The beauty of Football

फुटबाॅल विश्वचषक संपला अखेर. महिन्याभरातले सगळे सामने नाही पाहिले मी, पण बरेच पाहिले. फुटबाॅलचं तंत्र, खेळाडूंच्या पोझिशन्स, प्लेमेकर, खेळाच्या लॅटिन अमेरिकन/युरोपीय शैली, नियम, फाउल, रेड/यलो कार्ड, यातलं फारच वरवरचं मला माहीत आहे. पण या वेळी मी नेटाने ते शिकण्याचा, त्याबद्दल मिळेल तितकं वाचण्याचा प्रयत्न केला. घरी येणारी इंग्रजी वृत्तपत्रं, आॅनलाइन लेख, आणि ट्विटरच्या माध्यमांतून खूप वाचलं. २०१४ची स्पर्धा पहिली असेल जिचा मी खूप आनंद घेतला होता. त्यामुळे यंदा अधिक सजगतेने खेळ पाहिला. तरीही काय बकवास खेळलं इंग्लंड, किंवा ब्राझीलच्या खेळात ती मजा नाही राह्यली, वगैरे कमेंटण्याइतकं नाहीच कळत मला.
पण या विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने खूप वेगवेगळे मुद्दे समोर आले. खेळापलिकडचे.
रशियात स्पर्धा होत्या, पण इंग्लंडचा रशियावर राजकीय बहिष्कार आहे कारण काही रशियन गुप्तचरांना रशियाने इंग्लंडमध्ये मारलंय म्हणे गेल्या काही महिन्यांत, त्यामुळेच इंग्लंडच्या पंतप्रधान रशियात दिसल्या नाहीत, संघ उपांत्य फेरीत पोचला तरी.
रशियाला जेव्हा स्पर्धांचं यजमानपद मिळालं, साताठ वर्षांपूर्वी, तेव्हा देशाची आर्थिक स्थिती वाईट होती. स्पर्धेसाठी उत्कृष्ट दर्जाची स्टेडियम बांधणं हे एक आव्हान होतं. ती तशी बांधली गेली, पण स्पर्धा संपल्यानंतर त्यांचं काय होणार, तिथे आठवडी बाजार भरणार का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. अध्यक्ष पुतिन यांनीही त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय छेडला होता.
स्पर्धेपूर्वी रशियातल्या गुंडागर्दी करणाऱ्या फॅन्सविषयी खूप वाचायला मिळालं होतं. खासकरून रशिया आणि इंग्लंडचे फॅन आमोरासमोर आले तर दंगली घडू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. रशियन फॅन हे व्यायामशाळेत जाऊन शरीर कमावलेले, शिस्तबद्ध हिंसाचार करणारे असतात, अशी त्यांची ख्याती. पण अशा दंगली वा स्टेडियममध्येही फॅन्सनी काही दंगामस्ती केल्याचं दिसलंही नाही, वाचनातही आलं नाही.
रेफ्युजी वा स्थलांतरितांचा प्रश्न गेल्या काही वर्षांत जगातील अनेक प्रगत राष्ट्रांना भेडसावू लागला आहे. तसं स्थलांतर आदिम म्हणायला हवं, परंतु या शतकातलं स्थलांतर प्रामुख्याने युद्धजन्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती यांमुळे अाहे. विशेषकरून युरोप, अमेरिका या देशांत स्थलांतरित विरुद्ध स्थानिक असा एक संघर्ष धुमसतोय, असं चित्र दिसतं. या पार्श्वभूमीवर युरोपातल्या सर्व संघांमध्ये तथाकथित शुद्ध गोरे खेळाडू फारच कमी दिसले. अगदी जगज्जेत्या फ्रान्सच्या संघातही ते मोजकेच आहेत. आफ्रिकन मूळ असलेले अनेक खेळाडू या सर्व संघांमधून महत्त्वाची कामगिरी बजावताना दिसत आहेत. आता तरी फ्रान्सने स्थलांतरितांविषयीचं धोरण उदारमतवादी ठेवावं, अशी अनेक ट्वीट्स आहेत.
