रिपोर्टिंगचे दिवस

मी १९९१मध्ये मानसशास्त्र विषय घेऊन बीए झाले. पुढे काय करायचं ते काहीच ठरवलेलं नव्हतं. अभ्यास करायचा अतोनात कंटाळा होता म्हणून मी पुढे शिकणार नव्हते, मानसशास्त्रात एमए वगैरे तर नक्कीच नाही. मी एका ओळखीच्यांकडे नोकरी शोधायलाही गेले होते, त्यांचा संगणकाचा काहीतरी बिझनेस होता. पण नोकरी काही केली नाही आणि मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूट आॅफ करिअर एजुकेशन अँड डेव्हलपमेंटमध्ये पत्रकारितेतल्या डिप्लोमासाठी प्रवेशपरीक्षा दिली. ती परीक्षा नापास होण्याइतकी कठीण नव्हतीच. काॅलेज सुरू झालं. रोज संध्याकाळी सहा ते आठ आणि रविवारी सकाळी आठ ते ११ अशी साधारण लेक्चर्स असायची. आम्हाला शिकवायला उत्तम शिक्षक येत. म्हणजे कधीच एकाच लेक्चरसाठी एवढ्या लांब जाण्याचा कंटाळा नाही केला आम्ही कोणीच.

ई रामकुमार टाइम्स आॅफ इंडियात वृत्तसंपादक होते, ते आम्हाला एडिटिंग शिकवत. ते योग तज्ज्ञही होते. त्यामुळे टुणटुणीत होते. जीन्समध्ये खोचलेला टीशर्ट, पांढरेशुभ्र केस आणि घारे डोळे असे रामकुमार आमच्यासाठी पीटीआयच्या बातम्यांचे प्रिंट आणत, आॅफिसातल्या पीटीआयच्या यंत्रावर आलेल्या न्यूजफीडमधले. त्यामुळे आम्ही प्रत्यक्ष बातमी एडिट करायला शिकलो, डमी मॅटर नाही. ते आॅफिसातही फार कडक होते, अशा कथा नंतर ऐकल्या. असं म्हणत की, एखादं प्रेमपत्रही ते प्रूफरीड करतील आणि मगच पाठवू देतील.

आल्विन फर्नांडिस, टाइम्समधले चीफ रिपोर्टर, रिपोर्टिंग शिकवत. आल्विन थोडं नाकात बोलत, त्यांचा तो आवाज अजून कानात जशाच्या तसा ऐकू येतो. कुरळे केस आणि जाड चष्मा. प्रचंड प्रत्यक्ष अनुभव असल्याने त्यांच्या लेक्चरला कधीच कंटाळा येत नसे.

जागतिक घडामोडींबद्दल शिकवण्यासाठी कुमार केतकरांसारखा अत्यंत योग्य माणूस येई. आमच्या त्या क्लासमध्ये पंचवीसेक मुलं होतो, अनेक जण नोकरी करता करता शिकत होते. जय देशमुख आणि सवेरा सोमेश्वर आॅब्झर्वरमध्ये होते, श्रीकांत अलाहाबाद बँकेत होता, स्मिता खाजगी कंपनीत नोकरी करत होती. राखी झांगियानी नावाची एक लावण्यवती होती वर्गात, हुशारही होती खूप. त्या वर्गातले निम्म्याहून कमीच पत्रकारितेत आहेत, अनेक जण पीआरमध्ये काम करतायत. अनेकांशी संबंधही नंतर राहिला नाही. गंमत म्हणजे, माझं नाव तोपर्यंत तसं फार ऐकू यायचं नाही आणि या केवळ २५ जणांच्या वर्गात आम्ही दोघी मृण्मयी होतो. दुसरी बंगाली होती इतकंच.

आम्ही १९९२च्या जूनमध्ये पास झालो. ६ डिसेंबर १९९२ रोजी संध्याकाळी आमचं स्नेहसंमेलन होतं, आधीच्याही बॅचची मुलं आली होती. गरवारेच्या लाॅनवर आम्ही काही खेळत होतो. केतकर अाले ती बाबरी मशीद पाडल्याची बातमी घेऊनच. तेव्हा आम्हाला त्याचं महत्त्व फार लक्षात नाही आलं, म्हणजे त्याचे किती दूरगामी परिणाम होतील ते नाही कळालं. अर्थात नंतरच्या दंगली, बाॅम्बस्फोट या सगळ्याचे परिणाम आम्हा सर्वांवर झालेच.

डिप्लोमा मिळाला आणि मी द डेली या इंग्रजी वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून नोकरीला लागले. डेली एक टॅब्लाॅइड होतं, म्हणजे छोट्या आकाराचं वर्तमानपत्र, मिडडे किंवा आफ्टरनून असायचं तसं. परंतु, ते सकाळीच प्रसिद्ध व्हायचं. बातमी सनसनीखेज म्हणतात तशी प्रसिद्ध करण्याचा डेलीचा कल असे, परंतु बातमी चोख असावी लागायची. चार आण्याची कोंबडी आणि रुपयाचा मसाला असा प्रकार सहसा नसे. डेलीचं आॅफिस कुलाब्यात होतं, ससून डाॅक्सजवळ, एका माेडकळीला आलेल्या इमारतीत. इमारत धोकादायक असल्याची महापालिकेची नोटीसही त्यावर लावलेली होती. जिथेतिथे आधाराला लावलेले बांबू या नोटिशीवर शिक्कामोर्तब करत. आॅफिस तसं छोटंसं होतं. लक्ष्मण नावाचा टेलिफोन आॅपरेटर आम्हा सगळ्यांचा लाडका. कारण कोणालाही फोन लावायचा तर लक्ष्मणच आमचा आधार, तेव्हा मोबाइल तर नव्हतेच परंतु टेबलवरच्या फोनवरनंही बाहेर थेट फोन लावता येत नसे. मी त्याला लक्षुमण अशी खास मराठी ष्टाइलने हाक मारायची आणि आनंद वेंकटरामन हा क्रीडा डेस्कवरचा सहकारी माझी नक्कल करून मला हसायचा.

तेव्हा रिपोर्टरांच्या सकाळी मीटिंगा वगैरे फॅड नव्हतं आलं पेपरांच्या आॅफिसातनं. टीव्हीवरही वृत्तवाहिन्या २४ तास चालणाऱ्या नव्हत्याच. प्रत्येकाच्या घरातल्या लँडलाइनवर काय ती बातमी मिळायची शक्यता. एकदा घराबाहेर पडलं सकाळी की, थेट संध्याकाळी आॅफिसात पोचल्यावरच आॅफिसच्या कुणाचं काम असेल ते कळत असे. आम्ही वार्ताहर आपापली कामं करून संध्याकाळी आॅफिसात पोचायचो, बातमी बडवायला. अर्थात खुर्च्या, टाइपरायटर्स आणि वार्ताहर यांचं गणित कमीच जुळायचं. माझा जो टाइपरायटर होता, त्यावरची Q अक्षराची की खराब झालेली होती, त्यामुळे ती जोरात दाबावी लागे. आजही ते अक्षर टाइप करताना, संगणक वापरून वीस वर्षं झाली असली तरी, माझ्या डाव्या हाताची करंगळी जोरातच पडते.

