मंजिरीचा लेख |
कालच्या रविवारी लोकसत्तेने याची थेट हेडलाइनच केली आणि ती बातमी सर्वदूर पोचली. मला कळल्यानंतरही मी माझ्या भावंडांना काहीच बोलले नव्हते. पण आमच्या व्हाॅट्सअॅप ग्रूपवर ही बातमी केलीच मी शेअर. त्यानंतर काही जणांनी छोटं छोटं काही लिहून पाठवलं, ते माझ्या टिप्पणीसह यात जोडलंय.
माझी सगळ्यात मोठी मावसबहीण शीलूताई मौजेच्या कार्यालयात होती. अतिशय देखणी ताई तरुण वयातच बहुधा जन्मजात काही आजारामुळे अधू झाली. तरीही ती ट्रेनने मालाडहून गिरगावात जायची. तिचं अक्षर रेखीव होतं. तिथेच तिला तिचा जीवनसाथी भेटला, सुनील राणे. ताई काही वर्षांपूर्वी गेली. तिची लेक नेहा लिहिते - मला गूढ वातावरण नाही आठवत मौजेतलं कारण मी तशी खूप वेळ नाही गेलेले, मंजिरीमावशीएवढी. पण बऱ्याच आठवणी आहेत, मुख्य म्हणजे शीलाची आणि राण्यांची मुलगी म्हणून खूप लाड व्हायचे अगदी गेल्यागेल्या. त्यात (गुरुनाथ) सामंतकाका, सरिता (मानकामे) मावशी, हेमामावशी आणि नारायण हे जवळचे. माझ्या बाबाचं ऑफिस असल्यासारखी बिनधास्त सगळीकडे फिरायचे आणि एकदा पुस्तकांच्या शेल्फसपाशी गेलं की, वेळ कसा जायचा कळायचंच नाही. तो नवीन पुस्तकांचा वास, कुठलंही पुस्तक उघडून वाचत बसणं, त्या वेळच्या सगळ्या पुस्तकांची नावं माहीत असणं... खूप मस्त होतं ते सगळं. मला अजून एक आठवतंय ते म्हणजे मी बहुतेक ७-८ वर्षांची होईपर्यंत आई थोडंसं काम बहुतेक घरून करायची. तिला तिच्या मस्त अक्षरात लेजर बुक लिहिताना बघत बसायचे. मग तिला मदत म्हणून पुस्तकांची नावं सांगायची, किंमत, विक्री असं सगळं सांगायचं आणि ती लिहायची. त्या वयातसुद्धा गौरी देशपांडे आणि दुस्तरसारखी पुस्तकं मला माहीत होती, ती मौजेमुळेच. माझ्या वैयक्तिक जडणघडणीत खूप महत्त्वाचा वाटा आहे मौजेचा, इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळी पुस्तकं इतक्या लहान वयापासून वाचायला मिळणं हे खरं तर आपल्या सगळ्यांचं नशीब. आता वाचायला वेळ मिळत नाही याचं खूप वाईट वाटतं आणि अजूनही मी (नवरा) अमितला नेहमी म्हणते की, मोबाइल अॅपवर किंवा किंडलवर पुस्तकं वाचण्यात ती मजा नाही जी पुस्तकांचा वास घेऊन आणि त्यांना स्पर्श करून वाचण्यात आहे. सो खूप खूप थँक्यू आईबाबा आणि आप्पामामा ज्यांनी मौजेशी माझी ओळख करून दिली.
मी ग्रूपवर म्हटलं की, आपण सगळ्यांनी थोडंथोडं लिहू, छान होईल, त्यावर माझा मावसभाऊ राजेंद्र म्हणाला - लिखाण अप्पामामा किंवा श्री. पु. भागवत यांचेकडे जाणार नाहीये हे बरं, नाहीतर साभार परत नक्की, अधिक परत लिहून पाठवा किंवा टोकदार हवे आहे व बरी वाटावी, अशा प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या असत्या.