या स्पर्धेत सेट पीसेसच्या माध्यमातून झालेल्या गोल्सची संख्या जास्त आहे. म्हणजे पेनल्टी किक, पेनल्टी काॅर्नर, फ्री किक, यांतून झालेले गोल. बाॅल खेळवत (ड्रिबल), पास करत संधी साधून केलेले गोल कमी होते. याचा अर्थ फुटबाॅलसारखा नितांतसुंदर उन्मुक्त खेळही नियोजनबद्ध होत चालला आहे. म्हणूनच कालच्या अंतिम सामन्यात पाॅल पाॅग्बा आणि एम्बापे/मबापे (दोन सामन्यांमध्ये दोन समालोचकांनी असे दोन्ही उच्चार केले त्याच्या नावाचे.) यांचे गोल प्रेक्षणीय आणि अानंददायी होते. इथे डेटा सायंटिस्टांचा उल्लेख उचित ठरेल. कोणत्या संघाचे कोणतेे खेळाडू कसे खेळतात, याची सेकंदासेकंंदाची माहिती आता उपलब्ध असते, तिचं विश्लेषण करून कोणी कसंं खेळावं, हे आधीच ठरवलं जातं, खेळाडूंनी या नियोेजनानुसार, आखणीनुसारच खेळणं अपेक्षित असतं. यामुळे हळूहळू कदाचित या नैसर्गिक खेळातलं सौंदर्य नष्ट होईल, अशी भीती अनाठायी वाटत नाही.
अत्यंत देखण्या, हाॅट फुटबाॅलपटूंबद्दल लिहिलं नाही तर हे लिखाण अधुरं होईल. डेव्हिड बेकम हा माझ्या मर्यादित फुटबाॅलप्रेमाच्या काळातला कदाचित पहिला देखणा इसम. जर्मनीच्या संघातला बास्टियन श्वाइनस्टायगर मला आवडायचा. ('चक दे'मधला कबीर खान ज्याच्यासारखा होता, तो जोकिम लो काही हाॅट वगैरे नव्हे, पण खूपच आवडणारा. मॅनेजर/कोचबद्दल बोलतोय तर इंग्लंडचा 'वेस्टकोट'धारी गॅरेथ साउथगेटचा उल्लेख हवाच. गाेल झाल्यानंतरही चेहऱ्यावरची माशी ढळू न देणारा क्रोएशियाचा कोच डालिचही लक्षात राहिलेला.) यंदाच्या मोसमातले आॅलिविए जिरू, हॅरी केन, हे दोघे खास होते. मबापेचं हसू आणि गोल केल्यानंतर दोन्ही हात काखेत घालून स्तब्ध उभं राहाणं पाहून शाळेतला मस्तीखोर मित्र डोळ्यांसमोर येतो. मैदानात जरासाही धक्का लागल्यावर लोळणफुगडी घालणारा नेमार तर फुटबाॅल न आवडणाऱ्यांनाही माहीत झाला. त्याच्यावरचे विनोद अतिशयोक्त असले तरी एक बाब लक्षात ठेवायलाच हवी की, नेमारला फाउल करण्याचा, त्याच्या खेळावर बंधन आणण्याचा, प्रसंगी त्याला जखमी करण्याचा प्रयत्न हरेक प्रतिस्पर्धी करतो. त्याचे फाटके मोजे याची साक्ष देतात, टॅकल करणाऱ्याच्या स्पाइक्स असलेल्या बुटांमुळे त्यांची ही अवस्था होते. हेअरबँड लावणारा मानेवर केस रुळणारा धाकटा भाऊ असा असावा असं वाटायला लावणारा लुका माॅड्रिच तर खूप काळ मनात रेंगाळत राहील. आणि त्याची आसवं पुसणारी क्रोएशियाची अध्यक्ष कोलिंदाही. फ्रान्स जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करणारा फ्रान्सचा तरुण अध्यक्ष मॅक्राँ, केवळ आपल्या डोक्यावर छत्री आहे हेही लक्षात न आलेला, किंवा तसं न दाखवलेला, रशियाचा सर्वेसर्वा व्लादिमिर पुतिन, या छब्या यंदाच्या स्पर्धेतल्या काही अविस्मरणीय क्षणांमध्ये नक्की जमा होणाऱ्या. या समारोपाच्या सोहळ्याच्या वेळी गतविजेत्या जर्मनीचा कर्णधार फिलिप लाम चषक घेऊन आला आणि काही क्षणांत दिसेनासा झाला. सामना संपल्यापासून चषक प्रत्यक्ष येईपर्यंत जवळपास वीस मिनिटं गेली. त्या वेळात फ्रेंच खेळाडू सेल्फी काढत होते, आनंदाचे व्हिडिओ काढत होते. क्रोएशियाचे खेळाडू थकूनभागून मैदानात बसून राहिले होते. या वेळात स्टेडियममध्ये मोठ्या पडद्यावर सामन्यातले गोल दाखवत होते. फ्रान्सचा कर्णधार व गोलरक्षक लाॅरिसच्या निव्वळ ढिसाळपणामुळे एक गोल झाला होता, तो पाहताना लाॅरिस खजील झाला, पण नंतर चक्क आपल्याच मूर्खपणावर हसत सुटला. 
