Railkatha 11 - irresponsible commuters and insensitive rail admin

काल ईदची सुटी होती, त्यामुळे मध्य रेल्वेने गाड्या सुटीच्या वेळापत्रकानुसार चालवल्या होत्या. (हा निर्णय कोण घेतं, त्या व्यक्तीला एकदा भेटायची इच्छा आहे.) कालची सुटी शाळा/महाविद्यालयं, बँका, सरकारी कार्यालयांपुरतीच मर्यादित होती कारण लोकलना खूप (म्हणजे नेहमीइतकीच) गर्दी होती. बहुतेक खाजगी आस्थापनांचं काम सुरूच होतं. तरीही सुटीचं वेळापत्रक लागू केल्याने लोकल विलंबाने धावत होत्या.
सकाळी रोजची १०.५५ पकडायला मी १०.५०ला मुलुंडला पोचले. गाडी इंडिकेटरवर लावली होती, त्यामुळे नेहमीचे प्रवासी वाट पाहात होते. १०.५७ला ट्रेन आली, तर खचाखच भरलेली. आम्ही सगळे चकित कारण १०.५५ ठाण्याहून येते आणि तुलनेने रिकामी असते. डबा समोर येईतो इंडिकेटर पाहिला तर तो १०.२१ झालेला. ही लोकल येते खोपोलीहून. एकदाही ही लोकल उशिरा धावत असल्याची घोषणा नव्हती. गर्दी असूनही मी पकडली गाडी कारण सुटी अाहे, कदाचित ठाणे लोकल रद्द होऊ शकते, असा अंदाज होता. नंतर कळलं की, लोकल रद्दच होती. तिची घोषणा का केली नाही, हे कळायला मार्ग नाही. घोषणा कधी करायची आणि कधी करायची नाही, हे ठरवणाऱ्या व्यक्तीलाही भेटायची इच्छा आहेच.
मी संध्याकाळी ७.०५ला दादरला, फलाट क्र. ४वर पोचले. ६.५६ची टिटवाळा फास्ट यायला ४ मिनिटं दाखवत होता इंडिकेटर. एकवरनं जाणारी एक ठाणे आणि एक कुर्ला अशा दोन धीम्या लोकल रद्द केल्याची उद्घोषणा ऐकू येत होती. टिटवाळा ७.१० ला आली, त्यानंतर ७.०४ची कल्याण आली. ७.०७ची अंबरनाथ ७.२०ला आली, ती मुलुंडला थांबत असल्याने ती पकडली. गाडी कुर्ल्यापर्यंत ठीक होती, उभं राहायला जमत होतं.
विक्रोळीला प्रचंड लोंढा आत शिरला. फलाटावर एक वयस्कर गृहस्थ एका छोट्या मुलाला घेऊन उभे होते. गाडी सुरू व्हायच्या एखादा सेकंद आधी ते मूल त्यांनी दारात उभ्या एकीच्या हातात दिलं. आम्ही मुलुंडवाल्या साताठ जणी होतो त्या बाजूला उभ्या. जिच्या हातात ते मूल होतं, तिला आम्ही अर्थात आत घेतलं, जमेल तितकी जागा केली. आणि तिला ओरडलो, बाई, इतक्या गर्दीत का चढलीस याला घेऊन? तर ती म्हणाली, हे माझं मूल नाही, त्याची आई तिकडे आहे. तर या आईसाहेब आधी चढल्या होत्या. गर्दीत अडकल्या होत्या. त्यांना उतरायचं होतं कल्याणला. मग तिला म्हणू लागलो, अगं, स्लो का नाही पकडलीस, किंवा अपंगांच्या डब्यात का नाही गेलीस, इतक्या गर्दीत भीती नाही का वाटत.
तर म्हणते, खूप गर्दी आहे स्लो लोकलला पण. तरी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं होतं.
तोवर जिच्याकडे मूल होतं ते आमच्या डोक्यावरनं जरा आतल्या बाईच्या हातात सोपवलं. त्याला बिचाऱ्याला पाचसात मिनिटं तरी आई दिसली नव्हती, पण कौतुक असं की, पठ्ठ्या गपगुमान बसला होता. एरवी एखाद्या पाेराने ठणाणा बोंबा ठोकल्या असत्या इतकी गर्दी पाहून. मी उतरताना त्या आईला म्हटलंही, त्याची दृष्ट काढ गं घरी जाऊन, या परिस्थितीतही रडला नाही म्हणून.
आम्ही मुलुंडला उतरलो. ती कल्याणपर्यंत कशी गेली असेल, उतरायला मिळालं का, ठाऊक नाही.
एक बाई म्हणाली, लोक स्मार्टफोन वापरतील पण त्यातलं MIndicator वापरणार नाहीत. जरा अभ्यास केला तर कमी गर्दीची सोयीची लोकल पाहून निघता येतं. लहान बाळाला घेऊन जातानाही इतका विचार न करणारी माणसं पाहून संताप येतो, दयाबिया काही नाही वाटत. ती बाई जरा तासाभराने निघाली असती तर स्लो लोकलने आरामात गेली असती.
असो.
कालचा प्रसंग आठवून अजूनही थरकाप उडतोय.
बाळाचा, खरंतर गर्दीचा, फोटो घेण्यासाठी फोन जेमतेम बॅगेतनं बाहेर काढला, पण डावीकडे वळण्यापुरतीही जागा नव्हती.

Comments