कतरा कतरा जीने दो

 अभिनेता शशी कपूर गेले मागच्या आठवड्यात, त्यानंतर त्यांच्या अनेक चित्रपटांचे, गाण्यांचे उल्लेख समोर येत राहिले. अनेकांनी ‘इजाजत’मधल्या त्यांच्या अगदी छोट्याशा भूमिकेबद्दल खूप जिव्हाळ्याने लिहिलं होतं. जेमतेम दोनतीन मिनिटंच शशी कपूर पडद्यावर दिसतात, पण त्यातही त्यांनी जे रंग भरलेत, मुरलेल्या अभिनयाची चुणूक दाखवलीय ती लक्षणीयच. मग चित्रपटाचा शेवट यूट्यूबवर पाहणं ओघाने आलंच. सुधा... अशी प्रसन्न आणि प्रेमळ हाक मारत ते वेटिंग रूममध्ये येतात, रेखाशी बोलत बोलत सामान घेऊन बाहेर पडतात, आणि महेंद्र... असा उद्गार काढून चालायला सुरुवात करतात. इतकंच.

शशी कपूरना पाहताना नव्याने जाणवलं ते रेखाचं वागणं. शशी कपूरना पाहिल्यानंतर नसीरुद्दीनच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव वाचून ती म्हणते, ‘पिछले साल मैंने शादी कर ली.’ हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाव दाटून आलेले स्पष्ट दिसतात. अत्यंत पॅशनेट पण लहरी मैत्रिणीपायी बायकोकडे दुर्लक्ष करणाऱ्या पतीला सोडून गेलेली ही व्यक्ती. पुढचं आयुष्य एकटीनेच जगावं, अशी या नवऱ्याची कदाचित अपेक्षा. त्याने आडूनआडून तिला विचारलेलंही, आई कशी आहे, एकटीच राहतेस का, वगैरे. म्हटलं तर नेहमीच्या आयुष्यात भेटणाऱ्या सर्वसामान्य पुरुषांसारखाच. पत्नीवर, मग ती आता आपली राहिली नसली तरी, मालकी हक्क दाखवणारा. ती आनंदात असेल तर ते कसं चुकीचं आहे, ते अगदी हलकेच सूचित करणारा. तिच्यात अपराधी भाव जागृत करू शकणारा. तीही अशीच, सर्वसामान्य, नेहमीच्या पाहण्यातली. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कदाचित ते तसं दाखवायचं नसेलही, पण तसा अर्थ या अगदी छोट्याशा दृश्यातून निघू शकतोच. तो चित्रपटाला वरच्या पातळीवर नेतो, किती ‘रिअलिस्टिक’ आहे, असंही वाटून जातं. पण रेखाच्या डोळ्यांतलं पाणी आणि चेहऱ्यावरचे भाव अपराध वाटत असल्यावर शिक्कामोर्तब करतात, हे निश्चित. या दृश्याचा आणखी एक परिणाम होतो. शशी कपूर इतके प्रेमळ आणि आश्वासक दिसतात की, रेखाने त्यांच्यासोबत लग्न केल्याचं छानच वाटतं. तिच्या साधेपणाला आणि प्रेमाला साजेसा जोडीदार मिळाल्याचा आनंद वाटतो.
नाहीतर आहेच सामान्य बाईसारखं.

‘कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा जीने दो!’
असं आयुष्य.

Comments