swimsuit rounds and beauty pageants

सुचित्रा वर्मा
सौंदर्य स्पर्धा भारतातही आता चांगल्याच रुळल्या आहेत. या स्पर्धा जिंकणाऱ्या अनेक युवती चित्रपट वा जाहिरात क्षेत्रात यशस्वी झालेल्या आपण पाहतो आहोत. सौंदर्यवतीचा किताब जिंकण्यासाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्विमसूट वा बिकिनी फेरी पार करणं आवश्यक असतं. मात्र, आता स्त्रीदेहाचं प्रदर्शन करणारी ही फेरी बाद करण्याचा निर्णय अमेरिकेतील सर्वात मोठ्या सौंदर्य स्पर्धेच्या आयोजकांनी नुकताच जाहीर केला आहे. त्या निमित्ताने या विषयाच्या विविध पैलूंचा आढावा घेणारी ही कव्हर स्टोरी - २६ जून २०१८
बिकिनी किंवा स्विमसूट घालून मंचावर अवतरणाऱ्या युवती ही सहसा कोणत्याही सौंदर्य स्पर्धेतील सर्वाधिक आकर्षक बाब. कमनीय स्त्रीदेह राजरोस पाहण्याची संधीच. या स्पर्धांचं नावच सौंदर्य स्पर्धा (beauty pagaent) असल्याने त्यात सौंदर्याचे सर्व पैलू परीक्षकांसमोर यायला हवेत, हे साहजिकच. अगदी ‘संस्कारी’ भारतात होणाऱ्या मिस इंडिया स्पर्धेमध्येही स्विमसूट फेरी होतेच. अशी ही फेरी यंदापासून बंद करण्याची घोषणा मिस अमेरिका या स्पर्धेच्या आयोजकांनी नुकतीच केली आहे. ‘देहाचे सौंदर्य नको, बुद्धीच्या जोरावर विजेती निवडू,’ असं या आयोजकांनी म्हटलं आहे. आयोजक स्वत: मिस अमेरिका विजेत्या आहेत.

ही फेरी बंद करण्यामागचं मोठं कारण अर्थात #metoo मी टू चळवळ आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत हार्वे वाइन्स्टाइन या चित्रपट निर्मात्यावर अनेक अभिनेत्री व महिला सहकाऱ्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले, त्यानंतर अनेक वर्षं गप्प बसलेल्या शेकडो महिलांनी त्यांच्यावर कामाच्या ठिकाणी वा घरी ओळखीच्या पुरुषांनी केलेल्या अत्याचारांना वाचा फोडली. यातून विशेषकरून कामाच्या ठिकाणी होणाऱ्या शोषणावर चर्चा घडून आली, ते कसं रोखता येईल यावर मतमतांतरं व्यक्त करण्यात आली. सौंदर्य स्पर्धा हे अभिनयाशी मिळतंजुळतं क्षेत्र. अभिनेत्री असाेत वा माॅडेल्स, या स्त्रिया (बहुतांश स्त्रिया म्हणू) तिथे असण्याचा एक महत्त्वाचा निकष त्यांचं शारीरिक सौंदर्य हा असतोच. तसंच या स्पर्धा ही माॅडेलिंगच्या जगात पाऊल टाकण्याची पहिली पायरी समजली जाते. बहुतांश स्पर्धकांना जाहिरात क्षेत्रात जायचं असतं म्हणूनच त्या या स्पर्धेत सहभागी होतात, असं म्हणणं वावगं ठरू नये. या स्पर्धांबद्दल त्या शंभरेक वर्षांपूर्वी सुरू झाल्या तेव्हापासून उलटसुलट चर्चा होत आलीय.
या स्पर्धांच्या माध्यमातून स्त्रियांचं वस्तुकरण होण्यासाठी बळकटी मिळते, असा आरोप होतो. घराघरांतून दूरचित्रवाणी संच आले व त्यांवरनं या स्पर्धांचं प्रक्षेपण होऊ लागलं, त्यानंतर स्पर्धांची संख्या वाढली. प्रेक्षकांची संख्याही वाढली. ती वाढण्यामागे सुंदर स्त्रियांना स्विमसूट/गाउन/साडी आदि विविध पेहरावांमध्ये डोळे भरून पाहायला मिळतं हा मोठा घटक होता. प्रेक्षक वाढले म्हणून जाहिरातदार वाढले. जाहिराती वाढल्या म्हणून उत्पन्न वाढलं, असं हे साधं गणित.

