Just chill

सकाळसकाळी इतकं काम करणं इललीगल आहे, जरा चिल.

महिलामंडळाची मीटिंग असल्यासारखे कपडे नको करूस,

जरा हेप कपडे घाल.

ते केस मोकळे सोड गं, सारखे काय बांधून ठेवतेस?

तुला जरा नीट ब्रा घ्यायची गरज आहे!

एकाच गोष्टीवरून किती बोलतेस?

आता बास हं, प्लीजच म्हणजे!

माझ्या पुस्तकांना हात लावू नकोस, मी ठेवेन नीट.

फाॅर गाॅड्स सेक, केस मोकळे सोड.

माझं कपाट आवरू नकोस, मी आवरेन.

तू आवरलंस की मला वस्तू मिळत नाहीत.

जरा हील्स घालत जा, हिप्स नॅरो दिसतील.

पाया पडायची काय गरज आहे, इन लाॅज असले म्हणून काहीही?

प्लीज जमलं तर पप्पा एक्स्चेंज करून घे, हा डिफेक्टिव प्राॅडक्ट आहे.

आवर आता, पकवू नकोस प्लीज.

अंथरुणपांघरुण कशाला आवरायचं, पुन्हा रात्री झोपायचं आहेच ना?

तू एवढी वर्षं कशी राहिलीस या माणसाबरोबर? मी नाही राहू शकत.

तूच सांभाळ तुझ्या नवऱ्याला.

बघ तुझे संस्कार बघ तूच, कसे आहेत,

म्हणून सांगते जरा ऐकत जा माझं.

अम्मा, आय अॅम २१.
.
.
.
असं आईला सांगणारी बच्चेकंपनी आईला हेही बजावतच असते की,
.
.
.

सगळ्यांसाठी धावपळ केलीस, पण स्वत: जगायला विसरलीस.

आता तरी शहाणी हो, उरलेलं आयुष्य एंजाॅय कर

स्वार्थी हो जरा, जग गेलं भोXXत!

*****************

जमैका किंकेड या कॅरिबियन अमेरिकन लेखिकेची द गर्ल ही ८०च्या दशकातली एक लघुकथा. त्यावर आधारित एक कविता गार्गी रानडेने लिहिली. ती वाचून हे असं काही करण्याचा मोह आवरला नाही. यासाठी माझ्या अनेक मैत्रिणींचे अमूल्य इनपुट्स मिळालेले आहेत. त्यांना सगळ्यांना ही अर्पण.

गार्गीची कविता 
 सूचना 

सकाळी उठल्यावर आधी झिपऱ्या बांधायच्या.
रात्री उशिरा झोपायची सवय लावून घेतलीस तर लग्नानंतर मोडणं कठीण होईल.
दिवसा वापरलेले डबे रात्री घासताना कुकरमधलं खालचं गरम पाणी वापर.
ऑफिसमधून घरी आल्यावर आधी कुकर लाव, नंतर कपडे बदल, म्हणजे तेवढा वेळ वाचतो.
हाक ऐकल्यावर आधी ओ द्यायची.
बाहेरून घरी आलं की, आधी पाय धुवायचे.
विरजण मागायला शेजारणीकडे संध्याकाळी जायचं नाही.
चहाकाॅफी पिऊन झाल्यावर कपात लगेच पाणी घालून ठेवायचं.
ताटातल्या मिरच्याकढीलिंबाची पानं काढून केरात टाकायची, सिंकमध्ये पाणी तुंबतं नाहीतर. सिंक च्या जवळ केराचा डबा ठेवायचा.
गूळ घातला की, भाजी नीट मिळून येते. फोडणीत साखर घातली की रश्श्यावर तवंग येतो.
धिरडं घातलं की, तुळशीला एक फेरी मारायची, नाहीतर ते शिजत नाही नीट. घरी एक तरी तुळस असायला हवीच.
काय गं कार्टे- ओ कोण, तुझा बाप देणार?
आणि गोट्या कसली खेळतेस, मुलगा आहेस का?
आता लहान नाहीयेस, एवढा मोठा मांडा ठोकून नाही बसायचं. आवर!
आजीआजोबांना तुमचे विचार समजवायला जाऊ नका, ते जवळजवळ अशक्य आहे.
कोणाकडे गेल्यावर मदत करू का असं आपणहून विचार.
उठल्याउठल्या हातासरशी अंथरूण आवरायची सवय लावून घे.
खाताना तोंडाचा आवाज करायचा नाही.
ओढणी घेतल्याशिवाय बाहेर पडू नकोस.
मोठमोठ्याने हसायचं नाही, आपल्याच घरी का होई ना.
चपलाबूट विकत घेण्यासाठी संध्याकाळी जायचं, तेव्हा पाय जरा सुजलेले असतात. सकाळी घेतले तर बूट चावू शकतात.
कुठेही असलीस तरी रात्री दात घासल्याशिवाय झोपायचं नाही.
झोपताना स्वच्छ मऊ सुती कपडे घालूनच झोपायचं.
उष्ट्या खरकट्या हाताने वाढायचं नाही.
लोणच्यात ओला चमचा घालायचा नाही.
पैसे झाडाला लागत नाहीत, जपून खर्च करायचे.
पैशाची किंमत कमवायला लागलीस कीच कळेल.
रांगाेळी काढता आली पाहिजे मुलीच्या जातीला, लग्नानंतर उपयोगी पडेल.
छोट्या छोट्या गोष्टींवर रडत बसायचं नाही, लग्नानंतर असली कौतुकं चालणार नाहीत.
दुसऱ्या जातीत/धर्मात/समाजात लग्न केलं तर बाईलाच तडजोडी कराव्या लागतात, त्याही स्वयंपाकघरात. नेहमीच्या सवयीचं जेवण नसेल तर माणसं कितीही प्रेमात असली तरी काही दिवसांनी बिथरू शकतात.
परक्या पुरुषांकडे पाहून दात काढून हसू नकोस.
अरे ला का रे करायला शीक.
तुझ्या शरीरावर हक्क फक्त तुझाच आहे, हे लक्षात ठेव.
कोपऱ्यावरच्या पानवाल्याला तुझं पान माहिती असलं पाहिजे.
भाज्या घेताना भाव करायची वेळ आली नाही पाहिजे. (जर आली तर?) एवढं सगळं सांगितल्यावर भाव करायला पण मीच शिकवायचं?

*********

जमैकाच्या कथेची लिंक

http://www.saginaw-twp.k12.mi.us/view/8490.pdf

Comments