कॅनडात काही दिवसांपूर्वी एक मूल जन्माला आलंय, ते मुलगा आहे की
मुलगी, हे डाॅक्टरांना कळत नाहीये. कारण त्याला बाहेर दिसतील अशी स्त्री वा
पुरुष जननेंद्रियं नाहीत. त्यामुळे त्याच्या जन्म प्रमाणपत्रावर M किंवा F
ऐवजी U लिहिलंय. या यूचा अर्थ अननोन, म्हणजे ठाऊक नसलेला; उघड न केलेला
की, ओळख होऊ न शकलेला आहे, हे स्पष्ट नाही. असं प्रमाणपत्रावर नोंद केलेलं
हे बहुधा जगातलं पहिलं मूल असावं. या बाळाचं नाव आहे सिरिल अॅटली.
बाळाचा जन्म झाला की, त्याच्याकडे एक नजर टाकून डाॅक्टर सांगतात,
मुलगा आहे की मुलगी. पण जेव्हा नजर टाकून हे कळलं नाही, तेव्हा डाॅक्टरही
चक्रावले. अर्थात डोळ्यांनी जरी एखादं मूल मुलगी आहे असं दिसलं, तिचं शरीर
मुलीचं असलं तरी आतून तिला आपण मुलगा आहोत, असं वाटण्याची अनेक उदाहरणं
आपल्याला माहीत असतात. किंवा शरीर पुरुषाचं असलेल्या व्यक्तीला आपण स्त्री
आहोत, असं वाटत असतं, किंबहुना तशी खात्रीच असते. म्हणजेच, जन्म
प्रमाणपत्रावर स्त्री वा पुरुष स्पष्ट लिहिल्याने प्रश्न मिटत नसतोच.
बेबी सिरिल अॅटलीला त्याचे पालक जेंडर (माहीत) नसलेलं मूल म्हणूनच
वाढवणार आहेत, असं सांगितलं जातंय. अर्थात, हे खूप सोपं नसणारेय. जिथे
मुलग्यांचे कपडे निळे आणि मुलींचे गुलाबी असतात, जिथे शाळांमध्ये
प्रसाधनगृह/चेंजिंग रूम्स मुलगे व मुली अशा दोनच प्रकारच्या असतात, जिथे
मुलगे व मुलींची खेळणी वेगळी असतात, थोडं मोठं झाल्यावर मुलगे आणि मुली
खेळही वेगवेगळे खेळतात, किंवा त्यांनी तसे वेगळे खेळ खेळावेत अशी विभागणी
शाळाच करत असते, तिथे या मुलासाठी सगळं सोपं नसणारच. जेंडर, सेक्स आणि
सेक्शुअॅलिटी या तीन स्वतंत्र गोष्टी आहेत, असं मान्य करण्याकडे आता जगभरात
हळूहळू कल निर्माण होताेय. बेबी सिरिल अॅटलीच्या निमित्ताने वातावरण अधिक
मोकळं होईल, असं वेगळेपण स्वीकारण्याजोगी सकारात्मक परिस्थिती निर्माण
होईल, अशी चिन्हं दिसताहेत.
भारतातल्या परिस्थितीबाबत मात्र मोठं प्रश्नचिन्ह आहे. इतकंच.
भारतातल्या परिस्थितीबाबत मात्र मोठं प्रश्नचिन्ह आहे. इतकंच.
Comments
Post a Comment