मयंक भट हा माझा पहिला बाॅस. काळेपांढरे केस, ज्याला इंग्रजीत साॅल्ट न पेपर लुक म्हणतात, दाढी, आकडेबाज मिशा असणारा मयंक नेहमी खादीचा कुडता घालायचा. एकदा मला भेटायला आलेल्या एका व्यक्तीला मी "What is your good name?' असं विचारल्याचं त्याने ऐकलंन. ती व्यक्ती गेल्यानंतर मला म्हणाला, 'What is a bad name?' पुन्हा कधी मी हा प्रश्न कोणालाही विचारला नाही.

डेली हा तसा छोटा पेपर होता, त्याची पूर्वीची प्रतिष्ठा कमी नक्की झाली होती, पण पत शिल्लक होती. मला तेव्हा साडेतीन हजार रुपये पगार होता, तोही रोख मिळे. वयाची एकवीस वर्षंही पूर्ण नव्हती झाली मला, तेव्हा ते पैसे भरपूर वाटत. ते भरपूरच होते हे हल्ली लक्षात आलं. माझा एक सहकारी २००३मध्ये लोकसत्तात होता, तेव्हा त्याला याच्यापेक्षा कमी पगार होता असं तो म्हणाला तेव्हा माझ्या लक्ष्यात आलं की, इंग्रजी व मराठी पेपरांतली कामाची पद्धतच वेगळी असं नव्हे, तर पगारातही प्रचंड दरी होती, जी अजूनही काही अंशी आहेच.

मी तिथे लागले आणि अामचा मंत्रालय कव्हर करणारा वार्ताहर सोडून गेला. मग महानगरपािलका कव्हर करणाऱ्याचं तिथे प्रमोशन झालं. डेली हा मुंबईचा पेपर होता, त्यामुळे स्थानिक राजकारण अतिशय महत्त्वाचं होतं. त्या काळात महानगरपालिकेचं कामकाज बऱ्यापैकी शिस्तीत चाले, सर्व वृत्तपत्रांमध्ये हाउस, म्हणजे सर्वसाधारण सभेच्या व सर्व समिती बैठकांच्या सविस्तर बातम्या येत. सर्व मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी व उर्दू वृत्तपत्रांचे पत्रकार पालिका कव्हर करत. चंद्रकांत हंडोरे, आर. आर. सिंह, रा.ता. कदम (यांचा मुलगा मागच्या पालिका निवडणुकीत उभा होता.) आणि निर्मला सामंत प्रभावळकर या महापौरांच्या काळात मी अधनंमधनं पालिका बीट केला. तेव्हा रामदास नायक नगरसेवक होते, ज्यांची नंतर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कुख्यात गुंड अश्विन नाईकची पत्नी नीता नाईक नगरसेविका होती, अतिशय टापटीप असायची, इंग्रजी उत्तम बोलायची. ती मूळ गुजराती होती. मराठी नगरसेवकांची संख्या जास्त होती तेव्हा. साधारण याच काळात गो. रा. खैरनार या महापालिकेच्या उपायुक्तांनी अनधिकृत बांधकामं पाडून टाकण्याचा जोरदार रेटा लावलेला होता. एकुणात बातम्यांचा तोटा नव्हता, आणि सर्व पेपर या बातम्यांना न्याय देत.

मी डेलीत असतानाची अनेक महत्त्वाची घटितं वाचकांच्या लक्षात असतील, ती मुंबईच नव्हे तर संपूर्ण देशाच्या दृष्टीने लक्षणीय होती. ६ डिसेंबर १९९२ बाबरी मशीद पाडण्यात आली. ९३च्या जानेवारीत जातीय दंगली झाल्या. मार्चमध्ये मुंबईला हादरवून टाकणारे बाॅम्बस्फोट झाले. आणि सप्टेंबरात लातूरला भूकंप झाला. ९२ किंवा ९३च्या आॅक्टोबरमध्ये मुंबईत एका लोकलच्या डब्यात आग लागल्याच्या अफवेने किंवा प्रत्यक्ष धूर दिसल्याने अनेक महिलांनी चालत्या लोकलमधनं उड्या मारल्या आणि जीव गमावला. आमच्या समोरच्या इमारतीत राहणारी एक मुलगी त्यात मरण पावली.

मी या काळात नवशिकी होते, त्यामुळे दंगली वा बाॅम्बस्फोटांचे थेट वृत्तांकन मी केलं नाही. पण त्या सगळ्याचा परिणाम तेव्हा पालिका, मंत्रालय यांच्या कामकाजावर झालाच होता. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होत, घडामोडींचं राजकारण होई. डेलीतील क्राइम रिपोर्टर्स भारी होते तेव्हा. प्रणती मेहरा, हरीश नांबियार, रेनी अब्राहम, वगैरे. बलजीत परमार हा अनेक वर्षांपासून डेलीत होता. क्राइम रिपोर्टिंगमधला मुरलेला खेळाडू. केस कायम मिल्ट्री कट. एका डोळ्यात काहीतरी प्राॅब्लेम होता त्याच्या, त्यामुळे तो डोळा झाकलेला किंवा सतत गाॅगल. मला तर तो थेट हिंदी चित्रपटाच्या पडद्यावरून आॅफिसात आलेला व्हिलन वाटायचा. अर्थात, तो व्हिलन नव्हताच प्रत्यक्षात. त्याचं पंजाबी स्टाइलचं बोलणं (उदा. स्ट्रँडला तो सट्रँड म्हणे) ऐकायला मजा वाटायची. तो तेव्हा थेट दाऊद वगैरे "मंजे हुए खिलाडिओं के साथ' टेलिफोनवर बोलून बातम्या करायचा. आम्हाला कोणालाही बातमी दुसऱ्या दिवशी छापून यायच्या आधी ठाऊक नसायची. फक्त चीफ रिपोर्टर आणि न्यूज एडिटरनाच ती ठाऊक असायची. आम्ही घरी गेलो की रात्री तो ती टाइप करायचा. कारण बातमी बाहेर जाईल आणि एक्सक्लुजिव्ह राहणार नाही, अशी भीती त्याला वाटायची.

मार्च बाॅम्बस्फोटांनंतर तत्कालीन पोलीस उपायुक्त राकेश मारिया एकदम हिरो झाले. (ऐकीव माहिती : राकेश मारिया पंजाबी ख्रिश्चन आहेत, त्यांच्या नावावरून अंदाज येत नाही. त्यामुळे या हिंदू मुस्लिम जातीय तेढीच्या पार्श्वभूमीवर त्यांना काम करणं काहीसं सोपं गेलं, असं म्हणतात.) डेलीमध्ये त्या काळात अनेक ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध झाल्या. इतर मोठे पेपर त्या फाॅलो करत. डेली हा मुंबईस्थित पेपर असल्याने मुंबईत घडलेल्या या मोठ्या घटनांचा पेपरला बराच फायदा झाला.