इंग्लंड आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये त्यांच्या संघाबद्दल अगदीच तुरळक कुतूहल होतं. आपला संघ विश्वचषकात सहभागी होण्यास पात्र ठरलाय, याचं कौतुक वगैरे कमीच. त्यात ब्रेक्झिटमुळे इंग्लंडमधली अंतर्गत समीकरणं बदललेली. परंतु इंग्लंड जसं शेवटच्या आठ संघांमध्ये पोचलं, तसं It's coming home हे काही दशकांपूर्वी फुटबाॅलच्याच संदर्भात लिहिलेलं गाणं अचानक वर आलं आणि नंतर ओकारी येईल इतक्या वेळा हे शब्द कानांवर पडले, डोळ्यांसमोर आले. इंग्लंडच्या हवाई दलानेही या अक्षरांच्या फाॅरमॅटमध्ये फ्लायपास्ट केला. तेव्हा पाहायला मस्त वाटलं, पण इंग्लंड हरल्यानंतर हा सगळा तमाशा वाटू लागला. त्याउलट बेल्जियमच्या संघाचं आगमन कांस्यपदकांसह झालं मायदेशात, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी जमलेला समुदाय पाहून संघ थक्क झाला. अगदीच अनपेक्षित होतं त्यांच्यासाठी ते. त्यांना फ्रान्सकडून हरल्याची खंत वाटत होती, पण देशवासियांसाठी ते सगळे हिरो होते. (हा सामना पाहताना थिअरी आॅन्रीच्या मनात काय चाललं असेल, असं मला सारखं वाटत होतं. आॅन्री हा फ्रेंच खेळाडू, बेल्जियमच्या कोचिंग स्टाफचा एक सदस्य. त्याने जेव्हा हे काम घेतलं असेल तेव्हा कधीकाळी विश्वचषकात हे दोन देश एकमेकांसमोर येतील, असं वाटलं असेल का त्याला?) इंग्लंड आणि फ्रान्स शेवटच्या चार संघांमध्ये जागा मिळवतील, अशी पुसटशीही शंका त्यांच्या देशात कोणाला नव्हती. पण आपला संघ चक्क विश्वचषक जिंकू शकतो, हे लक्षात आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये एक उत्साहाची लाट आली. लाडक्या खेळाडूंच्या नावांचे टीशर्ट वेगाने खपू लागले. एकोप्याची भावना, आपल्या फुटबाॅलपटूंबाबत प्रेम जणू नव्याने जन्माला आलं. साउथगेट यांनी या भावनेचा पराजयानंतरच्या मुलाखतीत आवर्जून उल्लेख केला आहे. इंग्लंड जिंकलं तर अर्थव्यवस्थेलाही उजळा मिळेल, अशीही एक आशा होती, ती मात्र धुळीला मिळाली.
मी क्लब फुटबाॅल पाहात नाही. भारतात, माझ्या परिचयातही बुंडेसलिगा, कोपा अमेरिका, युरो वगैरे स्पर्धा पाहण्यााऱ्यांची, वेगवेगळ्या क्लबचे फॅन असणाऱ्यांची मोठी संख्या आहे. खरंतर इंग्रजी वृत्तपत्रांमधून या स्पर्धांची सुरेख वर्णनं, बातम्या, विश्लेषणं नियमित येत असतात. तरीही त्यातले सामने पाहण्यासाठी मी आजवर वेळ काढलेला नाही, हे खरंच. मेसी आणि रोनाल्डो आपापल्या क्लबसाठी जसे खेळतात, तसे देशाच्या संघासाठी खेळत नाहीत, ही या स्टार खेळाडूंविरुद्धची मोठी तक्रार. या दोघांना त्यांच्या क्लबमधील इतर उत्तम सहकाऱ्यांची जशी साथ मिळते, तशी देशाच्या संघाकडून मिळत नाही, असं स्पष्टीकरण यासाठी दिलं जातं. क्लबवरनं आठवलं की, इंग्लंडच्या क्लब्समध्ये खेळणारे केवळ ३३ टक्के खेळाडू इंग्लंडचे नागरिक असतात, इंग्लंडच्या संघाकडून खेळण्यासाठी पात्र असतात. बाकीचे खेळाडू बाहेरच्या देशांमधले असतात. हा प्रकार लॅटिन अमेरिका वा युरोपातल्या अन्य देशांमध्ये तितकासा होत नाही. त्यामुळे इंग्लंडमध्ये खेळणारे अनेक प्रतिभावान फुटबाॅलपटू असले तरी देशासाठी संघ निवडताना त्यांचा विचार करता येत नाही.
