Maturity - how and when?

मोठे कधी होणार ?

बसमध्ये समोर दोघीजणी गप्पा मारत होत्या. पंचविशीतल्या असतील. एक दुसरीला सांगत होती, तुझ्या मुलाला सगळं खायची सवय लाव हं, नाहीतर माझ्यासारखी अवस्था होईल. मला आईने लहानपणी फार लाडावून ठेवलं होतं. म्हणून माझे आता फार नखरे असतात खाण्यापिण्याचे.

जर पंचविशीतल्या मुलीला हे कळतंय की, लहान असताना आईने केलेल्या लाडांमुळे तिला आज अनेक पदार्थ आवडत नाहीत, तर तिला हे कळत नाही का, की आपण आवडत नसलेले पदार्थही आता हळुहळू खाऊन पाहायला हवेत? सवयीने ते आवडू लागतील. किंवा आवडले नाहीत तरी आरोग्याला पोषक म्हणून खायला हवेत? भाज्या, फळं, खायला हवं, हे शाळेत शिकूनही वर्षं लोटली, तरीही पालथ्या घड्यावर पाणीच!

असंही सांगणारे पुरुष असतात की, मी लहानपणापासून आईने सगळी कामं केलेली पाहात आलोय, आंघोळीचं पाणीसुद्धा तीच काढून देते आणि हातात चहाही तीच देते. तेव्हा विचारावंसं वाटतं की, लहान असताना तुला गरम पाणी घेता येत नसेल, पण आता तरी येतं ना? तुझी बायको नोकरी करणारी आहे, तुला एक लहान मुलगा आहे.

तुझी इतकी सेवा करून कामावर जाणं बायकोला शक्य होणारेय का? तुझा मुलगा हेच पाहात मोठा होणारेय आणि तोही त्याच्या आई/बायकोकडून तीच अपेक्षा करणार आहे. तिशी ओलांडल्यावर स्वत:च्या आयुष्यात असे बदल घडवून आणायला दुसरं कोणी कशाला लागतं? आपल्या आपणच हे बदल घडवून आणू शकतो ना! त्यालाच तर सुजाण होणं, मॅच्युअर होणं, म्हणतात. नाहीतर नुसतं वय वाढलं असंच म्हणेल कोणीही.

अठराव्या वर्षी भारतीय व्यक्ती प्रौढ होते. मग या वयानंतर, आपल्यातल्या कमतरतांबद्दल आईवडलांना दोषी ठरवणं थांबवून स्वत: सुधारणा घडवणं इतकं अशक्य आहे का? कधी शिकणार हे आपण? किती दिवस त्यांच्या कुबड्या घेऊन चालत राहणार? आपलं म्हणून आयुष्य कधी सुरू करणार? आणि आपल्या निर्णयांची जबाबदारी घेणार? आईवडीलही किती दिवस मुलांना आधार देत राहणार?

*****

हा लेख मधुरिमामध्ये माझ्या सदरात प्रसिद्ध झाला त्या दिवशी एका व्यक्तीची मेल आली.
'तुम्हाला लोकांच्या घरातील पर्सनल गोष्टी शी काय देणे घेणे आहे हो. सारखे आपले उपदेश देत असता पुरुष ना. कोण तुम्ही तुमची लायकी काय. आमच्या घरातील बायकांना कसे वागावे हे शिकवनारे तुम्ही कोण.  तुमच्या सारख्या बायकांना संसार बिनसर काय नाही म्हणून दुसऱ्याच्या गृह स्थि मध्ये कशाला विष कालवतेस.  मूर्ख कुठली.  बास कर हे तुझे उद्योग' असं या अजय मोहिते नावाच्या आमच्या वाचकाने म्हटलं होतं.

तुम्ही ने सुरुवात करून हा वाचक तूवर इतक्या सहज उतरलाय, त्याचं कौतुक वाटलं. माझ्या लिखाणात पुरुषांना लक्ष्य केलेलं नसतानाही तो इतका चिडलाय, याचं कारण नक्की ठाऊक नसलं तरी अंदाज येऊच शकतो. माझी लायकी काढताना, त्याने स्वत:ची लायकी दाखवलीय हे मात्र खरंच.

अशीच, परंतु याहून वाईट शब्दांतली, प्रतिक्रिया त्याने मुक्ता चैतन्य यांनाही पाठवली होती, त्यांचा विवाहविषयक एक लेख मधुरिमामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर. त्यातही म्हणायचं तेच होतं, तुमची लायकी काय, तुम्हाला काय करायचंय आमच्या घरांमध्ये काय चाललंय त्याच्याशी, वगैरे. त्यात त्याचा पाय जास्त घसरला होता, आणि त्याने तिच्या प्रेतालाही कोणी हात लावणार नाही असं म्हटलं होतं.

या अशा प्रतिक्रिया म्हणजे लेखातून व्यक्त केलेल्या विचारांची किती गरज आहे, याचा पुरावाच मानावा का?

कोणाही व्यक्तीला निव्वळ ती स्त्री आहे म्हणून इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलायची हिंमत कुठून येते?

मेल केलंय, त्यावर आपलं नाव आहे. आता लोकमाध्यमांच्या काळात हे शेअर होईल, आपल्या ओळखीच्या व्यक्तींपर्यंत ते पोचू शकेल, असा कोणताच धाक कसा वाटला नसेल?

मी माझे उद्योग थांबवणार नाही, हे तर निश्चितच. उलट अधिक जोमाने लिहायला यातून उत्तेजनच मिळतं. त्यामुळे या मोहित्यांच्या अजयचे आभारच मानायला हवेत.

(हे लिहिल्यानंतर मुक्ताने शोध घेतला तेव्हा कळलं अजय मोहिते यांचा आयपी अॅड्रेस २०१७पासून २०४ वेळा रिपोर्ट झाला आहे. म्हणजे तो paid trolling agency चा असण्याची शक्यता आहे.)

Comments