बाॅम्बस्फोटांनंतर एकदोन दिवस लोकलही बंद होत्या. कुलाब्याहून बोरिवलीतलं घर गाठणं अशक्य होतं. हरीशची एक मैत्रीण कुलाब्यातच माविमच्या वसतिगृहात राहात होती. तिथे काही जुजबी पैसे भरून एका रात्रीसाठी राहायची सोय केली. मी तोवर कधीच वसतिगृहात राहिले नव्हते, त्यामुळे मला धमाल आली तिथे. लोकल काही प्रमाणात सुरू झाल्या, त्या दिवशी मी प्रणतीच्या वांद्र्यातल्या घरी राहायला गेले, कारण ते अंतर कमी होतं. तिच्या वहिनीने दुसऱ्या दिवशी दिलेले, भरपूर बटर लावलेले टोस्ट अजून आठवतात मला. त्याच काळात एक दिवस खूप उशिरा घरी निघाले. रेनी मला सोडायला सोबत आला. पण आम्ही घरी पोचेपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती आणि लोकल बंद झाल्या होत्या. मग तोही आमच्याकडे राहिला. नुकताच भेटला होता अनेक वर्षांनी, त्याला तेव्हा घरी खाल्लेली पुरणपोळी आठवत होती. कदाचित त्या सुमारास होळी असेल म्हणून असावी.

डेलीमध्ये मराठीजन फार कमी होतो आम्ही. लक्षुमणबद्दल मी लिहिलंच आहे. शुभांगी खापरे राजकीय वार्तांकन करायची, ती मूळची नागपूरची होती पण मराठी कमीच बोलायची. प्रणती, मयंक, रेनी, हरीश यांना मराठी समजायचं. प्रणती बोलतेही चांगलं. सॅबी, आमचा फोटोग्राफरही मराठी चांगलं बोलायचा. फोटोग्राफर ही जमातच जगन्मित्र असते तशी, समोरच्याला समजेल ती भाषा ते बोलू शकतात किंवा त्या व्यक्तीपर्यंत आपलं म्हणणं सहजी पोचवू शकतात. मी अनेक देशीविदेशी फोटोग्राफरसोबत काम केलंय, त्यामुळे हे अनुभवांवरनं सांगू शकते.

तेव्हा बहुतांश इंग्रजी पेपरांत मंत्रालय आणि महापालिका कव्हर करणारे रिपोर्टर मराठीच असत, जे अमराठी होते त्यांना मराठी समजत असे व्यवस्थित. अगदी कागदपत्रांचा स्पष्ट अर्थ कळत नसेल त्यांना, पण चालू असणाऱ्या कामकाजाचा, पत्रकार परिषदांमध्ये बोललं जाई त्याचा अर्थ लावून बातमी लिहिता येत असेच. आणि मदत करायला आम्ही मराठी रिपोर्टर्स तयार असूच. बहुतेक अमराठी रिपोर्टर मुंबईकर होते, त्यामुळे शाळेत मराठी शिकलेले होते, त्याचा हा परिणाम असावा.

डेलीच्या आॅफिसच्या रस्त्यावर, रिगल सिनेमाच्या समोर शिल्पी केंद्र होतं, तिथे उत्तमोत्तम प्रदर्शनं लागायची, वेगवेगळ्या राज्यांच्या हातमाग कापडांची. आॅफिसला जातायेता त्याच्या जाहिराती दिसायच्या. मग दुसऱ्या दिवशी बसमधनं रिगलच्या स्टाॅपला उतरून प्रदर्शनात डोकावायचं, हा नित्यक्रम. मी, प्रणती, गीता शेषू यांनी बरीच खरेदी तिथे केली आहे. आॅफिसजवळ एक रेस्तराँ होतं, जिथनं आम्ही खायला मागवायचो, पण ते काळं की गोरं पाह्यलेलं नव्हतं. तिथली स्पेशॅलिटी होती मैसूर मसाला दोसा, याला आतनं लावलेली चटणी हिरवी असायची, इतर सगळीकडे ती लाल असते. सँडविच हा दुसरा पर्याय संध्याकाळच्या भुकेसाठी. बाकी आॅफिसात फक्त चहा मिळे.

त्या काळात आझाद मैदानात हँडलूम एक्स्पो लागायचं. नव्वदच्या दशकाच्या शेवटी बहुधा आझाद मैदानात प्रदर्शनं लावणं बंद झालं. मी टाइम्समध्ये असतानाही एक्स्पो लागलं की, तिथे अनेक फेऱ्या व्हायच्या. फॅशन स्ट्रीटचा तेव्हा जलवा होता. किंवा एनजीएमएच्या समोर छान कपडे मिळायचे, अर्थात रस्त्यावर. मला आठवतं तेव्हा ५० रुपयांना शर्ट मिळायचे, पांढऱ्या शर्टांना खूप मागणी होती त्यामुळे ते महाग असायचे जरा. माझे तिथे घेतलेले दोन शर्ट अजून आठवतात मला, फार आवडीचे होते ते.

मी डिसेंबर ९३मध्ये डेली सोडलं आणि जानेवारी १९९४मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये उपसंपादक म्हणून लागले. तेव्हा कुमार केतकर संपादक म्हणून आलेले होते, पण काही काळ गोविंद तळवलकरही होते. दीडेक वर्ष म.टा.त डेस्कवर काम केल्यानंतर मी तिसऱ्या मजल्यावर टैम्साफिंडियात रिपोर्टर म्हणून रुजू झाले. (रच्याकने, डेलीतून म.टा.त गेल्यावर पगार सणसणीत वाढला होता, टाइम्स ग्रूप आॅडिट ब्यूरो आॅफ सर्क्युलेशनच्या अ श्रेणीत असल्याने.)

टाइम्स आणि म.टा. एकाच कंपनीची लेकरं असली तरी सावत्र भावंडं असल्यासारखं वाटायचं. म.टा.चं कार्यालय एसीही नव्हतं, एक बाबा आदमच्या जमान्यातला भलामोठा पंखा गरगर फिरत असे अनेक वर्षं. टाइम्सचं आॅफिस मी तिथे गेले तेव्हा वातानुकूलित होतंच, टाइपरायटर जाऊन संगणकही आलेले होते. टाइपरायटरवर मी कदाचित काही दिवस काम केलंही असेन, कारण बातमी करण्याच्या आठवणी आहेत. टाइप करताना टाइपरायटरमध्ये तीन कागद, त्यांच्या मध्ये दोन कार्बन घालायचे. बातमी झाली की एक काॅपी स्वत:कडे ठेवायची, एक न्यूज एडिटरला द्यायची, एक चीफ रिपोर्टरला. या दोघांनी बातमीची चिरफाड केली की, त्यानुसार ती बदलून फायनल काॅपी पुन्हा टाइप करून सबमिट करायची. संगणक आले तेव्हा ते शिकायला मजा यायची. माझं लाॅगिन नेम होतं mrin. ते मला जे चिकटलं ते आजही तसंच आहे. एकतर टाइम्समधल्या अमराठी लोकांना मृण्मयी उच्चारायचे वांदे होते, म्रिन्मायी असं काहीतरी ते म्हणायचे. त्यामुळे म्रिन सोपं झालं.