विश्वचषक स्पर्धा सुरू झाल्या तेव्हापासून अनेक धक्के मिळत गेले. गतविजेता जर्मनी साखळीतच बाहेर फेकला गेला. ब्राझील, अर्जेंटिना, हेही लवकर बाहेर पडले. स्टार खेळाडूंना चमक दाखवता आली नाही. ज्याच्या  नावाची खूप चर्चा होती तो इजिप्तचा मो सलाह त्यातलाच. पण त्या फेऱ्यांमधलेही सामने थरारक झाले. इराणचा सामना सुरू असताना, इराणमध्ये एका स्टेडियममध्ये भल्यामोठ्या पडद्यांवर त्याचं थेट प्रक्षेपण सुरू होतं, आणि ते पाहण्यासाठी प्रथमच इराणमधील महिलांना परवानगी देण्यात आली होती. सौदी अरेबिया वि. रशिया हा उद्घाटनाचा सामना पाहण्यासाठी अनेक सौदी महिला सहकुटुंब आल्या होत्या. ही फारच लक्षणीय बाब होती या स्पर्धेतली. युरुग्वेचा संघ उत्तम खेळत होता. जपानच्या संघाने यंदा प्रथमच लागू केलेल्या चांगल्या वर्तनाच्या मुद्द्याच्या जोरावर वरच्या फेरीत प्रवेश मिळवला आणि त्यांच्या फॅन्सनीही सामना संपल्यानंतर, पराजय झाला असतानाही, स्टेडियममधला कचरा उचलून जगभरातून वाहवा मिळवली.
क्रोएशियासारखा छोटासा, विकसनशील देश विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोचतो, आणि आपण मात्र अजून हिंदुमुस्लिम खेळतोय, हे क्रिकेटपटू हरभजन सिंह याचं ट्वीट बोचरं आहे. दुर्दैवाने त्यात तथ्य आहे. आणखी किती वर्षं आपण फक्त प्रेक्षक म्हणून या स्पर्धा पाहायच्या, हा प्रश्न आहेच. तसं पाहायला गेलं तर माझ्या बहुतांश मैत्रिणींना फुटबाॅलमध्ये काडीचाही, की बाॅलचाही (?) रस नाही. पण अपवाद आहेतच. एकदा ट्रेनच्या गर्दीत आमची चर्चा रंगली. तर शेवटच्या तीन सामन्यांच्या वेळी मी आणि अस्मिता आॅनलाइन होतो, आणि एकमेकीशी शेअर करत होतो.
सुरुवातीला म्हटलंय की, २०१४ हा माझ्या स्पष्ट आठवणींतला पहिला फुटबाॅल विश्वचषक. पण २००६ आणि २०१०च्या स्पर्धेतले काही सामने मी पाहिला असावेत. नाहीतर झिनेदीन झिदानेने मातेराझीला दिलेली धडक मला लक्षात राहिलीच नसती. आणि पिअरलुइजी कोलिना हा इटालियन रेफरी तर मी कधीच विसरू शकत नाही. तब्बल सहा वेळा कोलिना यांना सर्वोत्तम रेफरीचा फिफाचा पुरस्कार मिळाला आहे. इटलीचाच गोलरक्षक गिआनलुइजी बुफाँ माझा फेवरिट होता.
तरीही या स्पर्धेनं मला अतिशय आनंददायी, उत्कंठावर्धक, थरारक क्षण अनुभवायची संधी दिलं, हे निश्चित. कालच्या अंतिम सामन्यानंतर क्रोएशियाच्या खेळाडूंना रडू आवरत नव्हतं, पण फ्रान्सच्या खेळाडूंचेही डोळे पाणावले होते. हे फार हृदयस्पर्शी होतं. या खेळावरचं, माणसांच्या जिवंतपणावरचं प्रेम वाढवणारं होतं.

Comments