दुसरा एक मतप्रवाह असाही आहे की, स्त्रीच्या शरीरावर तिचा हक्क आहे, तिला ते शरीर कपड्यांनी झाकायचं की स्विमसूट/बिकिनी घालून त्याचं प्रदर्शन करायचं हे ठरवायचा हक्क आहे. तो तिचा निर्णय आहे.कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीला असे तोकडे कपडे घालून परीक्षणासाठी उभं राहाणं तितकं सोपं नाही. अमेरिका वा युरोपसारख्या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यांवर बिकिनी घालणं अगदी साहजिक समजलं जातं. परंतु इतरत्र सार्वजनिक ठिकाणी बिकिनी क्वचितच वापरली जाते. त्यामुळे स्पर्धेतली बिकिनी फेरी तिथेही आव्हानात्मकच असते. भारतातल्या स्पर्धांमध्येही स्विमसूट फेरी होते.
फरक इतकाच की, तेव्हा सर्वसामान्य प्रेक्षक उपस्थित नसतात, केवळ परीक्षकांसमोर ती होते. मिस इंडिया २००५मध्ये शेवटच्या दहा स्पर्धकांमध्ये पोचलेल्या सुचित्रा वर्माला याविषयी विचारलं. ती म्हणाली, ‘या स्पर्धेत स्विमसूट फेरी सर्वात पहिली फेरी असते, म्हणजे तुमचा अर्ज स्वीकारल्यानंतर पहिली परीक्षा होते ती हीच. त्याचा एक उद्देश असतो की, स्पर्धकांनी त्यांच्या शरीरात काही बदल करून घेतलेले नाहीत ना हे तपासणं. किंवा कृत्रिम काही जोडाजोड केलेली नाही ना, हेही. मला स्वत:ला ही फेरी फारशी पसंत नव्हती. परंतु, स्विमसूट घालून मोजक्याच का होईना, परंतु स्त्री/पुरुष परीक्षकांसमोर उभं राहणं, चालून दाखवणं यासाठी प्रचंड आत्मविश्वासाची आवश्यकता आहे. तुम्ही तुमच्या निव्वळ कातडीत किती सहज वावरू शकता, स्वत:ला स्वीकारू शकता, याची मुख्यत्वे ही कसोटी असते.’

जाहिरातींमध्ये काम करणं ही या स्पर्धेत सहभागी झालेल्यांची मनीषा असतेच. जाहिरातींत काम करतानाही स्त्रीदेहाचंच प्रदर्शन मांडलेलं असतं बहुतेक वेळा, त्यामागे काही तर्क असो वा नसो. उदा. रेझरच्या जाहिरातीत स्विमसूट घातलेली स्त्री. परंतु, जर जाहिरातीत काम करायचंय, तर वेगवेगळ्या पेहरावांमध्ये तुम्ही सहजपण वावरणं आवश्यक आहे, म्हणून ही फेरी महत्त्वाची, असं मत सुचित्राने व्यक्त केलं.
जाहिराती वा चित्रपटांमधनं होणारं स्त्रीदेहाचं अनावश्यक (?) प्रदर्शन हा वादाचा मुद्दा आहे. ते योग्य की अयोग्य, याला पुन्हा वर मांडलेले मुद्दे लागू होतात. ती वस्तुस्थिती आहे, हे स्वीकारायला काहीच हरकत नसावी.

मिस अमेरिका स्पर्धेतून स्विमसूट फेरी बंद करण्याच्या निर्णयावरही त्यामुळेच अशा परस्परविरोधी प्रतिक्रिया आल्या आहेत. जर सौंदर्य हा निकष यापुढे लावायचा नाही, स्त्रियांना त्यांच्या कलागुणांवर जोखायचं असेल, तर सौंदर्य स्पर्धा तरी का म्हणायचं, असा प्रश्न उपस्थित झाला आहेच. तसंच, जर स्विमसूट फेरीमुळे स्त्रियांचं वस्तुकरण होतं तर ते साडी नेसून वा गाउन घालून होत नाही का, असाही प्रश्न विचारला गेला आहे.

या स्पर्धेच्या शेवटी सर्व स्पर्धकांना एक प्रश्न विचारला जातो. त्याच्या उत्तरावर अंतिम विजेती ठरवली जाते. हे प्रश्न सर्वसाधारणपणे साचेबंद असतात. भविष्यात काय करायचंय, हे जग सुधारण्यासाठी काय करशील, एक दिवस पंतप्रधानपद मिळालं तर काय करशील, वगैरे वगैरे. या उत्तरांवरनं अनेकदा स्पर्धक त्यांचं हसूही करून घेतात. अत्यंत गरीब कुष्ठरोग्यांच्या सेवेत आयुष्य वेचणाऱ्या मदर तेरेसा बहुतेक स्पर्धकांच्या आदर्श असतात. त्यांच्यासारखं काम त्यांना सगळ्यांनाच करायचं असतं. पण यातली गोम अशी असते की, सर्व स्पर्धकांकडून उत्तरं घोटून घेतलेली असतात. फक्त कोणता प्रश्न येतोय यावर कोणतं उत्तर द्यायचं ते तिने ठरवायचं. म्हणजे या स्पर्धेत बुद्धिमत्तेचा कस तसाही लागत नसतोच. मग ती निखळ सौंदर्य स्पर्धा तरी राहू द्यावी, असाही एक मतप्रवाह आहे.

अशी ही वादग्रस्त फेरी आता भारतातल्या स्पर्धांमध्ये आणखी किती काळ राहाते, ते बघणं रंजक ठरेल.

Comments