दीना वकील टाइम्सच्या मुंबई आवृत्तीची संपादक होती. अत्यंत गोरीपान व देखणी दीना उत्तम साड्या नेसत असे, दिसायला साध्या पण किमती. तिच्या पारशी नाकावरचा बारीक रिमचा चष्मा आठवतो मला. तिची गणपतीवर भक्ती होती, अनेक पारशांची असते तशी. तिच्या केबिनमध्ये शंभरेक गणपती असतील वेगवेगळे, लहानमोठे. दीना आणि चीफ फोटोग्राफर होशी जाल यांच्यातली वादावादी अख्ख्या न्यूजरूमचं मनोरंजन करायची. एखादा फोटो कुठे घ्यायचा, किती मोठा घ्यायचा आणि कॅप्शन काय द्यायची हे वादाचे मुद्दे. होशीच अनेकदा जिंकायचा अर्थात.

टाइम्समध्ये तेव्हा अनेक मराठी लोक होते. विद्याधर दाते, दिलीप चावरे, मिलिंद कोकजे, संजय रानडे, अंबरीश मिश्र, मुक्ता आणि राधा राजाध्यक्ष, राजीव वाघ, प्रियांका काकोडकर, वगैरे. राधा आणि मुक्ता संपादकीय पानाचं, रविवार पुरवणीचं काम करायच्या. डेस्कवर माझ्या अंदाजाने मराठी कोणी नव्हतं.

टाइम्समधल्या सोयीसुविधांबद्दलही लिहायलाच हवं. तिथे म.टा.च्या तुलनेत सोयी अधिक होत्याच, उदा. प्रत्येकाला संगणक, दर दोन रिपोर्टर्समागे एक फोन होता. कँटीनमधनंही म.टा.त संध्याकाळी मार्गरिन लावलेला ब्रेड येई तर टाइम्समध्ये त्यात काकडीच्या काही चकत्याही असत. टाइम्सच्या आॅफिसला खिडक्या होत्या, ज्यातनं व्हीटी स्टेशनचा नजारा आणि वाहता डीएन रोड दिसे. म.टा.च्या आॅफिसला एकही खिडकी नव्हती, बाहेर ऊन पडलंय की पाऊस कोसळतोय याचा अंदाज येणं अशक्य होतं. पण मला आवडणाऱ्या आणि महत्त्वाच्या वाटणाऱ्या दोन गोष्टी होत्या तिथे. एक म्हणजे रात्रपाळी केल्यानंतर घरी न जाणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी झोपायची उत्तम खोली होती. तेव्हा पेपर झोपी जाण्याची वेळ रात्री दीड असायची, म्हणजे एडिशन ११.३०ला गेली तरी दीडपर्यंत घडणाऱ्या एखाद्या तितक्याच महत्त्वाच्या घटनेलाही दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या पानावर जागा मिळू शकत असे. आता बहुतेक पेपरांमध्ये साडेअकराला शिफ्टच संपते. आणि ती संपल्यावरही अनेक कंपन्या होम ड्राॅपची सोय करतात. टाइम्स इमारतीत असलेल्या म.टा., इकाॅनाॅमिक टाइम्स, टाइम्स आॅफ इंडिया आणि नवभारत टाइम्समधल्या महिलांसाठी ही सोय होती. नभाटामध्ये महिला डेस्कवर नाइट करायच्या नाहीत बहुधा. पण मी म.टा.त डेस्कवर होते तेव्हा अनेक आठवडे रात्री आठ ते दीड अशी ड्यूटी करून आमच्या या खोलीत निवांत झोप काढलेली आहे. एकदा तर मी साडेआठनंतर जागी झाले. फ्रेश होऊन निघाले तर नऊच्या ठोक्याला साक्षात आर.के. लक्ष्मण दारात दिसले होते. (पुरुषांसाठी मात्र अशी खोली नव्हती. म.टा.तले माझे डेस्कवरचे पुरुष सहकारी खुर्च्या एकमेकींना जोडून त्यावर उशा ठेवून वा टेबलांवर पुठ्ठे पसरून चादर घालून झोपत, अर्थात ते पहाटे ट्रेन सुरू झाल्या की घरी जाऊन उरलेली झोप पूर्ण करू शकत.)

दुसरी महत्त्वाची सुविधा म्हणजे अनेक पेपर वाचण्यासाठी केलेले स्टँड. एका लांबलचक भिंतीला मुंबईतले सगळे इंग्रजी पेपर प्रत्येकाची स्वतंत्र फाइल करून लावलेले असत, उभं राहून त्या महिन्यातला कोणताही पेपर सहज वाचता येत असे. बाकी टाइम्सचा संदर्भ विभाग तर अफलातून होता. गूगल नसेल किंवा संगणकच नसतील तर आपण कोणताही संदर्भ कसा शोधू याची कल्पना करण्यासाठी तरुण पत्रकारांना थोडा बुद्धीला ताण द्यावा लागेल. त्यावर उत्तर होतं आमचा नेहमी मदतीस तयार, हसतमुख संदर्भ विभाग.

म.टा.त अवतीभवती आणि टाइम्समध्ये सिटीलाइट्स ही अशी सदरं होती, ज्यात मुंबई परिसरातल्या गंमतीजमती लिहिता येत. अशा गंमती ज्यांच्या बातम्या होत नसत, पण त्यातनं माणूसकीचं दर्शन होई वा मुंबई शहराचा एखादा पैलू समोर येईल. सिटीलाइट्सच्या एका आयटमचे ७५ रुपये मिळत, म.टा.त अवतीभवतीचे ५०. व्हाउचर केलं की दोन दिवसांत रोख हातात. बच्ची करकारियाचा मुलगा उर्वक्ष एकदोन महिने इंटर्न म्हणून आला होता. तेव्हा त्याने फॅशन स्ट्रीटवर पायजमा खरेदी केला, ५० रुपयांना. त्याच्यावर त्याने मस्त खुसखुशीत सिटीलाइट लिहिलं आणि पायजम्याचे पैसे वसूल केले. आम्ही त्याला फार चिडवलं होतं त्यावरनं.

एकदा करिष्मा कपूरचं फिल्मफेअरच्या कव्हरसाठी फोटो शूट करायचं होतं. शनिवार सकाळ असावी बहुधा. तिने पांढरा शर्ट आणि जीन्स घातली होती. वीसबावीस वर्षांपूर्वीची करिष्मा डोळ्यांसमोर आणा, ती अतिशय फाॅर्मात होती तेव्हा. वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या पार्श्वभूमीवर तिचे फोटो काढायचे होते. आणि पांढरा शर्ट घातलेले काही पुरुष त्यांना हवे होते, कशाला ते आठवत नाही. इतकं नक्की आठवतं की, मिस्टर दातेंनी (त्यांना अख्खं जग मिस्टर दातेच म्हणायचं.) पांढरा शर्ट घातला होता, आणि करिष्माचे काही फोटो त्यांच्यासोबतही काढले गेले. आम्ही त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखूनही त्यांना खूप चिडवलं होतं.

