अाठ वर्षांच्या लहानगीवर झालेला असो की, १७ वर्षांच्या तरुणीवर; बलात्कार तोच असतो. ते असतं एक निव्वळ अमानुष, क्रूर, हिंसक कृत्य. बलात्कार शेकडो वर्षांपासून होत आले असावेत. महाभारताच्या गोष्टीतलं, भर राजसभेत झालेलं द्रौपदी वस्त्रहरण हे बलात्काराइतकंच भीषण कृत्य आहे की. ते प्रत्यक्ष झालं की कल्पनाशक्तीचा खेळ, माहीत नाही; पण शेकडो वर्षांपूर्वी एका लेखकाच्या मनात हा विचार डोकावला, इतकं निश्चित. तेव्हाही भर सभेत द्रौपदीचे पाच थोर शूरवीर पती हातावर हात ठेवून गप्प बसलेे. नंतर त्यांनी काय पराक्रम गाजवला ते वेगळं, पण तेव्हा तिचं वस्त्र फेडणारे हात धरायला कोणी उठलं नाहीच. खेरीज द्रौपदीच्या स्त्री म्हणून असलेल्या मानसन्मानाच्या ठिकऱ्या उडाल्याच,पण राजसभाही खजील झाली.
देशात गेल्या काही वर्षांमध्ये, खासकरून फेसबुक आणि व्हाॅट्सअॅप या सामाजिक माध्यमांचा वापर प्रचंड वाढल्यानंतर, प्रतिक्रियावाद फोफावल्याचं दिसतंय. काहीही खुट्ट झालं की, लगेच या माध्यमांवर व्यक्त होणं ही अनेकांची गरज होऊन बसली आहे. तेसुद्धा मागचापुढचा विचार न करता. इलेक्ट्राॅनिक वृत्तमाध्यमांमध्ये वा वृत्तविषयक संकेतस्थळांमध्ये जशी आम्ही पहिले ही स्पर्धा असते, तशीच या माध्यमांवर असते. मग कोणी म्हणतं, ‘फाशी द्या.’ कोणी अरब राष्ट्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या जाहीर शिक्षांचे दाखले देतं, तर कोणी म्हणतं, ‘पण तेव्हा तुम्ही कुठे होतात?’ हो हो, हेच बरोबर आहे, अगदी असंच माझ्या मनात आलं, आप ने तो मेरे मुंह की बात छीन ली, असं सर्वसामान्यांना वाटायला लागतं, आणि ही ‘मतं’ पसरत जातात. एक मिनिटांत एखाद्या गोष्टीवर मत देण्याइतकी कोणत्याही विषयातली समज कोणाकडेही असते असं म्हणणं धाडसाचं ठरेल. भलेभले विचारवंत, तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक मत देण्याआधी वेळ मागून घेतात, सर्वंकष विचार करतात, मग काही लिहीतात, किंबहुना त्यांनी तसं करणं अपेक्षित आहे. परंतु अनुभव असं सांगतो की, असं घटनेनंतर समोर आलेलं, वैचारिक किंवा चिंतनात्मक लिखाण वाचण्याएवढा वेळच सामान्य वाचकाकडे नसतो, कारण तो तोपर्यंत दुसऱ्या एखाद्या ‘नुकत्याच हाती आलेल्या’ घटनेवर प्रतिक्रिया देण्यात गुंतलेला असतो.
इथवर आपण कसे पोचलो?
त्याचंही उत्तर महाभारताच्या गोष्टीत शोधावं का?
चिखलात रुतलेलं चाक बाहेर काढणाऱ्या कर्णावर ‘चालव बाण’ असं अर्जुनाला सांगणाऱ्या कृष्णाला कर्ण म्हणतो, ‘हाच तुझा धर्म?’ त्यावर साक्षात कृष्णानेही तर म्हटलंय, ‘तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?’
तर असं मागचं किंवा आजूबाजूचं उकरून काढत बसण्यापेक्षा अशा घटना वाढीला का लागल्या आहेत, माणूसकी दूर राहिली, कायद्याचं भयही का वाटेनासे झालंय, याची उत्तरं शोधायला हवीत खरं म्हणजे. काय वाटतं?
Comments
Post a Comment