काॅर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असलेला दुसरा मावसभाऊ अभिजीतने वेगळाच मुद्दा मांडला – जरी लोक म्हणाले मौज संपली, मौज बंद पडली, तरी मौजेचा आत्मा, the core values, what मौज stood for... आपण सांभाळू शकतो. In my opinion, Mauj stood for experimentation. Very high literary standards. Creating new writers and poets, Thought Leadership. And all this must have had a phenomenal contribution from Appa mama. My point is, we can perpetuate this value system. This thought to the next generation. It need not be the biological next generation or the language need not be Marathi alone.
मला आप्पामामामध्ये हे दिसायचं - Quest for perfection. Quest for excellence. Push and try till you get it absolutely right. हे आपण पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवं, स्वत:च्या आयुष्यातही बाणवायला हवं. Capabilities नाहीत आपल्यात त्या, पण यथाशक्ती प्रयत्न करत राहू.
अभिजीत असंही म्हणाला की, मौज म्हणजे एक kaleidoscope आहे. त्याचा अर्थ, त्याचं प्रत्येकाच्या आयुष्यातील स्थान वेगवेगळं आहे. मौजेत आपली भावनिक गुंतवणूक फार वेगवेगळी आहे. अगदी आपल्या पिढीतसुध्दा. त्यामुळे माझी post काहींना थोडी कोरडी वाटली असावी, हे मला जाणवलं. त्यामुळे काही भावना दुखावल्या गेल्या असतील, तर क्षमस्व. चू भू द्या घ्या.
राजेंद्र म्हणतो, मौजबद्दल बरीच चर्चा चालू आहे. एक किंचित वाचक म्हणून मला जे वाटलं ते मी मांडतोय. बदलती printing technology, वाचकांची आवड निवड, खुद्द मौज प्रकाशनाची पुस्तकं कोणती छापायची याबद्दलचे निर्णय, मौजची धुरा सांभाळणारी पुढची पिढी या सर्वांचा या घटनेवर परिणाम आहे. आपलं कुटुंब मौजेशी अनेकांगी जोडलं गेलंय. यात फक्त माणसंच नाहीत पण पुस्तकांची आवड पण आहे. अभिजीत म्हणाला ते "कालाय तस्मै नमः" हे खरंच, पण एक पुस्तक छपाईच्या जगातला मानदंड किंवा ब्रँड म्हणूया, तो जाणार हे सर्वात वाईट. जसे शिक्षक नागरिकांच्या पुढच्या पिढ्या घडवतात तसेच मौजने वाचकांच्या काही पिढ्या घडवल्या. आम्ही मौजेचे ऋणी राहू.
आमच्यातली मंजिरी बहुधा सर्वाधिक वेळा मौजेच्या गिरगावकर लेनमधल्या कार्यालयात गेली असेल. त्यामुळे तिचे ऋणानुबंध मामासारखेच गुरुनाथ सामंत आणि सरिता मानकामेशीही जुळलेले होते. तिने छोटी प्रतिक्रिया दिली ती ही की, मौजेच्या पश्चात वाचकांवर उच्च अभिरुचीचे, साक्षेपी संस्कार करण्याची अलिखित जबाबदारी इतर प्रकाशकांवर आलेली आहे. पुढच्या पिढीला लिहिते / वाचते करणे हा CSR त्यांनी मौजेइतक्याच कळकळीने करावा ही अपेक्षा. मंजिरीने काही वर्षांपूर्वी मौजेबद्दल एक लेख लिहिला होता, त्याची इमेज जोडलीय. त्यात एक सुधारणा अशी की, रापणचे लेखक प्रल्हाद अ धोंड आहेत, लेखात म्हटल्याप्रमाणे म.वा. धोंड नव्हेत.
सरतेशेवटी माझ्या मनात काय आलं ते.
मी मामा असताना क्वचितच मौजेत गेले असेन. बोरिवली ते चर्नी रोड हे अंतर शाळेत असताना लांबचंच. पण चुनाभट्टीच्या मामाच्या घरी मात्र त्याच्या लेखकांशी होत असलेल्या गप्पा, चर्चा एेकल्या आहेत. खटाववाडीतल्या या कार्यालयाबद्दल अनेक लेखकांनी लिहून ठेवलेलं वाचलंय अर्थात. मठी म्हणत त्याला. याच मठीच्या समोर मौजेच्या अंकाची विद्रोही साहित्यिकांनी होळी केली होती, आणि मामाने कसे त्यासाठी अंक दिले होते, वगैरे. कार्यालयात असलेली कबुतरं. हातात पेन्सिल घेऊन कागदांवर खाणाखुणा करत असतानाच समोर बसलेल्या लेखकाशी लेख वा कवितेबद्दल चर्चा करणारा मामा. हे सगळं वाचलेलं.