टाइम्सला मी रिपोर्टर म्हणून काम सुरू केलं. विद्युत (power) आणि वाहतूक (Transport) असे साधारण बीट माझ्याकडे होते. या दोन्हीमधलं धोरणं, आर्थिक उलाढाली, गुंतवणूक वगैरे फार बातम्या मी केल्या नाहीत, कारण बिझनेेस डेस्कवरचे रिपोर्टर ते काम करत. तो काळ मुंबईकरांची उपनगरी रेल्वे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून परीक्षा पाहणारा होता. ओव्हरहेड वायर तुटणे, रुळाला तडा जाणे, पाणी तुंबणे आदि कारणांमुळे लोकल बंद पडणे, विस्कळित होणे हे प्रकार नित्यनेमाने घडत. त्यामुळे बातम्यांना तोटा नव्हता. तसंच वीजपुरवठा बंद पडण्याचं प्रमाणही बरंच होतं. तेव्हा मुंबईत शहर विभागात टाटाची वीज होती तर उपनगरांमध्ये बीएसईएस कंपनी वीजपुरवठा करत असे. शहर विभागात अगदी थोड्या प्रमाणात बेस्टचाही सहभाग होता. १९९७च्या मेमध्ये संध्याकाळच्या सुमारास संपूर्ण शहरातला वीजपुरवठा खंडित झाला. काहीतरी मोठा बिघाड झाला होता. त्यामुळे लोकलही बंद होत्या. मला आठवतंय, त्या दिवशी मी प्रियांका काकोडकरच्या घरी राहिले होते. ती मंत्रालयाजवळ राहायची तेव्हा. तेव्हापासून बीएसईएसचे जनसंपर्क अधिकारी विवेक देवस्थळी यांच्याशी ओळख.

१९९६मध्ये कधीतरी कोकण रेल्वेचा वीर-खेड सेक्शन खुला झाला. मला त्या उद्घाटनाला जायची संधी मिळाली. इकाॅनाॅमिक टाइम्सचा रिपोर्टर संतोष मेनन सोबत होता. आम्ही मोटरने गेलो, बहुधा ट्रेनने थोडा प्रवास केला. खेड स्थानक पाहून मी मोहून गेले होते. रेल्वे स्थानकात उभं राहिलं की समोर डोंगर. अगदी जवळ. मग, १९९७च्या एप्रिलमध्ये मी आजोळी रत्नागिरीला गेले, रेल्वेने. नुकतीच रत्नागिरीपर्यंत जाऊ लागली होती ट्रेन तेव्हा. तो प्रवास अविस्मरणीय वगैरेच होता थेट. तोपर्यंत आजोळी जायचं म्हणजे ट्रेन, एसटी, पुन्हा एसटी, तर (छोटी होडी), एसटी आणि चालणं इतका प्रवास असायचा. त्यातला दुसऱ्या एसटीचा प्रवास या ट्रेनमुळे वाचला होता. ट्रेनमधले प्रवासी बहुतेक पहिलटकर होते. कोणी तिकीट सांभाळून घरी ठेवून तिकिटाची फोटोकाॅपी आणली होती, तर कोणी वरच्या बर्थवर चढायला घाबरत होते. एका कुटुंबाला सलग बर्थ न मिळाल्याने टीसीशी भांडत होते की, त्याने पैसे खाऊन दुसऱ्या कोणाला तरी त्यांचे बर्थ दिले म्हणून. टीसीही अगदी तरुण, नुकतेच नोकरीला लागलेले. त्यांनाही प्रवासाची सवय नव्हती, प्रवाशांना तर नव्हतीच. ट्रेन जाताना आजूबाजूला लोक उभे राहून अचंबित होऊन पाहातही होते. मजा वाटत होती या सगळ्याची, प्रवासी म्हणून आणि पत्रकार म्हणूनही. परतीच्या प्रवासात कोकणातून मुंबईला येणाऱ्या एसटीची कळा गाडीला आली होती. फणस, आंबे, सुपं, केरसुण्या, काय वाट्टेल ते. मी त्यावर येऊन जो रिपोर्ट लिहिला तो फारच आवडला होता वाचकांना.

एका शनिवारी मी अकरा साडेअकराच्या सुमारास आॅफिसात पोचले असेन. शनिवारी फार काम नसायचं कारण रविवारी वेगळ्या बातम्या असायच्या, फीचरसारख्या. माझ्यासाठी फिजिकल कम्फर्ट अतिशय महत्त्वाची, म्हणजे कपडे, चपला, बॅग या सगळ्याचा कमीत कमी त्रास कसा होईल याकडे माझं खास लक्ष असतं. त्यामुळे अजूनही या गोष्टी दिवसभरात काय उद्योग करायचेत यावर अवलंबून असतात. तर त्या शनिवारी काम नसेल या अपेक्षेने उंच टाचेचे बूट घालून मी गेले होते, जे एरवी मी वापरत नसे. आॅफिसात पोचल्यावर काही वेळातच फोन आला की, माटुंग्याला रुइया महाविद्यालयाच्या नाक्याजवळ कचऱ्याच्या एका ट्रकने एकदोन शाळकरी मुलांना उडवलंय आणि खूप लोक जमलेत, जमाव हिंसक होतोय, वगैरे. मी आणि श्रीराम वेर्णेकर बहुधा आम्ही तिथे पोचलो, तर नाक्याजवळचा परिसर हजारो माणसांनी भरून गेला होता. तिथे यापूर्वीही कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकचे असे अपघात झालेले होते वा जेमतेम टळले होते, तिथे झेब्रा क्राॅसिंग हवं अशी स्थानिकांची मागणी होती. श्रीरामला फोटो काढणंही अशक्य होऊन गेलं कारण जमावातल्या लोकांनी एका फोटोग्राफरचा कॅमेरा हिसकावून घेतला होता. तीनचार तास परिस्थिती जैसे थे होती. जमाव हलत नव्हता. माझ्या बुटांमुळे उभं राहून पायाचे तुकडे झाले होते. ते फेकून द्यावेसे वाटत होते, पण शक्य नव्हतं. मला आठवतंय, मी त्या परिसरातल्या एका घराचं दार वाजवून टाॅयलेटला जाऊ देण्याची विनंती केली होती. माझ्या नशिबाने टाइम्सच्या आयकार्डने ते काम सोपं केलं. या घटनेनंतर खूप फाॅलोअप बातम्या झाल्या. कचरा नेणाऱ्या गाड्यांची परमिट, त्यात किती कचरा असतो, कंत्राटदार कसं फसवतात, गाड्या किती जुन्या आहेत, वाहतूक पोलिसांनी काय करायला हवं, वगैरे.

कम्फर्टवरनं आणखी एक किस्सा आठवला. १५ आॅगस्ट होता. बाहेर फिरून करावं लागेल असं काम नसणार होतं कारण सगळीच कार्यालयं बंद असतात त्या दिवशी. म्हणून मी साडी नेसून गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास फोन आला की, पालघर/डहाणू भागातल्या काही शाळकरी मुलांना सकाळी ध्वजवंदनानंतर वाटलेल्या मिठाईतून विषबाधा झालीय आणि काही गंभीर मुलांना सायन हाॅस्पिटलला आणण्यात येतंय. मी आणि आमचा चीफ फोटोग्राफर होशी जाल बाइकवरनं सायनला पोचलो. आणखीही रिपोर्टर तिथे आलेच होते. आम्ही सगळे गप्पा मारत, त्या मुलांची वाट पाहात होतो. प्रसंग गंभीर होता, आणि मला कुठून साडी नेसलोय असं झालं होतं. प्राणाची झुंज देणाऱ्या मुलांच्या पालकांशी असं सजल्याधजल्या अवस्थेत बोलणं कठीण गेलं असतं, असं मला वाटत होतं. पण नशिबाने मुलांना सायनला आणण्याची वेळ आली नाही, त्यांची प्रकृती सुधारली होती.

