whatsapp university ka gyan

भात कुकरमध्ये करू नका, भाज्या चिरल्या चिरल्या लगेच वापरा, फळं चिरून ठेवू नका, कणीक फ्रिजमध्ये ठेवू नका... एक ना दोन. व्हाॅट्सअॅप विद्यापीठातून असे धडे दरराेज सगळ्यांनाच मिळत असतात. त्यात खाली एखाद्या वैद्याचं किंवा डाएटिशियनचं नाव टाकलं, किंवा आयुर्वेदात शेकडो वर्षांपूर्वी असं लिहिलंय अशी पंचलाइन टाकली की एकदम बेष्ट काम. (आयुर्वेदाशी माझं काहीही वाकडं नाही. मी कधीतरी आयुर्वेदिक उपचार घेतेही. पण...)
अरे पण लेको, पूर्वीच्या बायकांना स्वयंपाकघराबाहेर पडायलाच वाव नसायचा, वीज नसल्याने चुलीवरच स्वयंपाक करावा लागायचा, 'साडेसात वाजले डबा कसा झाला नाही अजून?' असं म्हणणारी पुरुषमंडळी नसायची, हे आपण लक्षात ठेवायला हवं. मुंबईत किंवा कोणत्याही शहरात राहणाऱ्या, नोकरी करणाऱ्या, सर्वसामान्य भारतीय पुरुष जितकी घरातली कामं शेअर करतात तितकीच (म्हणजे जवळपास शून्य ) कामं करणाऱ्या कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या बाया कुकरशिवाय वरणभात रोज करू शकतील का? भाज्या आदल्या दिवशी चिरून फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी करण्याची सोय आहे म्हणून पोटात भाज्या जातात तरी वेगवेगळ्या. नाहीतर बटाटा, कोबी वगैरे चिरायला सोप्या भाज्या किंवा उसळीच रोज केल्या गेल्या असत्या. फळं चिरून ठेवायची नाही मान्यच, कोणी काम कमी व्हावं म्हणून तसं करत नसतं. पण मुलांना डब्यात अख्खं सफरचंद किंवा पेअर किंवा आंबा वगैरे द्यायचं का मग? कणीक फ्रिजात ठेवू नका, भूत येतं म्हणे, असा एक व्हिडिओ आला होता मध्ये. रोज सकाळसंध्याकाळ कणीक भिजवून द्या, इतकंच सांगणं असं म्हणणाऱ्या व्यक्तीला मग.
नाॅनस्टिक वापरू नका, लोखंड किंवा बिडाची भांडी वापरा, असंही सांगतात हल्ली. बिडाची भांडी मेंटेन करायला किती वेळखाऊ आहेत पण. त्याला म्हणे दरवेळी स्वच्छ केल्यानंतर तेल लावून ठेवावं लागतं.
काल इथेच एक फेसबुक पेज पाहिलं, हेल्दी ब्रेकफास्ट पदार्थ सुचवणारं. एक मेनू होता, केळं, अंडं, १० बदाम, ४ खजूर आणि बरंच काही. एवढं सगळं घरातल्या चार माणसांनी रोज खायचं तर दिवाळं निघेल ना राव.
मिक्सरमध्ये वाटलेल्या चटणीला काही चव नसते राव, खरी चटणी खलातच कुटलेली हवी, असाही एक सूर अनेकदा निघत असतो. ठीकेय, खलबत्ता किंवा पाटावरवंटा वापरावा की सल्ला देणाऱ्यांनी. नाहीतर चटण्याच बाद करा स्वयंपाकातून.
चुलीवरची भाकरी किंवा चुलीवरचा स्वयंपाक हे आणखी एक नवीन प्रस्थ. पेटवा चुली आणि बसा फुंकत लाकडं, आमची काही हरकत नाही हो.
जेवताना पाणी पिऊ नये, आधी पिऊ नये, नंतर पिऊ नये वगैरेही मधनंच फेकलं जात असतं. एक दिवस आधी प्यावं, एक दिवस जेवताना प्यावं आणि एक दिवस नंतर प्यावं, हेच बरं नै मग.
ऋजुता दिवेकरांच्या नावानेही अनेक मेसेज येतात. ऋजुता आॅलमोस्ट झिरो फिगर असल्याने सगळे अधाशासारखे ते मेसेज वाचतात आणि त्यात लिहिलेलं अनुसरायचा प्रयत्न करतात. भारतीय जीवनपद्धतीचाच ती प्रसार करत असते खरं तर. पण ती तितकाच व्यायामही करत असते, हे आपण लक्षात घेत नाही. दिवसातनं दोनदाच खा ते दिवसातनं चारपाच वेळा थोडंथोडं खा, असेही दोन टोकाचे सल्ले मिळत असतात. शेवटी आपण जे काही खाऊ ते पचवायची ताकद आपल्याकडे आहे की नाही, हे आपलं आपल्यालाच माहीत असतं ना. मग आपली जीवनपद्धती आहे तसं खा, पचवा, मस्त राहा.
हे सल्ले वाचून माझ्यासारख्या अनेकांचं मनोरंजन होतं. परंतु असे मेसेजेस रोज समोर आले तर ते वाचून आधीच कामाच्या ओझ्याखाली आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या (दुसऱ्यांनी दिलेल्या) अपराधगंडाने पिचलेल्या बायांना न्यूनगंड येऊ शकतो की, मी माझ्या कुटुंबासाठी असा आरोग्यदायी स्वयंपाक नाही करू शकत. माझं काहीतरी चुकतंय, मी कमी पडतेय.
तर बायांनो, आणि स्वयंपाक करणाऱ्या पुर्षांनोही, हे सल्ले फाट्यावर मारा आणि तुम्हाला सोयीस्कर, आवडीचा, पोटभर, पौष्टिक स्वयंपाक करा, खा आणि खाऊ घाला. कारण सल्ले देणारी व्यक्ती ना तुम्हाला डाळिंब्या सोलून देणार असते ना भाकरी करून घालणार असते.
एक आहे की, घरातले सर्व सदस्य कामं शेअर करत असतील, तर आदर्श, आयुर्वेदाने सांगितलेल्या पद्धतीने स्वयंपाक होऊ शकतो. एकटी बाई करणार असेल, तर तिने तिचं तिचं ठरवावं काय आणि कसा स्वयंपाक करायचा ते.

Comments