हम सब सुलु

तुम्हारी सुलुच्या जाहिराती पेपरात पाहात होते, टीव्ही पाहात नसल्याने गाणी, प्रोमोज काहीच पाह्यलं नव्हतं. पण साधारण गोष्ट माहीत होती. विद्या बालन आवडतेच, सिनेमा छान असल्याचं काही फ्रेंड्सनी फेसबुकवर टाकलं होतं. त्यामुळे काल संध्याकाळी मी आणि एक मैत्रीण गेलोच पाहायला. मी सिनेमा नाटकही फार पाहात नाही, शेवटचा सिनेमा कोणता पाह्यला तेही आठवत नाहीये. आम्ही दोघीही तशाच, त्यामुळे खूप उत्साहात होतो.

सुलोचना दुबे उर्फ सुलु ही मुंबईचं उपनगर असलेल्या विरारमध्ये राहणारी पस्तिशीतली स्त्री. स्वत:ला होममेकर वगैरे न समजता रुळलेलं हाउसवाइफ म्हणणारी. अनेक छोट्यामोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं ही तिची आवड. मग ती अंताक्षरी असेल वा चमचालिंबू, संगीतखुर्ची असेल वा इतर काही. शैक्षणिक यश तिला मिळालं नसल्याचं कथा पुढे सरकते तेव्हा कळतं, पण ती ढ किंवा निर्बुद्ध नक्कीच नाही. ती छोट्या छोट्या गोष्टींत आनंद घेणारी आहे. तिचा नवरा साधा सर्वसामान्य माणूस. तिच्यावर, मुलावर प्रेम करणारा, सरळ आयुष्य जगणारा. नोकरीतला त्रास वाढत चालल्याने मधेच कधीतरी दारू पिऊन घरी येणारा. आणि जमती नहीं तो पिते क्यों हो, असा बायकोचा ओरडा खाणाराही.

सुलुला असते रेडिओ ऐकायची सवय. त्यात ती असते नकलाकार. मग काही कारणाने एफएम रेडिओच्या आॅफिसात जाऊन आपला आवाज आजमावून पाहाते आणि बाई चक्क आरजे बनते.

पुढे काय होतं त्याचा आपला अंदाज खराही ठरतो आणि हुकतोही, थोडाथोडा. पण सिनेमाची गंमत या गोष्टीत नाहीच. ती आहे सुलु या पात्रात. तिच्या संवादांत. तिच्या हालचालींत. आणि तिच्या आवाजात. ती जे हॅलो म्हणते, ते ऐकून पुरुष गळपाटला नाही तरच नवल. तिचं हसणं, गाणं म्हणणं, चिडणं, हताश होऊन रडणं, नाचणं सगळंच विशेष.

सुलु बघताना सगळ्या बायांना आपलीच गोष्ट पाहातोय, असं वाटू शकतं. विशेषकरून नोकरी न करणाऱ्या. माझ्या ओळखीतल्या अशा खूपजणी आहेत, ज्यांना सुलुसारखे छोटेछोटे उद्योग करत राहावेसे वाटत असतं. 'आपण काहीच करत नाही, संसाराला हातभार लावायला हवा' असा अपराधगंड त्यांना सतत छळत असतो आणि त्यातनंच त्या छोटेमोठे उद्योग करत असतात. त्या त्या कामातला आनंदही त्या घेत असतात. एखादं काम नाही जमलं तर त्या दुसरं काहीतरी करू पाहतात. यात कधी त्या हरतात, लोकांची बोलणी खातात, प्रत्यक्ष घरचेही त्यांची चेष्टा करतात, पण एक आंतरिक ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. छोटंसं यशही त्यांना खूश करून टाकतं. अशा सगळ्या बायांना "तुम्हारी सुलु' हा मोठ्ठा व्हिटॅमिनचा डोस असणारेय. त्या तिला पाहून मनातल्या मनात हसणारेत छान.

विद्या बालन सुलुला सहजी निभावते. सुलुचे स्वत:चे खास व्यक्तिविशेष तिने फार छान रंगवलेत. सुलोचनाची आरजे सुलु होते, फोनवर बोलणाऱ्या श्रोत्याशी तिच्या खास शैलीत, समोर बसून तिला सजेशन देणाऱ्या बँकीला धुडकावून, जो संवाद साधते तो निव्वळ भन्नाट. न्यूड सिनेमा मी पाहिलेला नाही, पण साधारण गोष्ट माहीत आहे - न्यूड म्हणून चित्रकारांसाठी माॅडेलिंग करणाऱ्या बाईची गोष्ट आहे ती. त्यात ती जे करते ते अनैतिक नाही, बेकायदाही नाही, तरीही तिला ते स्पष्टपणे बोलता येत नाही कारण समाज काय म्हणेल ही भीती. या सिनेमातही सुलु आरजे आहे, रात्रीच्या शोची, खासकरून पुरुष श्रोते जेव्हा त्यांच्या एकटेपणावर उपाय शोधत असतात, त्या वेळची. ती त्यांच्यासाठी जणू काउन्सिलर आहे. इथे सुलुला समाज नाही, तर तिच्या घरच्यांचेच टोमणे एेकावे लागतात. पण ती त्यांनाही पुरून उरते. आपण इतकी वर्षं यांचं ऐकत आलो, आता नाही, हे तिने ठाम ठरवलं आहे. या सिनेमाचं वेगळेपण यातही की, सर्वसामान्यपणे त्या बाईला विरोध करणाऱ्यांत सासरच्या व्यक्ती असतात, किंवा भावजया तरी. इथे वडील आणि बहिणीच शत्रूपक्षात आहेत.

सुलुच्या नवऱ्याचं, अशोकचं, काम करणाऱ्या मानव कौलचं कौतुक करावं तितकं थोडं. विद्याची भूमिकाही सशक्त आणि विद्या उत्तम अभिनेत्रीही, आणि तरीही मानव लक्षात राहिला. चांगलाच. नेहा धुपिया तर लाडकीच आहे, मरियाच्या भूमिकेत फिट्ट बसलीय.

विद्याच्या साड्या फार चतुरपणे निवडल्यात. त्या झगमगीत नाहीत, पण सुती/स्टार्च केलेल्याही नाहीत, किंवा कांजीवरम टाइपही नाहीत. अगदी झिरझिरीत सेक्सी नाहीत. तिच्या साड्या तशा साध्याच, दुकानात त्या मी घेईनच असं नाही. पण उत्तम ब्लाउजमुळे त्या उठून दिसतात, लक्षात राहतात.

सुलुअशोकचा विरारमधला ब्लाॅक कुठेही सिनेमाचा सेट वाटत नाही, इतका रिअलिस्टिक. एफएमचं आॅफिसही परफेक्ट.

मला खटकली ती एकच गोष्ट. ती म्हणजे सुलुच्या तोंडची हिंदी. मैं कर सकती है, मैं करेगी असं वाक्य अगदी मुंबईत राहणारं कोणी दुबे आडनावाचं माणूस म्हणेल का, हा खरोखरच प्रश्न पडलाय मला. पण ती मराठी असेल, आणि दुबेशी लग्न केलं असेल कदाचित.

अशी ही तुम्हारी सुलु, हमारी कब हो जाती है, पता ही नहीं चलता!

Comments

Post a Comment