एकदा वाडीबंदरच्या रेल्वेच्या भिंतीला एका ट्रकने धडक देऊन ती भिंत फोडून तो आत जाऊन कशावर आदळल्याचा फोन आला. पुन्हा होशी आणि मी निघालो. जीटी हाॅस्पिटलच्या रस्त्याने निघालो तर ट्रॅफिक जॅम, पुढे हलणं शक्य नव्हतं. होशी ऐकणाऱ्यातला नव्हेच, त्याने त्याची बाइक फुटपाथवर चढवली आणि आम्ही तिथे पोचलो, फुल फिल्मी इष्टाइल.

टाइम्समध्ये तेव्हा एक डे ड्यूटी असायची. आणि एक नाइट. दोन्हीत साधारण सारखीच कामं असायची. डेला आलं की, पोलीस, अग्निशमन दल यांच्या नियंत्रण कक्षाला फोन करायचा, आज काय विशेष असा प्रश्न विचारायचा, हे मुख्य काम. कधी फार लक्षणीय काही घडलं असेल, म्हणजे मोठी चोरी, खून, अपघात, एखाद्या खास व्यक्तीला अटक, तर फोनवरनं माहिती मिळे. नाहीतर पोलीस प्रेस नोट फॅक्सने यायची. या प्रेस नोटची भाषा विलक्षण असे. म्हणजे एखाद्या मोठ्या प्रसिद्ध व्यक्तीला अटक झाली असेल किंवा अपघाती मृत्यू झाला असेल तरी प्रेस नोटमध्ये उदा. क्षयज्ञ, हिंदू, पुरुष, ५० अशीच त्याविषयीच्या माहितीची सुरुवात व्हायची. "मोठा असेल त्याच्या घरी, आमच्या दृष्टीने अमुकअमुक'. टाइपरायटरवर टाइप केलेली प्रेसनोट, तीही फॅक्सने येणार. त्यामुळे ती वाचणं ही एक परीक्षाच असे. वरताण म्हणजे प्रेसनोटची भाषा कळायला सरकारी मराठीचं विशेष ज्ञान आवश्यक होतं. शाळेत तिसरा विषय म्हणूनही मराठी न शिकलेल्या रिपोर्टरांची अशा वेळी फार पंचाईत व्हायची. तसेही रिपोर्टर होतेच की टाइम्समध्ये. उदा. रेखा बोर्गोहाइन, ती दिल्ली/लखनऊत शिकलेली. तिला मराठीचा गंधही नव्हता. आणि शाळेत शिकलेल्या मराठीचा उपयोग पोलीस प्रेस नोट समजण्यासाठी होणं अंमळ अवघडच होतं. मग मी त्यांची हमखास मदतीला धावून जाणारी भाषांतरकार होते.

अग्निशमन दलाला फोन केला की आगीची बातमी असल्यास किती नंबर आग असं विचारत असू. एक नंबर आग म्हणजे भयंकर, खूप मोठी. मग बातमी पक्की. नाइट असली की हे सगळे फोन असायचेच, पण एक विशेष फोन असायचा तो हवामान खात्याला. तापमान विचारायला. आणि पावसाळ्यात पावसाची आकडेवारी. उद्या किती पाऊस पडणार, मच्छिमारांसाठी इशारा, वगैरेही कळायचं. वाचकांना हे वाचायला अतिशय आवडायचं. एखाद्या दिवशी काहीतरी चुकलं वा डेस्कच्या चुकीने आदल्या दिवशीचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला तर अनेक वाचकांचे फोन यायचे. नंतर नंतर हवामान खातंही वेदर रिपोर्ट फॅक्स करायला लागलं. आता बहुधा त्यांच्या वेबसाइटवरनं घेत असतील माहिती. पण त्या रोजच्या फोनमुळे आमची तिथल्या कर्मचाऱ्यांशी ओळखही व्हायची, कधी बातमी करायची तर त्यांना आमची नावं ओळखीची असत. सगळ्या पेपरातले नाइटचे रिपोर्टर त्यांना फोन करत असत वेदर रिपोर्टसाठी, त्यांना कधी कंटाळाही येत असेल तेच तेच सांगायचा, असं आता वाटतं. कधी फोन फार वेळ एंगेज्ड लागला तर मग आम्ही इतरांकडून माहिती घेत असू. पोलिसांकडूनही एखाद्या अपघाताची वा खुनाची माहिती कळली तर इतर पेपरांतल्या नाइटवाल्या रिपोर्टरला देत असू, तितकी दोस्ती आमची सगळ्यांची होतीच. एक्सक्लुजिव्ह बातमी सोडून इतर रूटीन बातम्या सहज एकमेकांना दिल्या जात. आणि आॅफिसातले फोन हे संवादाचं एकमेव माध्यम होतं. नाहीतरी अर्थात थेट भेट.

मिस्टर पालन ड्यूटी लावायचे. संडे डे ड्यूटी करायला फार वैताग यायचा. संडे नाइट परवडायची, दिवसभर रविवार साजरा करून संध्याकाळी आॅफिसला पोचता यायचं. आठवड्याची नाइट असेल तर मला वाटतं, दोन दिवस आॅफ मिळायचा. म्हणजे रविवार आणि सोमवार. शिवाय टॅक्सी भाड्याचं व्हाउचरही मिळायचं. त्यामुळे नाइट करायला कंटाळा येत नसे. व्हाउचरचे पैसे रोख मिळत, तेही महत्त्वाचं होतं. कारण तेव्हा पगार चेकने मिळे. एटीएम नव्हतीच, त्यामुळे पैसे हातात हवे असतील तर बँकेतच जावं लागे.

व्हाउचरच्या गंमतीजमती फार ऐकल्या आहेत टाइम्समधल्या. एक ज्येष्ठ फोटोग्राफर होते. फाउंटन किंवा कुलाबा अशी असाइनमेंट लागली की, ते जाण्याच्या आधीच टॅक्सीचं व्हाउचर देत. एक विशिष्ट शिपाई होता, तो ते व्हाउचर फायनान्समध्ये नेऊन रोख घेऊन फोटोग्राफर असाइनमेंटहून परत आल्याआल्या त्यांच्या हातात द्यायचा. अशी ऐष इतरत्र कुठे नसावी बहुतेक.

टाइम्समधलं पर्सोनेल खातं खूप चांगलं होतं. तेव्हा त्याचं एचआर असं बारसं व्हायचं होतं. रजा भरपूर होत्या, पण मस्टरमध्ये अफरातफरीला वाव नसायचा. दुसऱ्या मजल्यावर, म.टा.च्या आॅफिससमोर डिस्पेन्सरी होती. तिथे सकाळी दोन तास डाॅक्टर येत. दिवसभर कंपाउंडर असायचाच. एक छोटा पलंगही होता बहुतेक, बरं वाटत नसेल तर तासभर आराम करता येणं शक्य होतं. रक्तदाब वगैरे तपासता यायचा. जुजबी औषधं सहज उपलब्ध व्हायची. ही सोय मला अतिशय आवश्यक व महत्त्वाची वाटते. आज किती आॅफिसांमध्ये अशी सोय उपलब्ध असते, वृत्तपत्रं वा इतर, कल्पना नाही.