मी पाहिलेलं मौजचं कार्यालय गेल्या १० वर्षांतलं. चिंचोळ्या लाकडी जिन्याने पहिल्या मजल्यावर गेलं की डावीकडे मौजचं आॅफिस, म्हणजे प्रशासकीय वगैरे. तिथे सामंत, सरिता, वगैरे मंडळी बसत. या आॅफिसच्या खाली तळमजल्यावर गोदाम आहे. हा भाग अजून आहे. जिन्याच्या उजवीकडे मोठीशी खोली. या खोलीच्या खाली छापखाना, खोलीतून खाली वाकून पाहिलं की, काम दिसत असे. हा भाग विकला आहे. विकास परांजपेशी दोस्ती झाल्यानंतर गिरगावात गेल्यावर आधी ज्योत्स्नाच्या नि नंतर मौजेच्या कार्यालयात जाणं होई. संजय भागवतशी थोडीफार गट्टी झाली त्या काळात. मौजेत सगळे भागवत भाऊ या नावाने ओळखले जात. माधवभाऊ, संजयभाऊ, वगैरे. संजयला भेटायला गेलं की खालचे छापखान्यातले आवाज कानावर पडत. संगणक आल्यानंतर हे कार्यालय वातानुकूलित झालं. तिथेच मोनिका गजेंद्रगडकर बसत असे. माधव वा मुकुंद भागवत असत. संजयच्या संगणकावर मंद आवाजात शास्त्रीय संगीत सुरू असे.
हा छापखाना बंद झाला, पण पार्ल्यातला सुरू आहे. प्रकाशन सुरूच आहे, ते किती दिवस सुरू राहील ठाऊक नाही, कारण भागवतांच्या पुढच्या पिढीला या व्यवसायात रस नसावा. संजयही साठीच्या आसपास आहे. बाकी मंडळी त्याच्यापेक्षा मोठीच. तरुण मंडळी नसल्याने नवीन कल्पना, नवा उत्साह, जोम नाही. अखेरीस हा व्यवसाय आहे, भागवत कुटंुबीयांची त्यात भावनिक गुंतवणूक कितीही असली तरी प्रत्यक्ष व्यवसाय रोजच्या रोज चालवणं, त्यातले खाचखळगे, या गोष्टी अधिक महत्त्वाच्या. त्यामुळे त्यांनी छापखाना विकून liability कमी केली तर त्यांना दोष देणं चुकीचं वाटतं.
अनेक नवनवीन प्रकाशनं सुरू होत आहेत, तरुण मंडळी यात सहभागी आहे, नव्या दमाच्या लेखकांना हाताशी घेऊन तरुण वाचकांच्या पसंतीस पडतील अशी पुस्तकं निघत आहेत. परंतु, या पुस्तकांमध्ये मौजेत छापलेल्या पुस्तकांची मजा नाही, हे नक्की. मौजेचं कोणतंही, लहानमोठं, नवंजुनं पुस्तक हातात घेतल्याघेतल्या ते मौजेचं आहे, ही ओळख पटायची. किंचित पिवळट झाक असलेल्या कागदावर त्या विशिष्ट फाँटमध्ये छापलेलं पुस्तक, आणि मुद्रितशोधनाची शोधू म्हणता न सापडणारी चूक. आज हे अचूकपण किती पुस्तकांमध्ये सापडतं, याचं उत्तर आपलं आपण शोधावं.
भावनांचे उमाळे येऊ न देता या घटनेकडे पाहाता येणं, हीदेखील आप्पामामाची देणगी असावी. त्यासाठी आम्ही कायमच ऋणी राहू त्याचे.
Comments
Post a Comment