिकिट काढता येऊ लागलं. अगदी ऐनवेळचा प्रवास असेल, तर थोडे जास्त पैसे मोजून तात्काळ तिकिटही मिळू लागलं. पूर्वी राजधानी, शताब्दीची ऐट वाटे. आता जनशताब्दी, गरीबरथ, दुरोंतो हे शब्द सर्वसामान्यांच्या तोंडी रुळले. मुंबईत वांद्रे आणि कुर्ला अशी दोन टर्मिनसही आपल्याला सोपी वाटू लागली. m-indicator या मोबाइल अॅपने तर क्रांतीच केली. मुख्यत: रेल्वेचं वेळापत्रक देणाऱ्या या अॅपमुळे रोज प्रवास करणाऱ्यांची कितीतरी सोय झाली. कुठूनही कुठेही जाणाऱ्या गाडीची वेळ, तिकिटाचे दर, प्रवासाला लागणारा वेळ असं सगळं एका क्लिकवर उपलब्ध झालं. जुनं पोथीसारखं टाइमटेबल, जे चर्चगेट वा व्हीटीसारख्या मोठ्या स्थानकांवर व्हीलरच्या स्टॉलवरच मिळायचं फक्त, ते विकत घेऊनही पाचसहा वर्षं झाली असतील मला. बाबांचा रोजचा प्रवास नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर संपला असला तरी त्यांना घरात मध्य आणि पश्चिम रेल्वेचं लोकलचं टाइमटेबल लागायचंच. नवं टाइमटेबल आल्याची बातमी आली, की मला फोन असायचा, घेऊन ठेव म्हणून. खेरीज ते भलंमोठ्ठं बाहेरगावच्या गाड्यांचं टाइमटेबलही असायचंच घरी. ते तर केव्हाही उघडून पाहायला मजा यायची मला.
इतक्या अस्ताव्यस्त आपल्या देशात कुठल्या कोपऱ्यापासून कुठे ट्रेन धावतात, याचं प्रचंड अप्रूप वाटतं मला अजूनही. दोनतीन दिवस लागत असतील दूरच्या प्रवासाला. उदा. तिरुवनंतपुरम ते दिल्ली, मुंबई ते गुवाहाटी, मुंबई ते जम्मू, वगैरे. या दोन दिवसांच्या प्रवासात लोकलच्या डब्यांच्या घरातल्या खोल्या झालेल्या असतात. पुरुषमंडळी शॉर्टस, टीशर्टवर किंवा बनियनवर आलेली असतात. बूट सीटखाली जाऊन पायात स्लिपर्स असतात. दोरी बांधून क्वचित कपडेही वाळत पडलेले असतात. खाण्यापिण्याची रेलचेल असते. आजूबाजूच्या प्रवाशांसोबत फर्मास जेवण होत असतं. वर्षांनुवर्षांची ओळख असल्यासारख्या गप्पा होतात, अनेकदा ऋणानुबंध जुळतात कायमचे. माझ्या दोन प्रवासांमध्ये अशा दोन व्यक्ती मला भेटल्या. एक दिल्लीहून कोलकात्याला राजधानीने जाताना भेटलेले गुप्ता अंकल आणि दुसरी उद्यान एक्स्प्रेसने पंढरपूर, म्हणजे कुर्डूवाडीला, जाताना भेटलेली मीनामावशी. गुप्ता अंकलची ओळख होऊन पाचसात वर्षं झाली, पण ते अधनंमधनं फोन करून चौकशी करतात, कोलकात्याला यायचं आमंत्रण देतात. आणि मुंबईतच राहणाऱ्या मीनामावशीला मी घरी जाऊन भेटते. तिला कशिदाकारी करण्यासाठी कुडता शिवून ठेवलाय, तो द्यायला जायचंय लवकरच.
रेल्वेमुळे ओळख झालेल्यात एक आहे राजेंद्र अकलेकर हा तरुण वार्ताहर, आम्ही भेटलो फेसबुकवर. राजेंद्रलाही रेल्वेचा कीडा असाच लहानपणी चावलेला असावा. त्याने तर आता भारतीय रेल्वेवर पुस्तक लिहिलंय चक्क Halt Station India हे. मुंबई व परिसरात रेल्वेचं कुठं खुट्ट वाजलं की राजेंद्र ते फेसबुक आणि ट्विटरवर टाकतो. संध्याकाळी घरी जाताना ट्विटर चेक केल्याशिवाय निघत नाही मी ऑफिसातून म्हणूनच. असाच पुण्याचा विक्रांत देशमुख. संगीत (खासकरून कौशिकी चक्रवर्ती!) आणि रेल्वे हे आमच्यातले कॉमन धागे. विक्रांत फेसबुकवर नेहमी रेल्वेचे वेगवेगळे फोटो शेअर करणार, लिहिलंयही त्याने रेल्वेविषयी. विक्रांत आत्ता ग्लासगोला गेलाय, त्याच्या हाॅटेलच्या खालीच ग्लासगो मेट्रो स्टेशन आहे. त्यामुळे तो किती एक्साइट झाला असेल याची मला नीटच कल्पना येतेय. Feeling totally jealous. असाच संवाद सुरू झाला तो डोंबिवलीच्या गणेश मनोहर कुलकर्णी यांच्याशी. कुलकर्णी लांब पल्ल्याच्या ट्रेनचे चालक, मोटरमन. त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित प्रदीर्घ लेख अंतर्नादमध्ये लिहिला होता गेल्या वर्षी. तो वाचून मला त्यांचा इतका हेवा वाटला होता. मग त्यांना फोन केला, गप्पा मारल्या. आताही अधनंमधनं फोन सुरूच असतो.
माझ्या भावात बाबांकडनं रेल्वेचं फॅसिनेशन नाही आलं, त्याचा बराच प्रवास बाइक व मोटारीने होत असतो. माझी मुलगी मात्र कुठेही जायचं ठरवलं, तर पहिला प्रश्न विचारते, ‘ट्रेनने जातोय ना आपण? प्लीज, फ्लाइट नको, ट्रेनने जाऊ. सेकंड स्लीपर चालेल, पण ट्रेन हवी.' आणि मी भरून पावते.

Comments