टाइम्समध्ये मी अडीच वर्षं होते जवळपास, थोडी कमीच. मग मी पुन्हा म.टा.त गेले. या अनुभवांवर मी लिहिलेलं इथे वाचता येईल. तिथे पाचसहा वर्षं काम करून मी वर्षभर ब्रेक घेतला. मग नवशक्तीत गेले. तिकडे वर्षभर नोकरी केली. नवशक्ती हा फ्री प्रेस जर्नल या प्रतिष्ठित समूहाचा मराठी पेपर. मराठी पत्रकारांची शाळाच जणू. परंतु गेल्या काही वर्षात ही प्रतिष्ठा कमी झालेली. आॅफिस नरीमन पाॅइंटला, अगदी समुद्राला लागूनची बिल्डिंग, फ्री प्रेस हाउस. पण बडा घर पोकळ वासा. सतत बंद पडणारे संगणक, अस्वच्छ आॅफिस, मनसोक्त भटकणारे उंदीर, सार्वजनिक शौचालय परवडलं असं प्रसाधनगृह. शेजारीच फ्री प्रेसचं आॅफिस होतं, तेही फार बरं नव्हतं. नवशक्तीतल्या रंगबिरंगी आडनावांची तेव्हा चर्चा होई. निळे, जांभळे, काळे, गोरे, असे अनेक रंग एकसमयावच्छेदेकरून तिथे गुण्यागोविंदाने नांदत होते. तिथे मी मुंबईच्या बातम्या तपासणे आणि पान लावणे असं काम करायचे. संध्याकाळी ५ ते ११ ड्यूटी. ११ म्हणजे ११. १०.३०ला पान लागल्यावर निघालं तरी भुवया वर व्हायच्या. तेव्हा व्हीटीहून १०.४७ की अशीच काहीतरी फास्ट लोकल होती, शेवटची. आता त्यानंतरही असते एक बहुधा. ती पकडायसाठी माझी धावपळ असायची. कारण स्लो ट्रेनने ११.३० वाजून जायचे घरी पोचायला. त्यात १०.३०च्या सुमारास टॅक्सी मिळत नसे पटकन. म.टा.त असतानाही मी मुंबईचं पान लावायचे, पण इथे वेगळे लोक होते पान लावायला. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून राहावं लागे. त्यांच्या कलानुसार पान होई. इतक्या वर्षात कधी नव्हता आला तो हॅरॅसमेंटचा अनुभव इथे मला आला. अनेक दिवस माझ्या संगणकाच्या होमपेजवर अश्लील व्हिडिओ डकवलेला असे. त्याची तक्रार करून काही होईल अशी अपेक्षाही नव्हती. कोण करत असेल याचा अंदाज होता, पण पुरावा नव्हता. त्यामुळे मी गप्प बसले.

आम्ही जेवायचो साडेआठला ती पंधरावीस मिनिटं मजेत जायची. सगळे एकत्र जेवायचो, त्यामुळे वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळायचे. दीपक परब होते, ते अनेकदा आंबोळ्या नि काळ्या वाटाण्याचं सांबार आणत. किंवा चिकन, मासे, वगैरे. अमिता दरेकर काही काळ सोबत होती माझ्या तिथे. आश्विन बापट होता क्रीडा विभागात, तो आता एबीपी माझावर दिसतोच रोज. संतोष काळे होता काॅमर्स पेजवर, तो आता दिव्य मराठीत माझा सहकारी आहे.

एक वर्ष पूर्ण होताच मी नोकरी सोडली आणि इंडियन एक्स्प्रेसमध्ये स्पेशल (की प्रिन्सिपल?) काॅरस्पाँडन्ट म्हणून लागले. तेव्हा आॅफिस लालबागला होतं, सुप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या अगदी जवळ. मी तिथे जाॅइन झाले त्याच सुमारास मुंबईत हिंदुस्तान टाइम्स आणि डीएनएच्या आवृत्ती रुजू झाल्या. एक्स्प्रेसमधले अनेक अनुभवी वार्ताहर एचटीला गेले. अजूनही त्यातले बहुतेक जण तिथेच आहेत. मी तिथे रुजू झाले, जुलैच्या मध्यावर. २६ जुलै रोजी मी कंपनीच्या नियमांनुसार बाॅम्बे हाॅस्पिटलला आरोग्य तपासणीसाठी गेले होते. तपासणी झाल्यावर टॅक्सीने आॅफिसला आले, दोनच्या सुमारास. पाऊस पडत होता, साधारण जुलैत असतो तसा. कामाला सुरुवात केली आणि काही काळाने कोणीतरी म्हणालं की टाॅयलेटमधनं पाणी वर येतंय. बाहेर गेलो तर प्रचंड अंधार आणि मुसळधार पाऊस. काही वेळातच आॅफिसात पाणी शिरलं, पाऊलभर पाणी होतं. लालबाग हा सखल भाग असल्याने तिथे हा प्रकार नेहमीचाच होता. परंतु संध्याकाळनंतर मात्र पावसाचा काही वेगळाच रंग आहे हे लक्षात यायला लागलं. तोवर मुंबईच्या अनेक भागांतली वीज गेलेली होती. आॅफिसात मात्र होती. रात्रपाळीचे डेस्कवरचे लोक आले तेव्हा कंबरभर पाणी होतं आसपास. हळुहळू परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं स्पष्ट झालं. रात्री घर गाठणं अशक्य होतं. घरी आई आणि साताठ वर्षांची लेक, दोघीच होत्या. लँडलाइन चालू होता बहुतेक, त्यामुळे संपर्क शक्य होता. रात्री दीडपर्यंत आम्ही काम करत होतो. आॅफिसातले फोन सारखे वाजत होते. अनेक लोक फोन करून विचारत होते की, परिस्थिती काय आहे, आम्ही बाहेर पडू का, ट्रेन सुरू आहेत का, वगैरे. तेव्हा मोबाइल होते आलेले, परंतु फार कमी वापरकर्ते होते. आम्ही सगळ्यांना सांगत होतो, आॅफिसातून बाहेर पडू नका, आतमध्ये सुरक्षित आहात.

त्या रात्री आॅफिसच्या कँटीनच्या मुलांनी आम्हाला जागतं ठेवलं. पाऊलभर पाण्यात उभं राहून ती मुलं काम करत होती. रात्री दीडच्या सुमारास त्यांनी त्या दिवसातला शेवटचा वडापाव आणि चहा दिला होता, मी तो आयुष्यात विसरणार नाही. त्यांच्याबद्दल फार कृतज्ञ वाटलं होतं तेव्हा. दुसऱ्या दिवशी मुंबईत वितरित झालेला एक्स्प्रेस हा एकमेव पेपर होता. आम्हाला व्यवस्थापनाकडून नंतर जलतत्त्वाबद्दल काही लिहिलेले मग भेट देण्यात आले, या दिवसाची आठवण म्हणून.

आम्ही बहुतेक जण त्या दिवशी आॅफिसातच राहिलो कारण बाहेर प्रचंड पाणी होतं. आमचा ब्यूरो चीफ दिल्लीवाला होता. तो साडेअकराच्या सुमारास गाडी घेऊन निघाला, म्हणाला, मैं ऐसे नहीं रह सकता. आम्ही सगळ्यांनी सांगून पाह्यलं की, तू वडाळ्याला पोचू शकणार नाहीस, वाटेत अडकशील. पण तो ऐकला नाही. आणि अपेक्षेनुसार दोन तासांनी परत आॅफिसात आला. त्यालाही रात्र तिथेच काढावी लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी लोकसत्तेतल्या काही मित्रांसोबत बाहेर पडले. काही दुकानं उघडली होती. टीशर्ट आणि पायजमा विकत घेतला, त्या दिवशी घालायला. पाऊस मग काहीसा कमी झाला पण ट्रेन नव्हत्या सुरू झाल्या. त्या दिवशी माहीमला मावशीकडे जायला निघाले. लालबागहून दादर टीटीपर्यंत बस मिळाली. पण पुढे चालत जावं लागलं. मावशीकडे गेल्यावर स्वच्छ आंघोळ केल्यावर इतकं बरं वाटलं होतं.

पुढचे अनेक दिवस आम्ही, सर्वच वृत्तपत्रांनी, अनेक फाॅलो अप स्टोरीज केल्या. त्यातल्या अनेक ह्यूमन इंटरेस्ट म्हणजे माणूसकीचं दर्शन घडवणाऱ्या होत्या. मी केलेली स्टोरी एका रिक्षावाल्याबद्दलची होती. पार्ल्यातला एक स्पेशल मुलगा आणि बांद्र्यातली एक स्पेशल मुलगी अशा दोघांना हा रिक्षावाला रोज सकाळी चेंबूरच्या त्यांच्या शाळेत घेऊन जाई व संध्याकाळी घरी घेऊन येई. त्या दिवशी सकाळी फार पाऊस नसल्याने दोघंही मुलं शाळेत पोचली होती. पावसाचा जोर वाढल्यानंतर त्याने या मुलांना शाळेतनं पिकअप तर केलं, पण पुढे कुर्ल्याजवळ पाण्यात रिक्षा अडकली. त्याने एक उंचवटा पाहून रिक्षा थांबवली. मग त्याने उलट जायचा निर्णय घेतला, मानखुर्दला, त्याच्या घरी. कधीतरी रात्री उशिरा तो घरी पोचला. त्याच्या बायकोने या दोन मुलांना जेवू घातलं, झोपवलं. या मुलांच्या घरचे लोक तिथे पोचू शकत नव्हते, त्यांचा संपर्कही होत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना त्याने घरी सोडलं. नॅशनल जिओग्रािफकने या विषयावर केलेल्या एका माहितीपटात या घटनेचा समावेश केला आहे.

माणूसकीचं दर्शन घडवणाऱ्या, मुंबई स्पिरिटबद्दल बोलणाऱ्या स्टोरीज अनेक होत्याच. पण महत्त्वाच्या स्टोरीज होत्या त्या मुंबईची इतकी दुरवस्था कशी झाली, महापालिका, brimstowad प्रकल्प, राज्य सरकार, धोरणं, भ्रष्टाचार, ब्रिटिशांच्या काळातली व्यवस्था, प्लॅस्टिकचा बेबंद वापर, हवामान खात्याने भाकीत कसं काय केलं नाही, वगैरेच्या. अर्थात, इतकी वर्षं लोटली या घटनेला, कोणीच काहीही शिकलं नाहीये. ना सरकार, ना आपण नागरिक. नुसतं त्या मुंबई स्पिरिटच्या नावाने लोकांचा उदोउदो करायचा. मग प्रत्यक्षात शहर गेलं खड्ड्यात.

एक्स्प्रेसमध्ये असताना माझ्या लक्षात आलं की, reporting is not my cup of tea! मला रिपोर्टिंग अजिबात जमत नव्हतं. एक तर बऱ्याच वर्षांनी मी रिपोर्टिंग करत होते. त्या काळात पत्रकारिता बदलली होती, 24X7 वृत्तवाहिन्यांमुळे बातम्यांची मागणी बदलली होती. तसाही माझा स्वभाव एखाद्या गोष्टीच्या मागे लागून ती तडीस लावण्याचा नाही. म्हणजे मी कामं अर्धवट सोडते असं नाही, तर ज्या कामांना फार वेळ लागणार असेल, ज्यात फार डोकं लावावं लागणार असेल ती मी हातातच घेत नाही. मला रिपोर्ताज शैलीत लिहायला अधिक आवडतं, कारण ते सोपं आहे. जे डोळ्यांनी पाह्यलं, जे कानांनी ऐकलं, ते पांढऱ्यावर काळं करायचं. टाइम्सला असताना अनेक स्टोरीज केल्या ज्यासाठी अनेक लोकांशी बोलावं‌/भेटावं लागलं. पण पुढच्या दहा वर्षांत परिस्थिती फारच बदलली होती. मुख्यत: टीव्हीमुळे बातमीपेक्षा तिचं विश्लेषण किंवा तिच्यामागची बातमी अधिक महत्त्वाची बनली होती. इंडियन एक्स्प्रेसची जी खासियत मानली जाते, शोध पत्रकारिता, ती करण्याचा माझा पिंडच नसल्याचं माझ्या लक्षात आलं. तिथलं डेस्क अतिशय काटेकोर होतं, शब्द न शब्द तपासून पाह्यला जाई. मी रात्री एक वाजताही डेस्कचे फोन घेतलेले आहेत. पण मला ते काही झेपलं नाही एवढं खरं. अखेर नऊ महिन्यांनी मी एक्स्प्रेसला रामराम ठोकला. मी तेव्हा फार निराश झाले होते, हे आपल्याला जमत नाहीये, हे मला कळत होतं पण मला बदलायची आतून स्फूर्ती मिळत नव्हती. तशीही मी self motivated वगैरे नाही. ठेविले अनंते तैसेचि राहावे, हे माझं आवडतं वाक्य. ते काही परिस्थितींमध्ये आवश्यक असलं तरी सगळीकडे त्याची मात्रा चालत नसते.

यानंतर मी एका मैत्रिणीमुळे फिक्सर बनले. हे काम मात्र मला अतिशय आवडलं. एक कारण हेही असेल की यात मला डोकं वापरायचं नव्हतं. म्हणजे स्टोरी काय करायचीय, हे स्पष्ट मांडलेलं असायचं. मला त्याबरहुकूम माणसं, जागा शोधायचे असत. ते अगदी एकदोन असाइनमेंट सोडल्या तर सोपं होतं. या निमित्ताने मला फिरायला मिळायलं, खूप माणसांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला मिळालं. जिथे एरवी जाणं शक्य नव्हतं, तिथे जायला मिळालं. वेगवेगळ्या देशांतल्या रिपोर्टर्ससोबत काम केल्याने त्यांच्या वेगवेगळ्या शैली पाहता आल्या. त्यातलं कितपत मी प्रत्यक्ष वापरतेय, वापरलंय मला माहीत नाही. पण माणूस म्हणून मी या पाच वर्षांत सगळ्यात जास्त घडले, स्वत:शी कम्फर्टेबल झाले, स्वत:ला प्रेमाने स्वीकारायला सुरुवात केली, हे नक्की.

या सगळ्याची गोष्ट आधी लिहिली आहेच.

Comments